नवीन लेखन...

कृतज्ञता.. परस्परावलंबन (बेवड्याची डायरी – भाग १८)

रविवारी सायंकाळी पालकांना भेटण्याची वेळ असते हे मला माँनीटर कडून समजले ..त्याने मला हे देखील सांगितले की अजून तुम्हाला येथे येवून दहा दिवस पूर्ण झाले नाहीत ..म्हणून तुमच्या घरून कोणी येणार नाहीत …ज्यांना येथे दाखल होऊन किमान दहा दिवस होऊन गेले आहेत अश्या लोकांनाच पालकांना भेटू देतो आम्ही ..कारण सुरवातीचे दहा दिवस येथल्या दिनक्रमाशी जुळवूनघेण्यात जातात ..जर त्या दहा दिवसात पालकांशी संपर्क झाला तर उपचार घेणारा हमखास पालकांकडे मला घरी घेवून चला म्हणून हट्ट करतो ..एक तर त्याच्या मनात व्यसनाची ओढ तीव्र असते ..शिवाय प्रथमच तो कुटुंबीयांपासून दूर राहत असतो ..त्यामुळे पालक दिसताच तो त्यांना घरी घेवून चला म्हणून मागे लागतो ..

माझ्या घरून आज कोणी भेटायला येणार नाही हे समजल्यावर मी जरा खट्टू झालो ..खरे तर मी देखील मनात योजले होते की अलका भेटायला आली की आता मला घरी घेवून चल असे म्हणायचे ..इथे जरी चांगले शिकवले जात होते ..व्यसना शिवाय जेवण ..झोप येणे सुरळीत होत होते ..जेवणही चांगले होते ..मनोरंजन होते ..तरीही ..येथून बाहेर पडावे असे विचार मनात येत होते ..भेट नाही पण किमान अलकाला एखादा फोन तरी करावा सरांना सांगून असे मी ठरवले ..आज फक्त सकाळी एक समूह उपचार होणार होता ..बाकी थेरपीजना सुटी होती हे सकाळीच समजले होते ..

समूह उपचारांच्या वेळी सरांनी ‘ कृतज्ञता ‘ हा विषय चर्चेला घेतला ..कृतज्ञता म्हणजे इतरांनी आपल्याला केलेल्या मदतीबद्दल जाणीव ठेवणे ..त्या मदतीबद्दल ऋणी राहणे ..किवा ज्यांनी ज्यांनी आपल्याला आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर …मदतीचा हात दिला आहे ..आपले जीवन अधिक सुखकर होण्यासाठी शिकवण दिलीय ..आपल्याला सुख मिळावे म्हणून प्रयत्न केले आहेत अश्या सर्व लोकांच्या श्रमांची ..कष्टांची जाण ठेवून ..अशा व्यक्तींना मान देणे ..त्यांच्या भावनांचा सन्मान करणे होय ..सरांनी आधी कृतज्ञतेचा अर्थ उलगडून सांगितला ..माणूस जन्माला आल्यावर त्याला जन्म देणारे ..त्याचे नीट पालन पोषण करणारे आईवडील …त्याला वेळो वेळी प्रेम देणारी भावंडे ..शाळेत ..कॉलेजात त्याला वेगवेगळे विषय शिकवणारे त्याचे शिक्षक.. त्याला उदरनिर्वाहासाठी नोकरी देणारी व्यवस्था ..लग्न झाल्यानंतर त्याच्या आयुष्यात येवून त्याचे जीवन अधिक सुखकर व्हावे या साठी झटणारी पत्नी ..त्याला पितृत्वाचा आनंद देणारी मुले ..इतकेच नव्हे तर माणसाने निसर्गाबद्दल ..समाजाबद्दल देखील कृतज्ञ राहिले पाहिजे हे सांगताना सरांनी सुंदर उदाहरण दिले ..

