नवीन लेखन...

मानसोपचार तज्ज्ञांची भेट ! ( बेवड्याची डायरी -भाग २३ वा )

मला आता येथील वास्तव्यात आठवडा होत आला होता ..बहुतेक येथील सर्वांशी ओळखी झालेल्या होत्या ..केवळ दारूचेच व्यसनी नव्हे तर इथे निरनिराळी इतर व्यसने करणारे देखील लोक दिसले ..त्यापैकी काही व्यसनांची तर नावे देखील मी प्रथमतः ऐकली होती ..’ व्हाईटनर ‘ .सुंघणारे…तसेच ‘ फोर्टविन ‘ व वेदनाशामक इंजेक्शने घेणारे ..एकाच्या तर दोन्ही हातावर खूप जखमा आढळल्या ..मी त्याला त्या जखमांचे कारण विचारले तर त्याने सांगितले की मोटार सायकल घसरून झालेल्या अपघातात हे लागले आहे ..जखमा अजून बऱ्या झालेल्या नाहीत ..माझा यावर विश्वास बसत होता ..त्याच वेळी तेथे आलेल्या माँनिटरने मला माहिती पुरवली की हा खोटे बोलतोय ..या जखमा अपघाताने नव्हे तर इंजेक्शन घेताना त्याची सुई वारंवार ‘ आउट ‘ गेल्याने झालेल्या आहेत ..

हा जे वेदनाशामक इंजेक्शन नशा म्हणून वापरतो ..त्याचे मिश्रण सिरींजमधून हाताच्या शिरेत घेताना ..घाईघाईत किवां शिरेचा योग्य अंदाज न आल्याने अनेकदा सुई प्रत्यक्ष शिरेत न जाता शिरेच्या बाजूला त्वचेच्या खाली खुपसली जाऊन ..तेथे याने सिरींज द्वारे सोडलेल्या मादक द्रव्याचा साठा होऊन गाठ तयार होते ..नंतर ती गाठ फुटून जखमा तयार होतात …ज्या लवकर भरत नाहीत ..कारण याचे सतत अशी इंजेक्शने घेणे सुरु असते ..तसेच त्या जखमा बऱ्या होण्यासाठी योग्य पथ्ये देखील पाळली जात नाहीत ..काही वेळा शीर लवकर सापडत नाही ..तोवर हे लोक शीर सापडेपर्यंत सारखी सुई त्वचेत खुपसत राहतात ..त्यामुळे देखील अशा जखमा होतात ..

हे ऐकून माझ्या अंगावर काटाच आला ..भयानकच होते हे ..मला तर साधे आजारी असताना देखील इंजेक्शन घेण्याची भीती वाटते ..इथे तर स्वतच्या नशेसाठी वारंवार सुई टोचून घेतली जात होती ..माँनीटरने पुढे सांगितले की ..जेव्हा वारंवार इंजेक्शन घेवून हातांच्या शिरा निकामी होतात तेव्हा मग पायांच्या शिरांचा देखोल वापर केला जातो ..पुढे त्या देखील निकामी होत जातात ..मग पोटातल्या शिरेत ..डोळ्याखालच्या शिरेत ..अगदी शेवटी शेवटी तर लिंगावरील शिरेत देखील हे मादक द्रव्य टोचून घेतले जाते ..माँनीटर हे सगळे सांगत असताना तो निर्लज्जपणे सगळे ऐकत मान डोलवत होता ..अजून माहिती म्हणून मी माँनीटरला ‘ व्हाईटनर ‘ बद्दल विचारले ..आपण ‘ इरेजर ‘ म्हणून जे कोरेस कंपनीचे ‘ व्हाईटनर ‘ वापरतो ..त्यात दोन बाटल्या असतात …एका बाटलीत पांढऱ्या रंगाचा घट्ट द्राव असतो ..तर दुसऱ्या बाटलीत तो घट्ट द्राव प्रवाही करण्यासाठी ‘ थिनर ‘ असते ..ते थिनर विशिष्ट प्रकारच्या केमिकल पासून बनवले जाते ..तर ते थिनर एका रुमालात ओतून घेवून ..वारंवार तो रुमाल नाकाशी धरून त्याचा वास घेतले जातो ..त्यामुळे डोके बधीर होऊन ..नशा येते

