नवीन लेखन...

खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी (आठवणींची मिसळ ३)

ज्योतिष, पत्रिका, ग्रह ह्या सगळ्या अंधश्रध्दा आहेत असं तर्काधारे कितीही समजवून दिलं तरी माणसाच्या मनांत भविष्यात काय घडणार याचं कुतूहल असतचं. त्याचा गैरफायदा घेतला जातो.पण कांही कांहीच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींचा विचार केला तर वाटतं की खरंच असं कांही नसेल? उदाहरणार्थ ज्योतिष शास्त्र म्हणतं की माणसाच्या आयुष्यातलं प्रेम, प्रणय, त्यापासून लाभणारं सुख हे पत्रिकेतल्या शुक्र ह्या ग्रहावर अवलंबून असतं. आता हा शुक्र ग्रह एवढ्या लांबून पृथ्वीवरच्या प्रत्येकाच्या प्रणयजीवनांत ढवळाढवळ करत असेल की नसेल, कुणास ठाऊक. पण एखाद्यावर मुली सहज भाळतात असं पाहिलं की कोणीतरी म्हणतच,”ह्याचा शुक्र फार पॉवरफुल असणार”. जेव्हां किशोर वयांतून मुलगा तारूण्याच्या उंबरठ्यावर येऊन थडकतो, तेव्हा त्याचे डोळे आजूबाजूला वेगळ्या दृष्टीकोनांतून पाहूं लागतात.त्या नजरेला भिडणारी नजर शोधू लागतात. हल्ली यासाठी फार कष्ट करावे लागत नाहीत पण पूर्वी म्हणजे फक्त ५०-६० वर्षांपूर्वी हे काम इतकं सोप नव्हतं. एकतर मुलामुलींच सहशिक्षण कमीच होतं. आठ दहा वर्षानंतर मुला मुलींचे वेगळे गृप्स होत. एखाद्या मुली बरोबर बोलणं सुध्दा कठीण असे. पुढच्या पायऱ्या तर त्याहून कठीण. पण शुक्राचा भक्कम पाठींबा असेल तर? पण एवढी लांबलचक प्रस्तावना करण्यापेक्षा मी तुम्हाला राजूची प्रेमकथाच ऐकवतो. मग तुम्हीच ठरवा, राजूचा शुक्र कसा होता ते ?म्हणजे ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवत असाल तर.

राजू सांवळा पण सतेज. डोळे बोलके. बांधेसूद देह. बऱ्यापैकी उंची. मैदानी खेळांची आवड. कबड्डीपासून क्रिकेटपर्यंत सर्व टीममधे तो असायचा. भावगीतही गायचा. थोडक्यात राजू स्मार्ट होता. आमच्याबरोबर लोकलमधे असायचा. कॉलेजमधे असतांना लोकलमधेच त्याची माझी ओळख झाली. माझा खास मित्र झाला. एफ. वाय.ला असतांनाच त्याला प्रेमाची बाधा होऊ लागली. मिशी फुटायच्या आधी सुध्दा त्याच्याबद्दल ‘कांहीतरी’ वाटत असावं अशा सूचक शब्दांनी एक दोन मुलींनी आडून आडून चौकशी केल्याचे सुध्दा मला त्याच्या एका शाळकरी मित्राकडून कळलं होत. पण टीन एज मधल्या त्या चौकशा उगवल्या आणि मावळल्या. भरीव असं कांही घडलं नाही. लक्षांत घेण्यासारखी गोष्ट इतकीच की ह्या चौकशांना राजूने सुरूवात केली नव्हती. मित्रांनी साहाजिकच राजूला उत्तेजन द्यायला सुरूवात केली. तोही एका चौकशी करणाऱ्या मुलींत इंटरेस्ट घेऊ लागला होता म्हणे पण प्रकरण कांही फार पुढे गेलं नाही. त्या मुलीच्या घरून स्थळे पहाणं लौकर चालू झालं. तिचा विचार बदलला. राजूला फारसं वाईट वाटलं नाही. तो त्यांत मनाने खूप गुंतला नव्हताच. महावीद्यालयात राजू सायन्सला होता. मी आर्टसला होतो. त्याच वेळी आमची मैत्री झाली. राजू इंटर सायन्सला अडकला. तोपर्यंत त्याचीही अठरा वर्षे पूर्ण झाली होती. एका सरकारी कार्यालयांत राजूला नोकरी मिळाली. राजूने कॉलेजला रामरामच ठोकला. तो काळ असा होता की नोकरी करणे असा उल्लेख करायच्या ऐवजी अमक्या अमक्या कार्यालयांत चिकटला असे म्हणत. कारण नंतर कोणी सहसा ती नोकरी बदलत नसे. त्यातून सरकारी तर नाहीच. घरच्यांची अपेक्षाही तशीच असे. नोकरी नीट केली की झालं. राजूच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. तो पुढे शिकला असता तर त्याला ते शक्य होतं. त्याची भावंडे पदवीधर झाली पण त्याने शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला आणि नोकरी स्वीकारली, ते त्याच्या घरच्यांनी स्वीकारलं.

