नवीन लेखन...

बेवड्याची डायरी – भाग २ – पहिला दिवस व्यसनमुक्ती केंद्रातला

मला कोणीतरी ऑफिस मधून उठवून पलंगावर आणून झोपवले इतके लक्षात आहे फक्त नंतर मला एकदम जाग आली तेव्हा .आजूबाजूला खूप जण इकडे तिकडे फिरताना दिसत होते .मी डोळे चोळले ..आणि जरा डोक्याला ताण दिला तेव्हा लक्षात आले की आपण घरी नसून ‘ मैत्री ‘ व्यसनमुक्ती केंद्रात आहोत ते ..गेले काही दिवस माझे पिणे वाढलेय म्हणून अलका सारखी कटकट करत होती ..तिने कुठून तरी या व्यसनमुक्ती केंद्राची माहिती आणली आणि माझ्यामागे लकडा लावला होता की एकदा तरी आपण चौकशी ला जाऊ येथे म्हणून पण मी अनेक वेळा उडवून लावले होते तिला ..मी काही दारू पिऊन कधी भांडण करत नव्हतो .. कधी रस्त्यावर पडलो नव्हतो ..सगळे काही सुरळीत चालले होते तरीही अलका सारखी मागे लागली म्हणून तिला असेच एकदा म्हंटले होते की ‘ जाऊ केव्हातरी ‘ आणि तिने आज सुटी पाहून अचानक मला इथे आणले होते ..मी तिला प्रतिकार करू शकत होतो ..नाही केला .कारण मला थोडेफार कुतूहल होतेच व्यसनमुक्ती केंद्राबद्दल …

उठून पलंगावर बसलो तसे एकदोन जण माझ्याजवळ आले आणि माझे निरीक्षण करू लागले ऐक जण जरा वयस्कर होता ..केस पांढरे मात्र त्याच्या चेहऱ्यावर मिस्कील भाव होते ..जणू काही तो मला ‘ काय ? कशी मजा आली ” असे म्हणत असावा … दुसरा खुपच तरुण होता साधारण पंचविशीचा असावा ..माझ्या जवळ येऊन म्हणाला ‘ विजय भाऊ , बरे झाले तुम्ही उठलात .चला चहा घ्या थोडा म्हणजे तरतरी येईल .. त्याच्या हातात ऐक स्टीलचा ग्लास होता …माझे डोके जड झाले होते ..शिवाय मघा ऑफिस मधून मला सरळ आत पलंगावर आणून झोपवले होते ..माझे जेवण देखील राहिले होते ..पोटात नुसती आग पडली होती ..मी त्याला पाणी मागितले ..त्याने एकाला पाणी आणण्यास सांगितले ..ऐक ..दोन तीन ..मी घटाघटा तीन ग्लास पाणी रिचवले ..तेव्हा कुठे जरा हुशारी आली ..

खूप दारू पिऊन रात्रीचा जेव्हा मी घरी येऊन न जेवता झोपत असे तेव्हा देखील मला एकदम मध्यरात्री जाग येई व पोटात पडलेली आग शांत करण्यासाठी असे दोन तीन ग्लास पाणी प्यायले की बरे वाटे ..त्याने मला चहा दिला गरम गरम वाफाळलेला चहा घ्यावासा वाटत होता पण ..पण तो ग्लास हातात घेतला तेव्हा हात थरथरू लागला ..माझ्या थरथरत्या हात कडे पाहून तो म्हतारा परत गालात हसतोय असे वाटले ..त्याचे असे हे ..जवळ उभे राहणे आणि मुख्य म्हणजे माझे सतत निरीक्षण करणे मला आवडले नाही ..मी त्याच्याकडे त्रासिक मुद्रेने पहिले ..तसा तो निघून गेला . हळू हळू चहाचा ऐक ऐक घोट घेत होतो ..पण आता आपण व्यसनमुक्ती केंद्रात अडकलो आहे ही भावना मात्र मन पोखरत होती..

..माझ्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीचा हा ऐक अपमानच समजत होतो मी ..दारू काय जगात सगळेच पितात ..आणि जर एखादा प्रामाणिकपणे कष्ट करून नीट संसार करत जर स्वतच्या आनंदासाठी दारू प्यायला तर त्यात चूक ते काय ? ..अलकाला उगाच माझी चिंता वाटे ..मी काही लहान मुलगा नव्हतो की… मला स्वतचे भले बुरे समजत नव्हते अश्यातला ही भाग नव्हता ..उलट हल्ली तिच्याच कटकटीमुळे माझे पिणे वाढले होते …ही बाई सारखी घरात माझ्या मागे काहीतरी भुणभुण लावत असे ..हे करा ..ते करा ..हे का नाही केले ? ते का नाही केले ? वगैरे ..ऑफिस मधील साहेबाची वेगळीच तऱ्हा ..त्याला कोणतेही काम कधी पसंत पडले असे होत नसे . प्रत्येक काही ना काही चुका काढून हाताखालच्या लोकांवर कसे डाफरावे याचे जणू त्याचे खास ट्रेनिंग झालेले होते ..ऑफिस चा ताण ..घरच्या कटकटी या सगळ्या गोष्टीतून विरुंगुळा म्हणून मी पीत असे ..

— तुषार पांडुरंग नातू 

( बाकी पुढील भागात )
” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

( माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे. यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..