नवीन लेखन...

ब्लँकआउट ( बेवड्याची डायरी – भाग २४ वा )

रात्री नीट झोप झाली नाही ..रात्रीचे जेवून गादीवर पडल्यापडल्या बाजूलाच बसून स्वत:च्या गुडघेदुखीबदल तक्रार सांगत ..स्वत:च्या हाताने गुढघे दाबत बसलेल्या शेरकर काकांची बडबड ऐकत होतो ..सगळे जण झोपेला आलेले ..अकरा वाजता लाईट्स बंद होणार .. तोवर सर्वांची जरा टंगळमंगळ सुरु होती…तितक्यात वार्डचा बाहेरचा दरवाजा उघडून कार्यकर्ते एका धडधाकट व्यक्तीला धरून आत घेवून आले ..तो माणूस मोठमोठ्याने अर्वाच्च शिव्या देत होता ..सगळे धडपडून उठले जागेवरून .. साधारण चाळीशीचा असावा ..अंगावर एक बर्म्युडा होता फक्त ..बाकी वर शर्ट वगैरे काहीच घातलेले नव्हते .. तब्येत चांगलीच वाटली .. त्याने वार्डमध्ये प्रवेश करताक्षणी दारूचा प्रचंड भपकारा आला ..त्या वासाने कसेतरीच झाले मला ..मळमळल्या सारखे .. त्याला वार्डमध्ये सोडून कार्यकर्ते निघून गेले बाहेर ..
तो इकडे तिकडे पिंजऱ्यातील अस्वस्थ वाघासारखा फिरत होता ..मध्येच कोणाला तरी मोठ्याने शिव्या घालत होता ..आम्ही सगळे कुतूहलाने त्याच्या भोवती जमलो ..आमच्या कोणाशीही त्याची ओळख नसतानाही तो सगळे अगदी त्याचे मित्र असल्यासारखा आम्हाला सांगू लागला ” आज सोडलाच नसता त्याला ..वाचला पहा थोडक्यात ..कोथळाच बाहेर काढणार होतो हरामखोराचा “..त्याच्या बोलण्यातून आज मरता मरता वाचलेल्या त्या व्यक्तीचे नाव अनिल आहे असे समजले ..हे देखील समजले की अनिल म्हणजे त्याच्या पत्नीचा भावू ..हे महाशय आपल्या साले साहेबांवर खूप संतापलेले होते तर ..त्याच्या मोठमोठ्याने बोलण्यामुळे सर्वांच्या झोपा उडाल्या होत्या ..असा कोणी नवीन वार्डात आला की एकदोन जुने ..पुराने पापी असलेले ..अश्या व्यक्तीची थोडी फिरकी घेतात हे मला माहित होते ..त्या नुसार मस्करी करण्यात हातखंडा असलेल्या शेरकर काकांनी सुरवात केली …

.” अरे यार ..चाकूने भोसकणार होते की काय त्या अनिलला तुम्ही ? ..मग मजा नाही ..नुसत्या हाताने एकदोन फाईटी मारून जीव घेतला तर जास्त चांगले असते..चाकूने काय ..कोणीही मरते ..नुसत्या बुक्कीत ठार झाला पाहिजे माणूस ..” हे ऐकून तो माणूस जरा भडकला ..” तुम्ही समजता काय मला ..नुसत्या बुक्कीत देखील ठार करू शकतो मी ..लाल मातीत खेळलेला आहे ..एकावेळी चार चार जणांना फिरवू शकतो .”.असे म्हणत त्याने एकदम पहिलवानी पवित्रा घेतला ..सगळे त्याच्या भोवती गोल करून उभे होते ..त्याने हाताच्या दंडावर ..मांडीवर शड्डू ठोकल्यासारखे केले ..आणि तयार झाला कुस्तीला ..त्याच्या वर्तनावरून समजत होते की त्याला तो नेमका कुठे आहे ..त्याला कुठे आणले आहे हे काहीच भान नव्हते ..तो शड्डू ठोकत शेरकर काकांना आव्हान देवू लागला ..’ मला कुस्ती नाही येत ..कराटे येत असेल तुम्हाला तर लढू ‘ असे म्हणून शेरकर काकांनी त्याला अजून डिवचले ..तो पण लगेच ..तुम क्या समझे मेरेको …कराटे का ब्लँक बेल्ट हु मै ..असे म्हणाला ..लगेच त्याने हवेत आडवे तिडवे हातवारे करत कराटे खेळण्याचा पवित्र घेतला ..