तेव्हां हळू हळू नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढू लागली होती. कांही मुलींना घरच्या परिस्थितीमुळे नोकरी करणे भाग पडे. तर कांही लग्न होईपर्यंत नोकरी करायचा विचार करत. पुढे काय करायचं ते होणाऱ्या पतीने ठरवायचं. आज बऱ्याच महिला हा निर्णय स्वतः घेतात. राजूच्या ऑफीसमधेही मुली नोकरीला होत्या. राजू ऑफीसमधे लौकरच लोकप्रिय झाला. विशेषतः महिलावर्गावर त्याची चांगलीच छाप पडली असावी. मग राजूची त्यातल्याच एका मुलीशी जवळीक वाढू लागली. ती मुलगी दिसायला चांगली होती, एवढचं मी सांगतो. तिचे नाक, डोळे, रंग हे सर्व ठीक होतं. बाकीचं ठरवणं मी तुमच्या कल्पनाशक्तिवरच सोडतो. पहाता पहाता राजू तिच्या प्रेमांत पडला. बहुदा ती आधीच त्याच्या प्रेमांत असावी. ती वयाने एखाद्या वर्षाने राजूहून मोठी होती. आपण तिचं नाव निशा असं समजूया. राजू आणि निशा बरोबर फिरायला जाऊ लागले. तेव्हाच आमच्या एका मित्राच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती. राजू तिला बरोबर घेऊन पूजेला आला. आमच्या त्या मित्राचे आई वडिल प्रागतिक होते. त्यांनी त्या दोघांना पाठींबा दिला.लौकरच दोघांनी एकमेकांशी विवाह करायचं पक्कं केलं.

त्या काळांत बऱ्याच पालकांना प्रेमविवाहच मान्य नसे. त्यातच जातीचा विचारही पक्का असे. राजू तसा उच्चवर्णियांत मोडणाराच होता. परंतु दोघांच्याही घरून मान्यता मिळणे शक्य झाले नाही. राजूचे आईवडिल फक्त नाराज झाले. त्यांनी विरोध दर्शविला पण राजूवर कांही बंधने घातली नाहीत. निशाच्या घरच्यांनी मात्र प्रखर विरोध केला. तिच्यावर खूप बंधनं घातली. कार्यालयात चुटपुटती भेट व्हायची. त्या दोघांनी हार मानली नाही. दोघांचा इरादा पक्का होता. आम्हा मित्रांशिवाय पाठींबा कुणाचाच नव्हता. तिचे आईवडील तिला खूप बोलले. तिच्या मोठ्या बहिणीचा नवरा मान्यवर लेखक होता.त्यांच त्याही काळी नांव झालं होतं. पुढे तर त्यांच नाव खूपच मोठं झालं. ते आपल्या कथांमधून प्रेमाच्या तत्त्वज्ञानाचे डोस पाजायचे. प्रेमाची खूप महती गायचे. राजूच्या आणि माझ्या एका मित्राने त्याना गाठले. त्याला वाटत होते की ह्यांना नक्कीच सहानुभूती वाटेल आणि यांच्यातर्फे मध्यस्ती करून हा विवाह घडवून आणता येईल. त्यांच्याशी बोलल्यावर मित्राच्या लक्षात आले की ह्या दोघांचे प्रेम आणि निशाच्या म्हणजे त्यांच्या मेहुणीच्या घरचा विरोध ह्यासंबंधी त्यांना सर्व माहिती होती पण त्यानी ह्या दोघांना मदत करण्यास चक्क नकार दिला. माझ्या मित्राने त्यांना परखडपणे सुनावले की तुमचं वागणं, तुम्ही लिहिता त्याच्याशी सुसंगत नाही. पण त्यानी त्यावर कांही उत्तर दिलं नाही, मौन स्वीकारले. बहुदा जातीबाह्य विवाह करायला त्याचाही विरोधच असावा. त्याशिवाय ती पदवीधर होती. राजू पदवीधर नसल्यानेही त्यांना पसंत नव्हता. प्रेमाची महती कथांपुरतीच असावी. उलट घरची बंधने अधिकच कडक झाली.

