नवीन लेखन...

बेवड्याची डायरी – भाग ७ – उचलबांगडी.. पालखी.. मेडीटेशन

सरांनी सांगितलेला प्रार्थनेचा अर्थ मनात घोळवत मी सरांनी विचारलेल्या ‘ ‘ तुम्हाला समजलेला प्रार्थनेचा अर्थ ?’ या प्रश्नाचे उत्तर लिहायला बसलो ..हात थोडे थरथरत होते तरीही नेटाने लिहीत गेलो .. या पूर्वी मी शाळेत आणि इतरही ठिकाणी वेगवेगळ्या प्रार्थना म्हंटल्या होत्या व त्या सगळ्यांन मध्ये देवाला काही ना काही मागितलेले असायचे व बहुधा धन .धान्य समृद्धी ..पुत्र ..सुख अश्या गोष्टी त्यात असत .या प्रार्थनेत मात्र देवाकडे फक्त सहनशक्ती ..धैर्य ..आणि समजूतदारपणा मागितला होता हे जरा विशेष होते ..म्हणजे जगात आपल्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी घडत असतात ज्याचा आपल्याला शारीरिक अथवा मानसिक त्रास होऊ शकतो ..व त्याचा त्रास करून घेऊन टेन्शन आहे ..कटकट आहे ..दुखः आहे ..म्हणून माझ्यासारखा व्यक्ती दारू पीत राहतो किवा जर काही जण दारू न पिता चीडचीड करणे ..निराश होणे ..वैफल्य ग्रस्त राहणे अश्या गोष्टी करत राहतात आणि स्वतःसोबतच इतरांचेही आयुष्य अवघड करतात त्या ऐवजी अश्या गोष्टी प्रसन्न पणे स्वीकारून जर त्यातून बाहेर पाडण्यासाठी मनाची ताकद वाढवली आणि योग्य तो विचार आणि कृती करत राहिले तर नक्कीच आपण या त्रासदायक अवस्थेतून स्वतची सुटका करू शकतो असं एकंदरीत अर्थ मला उमजला होता .. मी थोडक्यात मला जे समजले ते लिहिले ..
तितक्यात अचानक वार्डचा बाहेरचा दरवाजा उघडला गेला आणि तीनचार कार्यकर्ते एका माणसाला अक्षरशः उचलून वार्डात घेऊन आले ..सगळे जण त्यांच्या भोवती जमा झाले ..तो माणूस जाम पिलेल्या अवस्थेत होता ..मोठमोठ्याने शिव्या देत होता सगळ्यांना ..देख लुंगा .. छोडूंगा नही अश्या धमक्या देत होता ..मी देखील कुतूहलाने जवळ गेलो .साधारणपणे चाळीशीचा असावा तो माणूस ..अंगावर बनियान आणि ऐक लुंगी होती फक्त ..त्याला त्या कार्यकर्त्यांनी चुचकारत शांत बसवले आणि मग एकाने हातातील गोळ्या त्याला खायला दिल्या …आणि त्याला पलंगावर बसवून ते मॉनीटरला त्याच्याकडे लक्ष द्यायला सांगून निघून गेले ..तो माणूस अजूनही असंबद्ध बडबड करत होता ..बीबी को अभी डायव्होर्स दे दुंगा .. सबको कोर्ट में खिचुंगा वगैरे चालले होते ..सगळे जण त्याची गम्मत पहात होते ..

एकाने टोमणा मारला ‘ अरे तुम बाहर जाओगे तब ना ये होगा ? ..अब यहासे जल्दी निकलनेही वाले नही हो तुम ” हे ऐकून तो उसळून पलंगावरून उठला उभा राहताना त्याचा तोल गेला तसा परत बसला ..म्हणाला ‘ कौन रोक सकता है मुझे ? है किसकी हिम्मत असे म्हणत छातीवर हात ठोकत आव्हान देऊ लागला ..सगळी गम्मतच होती .पाच मिनिटे आधी त्याला चार जणांनी अक्षरशः उचलबांगडी करून वार्ड मध्ये आणला होता ते तो बहुतेक विसरला असावा . …. त्याचा आवेश पाहून मॉनीटर ने सगळ्याने गर्दी कमी करायला सांगितले ..तो हळू हळू बडबड करत मग शांत झोपला …

