नवीन लेखन...

चिरफाड करणारे पत्र.. (बेवड्याची डायरी – भाग ४० वा)

माँनीटरच्या म्हणण्यानुसार जे प्रामाणिक पणे आत्मपरीक्षण करतात त्यांच्या मनात ..आत्मग्लानी ..अपराधीपणा ..अशा भावना निर्माण होणे स्वाभाविक होते ..मी येथे उपचारांसाठी दाखल होताना अश्या सगळ्या प्रक्रियांना सामोरे जावे लागेल याचा विचार देखील केला नव्हता ..व्यसनमुक्तीचे उपचार म्हणजे मला काही दिवस शारीरिक त्रासासाठी गोळ्या औषधे देतील ..मग व्यसन करणे कसे वाईट आहे हे समजावून सांगतील इतकेच वाटले होते ..परंतु इथे केवळ व्यसनमुक्तीच नव्हे तर एका विस्कळीत झालेल्या व्यक्तिमत्वाला पुन्हा आकार देण्याचे काम सुरु झाले होते ..शरीरातून दारू लवकर निघून जाते मात्र मनातून निघून जायला खूप वेळ लागतो ..कारण मनातील दारूच्या सेवनाशी निगडीत असलेल्या भावना इतक्या सहज सहजी निघून जात नाहीत ..त्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाचे संपूर्ण आकलन ..परीक्षण ..करणे गरजेचे आहे ..ते झाले की मनाच्या साफसफाईचे काम सुरु होते .. नंतर केलेली स्वच्छता नियमित टिकवून ठेवणे आलेच ..नाहीतर दारू अथवा व्यसन हा अतिशय खुनशी शत्रू आहे ..तो आपल्या बेसावध होण्याची वाट पाहत रहातो ..पुन्हा पुन्हा हल्ला करू शकतो ..मला हे पूर्णपणे पटले ..पूर्वी घरी देखील अनेकदा मी दारू सोडली होती ..एकदोन महिन्यातच माझा निश्चय डळमळीत होऊन पिणे पुन्हा पुन्हा सुरु झाले होते ..कायमची व्यसनमुक्ती मिळवण्यासाठी स्वतःवर कष्ट घेण्याची गरज होतो मला …नाश्ता करून झाल्यावर मी वार्डात मित्रांशी गप्पा मारत बसलेलो असताना माॅनिटरने मला एक पाकीट आणून दिले… पाकीट उघडेच होते ..म्हणाला विजयभाऊ जरा वाचा हे सगळे ..मी पाकीट घेवून त्यातील कागदाची घडी काढली ..उघडून पहिले तर वर प्रिय असे लिहिलेले होते …एका कोपर्यात जावून बसलो वाचत ..

प्रिय ,
परवा मी भेटीला आले असताना तुम्ही घरी घेवून जाण्यासाठी जो हट्ट केला त्यामूळे मी खूप व्यथित झाले आहे ..शेवटी तर तुम्ही घटस्फोटाची धमकी दिलीत मला ..इतकी का मी वाईट आहे ? आपल्या नव-याने व्यसनमुक्त असावे ही अपेक्षा ठेवणे हीच माझी चूक आहे का ? जर तुम्हाला असे वाटत असेल की मी आयुष्यातून निघून गेल्यावर तुम्ही व्यसनमुमुक्त राहू शकाल..तर मी खरोखरच तुमच्या आयुष्यातून निघून जाईन ..तुमच्या व्यसनमुक्तीसाठी मी वाट्टेल तो त्याग करायला तयार आहे ..

मला माहित आहे की तुम्ही रोज पिवून घरी आलात की मी कटकट करते ..आदळआपट करते ..म्हणून तुम्हाला माझा राग येतो ..पण त्यामागे तुमचा जीव सुरक्षित व्हावा हीच भावना असते माझी ..लग्न झाल्यावर अगदी सुरुवातीपासूनच मी तुमच्या पिण्याबद्दल माझी नाराजी व्यक्त करतेय हे आवडत नसेल तुम्हाला कदाचित ..परंतु आपण नेहमी आसपास होणार्या घटना वाचत असतो पाहत असतो ..त्यातून दारू एका संसाराचे कसे वाटोळे करते हे माहित असूनही तुम्ही अहंकाराने मला काही होणार नाही असेल म्हणता तेव्हा खरोखर तुमच्या बुद्धीची कीव येते मला ..वर्तमान पत्रातील व्यसनाशी संबंधित वाईट बातम्या वाचल्या की खरोखर माझ्या काळजाचा थरकाप होतो ..दारूच्या नशेत खून ..दारूच्या नशेत बलात्कार ..दारूच्या नशेत अपघात ..दारुड्या बापाचा मुलाने खून केला ..विषारी दारूने मृत्यू ..दारूमुळे कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या ..अश्या प्रकारच्या बातमीचा मथळा मला अवस्थ करतो ..तुमची काळजी वाटते सतत ..