हे त्याचे माकडचाळे पाहून आमची हसून हसून मुरकुंडी वळली ..एव्हाना एका कार्यकर्त्याने त्याच्यासाठी झोपेच्या गोळ्या आणल्या होत्या ..तो त्या गोळ्या घ्यायला तयार होईना ..मग शेरकर काकांनी त्याला सांगितले ” ये गोली लेनेके बादही मै लडूंगा तुमसे ” ही मात्र लागू पडली ..’ गोलीसे कौन डरता है..जो डर गया समझो मर गया ” असे म्हणत मोठ्या शुराच्या अविर्भावात त्याने गोळी घेतली ..मग सुमारे तासभर शेरकर काका आणि त्याचा कल्ला सुरु होत्या ..हळू हळू गोळीचा परिणाम जाणवू लागला ..त्याच्या हालचाली शिथिल झाल्या . ..बोलता बोलता तो गादीवर आडवा झाला ..चक्क घोरू लागला दहा मिनिटात .. !

नंतर कितीतरी वेळ मी त्याच्या या असंबद्ध वर्ताना बद्दल विचार करत होतो ..दारू प्यायल्यावर माझे कधी असे माकड झाले नव्हते ..मला स्थळ ..काळ ..वेळ याचे नेहमीच भान राही ..याचे तर भलतेच होते ..त्याला आपण कुठे आहोत ..आजूबाजूला कोण आहे याचे देखील भान नव्हते ..सकाळी तो माणूस उठल्यावर त्याच्याकडे पहिले तर ..रात्रीची घटना एखादे स्वप्न असावे असे त्याचे वर्तन होते …सकाळी अनोळखी चेहऱ्याने तो ..मी कुठे आहे ? मला कोणी आणले इथे ? ही कोणती जागा आहे वगैरे विचारात होता आसपासच्या लोकांना ..मी माँनीटरला विचारलेच त्याबद्दल ..तेव्हा त्याने जे सांगितले ते भयावहच होते ..दारू मुळे किवा मादक द्रव्यांमुळे बरेचदा अशी ” ब्लँकआउट “ची अवस्था येवू शकते ..या अवस्थेत माणसाच्या मेंदूचे काम सुरु असते ..मात्र ते काम असंबद्ध पद्धतीने सुरु राहते ..आसपासची परिस्थिती ..लोक ..स्थळ ..काळ.. वेळ या बाबतचा विवेक नष्ट होतो त्या वेळी त्याच्या मनात येणाऱ्या विशिष्ट भावनेनुसार तो वर्तन करतो ..बाकी सर्व अवयव कार्यरत असतात ..परंतु तो त्या अवस्थेत जे जे काही करतो ते त्याच्या स्मरणात अजिबात राहत नाही ..