राजूचा आणि निशाचा निश्चय पक्का होता. त्यांनी परस्पर बाहेर भेटून रजिस्टर्ड मॕरेज करायचं ठरवलं. साक्षीला मित्र होतेच. त्यांनी ठरवलेला दिवस उगवला. त्या लेखकाशी बोलणारा मित्र मला इरॉस थिएटरच्या इथे भेटणार होता. मग आम्ही रजिस्ट्रारच्या ऑफीसमधे जाणार होतो. ती घरून निघाल्यावर बाहेरच राजूला भेटणार होती. राजूबरोबरही आणखी एक मित्र गेला होता. राजूने आणि तिने कधी कसा बेत केला होता हे नीटसं समजलं नव्हतं पण तिनेच सर्व ठरविण्यांत पुढाकार घेतला होता. मी मित्राला इरॉसच्या इथे भेटलो. त्याचा चेहरा पडला होता. मी विचारले काय झाले? तो म्हणाला,”ती आलीच नाही. वाट बघून बघून राजू निराश झाला. “त्या दिवशी नव्हे तर त्या दिवसानंतर ते कधीच भेटू शकले नाहीत. तिच्या एका मैत्रीणीकडून कळले की आदल्या दिवशी तिची नागपूरची मावशी घरी आली आणि घरच्यांनी जबरदस्तीने तिला मावशीबरोबर नागपूरला पाठवून दिले. थोड्याच दिवसांत तिचा तिकडेच विवाहही झाला. तिने नोकरीही सोडली. राजूच्या विवाहाचा योग त्या दिवशी नव्हता.

राजू प्रेमभंगाने खूप निराश झाला. दु:खी वाटू लागला. कांही दिवस विमनस्क दिसला. त्याचे गाणं बंद झालं. त्याचा पडेल चेहरा, अबोल रहाणं, हळहळ व्यक्त करणं यामुळे आम्हाला त्याची काळजी वाटू लागली पण ही सर्व लक्षणे एखाद दोन महिनेच राहिली. त्याच वेळी त्याने नोकरीही बदलली. नंतर नॕशनलाईझड झालेल्या एका चांगल्या बँकेत तो नोकरीला लागला. तिथे त्याला नवे मित्र भेटले. राजू परत सगळ्या गोष्टीत पूर्वीप्रमाणेच रस घेऊ लागला. अगदी मुलींतही. त्याची गाडी रूळावर आली.