हा काय प्रकार आहे ? मी माझा माहितगार मित्र शेरेकर काकांना विचारले ..तर ते मिशीतल्या मिशीत हसत उद्गारले ‘ पालखी ‘ …म्हणजे ? मी पुन्हा विचारले तसे ते सांगू लागले .. काही लोक दारू पितात.. खूप त्रास देतात घरच्या लोकांना भांडणे करतात …तोडफोड करतात घरातील वस्तूंची ..मात्र त्यांना आपण दारूच्या आहारी गेलोय हे अजिबात मान्य नसते किवा आपल्यामुळे कुटुंबियांना त्रास होतोय हे त्यांच्या गावीही नसते व ते उपचार घेण्यास तयार नसतात अश्या लोकांना मग कुटुंबियांच्या विनंतीवरून ‘ मैत्रीचे ‘ लोक घरातून असतील त्या अवस्थेत अक्षशः उचलबांगडी करून गाडीत टाकून उपचारांसाठी घेऊन येतात या प्रकाराला येथे ‘ पालखी ‘ असे म्हणतात . ‘ मग तो माणूस बाहेर पडल्यावर , घरच्या लोकांना अजून त्रास देत असेल ..किवा बदला म्हणून अजून दारू पीत असेल असं विचार माझ्या मनात आला तसे मी काकांना बोलून दाखवले तर ते म्हणाले ‘ बेवडा माणूस दारू पिण्याशिवाय काही करू शकत नाही…तो जरा ऐक दोन दिवस इथे चीडचीड करेल . एकदोन वेळा समूह उपचारात सामोल झाल्यावर ..मग त्याचा राग निवळेल कारण त्यालाही आतून माहिती असते की आपले चुकते आहे पण अहंकारामुळे तो स्वतची चूक मान्य करत नाही .. इथे आल्यावर त्याला कळते की आपले या लोकांपुढे काही चालणार नाहीय ..

मलाही असेच आणलेय असे सांगत शेरकर काकांनी मला आश्चर्यचकित केले ! शेरकर काकांचे म्हणणे बरोबरच होते ..घरच्या मंडळीना जर या एका व्यक्तीमुळे त्रास होत असेल तर याला सुधारण्यासाठी त्यांना असे धाडसी पाउल उचलणे भागच असणार ..कारण केवळ घरात भांडण करतो ..तमाशा करतो .तोडफोड करतो म्हणून लगेच पोलिसात धाव घेता येत नाही ..घरगुती मामला आहे म्हणून पोलीस ते मनावर घेणार नाहीत ..मनावर घेतले तरी अश्या माणसावर काय केस लावणार आणि कितीदिवस त्याला जेल मध्ये टाकणार हा देखील प्रश्नच असतो ..त्या ऐवजी जर त्याला सुधारणेसाठी थोड्या जबरदस्तीने व्यसनमुक्ती केंद्रात ठेवणे केव्हाही योग्यच ! अर्थात माझ्या बाबतीत असे शिव्यादेणे .भांडणे ..मारझोड वगैरे कधी घडले नव्हते तसे मी शेरकर काकांना म्हणालो तर हसून ..’ अजून घडले नाही ..पण या पुढे प्याल तर तेही घडेल ‘ असे म्हणत त्यांनी माझ्या हातावर टाळी दिली ..

मेडीटेशन …..
सर्वाचे सरांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन झाल्यावर मॉनीटरने आमच्या सगळ्यांच्या वह्या गोळ्या केल्या सरांना दाखवण्यासाठी ..मला उत्सुकता होती की माझे उत्तर पाहून सर् काय म्हणतात याची …अर्ध्या तासात सरांनी वह्या तपासून परत पाठवल्या ..मी घाईने माझी वही उघडली तर त्यात फक्त बरोबर ची खूण केली होती आणि खाली सरांनी वही पहिल्याची सही केली होती ..माझा थोडासा विरस झाला त्यामूळे ..मला सर् वहीवर काहीतरी कौतुकाचे शब्द लिहितील असे वाटले होते … पुन्हा टर्र्र्र्रर्र्र्र्र्र्रर्र अशी बेल वाजली आणि सर्व सतरंजीवर बसले ‘ मेडीटेशन ‘ ची वेळ आहे असे समजले ..मी देखील मांडी घालून सर्वांसोबत खाली बसलो .. जे लोक वृद्ध होते किवा ज्यांना खाली बसण्यास अडचण होती असे लोक मात्र मागे खुर्चीवर बसले होते …सर् आल्यावर त्यांनी हलकेच डोळ्यावर हात फिरवून डोळे मिटले आणि मग सर्वाना तसेच हलकेच पापण्या बंद करायला सांगितल्या ..काही क्षण तसेच .शांततेत गेले ..मधूनच कोणाच्या तरी खोकल्याचा ..शिंकेचा आवाज ..खिडकीत चिमणीची चिवचिव … बाहेरून बाहेरून जाणाऱ्या मोटारीचा मोठ्याने वाजलेला भोंगा असे काही काही आवाज अपवाद !…किती वेळ असे डोळे मिटून बसायचे ते समजेना ..मला सारखे डोळे उघडून आजूबाजूला पहावेसे वाटत होते …

