नवीन लेखन...

मदत मागणे.. मदत घेणे ! (बेवड्याची डायरी – भाग १९)

आज सकाळी मला अगदी प्रसन्नपणे जाग आली ..बहुतेक शरीरावरील दारूचा प्रभाव संपला असावा ..उठल्याबरोबर अगदी फ्रेश वाटत होते ..शांत झोप झाल्याचेच हे लक्षण ..दारूच्या नशेत झोपल्यावर सकाळी उठतांना खूप जीवावर येई ..अंग जड पडलेले ..चुरचुरणारे डोळे ..डोके सुन्न ..अशी अवस्था असे ..शिवाय उठल्या बरोबर आज दारूचा बंदोबस्त कसा होईल ..पैसे कोठून आणायचे ..काल रात्री नशेत अलकाशी केलेलं भांडण ..हे सर्व आठवायचे आणि अंथरुणातून उठूच नये असे वाटायचे ..पुन्हा आता उठून कामावर जायचे ..दिवसभर ऑफिसमध्ये मान मोडून काम …सहकाऱ्यांच्या कुत्सित मुद्रा ..वगैरे सगळे सगळे नकोसे होई ..पटापट तोंड धुवून मी अंघोळ उरकली ..सकाळी सकाळी मी एकदम अंघोळ वगैरे करून पी .टी. ला तयार झाल्यावर शेरकर काकांनी विचारलेच ..” विजयभाऊ काय विचार आहे आज ? ..घरी जाणार की काय ? “..त्यांना हसून म्हंटले ‘ आता काही दिवस हेच घर समजायचे ..इथे सगळे शिकून मगच बाहेर जायचे असे ठरवलेय “..माझ्या उत्तराला त्यांनी हसून टाळी दिली ..वर टोमणा मारला ..म्हणजे कायमचे राहणार की काय इथे ? मी देखील त्यांना टोला दिला ” त्यात काय विशेष ? तुम्ही आहातच की सोबतीला ” हा टोला त्यांना लागला असावा ..नुसतेच गालातल्या गालात हसत चूप बसले …

पी.टी आटोपून चहा घेताना ..बाजूला बसलेल्या एकाने त्याच्या लॉकर मधून त्याच्या पत्नीने काल आणलेला चिवडा आणला ..मलाही चिवडा घ्या असा आग्रह करू लागला ..मला आश्चर्य वाटले .. काल याचे पालक भेटायला आल्यावर याने खूप तमाशा केला असे ऐकले होते ..हा म्हणे पत्नी भेटायला आल्यावर सुमारे १० मिनिटे नुसताच तिच्या शेजारी बसून होता ..ती बिचारी बडबड करत होती ..हा घुम्यासारखा बसलेला ..मग म्हणाला ..झाले ना तुझे समाधान ?.. पंधरा दिवस राहीलोय मी इथे …. सगळे शिकलो ..यापुढे दारू पिणार नाही असे वचन देतो तुला ..आता घरी घेवून चल मला..नाहीतर मी कायमचा इथे रहातो ..तू सांभाळ मुले ..माझी नोकरी ..ती हबकलीच बिचारी …तिला भेटण्या पूर्वी सरांनी कल्पना दिली असावी की ते घरी घेवून चल म्हणून हट्ट करतील ..

मात्र अगदी या पातळीवर येऊन धमक्या देतील असे वाटले नसावे तीला..ती रडू लागली ..ते पाहून एका कार्यकर्त्याने याला विचारले देखील काय झाले म्हणून ..तर हा म्हणाला की ” ती मला घरी चला म्हणतेय ..आणि मी म्हंटले की अजून काही दिवस रहातो म्हणून तिला वाईट वाटले “..याने कार्यकर्त्याला पाहून एकदम पलटी मारली होती ..शेवटी सर्वाना समजलेच कि हा हट्ट करतोय घरी जाण्याचा ..याला सरांनी समजावले ..मग शांत झाला ..मात्र पत्नीने घरून याच्यासाठी आणलेल्या खाण्याच्या वस्तू घेणे याने नाकारले होते ..सरांनी मग ते पदार्थ ऑफिस मध्ये ठेवून घेतले ..पत्नीची समजूत घालून तिला पाठवले ..नंतर एक तासाने हा ऑफिस मध्ये गेला ..आणि ‘ सर अहो तिची गम्मत करत होतो मी ‘ ..असे स्पष्टीकरण देवून ..ते खाण्याचे सामान परत घेवून आला होता …मी त्याला नम्रपणे नकार देवून ..तेथून उठलो …

आजच्या समूह उपचारा मध्ये सरांनी ..मदत घेणे ..मदत मागणे या विषयावर चर्चा केली …प्रत्येक व्यसनी व्यक्तीला आपण कोणाचीही मदत न घेता व्यसन सोडू शकतो असा खोटा आत्मविश्वास असतो ..एकतर मुळातच आपण व्यसनी आहोत हे त्याला मनापासून मान्य नसते ..त्यात कोणाची मदत घेणे म्हणजे त्याला खूप कमीपणा वाटतो ..खरे तर मदत घेण्यात कोणताही कमीपणा नसतो ..उलट व्यसनाच्या आकर्षणाशी लढण्यासाठी स्वतची शक्ती वाढवणे असते मदत घेणे म्हणजे ..अल्कोहोलिक्स अँँनाँनिमसच्या पहिल्या पायरी मध्ये जसे आपण व्यसनी झाल्याची मनोमन काबुली देणे आणि व्यसनामुळे आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होतोय हे समजून घेण्यास सांगितले आहे ..तसेच पुढे दुसऱ्या पायरीत म्हंटले आहे ” आम्ही या विश्वासाप्रत पोचलो की आमच्याहून उच्च असलेली शक्तीच आम्हाला पुन्हा गमावलेले शहाणपण मिळवून देण्यास मदत करेल ” याचा अर्थ स्पष्ट आहे की आपणच जगातील सर्वात शक्तिशाली ..बुद्धिमान ..वगैरे नसून आपली समस्या सोडवण्यासाठी दुसरा कोणीतरी आपल्याला मदत करू शकतो यावर विश्वास ठेवणे होय ..

अगदी जन्म झाल्यापासून कोणा ना कोणाच्या मदतीनेच आपण मोठे होत गेले आहोत ..हे सत्य आपण नाकारता कामा नये ..तसेच व्यसना पासून मुक्ती मिळावी यासाठी निसंकोच मदत मागितली पाहिजे ..जसे इतर शारीरिक आजारात आपण डॉक्टर ..औषधे यांची मदत घेतोच ..मग हा तर शारीरिक आणि मानसिक असा दोन्ही प्रकारचा आजार आहे ..अल्कोहोलिक्स अँनानिमसची किवा व्यसनमुक्ती केंद्राची ..समुपदेशकाची ..कुटुंबियांची व्यसनमुक्तीसाठी मदत घेण्यास कमीपणा वाटून घेवू नये ..अहंकारामुळे बहुतेक व्यसनी ‘ मी माझा माझा सोडून देईन व्यसन ‘ ..माझ्या विल पाॅवर वर मी सोडू शकतो ..मला कोणाच्या मदतीची गरज नाही वैगरे विचार करतो आणी स्वताचेच नुकसान करून घेतो..व्यसनाधिनता या मनोशारीरिक आजाराची व उपचारांची शास्त्रीय माहिती घेण्यासाठी तसेच उपचारांसाठी मदत घेण्यात कमीपणा मानणे हे स्वताच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे ..अनेक जण मदत न घेण्याच्या अहंकारापोटी मृत्युच्या स्वाधीन होतात हे एक कटू सत्य आहे..

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..