त्यानंतर आम्ही एका रविवारी एक दिवसाच्या नॕशनल पार्कच्या (आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) पिकनिकला गेलो. आम्हा नऊ दहा मित्र होतो. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे संमिश्र खाजगी पिकनिकस काढण्याचा जमाना तेव्हा खूप दूर होता. परंतु आम्हाला तिथे तरूण मुलींचा असाच एक आठ दहा जणींचा गिरगावहून आलेला एक गृप भेटला. बोलता बोलता आम्ही एक गृप होऊन गेलो व अगदी परतताना अंधेरीपर्यंत आम्ही बरोबर राहिलो. बोलतांना कळलं एक मुलगी रिझर्व्ह बँकेतच सर्व्हीस करत होती. मीही रिझर्व्ह बँकेतच आहे हे कळल्यावर त्या सर्व आमच्याशी मोकळेपणी बोलू लागल्या. दिवसभर कांही साधे खेळ, हास्य विनोद, गाणी ह्यात वेळ गेला. एक दिवसाची पिकनिक मजेत साजरी करण्याचा उद्देश साध्य झाला. काबा मित्रांनी त्यांचे पत्तेही घेतले. एक मित्र मुंबईत एकटाच रहात असे. तो थोडा गंभीर प्रकृतीचा होता. त्याने त्या मुलींशी भावाचे नाते जोडले. नेमकी माझ्या बँकेतील मुलगी मात्र महेशच्या प्रेमांत पडली. हे प्रेम प्रकरण मात्र फार लांबले नाही. मित्र राजूला चिडवत असत पण ती मुलगी राजूपेक्षा बरीच मोठी आणि दिसण्यात साधारण होती. राजू तिच्या प्रेमात पडला नाही. ती मला बँकेत भेटली की त्याची चौकशी करत असे. तो दुसरा मित्रही कांही निरोप घेऊन येत असे पण राजू ह्यावेळेला खंबीर राहिला. पुढे तिचं घरून ठरवून लग्न झालं.

बँकेमधे राजू क्रिकेट आणि टेबल टेनिस दोन्ही खेळायचा. नव्या बँकेतही मुली होत्याच. एक दिवस त्याच्या नव्या मित्राने, तो आमचाही मित्र झाला होता, आम्हाला सांगितले की राजूचे एका मुलीबरोबर खूप जमते आहे. राजूने आमच्यापासून कधीच कांही लपवले नाही. त्याचे आणि एका मुलीचे चांगलेच जमत होते. यावेळी ती मुलगी त्याच्या जातीतली किंवा पोटजातीतलीच होती. वयानेही ह्याला योग्य होती. तो आम्हाला सर्व प्रगती सांगत असे. शिवाय तो नवा मित्र होताच. त्या मित्राने स्वतः घरच्यांच्या विरोधाला न जुमानता विवाह केला होता. त्याला राजूचे आधीचे प्रेमप्रकरण माहित नव्हते. यावेळी राजूच्या घरच्यांनी त्याला अजिबात विरोध केला नाही. उलट पाठींबा देऊन महेशच्या मनासारखं होऊ दे असं म्हटलं पण नियुक्त वधूच्या घरून विरोध होताच. त्यांना तिचा विवाह कुणा दुसऱ्याशी लावायचा होता. यावेळी राजूच्या घरच्यांनी तयारी केली. वधूच्या घरून विवाहाला विरोध होता म्हणून त्यांनी पुन्हां रजिस्टर्ड विवाहाचचं आयोजन केलं.