सर् बोलू लागले ‘ हलकेसे आंखें बंद ..रीड की हड्डी में सीधे बैठनेका प्रयास …प्रसन्न मुद्रा … मी ताठ होऊन बसलो …सरांचा आवाज त्या शांततेत गंभीर वाटत होता … शरीर कें बाहरी दुनिया में भटकने चंचल मन को शरीर कें भीतर रखते हुवे ..अंतर्गत संवेदनाओ का अनुभव करते रहेंगे … सर् हिंदीत आणि मराठीतही तेच सांगत होते …माझे मन सारखे आसपास होणाऱ्या आवाजाचा वेध घेत होते ..किवा मग बाहेरून येणाऱ्या आवाजाकडे धाव घेत होते ..मध्येच घरची आठवण ..अलका आत्ता काय करत असेल ? …मुले शाळेत गेली का ? ..ऑफिस मध्ये काय चालले असेल असे सारखे इकडे तिकडे पळत होते … सर् पुढे बोलू लागले ‘ चंचल मनाला आज …आत्ता .इथे शरीरात ठेवण्याचा सतत प्रयत्न करा … आपल्या साऱ्या इच्छांच्या … वासनांच्या… पूर्ततेचे साधन ..आपले अनमोल शरीर कसे जिवंत आहे ..ते समजून घेण्याचा प्रयत्न सुरु ठेवा … आता मला शरीरात होणारा श्वास- उच्छवास जाणवत होता …. ‘ अनमोल शरीर को जीवित रखनेके कें लिये .अनेक कुदरती प्रक्रियाये लगातार शरीर में हमारे हस्तक्षेप कें बगैर काम कर रही है … प्रमुख प्रक्रिया है नैसर्गिक स्वाभाविक सांस… प्रश्वास की … इस प्रक्रिया का लगातार ..बारबार अनुभव करते रहेंगे ..शरीर में सांस कैसे अंदर ली जाती है ..फिर कैसे बाहर छोडी जा रही है … माझे मन आता एकाग्र होत होते ..श्वासोच्छ्वास स्पष्ट अनुभवण्यासाठी खोल श्वास घ्या …लंबी सांस लेंगे …फिर आरामसे बाहर छोडेंगे …. सर् देत असलेल्या सूचनांचे मी पालन करू लागलो हळू हळू माझे श्वसन संथ होत असल्याचे जाणवले ..

मग सरांनी सर्वाना एकाच सुरात तीन वेळा ” ॐ ‘ कार चा दीर्घ उच्चार करायला लावला ..मला हे ‘ ॐ ‘ कार प्रकरण समजेना ..तरीही मी सर्वांसोबत सूर मिसळला .. जो भाई ‘ ॐ ‘ नही बोलना चाहते …वो चाहे तो उसी स्वर में ‘ आमेन ‘ या ‘ आमीन ‘ भी बोल सकते है ..या वो चूप बैठ सकते है ..सरांनी पुढची सूचना दिली बहुधा जे उपचारी मित्र हिंदू नसतील त्यांना ‘ ॐ ‘ कार म्हणण्यास संकोच वाटू नये म्हणून सरांनी त्यांना त्यांच्या धर्मानुसार ‘ आमेन ‘ किवा ‘ आमीन ‘ चे दीर्घ उच्चारण करण्याची मुभा दिली होती …तीन वेळा उच्चारण झाल्यावर सर् पुन्हा बोलू लागले .. मन की शांत अवस्था .निर्विचार अवस्था ..शून्य अवस्था पाने का प्रयास …आज अभी वर्तमान मे जीने का अभ्यास ..आनेवाले कल की चिंताये..बीते हुवे कल के दुख ..कुछ पाने की लालच ..कुछ खोने का भय ..सारी बातोंको दूर रखते हुवें एकमात्र अनुभव शरीर के जीवित होने का … प्रत्येक सांस कें साथ नाक में होनेवाली संवेदनाये पेट कें मांसपेशियो का फुलना -सिकूडना ..लगातार अनुभव करते रहेंगे … कुछ पाने की लालच नही ..कुछ खोने का भय नही …चिंता नही ..तनाव नही .. काही काळ सगळे शांत होते …मग सरांनी हळूहळू डोळे उघडायला … चेहऱ्यावर तळवा फिरवायला सांगितले आणि सकाळी झालेलीच प्रार्थना पुन्हा झाली …