तुम्हाला खरे वाटणार नाही कदाचित पण तुमच्या आणि आपल्या संसाराच्या काळजीने अनेक रात्री मी जागी असते ..बाजूला तुम्ही नशेत चूर झोपलेले असताना मी जागीच आहे ..डोळ्याला डोळा नाही हे तुम्हाला कधी जाणवले नसेल ..मुले देखील हल्ली तुमच्या दारूबद्दल माझ्याकडे नाराजी व्यक्त करतात ..बाबा असे का वागतात हे विचारतात मला ? काय उत्तर देवू मी त्यांना ..किती दिवस बाबा औषध घेतात हे खोटे सांगू त्यांना ..मुले तुम्ही घरी असलात कि अत्यंत असुरक्षित असतात हे तुम्हाला जाणवत नाही का ? घरात फालतू बडबड ..शिव्या देणे ..मुलांसमोर शोभते का तुम्हाला ? माझे वागणे चुकत असेल तर तुम्ही मला तसे स्पष्ट सांगा ..मी तुम्हाला हवा तसा बदल करेन माझ्या वर्तनात ..तुम्ही कितीही भांडले माझ्याशी ..माझ्या माहेरच्या उद्धार केलात ..मला शिव्या दिल्यात ..मूर्ख ..बेअक्कल ..बावळट म्हंटले तरी चालेल ..मी सहन करीन सगळे ..मात्र तुमचे दारू पिणे माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होतेय ..

माझ्या मनात आजकाल आत्महत्येचे विचार येतात हे मी तुम्हाला प्रथमच सांगते आहे ..पराभवाची भावना मला सतत घेरून असते ..माझ्या संसाराची किती किती स्वप्ने सजवली होती मी . गरिबीत ..दारिद्र्यात देखील आनंदाने संसार करायला तयार होते ..तुम्ही अर्धपोटी ठेवले असतेत तरी चालले असते मला ..आम्हा मुलींना लहानपणापासून हे तडजोड करायला ..संसार आहे तसा स्वीकारायला शिकवले जाते ..पण तुमच्या दारूबाबत मात्र मला तडजोड करता येत नाहीय ..हा माझा पराभवच आहे ..तुमच्या व्यसनमुक्तीसाठी मी उपास केले ..नवस केले ..रोज देवाजवळ तुम्ही आणि आपला संसार सुरक्षित राहावा म्हणून मी प्रार्थना करत असते ..तुमचा देव धर्मावर विश्वास नाहीय म्हणून तुम्हाला न सांगता माझे हे उद्योग सुरु असतात ..दारूच्या नशेत तुम्ही मला अनेकदा घर सोडून कायमची निघून जा ..तोंड काळे कर ..असे म्हणत असता तुम्ही नशेत असे बोलता म्हणून मी दुर्लक्ष करते त्याकडे ..परंतु परवा पहिल्यांदाच दारू न पिता तुम्ही घटस्फोट घेईन अशी धमकी दिलीत मला ..हे माझ्या मनाला फार लागून राहिले आहे ..

तुमच्या भल्यासाठीच मी तुम्हाला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे …तुम्ही बरे व्हावे म्हणूनच हे चालले आहे हे तुम्हाला समजत नाहीय का ? योग्य वेळी मी येथील सरांच्या सल्ल्याने तुम्हाला घरी घेवून येईन ..मी अगदी थोडी पितो ..असे तुम्ही अनेक वर्षांपासून म्हणत आला आहात ..मात्र आता तुमचे पिणे हाताबाहेर गेलेय हे तुम्हाला वाटत नाही का ? असो ..हे पत्र वाचून तुम्हाला माझा राग येईल कदाचित ..मला क्षमा करा.

सदैव तुमची
अलका

पत्र वाचताना माझा हात थरथरत होता ..डोळ्यातून अश्रू ओघळले ..!

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..