नवीन लेखन...

डोक्याला खुराक …डायरी रायटिंग ( बेवड्याची डायरी – भाग २१ वा )

सरांनी डायरीत लिहायला सांगितलेल्या प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो ..मात्र सुरवातीला काहीच सुचेना ..कॉलेजनंतर सुमारे २० वर्षांनी काहीतरी लिहिण्यासाठी वही घेवून बसावे लागले होते इथे ..लिहिण्याची सवय मोडलेली होती ..तसेही मला लिहायचा कंटाळा होता ..मला मिळालेल्या २०० पानी वहीवर …दोन दिवसांपूर्वीच मी नाव टाकून ..एका प्रश्नाचे उत्तर त्यात लिहिले होते ..ते पुन्हा एकदा वाचले ..अक्षर खूप वाईट आलेले होते माझे ..आज लिहायला सुरवात करण्यापूर्वी मनात प्रश्न आला की डायरी लिहिणे येथे सक्तीचे का असावे ? …लगेच मी माँनीटरला याबाबत विचारलेच ..तो हसून म्हणाला ..जवळ जवळ येथे दाखल होणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असतोच ..कारण बहुधा सर्व व्यसनी लोकांना लिहायचा कंटाळा असतो ..

तसेच स्वतःबद्दल काही खाजगी लिहायचे म्हंटले की माणसाच्या अजूनच जीवावर येते ..डायरी लिहिणे किवा दैनंदिनी लिहिणे हे खरे तर एक मानसिक उपचारच असतो ..बोलताना माणूस काहीही बोलून जाऊ शकतो ..नंतर ते नाकारूही शकतो ..पण लेखनाचे तसे नाही ..लिहिताना विचार करून लिहावे लागते ..आपल्या मनातील गोष्टी सुसंगतपणे कागदावर उतरवणे ही एक मानसिक शिस्त आहे ..तुम्ही त्यामुळे सुसंगत विचार करू शकता ..बोललेले लक्षात राहीलच याची खात्री नसते ..परंतु लिहिलेले सगळे तुम्हाला आठवण करून देण्यास पुरावा असतो ..शिवाय तुम्ही सर्व येथे काय शिकले ते बाहेर गेल्यावरही तुम्हाला वाचता येईल डायरी लिहिल्यामुळे ..जेव्हा जेव्हा व्यसनाची आठवण येईल ..खूप निराश ..अस्वस्थ वाटेल..तेव्हा तेव्हा इथे लिहिलेली डायरी उघडून वाचलीत तर येथे शिकलेले सगळे तुम्हाला व्यसनमुक्ती टिकवण्यास तसेच नव्या जोमाने जीवन जगण्यास मदत करू शकेल ..

मी आजूबाजूला पहिले तर बहुतेक सगळे जण डायरी लिहायला बसलेले होते ..गम्मत वाटली ती त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून ..अगदी कष्टप्रद चेहऱ्याने ..नाईलाजाने हे सगळे लिहायला बसले होते हे उघड दिसत होते ..शेरकर काका उगाचच इतरांच्या वहीत डोकावत फिरत होते ..त्यांनी वहीत डोकावताच ते ज्याच्या वहीत डोकावले ती व्यक्ती ताबडतोब वही मिटून टाकत असे ..ते पाहून माँनीटरने शेरकर काकांना टोमणा मारला ” काका ..आपलं ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून .. हे बंद करा आता ..तुम्ही पण लिहायला बसा ” असे म्हणत त्यानाही लिहायला बसवले ..