..याची पुढची पायरी म्हणजे ते थिनर रुमालात न ओतता एका छोट्याच्या प्लास्टिकच्या पिशिवीत ओतून त्या पिशवीत नाक खुपसून दीर्घ श्वास घेत तो दर्प घेतला जातो ..त्या केमिकल मधील विषारी द्रव्ये मेंदूवर परिणाम करून नशा येते ..मला आठवले की वर्तमान पत्रात या बद्दल मी वाचले होते ..त्या ‘ व्हाईटनर ‘ वर आता बंदी येवून त्याऐवजी ‘ पेन इरेजर ‘ आलेत म्हणून ..मात्र बंदी येवूनही अनेक ठिकाणी हे ‘ व्हाईटनर ‘ जास्त किमतीत उपलब्ध होते असे समजले..बहुधा कमी वयाची मुले या व्यसनात अडकतात …या नशेने वेड लागल्याचे किवा ओव्हरडोस होऊन मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे ..असे माँनीटरने सांगितले ..आजकाल शिक्षणासाठी बाहेर गावी होस्टेलवर राहणारे विद्यार्थी ..अगदी मुलीही ..तसेच दारूचा तोंडाला वास येतो म्हणून ..वास न येणारी नशा शोधणारे अनेक तरुण अशा प्रकारच्या मादक द्रव्यांच्या आहारी जात असतात ..ज्यात गांजा ..चरस ..अफू ..ब्राऊन शुगर ..व इतर अनेक मादक द्रव्ये येतात ..माँनीटरने व्यवस्थितच माहिती दिली मला …

आज मानसोपचार तज्ज्ञांच्या भेटीचा वार होता ..या आठवड्यात नवीन दाखल झालेल्या सर्वांना माँनीटरने …सकाळी प्रार्थनेच्या वेळी त्यांना आज मानसोपचार तज्ज्ञांना भेटायचे आहे हे सांगितले होते ..त्यावर एकदोन जणांनी सरळ सरळ नकार दिला होता ..त्यांना माँनिटरने वारंवार दारू अन्य मादक पदार्थांच्या सेवनाने मेंदूवर कसे दुष्परिणाम होऊन ..मानवी विचार ..भावना ..वर्तन यात कसा नकारात्मक बदल होतो हे समजून सांगितल्यावर ते तयार झाले ..माझेही नाव त्यात होते ..मलाही नकार द्यावासा वाटले ..परंतु विचार केला की जर मला मनापासून दारूच्या व्यसनातून बाहेर पडायचे असेल तर उपलब्ध असलेली सारी मदत घेतलीच पाहिजे ..माझा नंबर आल्यावर मी केबिन मध्ये गेलो ..तरुण हसतमुख मानसोपचार तज्ज्ञांनी मला बसायची खुण करून माझ्या फाईल वर भरलेली माझी माहिती वाचली ..

माझा रक्तदाब पहिला ..डोळ्यात टाँर्चचा प्रकाश टाकून डोळ्याच्या बाहुल्या तपासल्या ..मग मला .. किती वर्षांपासून दारू पिता ? ..किती पिता ? ..दारू प्यायल्यावर घरी भांडणे …शिवीगाळ ..मारपीट होते का ? दारू खेरीज अन्य मादक पदार्थ घेता का ?असे प्रश्न विचारले ..मी उत्तरे देत गेलो ..मग सध्या झोप शांत येते का ? ..स्वप्ने पडतात का ? ..कानात काही आवाज येतात का ? भविष्यकाळाची खूप चिंता वाटते का ? ..पत्नीच्या वागण्याचा काही संशय येतो का ? कोणी तुमच्याशी अदृश्य पणे बोलते आहे असे वाटते का कधी ? ..खूप राग येतो का ? निराश वाटते का ? असे वेगवेगळे प्रश्न विचारले ..मी जमेल तशी उत्तरे दिली …त्यांनी फाईल वर काहीतरी लिहले ..म्हणाले बरे झाले तुम्ही लवकर उपचारांना आलात ..तुम्ही दिलेल्या उत्तरावरून अजून तरी तुमचे गंभीर प्रकारची मानसिक नुकसान झालेय असे वाटत नाही ..अर्थात तुम्ही खरी उत्तरे दिली असतील तर ..डॉक्टरशी खरे बोलावे नेहमी ..कारण त्यामुळेच तो आपल्याला योग्य ती मदत करू शकेल ..तुम्हाला मी तुमची अवस्थता तसेच भाविनिक चंचलता किवा भावनिक तीव्रता कमी करण्यासाठी एक गोळी लिहून देतोय ..ती सध्या घ्या नियमित ..मग तुमच्या डिसचार्ज नंतर ठरवू गोळी बंद करायची की नाही ते ..

मी मानसोपचार तज्ज्ञांना भेटून बाहेर पडताच ..बाहेर नंबर येण्याची वाट पाहणाऱ्या काहींनी मला घेरले ..काय म्हणाले ? काय विचारतात ? असे प्रश्न विचारू लागले . ..जसे नोकरीच्या मुलाखतीच्या वेळी आत जाऊन बाहेर आलेल्या उमेदवाराला बाकीचे उमेदवार.. काय काय ? विचारले ते माहित करून घेतात तसेच होते ..खरे तर मानसोपचार तज्ञ जे जे विचारतात त्यांची खरी उत्तरे द्यायची मानसिक तयारी असेल तर ..आधी सराव करून जाण्याची गरजच नाही ..प्रत्येकाची विचार करण्याची ..वागण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते ..त्यानुसार त्यात काही वावगे आढळले तरच मानसोपचार तज्ज्ञ गोळ्या देणार असतात …बाहेर रांगेत बसलेल्या लोकांचे चिंताग्रस्त चेहरे पाहून मला हसू येत होते …

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

( माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे. यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..