नवीन लेखन...

नातलगांच्या भेटीची ओढ ! (बेवड्याची डायरी – भाग १४)

मला विचारलेल्या कौटुंबिक प्रश्नांनी मी मनातून हललो होतो ..मी केलेल्या अनेक चुकांची नव्याने जाणीव होत होती ..स्मृतीच्या पडद्या आड गेलेल्या घटना एका नव्या स्वरुपात माझ्यासमोर उघड होत होत्या ..दारू पिण्याच्या काळातले माझे वर्तन अलकाने कसे सहन केले असेल ते जाणवून हृदयात खळबळ उडाली होती ..उरलेल्या प्रश्नांची कशीबशी उत्तरे देवून मी केबिन मधून विषण्णपणे बाहेर पडलो ..अलकाची आणि मुलांची तीव्रतेने आठवण येत होती ..त्यांना भेटायची ओढ जागृत झाली ..मी माँनीटर कडे जावून ..मला सरांना भेटायचे आहे असा आग्रह करू लागलो ..तो म्हणाला तुमचे नेमके काम काय आहे ते सांगा ..काही त्रास होत असेल तर मी औषध देतो .. विशेष काम असल्याखेरीज सरांना भेटता येणार नाही ..मी हट्टालाच पेटलो ..शेवटी त्याने मला बाहेर जाण्यास परवानगी दिली ..
बाहेर ऑफिसमध्ये दोन तीन कार्यकर्ते आणि सर बसलेले होते ..माझा चेहरा पाहून कदाचित त्यांना माझी अवस्थता जाणवली असावी ..’ काय हो ..विजयभाऊ कंटाळलात की काय इथल्या वातावरणाला ‘ एका कार्यकर्त्याने विचारले ..त्याच्याकडे दुर्लक्ष करत मी सरांच्या समोरच्या खुर्ची वर बसलो ..” बोला ..कसे वाटतेय इथे ” सरांनी प्रसन्नतेने विचारले ..” मला घरी फोन करायचा आहे ” असे म्हणताच सर म्हणाले ” आम्हाला वाटलेच होते ..अहो पण इथे दाखल झाल्यावर सुमारे पंधरा दिवस नातलगांशी संपर्क करता येत नाही ” सरांनी सरळ नियमावर बोट ठेवत मला सांगितले ..” सर मी इथे राहायला तयार आहे ..फक्त मला एक फोन करून अलका आणि मुले कशी आहेत याची चौकशी करायची आहे ….

गेल्या तीन दिवसांपासून घरी काय चाललेय याची मला काहीच माहिती मिळालेली नाहीय ..मुलांची शाळा वगैरे माहिती हवीय मला ..मी घरी जाण्याचा हट्ट करत नाहीय ” मी माझा मुद्दा पुढे रेटत होतो ..सर हसून विनोदाने म्हणाले ” विजयभाऊ कुटुंबियांची सर्वात मोठी काळजी इथे दाखल आहे म्हंटल्यावर सगळे काही तिकडे सुरळीतच असणार ..आपण घरी असलो की जास्त समस्या असतात ” …” सर पण ..जर मी कुटुंबियांना घरी घेवून चला असा हट्ट करणार नसेन ..इथे मी पूर्ण उपचार घेतो असे चांगले सांगणार असेन ..तर माझ्या मानसिक समाधानासाठी मला घरी फोन लावून द्यायला काय हरकत आहे ” मी एकदम अचूक मुद्दा मांडला …

” हे बघा विजयभाऊ व्यसनमुक्ती केंद्रातील नियम हे उगाच आमच्या मनात आले म्हणून बनवलेले नसतात तर त्या प्रत्येक नियमामागे मानसिक उपचार दडलेले असतात ..व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाल्यावर पहिले पंधरा दिवस काही विशेष कारण असल्याशिवाय नातलग तुम्हाला संपर्क करू शकत नाहीत ..कारण व्यसन बंद केल्यानंतरच्या सुरवातीच्या काळात ..व्यसनी व्यक्तीला अनेक प्रकारचे शारीरिक व मानसिक त्रास होऊ शकतात ..अशा वेळी घरी जाण्याची ओढ असते मनात ..जर संपर्क झाला तर बहुतेक जण ..मला इथे खूप त्रास आहे ..इथली व्यवस्था मला आवडली नाही ..आता मी घरी येतो ..या पुढे मी अजिबात व्यसन करणार नाही ..वगैरे प्रकारचे बोलून कुटुंबियांना घरी नेण्यास आग्रह करतात ..