ते म्हणाले आज अंगात मी जो शर्ट घातला आहे ..तो तयार होऊन माझ्या पर्यंत पोचविण्यासाठी देखील अनेक लोकांचा हातभार आहे ..आधी शेतकऱ्याने शेतात कापूस पिकवला ..पुढे तो कापूस मिल मध्ये जाऊन त्याचे कापड तयार झाले ..मग माझ्या मापाचा शर्ट शिवून तो दुकानात विक्रीला ठेवला गेला ..मी काही पैसे मोजून तो शर्ट खरेदी केला..मी केवळ काही पैसे मोजून तो खरेदी केला म्हणून शर्ट तयार होण्यासाठी कष्ट घेतलेल्या लोकांची मी किंमत करू नये ही ‘ कृतघ्नता ‘ ठरेल. मी जिवंत राहावे म्हणून शरीरात घेतला जाणारा प्राणवायू ..मला जगण्यासाठी आवश्यक असणारे पाणी ..पोषणासाठी मी खात असलेले अन्न हे सगळे मी एकटा माझ्या बळावर निर्माण करू शकत नाही .. तसेच माझ्या दैनंदिन गरजेच्या वस्तू मी निर्माण करू शकत नाही ..केवळ काही पैसे खर्च करून मी इतरांच्या सेवा विकत घेवू शकतो..परंतु जर माझ्या कडे करोडो रुपये असतील आणि मला सेवा उपलब्ध करून देणारी एकही व्यक्ती आसपास नसेल तर मी सुखी होवू शकणार नाही…निसर्ग ..आसपासची माणसे ..एकंदरीत सर्व समाजच काही ना काही कारणाने एकमेकांसाठी मदत करणारा ठरतो ..म्हणून सर्वांबद्दल कृतज्ञता बाळगली पाहिजे ..मात्र माणूस अहंकारामुळे अनेकदा मी ‘ सेल्फमेड ‘ आहे असे म्हणतो हे किती हास्यास्पद आहे ..मानवी शरीर आणि मन यांना सुख देणाऱ्या साऱ्या व्यवस्थेबद्दल कृतज्ञता बाळगली तरच अहंकार नाहीसा होतो ..

….प्रत्येक व्यक्ती ही कोणत्या न कोणत्या कारणासाठी इतरांवर अबलंबून असते काही वेळा मानसिक दृष्ट्या तर काही इतर कारणांनी.. परस्परावलंबनाची ही जाणीव प्रत्येकाला असणे आवश्यक आहे ..कृतज्ञता यालाच म्हणतात …ही कृतज्ञता ज्यांना समजते ती माणसे कधीच कोणाचा तिरस्कार करत नाहीत ..कधीच व्यसने करत नाहीत ..किवा समाजविघातक कृत्ये करत नाहीत ..उलट अशी माणसे सर्वांच्या विकासासाठी आपली आपला पैसा ..श्रम आणि बुद्धी यांचा वापर करून स्वतचे आणि इतरांचेही जीवन सुखी करण्यासाठी प्रयत्नशील राहतात .. सोप्या भाषेत कृतज्ञता म्हणजे काय हे समजावून सांगितले…

पुढे त्यांनी विशेष सूचना दिली ..आज ज्या लोकांचे पालक त्यांना भेटायला येतील ..त्यांनी पालकांकडे कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे ..आपण व्यसने करून पालकांना खूप त्रास दिलाय ..पैसे उडवले आहेत ..सर्व कुटुंबियांना आपल्या व्यसनापायी वेठीस धरले होते ..तरीही त्यांनी आपण सुधारावे म्हणून आपल्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून नव्याने जीवन जगण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिलीय ..त्यामुळे भेटायला आलेल्या पालकांशी नम्रतेने बोला ..त्यांच्या भावना समजून घ्या ..त्यांना यापुढे व्यसन करणार नाही म्हणून आश्वस्त करा ..जर तुम्ही घरी जाण्याचा हट्ट केलात..,,घरी घेवून चला म्हणून त्यांना ‘ इमोशनल ब्लँकमेलिंग ‘ केले….धमक्या दिल्या ..घाबरवले किवा त्यांच्यावर राग व्यक्त केला .. तर नक्कीच त्यांना दुखः होईल ..इतके दिवस व्यसने करून आपण त्यांना दुखः दिलेच आहे ..आता सुधारणेच्या काळात त्यांना आपण सुधारत आहोत असा धीर मिळाला पाहिजे ..ज्यांचे पालक भेटीला येणार नाहीत त्यांनी नाराज न होता पालकांना काहीतरी अडचण असेल असा विचार केला पाहिजे ..असे सांगून सरांनी आम्हाला पालकांच्या भेटीसाठी शुभेच्छा दिल्या ..

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..