मी लिहायला दिलेला प्रश्न पुन्हा पहिला .. ‘ आपण निसर्ग नियमांचे पालन करण्यात कोठे चूक केलीय असे आपणास वाटते ? ‘.. डोक्याला ताण देवून विचार करायला हवा होता ..सरांनी जे निसर्गनियम सांगितले होते ..त्याबाबतच लिहावे लागणार होते ..मला आठवले ..निसर्गनियमानुसार ..अन्न ..वस्त्र ..निवारा या मानवाच्या मूळ किवा प्राथमिक गरजा असतात ..त्यात मी दारू जोडली होती ही चूकच होती माझी ..निसर्गाने दिलेल्या शरीराची काळजी घेण्याऐवजी मी ते शरीर चुकीच्या गोष्टीसाठी वापरून नष्ट करू पाहत होतो ..निसर्गाने काहीही पैसे न घेता बहाल केलेले अनमोल शरीर मी वाया घालवत होतो ..दारू ही मानवी शरीरची गरज नसतानाही मी तिला गरज बनवले होते ..सुरवातीला आनंद ..मौज ..अशी कारणे देत व नंतर दुखः ..तणाव ..राग ..निराशा ..या वेगवेगळ्या कारणांनी मी दारूच्या आहारी जावून तिला जीवनावश्यक गरज बनवले ..पुढे पुढे तर ‘ अन्न ‘ ही गरज दारूमुळे संपूष्टात येवू लागली होती ..मी पटापट लिहू लागलो ..निसर्गनियमानुसार दुखः -आनंद ..मिलन – विरह .हे प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या कालखंडात येत असते ..ते न स्वीकारता मी मला फक्त आनंदच मिळाला पाहिजे या अट्टाहासाने जगत राहिलो ..मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींचा स्वीकार करणे मला जमलेच नाही .. माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट माझ्या मर्जीने घडली पाहिजे या विचाराने मी सतत निराश ..वैफल्यग्रस्त होत गेलो ..जेव्हा जेव्हा मनाविरुद्ध घडले तेव्हा तेव्हा दारू पिवून स्वतचे खोटे समाधान करून घेतले ..माझे दारू सेवन करणे ही एक प्रकारची बंडखोरीच होती माझी ..

निसर्गात प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया मिळेल हे लक्षात घेता मी बेबंद पणे ..बेदरकर पणे दारू पीत राहिलो ..माझे काहीच नुकसान होणार नाही या भ्रमात ..आणि हळू हळू ..शारीरिक ..मानसिक ..आर्थिक ..कौटुंबिक व सामाजिक पातळी वर माझे नुकसान होत गेले तेव्हा आपण करत असलेल्या क्रियेची ही प्रतिक्रिया आहे हे न समजता ..सर्वाना दोष देत गेलो ..भांडत गेलो इतरांशी ..शेवटी शेवटी तर जगात सर्वात जास्त दुखः माझ्याच वाट्याला आलेय ..मी कमनशिबी आहे ..माझ्यावर अन्याय होतोय या भावनेत गुरफटलो ..सतत नशिबाला दोष देत गेलो आणि दारू पीत राहिलो ..माझ्या जीवनातील अडचणी ..समस्या ..तणाव …हे आव्हान म्हणून स्वीकारून त्यावर मला मात करता आली असती ..मात्र तसे न करता मी दारूचा आधार घेतला ..

एकदा लिहायला सुरवात केली तसे तसे मला पटापट सुचत गेले ..शेवटी लिहिले की निसर्गनियमानुसार जगणे मला मान्य नव्हते ..आयुष्यातील प्रत्येक घटना माझ्या मनासारखी घडली पाहिजे असे मला वाटे ..म्हणूनच मला वारंवार निराश व्हावे लागले.. समर्थ रामदासांनी म्हंटले आहेच ‘ जगी सर्व सुखी असा कोण आहे ..विचारे मना तूच शोधून पाहे ‘ त्या नुसार जगात प्रत्येकच्या वाट्याला कोणते तरी दुखः आहेच ..तसेच कोणते तरी सुखही आहे ..मी मला मिळणारे सुख लक्षात न घेते दुखा:चा बागुलबुवा बनवून ..दारूचे कृत्रिम सुख मिळवत गेलो ..परिणामी अधिक अधिक दुखी: झालो ..दारू पिणे किवा व्यसन करणे हा जर दुखा:वर उपाय असता ..तर मग सर्वानीच दारू प्यायला हवी होती ..कारण सर्वांच्याच वाट्याला समस्या आणि दुखे: आहेत..सुमारे अर्धा तास कसा उलटून गेला लिहिण्यात ते समजलेच नाही ..

अगदी शेवटी लिहिले कि या पुढे जीवनातील समस्या ..संकटे ..अडचणी यांचे आव्हान स्वीकारायला मला शिकले पाहिजे ..तसेच माझ्या प्रत्येक कृतीची प्रतिक्रिया मला निसर्गाकडून मिळणार आहे हे लक्षात ठेवून या पुढे प्रत्येक कृती करताना ती सकारात्मक असली पाहिजे याचे भान ठेवणे मला आवश्यक आहे ..म्हणजेच आपल्या कर्माचे फळ नक्कीच मिळणार आहे या विश्वासाने कोणतेही कर्म करताना नीट विचार करूनच वागावे लागेल मला ..एकदाचे लिहून झाले तसे एकदम सुटल्या सारखे वाटले ..माझ्या बाजूलाच शेरकर काका बसले होते लिहित ..मी गमतीने त्याच्या वहीत डोकावलो ..त्यांनी पटकन वही बंद केली …

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

( माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे. यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..