जर कुटुंबीयांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले तर चिडतात …धमक्या देतात ..म्हणून असा संपर्क फक्त पहिले पंधरा दिवस उलटून गेल्यावर रविवारीच करता येतो ..आम्ही येथे कुटुंबियांच्या भेटीसाठी रविवार ठरवलेला आहे ..तेव्हा पंधरा दिवस झाल्यानंतर येणाऱ्या रविवारी नक्की तुमचे कुटुंबीय तुम्हाला भेटायला येतील ..असा मध्ये संपर्क करता येणार नाही ..” सरांनी मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला ” पण सर मी घरी जाण्याचा हट्ट अजिबात करणार नाही हे तुम्हाला आधीच सांगितले आहे .. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे ..मी एकही वावगं शब्द बोलणार नाही अलकाशी “..मी माझा घरी फोन करायचा हट्ट चालूच ठेवला .

” विजयभाऊ मला खात्री आहे कि तुम्ही हट्ट करणार नाही ..तुम्ही शब्द दिलाय तसे वागाल तरीही तुम्हाला मी घरी फोन करू देणारा नाहीय ..याचे कारण असे की एकदा कुटुंबियांशी बोलणे झाले की तुमचे मन इथून बाहेर.. घरी जाईल ..इथे फक्त शरीर राहील ..उरलेले सगळे दिवस तुम्ही घरचाच विचार करत बसाल इथे ..एक व्यसनी व्यक्ती हा मुळातच खूप चंचल असतो ..शिवाय खूप भावनाप्रधान देखील ..कुटुंबीयांशी संपर्क झाला की आपले आताचे विचार बदलू शकतात हे दुसरे कारण ..शिवाय तुम्हाला इथे कुटुंबियांच्या तुमच्यावरील प्रेमाची..त्यांच्या त्यागाची ..त्यांनी भोगलेल्या त्रासाची जाणीव व्हावी असाच आमचा हेतू आहे ..त्यांचा विरह सहन करत गेले तरच ती जाणीव सखोल होण्यास मदत मिळेल ..आता संपर्क झाला आणि तुम्ही पत्नीला ‘सॉरी ‘ म्हंटले म्हणजे काम पूर्ण होत नाही ..व्यसनामुळे आपल्याला प्रिय व्यक्तींचा दुरावा सहन करावा लागतोय हे तुम्ही नीट समजून घेतले तर ….या पुढे तुम्ही कुटुंबियांच्या भावना समजून घेवू शकाल ..”

” व्यसनाधीनता या धूर्त आजाराचा भाग असा आहे की व्यसन बंद केल्यावर काही दिवस व्यसनी व्यक्ती अतिशय अवस्थ असतो ..त्याला बाहेरच्या अनेक गोष्टींची आठवण होत राहते ..पूर्वी लांबवलेली कामे ..नोकरीवरील समस्या ..कुटुंबातील समस्या ..विम्याचा न भरलेला हप्ता ..गाडीचा हप्ता .बँकेचे देणे ..वगैरे गोष्टी त्याला अवस्थ करतात ..व कसेही करून तो लवकरात लवकर इथून बाहेर पडावे या मनस्थितीत जातो ..साहजिकच उपचार घेण्यातील त्याचे लक्ष उडते ..म्हणून हा नियम आम्ही केला आहे ..अहो तुम्हीच नाही तर कुटुंबियाना देखील आम्हाला हे सगळे समजावून सांगून संपर्क करण्यास मनाई करावी लागते..काही कुटुंबीय घरातील व्यसनी व्यक्ती इथे दाखल केल्यावर ..दिवसरात्र आम्हाला फोन करत राहतात ..त्याची आठवण येते सांगतात ..त्यच्याशी एकदा बोलता येईल का ? त्याला दुरून पाहता येईल का ? वगैरे प्रश्न विचारून भंडावून सोडतात ..काही जण तर अगदी ‘ तो जेवतो का ? झोपतो का ? किती जेवतो ? काही म्हणतो का ? आमची आठवण काढतो का ?असे प्रश्न विचारतात ..

त्यानाही आम्ही हेच सांगत असतो ..की काही काळजी करू नका ..इथे सर्व व्यवस्थित आहे ..त्याच्याशी संपर्क पंधरा दिवसानंतर येणाऱ्या रविवारीच करता येईल ..एक प्रकारे नातलगांसाठी देखील हा एक मानसिक उपचार असतो ..एरवी त्यांचे सगळे लक्ष व्यसनी व्यक्ती भोवती केंद्रित झालेले असते ..आता तो दूर आणि व्यसन करणार नाही असा सुरक्षित ठिकाणी आहे म्हंटल्यावर त्यांनी देखील त्याची काळजी करणे बंद करावे अशी आमची इच्छा असते ” सरांनी इतके सविस्तर उलगडून सांगितल्यावर मी माझा हट्ट सोडणे योग्य समजले ..संमती दर्शक मन हलवून सरांचा निरोप घेतला ..वार्डात येवून बसलो ..म्हणजे आता बाहेरचे घरातील सर्व विचार सोडून इथल्या उपचार पद्धतीवर लक्ष केंद्रित करायचे होते तर ..चला काही दिवसांचाच तर प्रश्न आहे ..नाहीतरी घरी असतानाही माझे वर्तन घरात असून नसल्यासारखेच होते ..मला कोणाचीच पर्वा नव्हती ..

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..