सर् काही बोलायला सुरवात करण्यापूर्वीच एकजण उठून उभा राहिला व म्हणाला ‘ सर् , माझे नाव आज पासून येथे बोर्डावर झाडू मारण्याच्या ड्युटीत लावले आहे ..मी कधी झाडू वगैरे हातात सुद्धा घेतला नाहीय आजपर्यंत ..तेव्हा असले काम मी करणार नाही .’ .त्याच्या अश्या बोलण्यावर सगळे हसले .. ‘ ठीक आहे , खाली बसा .म्हणून सरांनी त्याला खाली बसायला सांगितले ..व सर्वाना विचारले ‘ अजून कोणा कोणाला अशीच अडचण आहे ? ‘ पाच सहा जणांनी हात वर केले ..माझे नाव अजून बोर्डावर लागले नव्हते .पण लागले नाही तर बरे या विचाराने मी देखील हात वर केला ..’ बघा आपण सारे येथे ऐक कुटुंब म्हणून राहतो आहोत ..त्यामूळे येथील सारी कामे आपण वाटून घेऊन करतो आहोत ..आपल्या घरात जसे आई ..बहिण किवा पत्नी घरातील कचरा बाहेर काढून टाकण्यासाठी झाडू मारते .. स्वयंपाकाची भांडी स्वच्छ करते .. घर आवरून ठेवते तसेच इथले काम आहे .. पूर्वी घरी दारू पिताना किवा व्यसने करताना आपण घर म्हणजे फक्त ‘ लॉजिंग ..बोर्डिंग ‘ असेच समजत होतो म्हणजे घरी काही पैसे दिले की खाण्याची व राहण्याची सोय होते घरआपल्यासाठी ..बाकी घरात कोणाच्या भावना काय आहेत … कोणाला काय त्रास आहे ..याचा कधी विचार आणि पर्वा देखील केली नाही म्हणूनच आपण भावनिक दृष्ट्या कुटुंबियापासून दूर गेलो आणि व्यसनाच्या जवळ जात राहिलो ..तेव्हा इथे जर आपण ऐक कुटुंब म्हणून राहत असू तर नक्कीच येथील जमेल त्या जवाबदा-या आपणांस उचलल्या पाहिजेत ..तरच जिव्हाळ्याने आपल्याला इथे काही शिकता येईल …

झाडू मारणे किवा स्वयंपाकाची भांडी घासणे हे काम जर कोणाला हलक्या दर्जाचे वाटत असेल तर आपला त्या कामांकडे पहाण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला पाहिजे जे काम आपल्या घरातील स्त्री करू शकते ते आपण का करू शकणार नाही ? ..कोणतेही काम हलके किवा भारी नसते मित्रानो तर आपल्या दृष्टिकोनामुळे आपल्याला तसे वाटते ..परदेशात तर भरपूर पैसे देऊन देखील नोकर मिळत नाही तेथे अशी सर्व कामे घरातील लोकच करतात व हे स्वावलंबन आहे हे ध्यानात घ्या .. एकाग्रपणे झाडू मारणे हे देखील ऐक मेडीटेशन होऊ शकते … आणि मग झाडू मारून झाल्यावर किवा भांडी घासून झाल्यावर जर तुम्ही वार्डमध्ये ..भांड्यावर ऐक नजर टाकली तर ती झालेली स्वच्छता पाहून निश्चितच तुम्हाला आनंद वाटेल ..त्या मुळे या अनुभवास कोणी मुकता कामा नये असे मला वाटते … मुद्देसूद पणे समजावून सांगत होते ..सर्वाना ते पटत होते .. आणि जर कोणाला काही शारीरिक अडचण वा त्रास असेल तर त्याला नक्कीच आपण या कामातून सुट देऊ शकतो .

मात्र आपल्याला जर खरोखर जुन्या वाईट गोष्टींचा त्याग करायचा असेल तर आजपासून आपण या कुटुंबातील सदस्य म्हणून माझी जवाबदारी काय आहे हे समजून घ्यायला हवे व ती पार पडायला हवी ..हीच तर सुरवात आहे आपल्यातील बदलाची ..सरांनी बोलणे संपवून मग आता कोणाला काही अडचण आहे का विचारले तेव्हा सगळ्यांनी नकारार्थी माना हलविल्या एकजण म्हणाला ‘ लेकिन हमारे खानदान में कभी किसी ने झाडू नाही मारा आजतक ‘ त्यावर शेरकर पटकन म्हणाले ‘ तुम्हारे खानदान में कभी किसी ने दारू भी नही पी थी . वो तो तुमने करके दिखाया ना ? ” सगळे जोरात हसले तो खजील होऊन खाली बसला ….

— तुषार पांडुरंग नातू

( बाकी पुढील भागात )

( बाकी पुढील भागात )
” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

( माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे. यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..