मी त्यावेळी रिझर्व्ह बँक मेन बिल्डिंगमधे होतो. बॅंकेतून अकराच्या आधी दहा मिनिटे असताना जवळच असलेल्या रजिस्ट्रारच्या ऑफीसमधे मी गेलो. तिथे अकराची वेळ दिली होती. ऑफिसच्या बाहेरच राजूच्या घरच्या मंडळीनी माझे स्वागत केले. राजू आणि एक मित्र व त्याची पत्नी वधूला घेऊन येणार होते. ते तोपर्यंत आले नव्हते. आम्ही वाट पाहू लागलो. साडेअकरा झाले तरी त्यांचा पत्ता नव्हता. योग्य अधिकाऱ्याला भेटून वेळ वाढवून घेतला. खूप उशीरा ते आले पण वधू बरोबर नव्हतीच. इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती. पुढे कळलं की त्या मुलीला आदल्या दिवशी मनाविरूध्द विमानाने दिल्लीला नेण्यात आलं. नोकरी तिने सोडलीच. तिचंही लग्न तिच्या घरच्यानी त्यांच्या मर्जीनुसार कुणाबरोबर तरी लावून दिलं. ह्यावेळी राजूची अवस्था कींव करण्याजोगी झाली. बोलणं एकदम कमी झालं. चेहरा पडलेला. कळसूत्री बाहुल्याप्रमाणे ऑफीसमधे जायचा आणि यायचा.गाणं आणि खेळ ह्यानाही फाटा दिला. बँकेतल्या नव्या मित्राला भीती वाटू लागली की हा आता निराशेच्या भरांत कांही जीवाचं बरं वाईट करून तर घेणार नाही किंवा मानसिक रूग्ण तर होणार नाही. तो आम्हाला राजूकडे लक्ष ठेवायला सांगू लागला. आम्हा जुन्या मित्रांना तशी बिलकुल भीती वाटली नाही. आम्ही त्याला सांगितले की काळजी करू नकोस. राजू ह्या धक्क्यातून सावरेल नव्हे पुन्हां प्रेमांतही पडेल. राजूने पहिल्याप्रमाणेच महिनाभर प्रेमभंगाचा शोक पाळला आणि तो सहज पूर्वपदावर आला. त्याने मुलींचा विषयही वर्ज्य मानला नाही. पुन्हा त्याच्या प्रेमात कोण पडत्येय याची आम्ही वाट पाहू लागलो.

यावेळी मात्र त्याच्या आईवडीलांनी त्याच्या कुणाच्या प्रेमात पडण्याची वाट पाहिली नाही. एक स्मार्ट सुशील मुलगी त्याच्यासाठी पाहिली. राजू तिच्या प्रेमात पडला तो आजतागायत तिच्या प्रेमातच आहे. रीतसर वैदिक पध्दतीने विवाह झाला. त्यांच्या लग्नाला लौकरच पन्नास वर्षे होतील. दोघानी उत्तम संसार केला. आता नातवंडेही मोठी झाली. त्याची प्रेमप्रकरणे हा त्याला चिडवायला (पत्नीसमोर नाही) विषय झाला आणि तोही आता खिलाडू वृत्तीने त्या गोष्टींकडे पहातो. लग्नानंतर राजू कुणा दुसरीच्या प्रेमांत पडला नाही. पत्नीच्या प्रेमात तृप्त राहिला. दिल्लीला नेली गेलेली त्याची प्रेयसी दोघांच्याही लग्नानंतर योगायोगाने त्याच्या नव्या घराजवळ रहायला आली. तिने त्याच्याशी पुन्हा जवळीक साधायचाही प्रयत्न केला पण विवाहीत राजू बधला नाही.

अशाप्रकारे राजूची प्रेम प्रकरणाची कहाणी सुफळ संपूर्ण झाली. अनेक मुली राजूच्या प्रेमांत पडल्या. तोही प्रत्येकीशी त्या त्या वेळी प्रामाणिक राहिला. लग्न करायचाच त्याने प्रयत्न केला पण लग्नाच्या गांठी स्वर्गात बांधल्या जातात हे इंग्रजी वचन त्याच्या बाबतीत खरं ठरलं. आता हे सर्व योगायोग, ह्या घटना जशा घडल्या तशा मी तुम्हाला सांगितल्या. आता तुम्हीच ठरवा काय ते? राजूचा शुक्र प्रभावी होता कां? असेलही कारण मुली आपणहून त्याच्या प्रेमांत पडत होत्या. मग लग्न होण्यापासून कोणता ग्रह अडवत होता? ज्योतिषाकडे घडून गेलेल्या गोष्टी कां झाल्या हे सांगायला खूपच वाव असतो. शुक्राचा प्रभाव आपण मानायचचं ठरवलं तर बहुदा त्याच्या पत्नीच्या पत्रिकेतल्या अतिप्रभावी शुक्रानेच ती लग्न होऊ दिली नसावीत. आणि खरा आडवा येत होता तो मुलींच्या पालकांचा दूषित पूर्व’ग्रह’च.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..