काही जण तर या ‘ ब्लँकआउटच्या ‘ अवस्थेत एका गावातून रेल्वेत बसून दुसर्या गावी जातात ..तेथे दारू उतरली की भानावर येतात ..त्यांना आपण या गावी का आणि कसे आलो हे देखील आठवत नाही ..याच अवस्थेत काही जणांच्या हातून रागाच्या भरात खून ..एखाद्याला जबरी मारहाण असे गुन्हे घडू शकतात..वस्तूंची तोडफोड फेकाफेक ..काहीजण खिश्यातील सगळे पैसे उडवतात..वाटून टाकतात ..नोटा फाडतात ..काही जण स्त्रियांशी अश्लील लगट करणे ..चाळे करणे अशा गोष्टी करूशकतात ..काही जणांना वस्त्रांचे भान राहत नाही ..किवा लघवी संडास यांचे भान सुटते ..काही जण नुसती रडारड करतात ..सारखे दुखःचे कढ येतात त्यांना ..आपण एखाद्या सिनेस्टार बद्दल कधी पेपर मध्ये वाचत असतो की पार्टीत त्याने दारू पिवून गोंधळ केला असे ..तो हाच प्रकार असतो .काही जणांच्या बाबतीत ही अवस्था कमी तीव्रतेची असते ..म्हणजे रात्री आपण घरी कसे आलो हे सकाळी आठवत नाही ..मात्र तो घरी बरोबर आलेला असतो ..किवा रात्री कोणाशी काय बोललो ..शेवटचा पेग कोणत्या ठिकाणी प्यायलो ..आपली गाडी किवा स्कूटर कुठे ठेवली आहे हे सगळे त्याला सकाळी अजिबात आठवत आठवत नाही ..

अश्या अवस्थेत तो जे जे वर्तन करतो ते त्याला सकाळी सांगितले तर तो कानावर हात ठेवतो ..मी असे काही केलेच नाही म्हणतो ..त्याला वाटते हे लोक आपण दारू सोडावी म्हणून उगाच भलते सलते आरोप करत आहेत आपल्यावर ..माँनीटर सांगत असलेली माहिती मला तंतोतंत पटली..मला देखील अनेकदा सकाळी रात्री काय काय घडले याचा तपशील काही केल्या आठवत नसे ..अनेकदा तर मी उठल्या उठल्या आपण स्कूटर बरोबर घरी आणली नाही नाही हे आठवत नसे ..मग आधी बाल्कनीत जावून मी स्कूटर जागेवर आहे किवा नाही हे तपासत असे..काही वेळा रात्री मी अलकाशी खूप भांडण केलेले असे …रागाच्या भरात जेवणाचे ताट भिरकावलेले असे ..मात्र सकाळी अलका जेव्हा मला हे सांगे तेव्हा मला ते अजिबात आठवत नसे ..अलका उगाच काहीतरी तिखटमीठ लावून सांगतेय किवा मला घाबरवण्यासाठी बोलतेय असे वाटे .

परंतु ही अवस्था खूप प्यायल्याने येत असेल ना ? असे मी माँँनीटरला विचारले .. तेव्हा त्याने दिलेले उत्तर मला चिंतेत टाकणारे होते ..

खूप प्यायले तरच किवा हलक्या दर्जाची दारू घेतली तरच असे होते असे अजिबात नाही ..हे प्रत्येकाच्या बाबतीत केव्हाही घडू शकते ..आपलं मेंदू काही वेळा दारूबाबत खूप संवेदनशील असतो ..प्रत्येक वेळी असे होतेच असे नाही ..मात्र केव्हाही हे होऊ शकते हेच खरे आहे ..काही वेळा एकदोन पेग नंतर देखील मेंदू जास्त उत्तेजित होऊन ही अवस्था येते ..तर काहीवेळा एकदोन क्वार्टर पिवून देखिल असले काहीच होत नाही ..शेवटी त्या वेळी त्याचा मेंदू दारूबाबत किती संवेदनशील आहे त्यावर ही अवस्था अवलंबून असते ..आणि मेंदूची संवेदनशीलता अनेकदा आपल्या भावनिक स्थितीवर अवलंबून असते ..त्यामुळे आपल्या बाबतीत असे कधीच होऊ शकणार नाही हे म्हणणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे ..जेल मध्ये असे अनेक जण असतील ज्यांनी या अवस्थेत एखाद्याचा खून केलाय..जबरी जखमी केलेय ..याच अवस्थेत अनेक जण वाहन चालवताना अपघात देखील करू शकतात ..

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

( माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे. यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..