नवीन लेखन...

लपवाछपवी.. (बेवड्याची डायरी – भाग १३)

प्राणायाम करण्यापूर्वी शरीर एकदा ताजेतवाने करून घेण्यासाठी चाललेले शरीर संचालन करताना … शरीराचे सर्व अवयव सांध्यातून हलवताना ..माझ्या सांध्यामध्ये थोड्या वेदना होत असल्याचे जाणवले ..तसेच सर्व स्नायू आखडून गेल्याने त्यांची हालचाल करताना त्यावर ताण येत होता ..मला कंटाळा आला ते सगळे करण्याचा ..खरे तर मला तीन दिवस विश्रांती घेण्यास सांगण्यात आले होते ..तरीही मी हे सगळे करणार असे ठरवून यात सहभागी होत होतो ..शेवटी कंटाळून उठलो ..माझ्या पलंगावर जावून बसलो ..सगळे शरीर ओढल्या सारखे वाटत होते ..जरा झोप काढावी असे वाटू लागले …माझ्या सारखेच नवीन आलेले किवा आजारी असलेले चारपाच जण होते जे प्राणायाम करत नव्हते ..
आम्ही सगळे प्राणायाम करणाऱ्या लोकांकडे पाहत होतो ..सुमारे ८० जण त्या हॉल मध्ये बसलेले असावेत …जे मांडी घालून बसू शकत होते त्यांनी मांडी घातलेली ..काही अधिक उत्साही ..वज्रासनात बसलेले होते ..एका बाजूला कोपऱ्यात आठ दहा खुर्च्यांवर कंबर दुखी ..अपघातात पायाला इजा होऊन पाय थोडा अधू असलेले ..दारूमुळे लिव्हर वर परिणाम होऊन लिव्हरची समस्या वाढल्याने ..प्राणयाम न करता येणारे ..हार्टची समस्या असलेले लोक बसलेले होते ..हे सारे खुर्चीवर बसलेले लोक प्राणयाम घेणारे सर सांगत असलेले व्यायाम जेमतेम जमेल तसे करत होते ..एकंदरीत त्यांच्या हालचालींवरून ते हे सगळे नाईलाजाने करत असावेत असे जाणवत होते ..कारण सरांची नजर दुसरीकडे जाताच ते पुन्हा शुंभासारखे बसून रहात..सरांचे लक्ष गेले की गडबडीने काहीतरी हालचाल केल्यासारखे दाखवत ..बसलेल्या लोकांपैकी देखील काही जण ओढून ताणून प्राणायाम करणारे वाटले …सर्वांचे निरीक्षण करताना एक लक्षात आले यात काही जण अंगचोर ..आळशी ..चालढकल करण्याच्या प्रवृत्तीचे वाटले ..मला असा पलंगावर रिकामा बसलेला पाहून एक कार्यकर्ता माझ्याजवळ आला ..म्हणाला मला जरा तुमची काही माहिती हवी आहे ..चला माझ्यासोबत ..त्याच्या सोबत बाजूच्या केबिनमध्ये गेलो ….

त्याने माझा येथे दाखल होते वेळचा फॉर्म काढला..मग माझी शैक्षणिक माहिती ..कौटुंबिक माहिती ..विचारली ..मी पटापट उत्तरे देत होतो ..तो ती माहिती फॉर्मच्या रकान्यात भारत होता ..माझ्या व्यसन सुरु होण्याला किती वर्षे झाली ? व्यसनामुळे खोटे बोलणे ..घरचे पैसे मारणे ..बाहेर उधाऱ्या ..कर्जे वगैरे आहेत काय ? पोलीस केसेस झाल्या आहेत का ? दारू पिवून कधी अपघात झाला आहे का ? दारू वरून पती -पत्नीत भांडणे होतात का ? असे प्रश्न आल्यावर मी जरा सावध झालो ..वाटले आता हा जरा जास्त खाजगी माहिती विचारतोय ..मी सगळ्यांना नकारार्थी उत्तरे देत गेलो ..क्षणभर तो थांबला ..माझ्याकडे पाहून मिस्कील हसला ..” काय हो सगळ्या प्रश्नांना विचार न करता पटापट उत्तरे देत आहात ..जरा नीट आठवून उत्तरे द्या ” मी जरा वरमलो ..” त्यात आठवण्यासारखे काय आहे ?..मी जे आहे ते सांगतोय ” असे म्हणून सारवासारव केली ..मग तो म्हणाला ” ही माहिती समुपदेशकाच्या अभ्यासासाठी असते …तुमचे दारूमुळे कोणकोणत्या पातळीवर नुकसान होतेय हे समुपदेशकाला समजते ..तुम्हाला चांगले समुपदेशन करण्यासाठी त्याला या माहितीचा उपयोग होतो .. म्हणून खरी आणि योग्य उत्तरे दिलीत तर तुमचाच फायदा आहे ”

मी समजल्या सारखी मान हलवली ..मग लक्षात आले की काही प्रश्नांची उत्तरे मी धादांत खोटी दिली होती …ऑफिस मध्ये काही मित्रांकडून मला अनेक वेळा उसने पैसे घ्यावे लागले होते ..काहींचे परत करणे बाकी होते ..एकदा अलकाला न सांगता तिच्या पर्स मधील पैसे मी काढले होते ..दोन वेळा दारू पिवून बाईक चालवताना माझा कंट्रोल सुटून एकदा दुभाजकाला तर एकदा एका रस्त्यावरून चालणाऱ्या मुलाला माझा धक्का लागला होता ..मी पटकन तेथून पोबारा केला होता ..म्हणून वाचलो होतो ..पत्नीशी अगदी जोरदार भांडणे ..मारहाण असे प्रकार घडले नव्हते तरी बरेच वेळा माझ्या पिण्यावरून अलका मला बोलली की मला खूप राग येई ..रागाच्या भरात मी नको ती बडबड करी ..तिचाही राग अनावर होई ..मुले बिचारी भांबावून आमच्या दोषांकडे पाहत असत ..या भांडणाचा शेवट ..तिची माहेरी निघून जाण्याची धमकी ..आणि जा निघून ..माझे तुझ्यावाचून अडले नाही अजिबात या माझ्या बेफिकीर घोषणेत होई ..मग तीनचार दिवस तिचा अबोला असे ..हे सगळे आठवल्यावर मी त्याला काही उत्तरे दुरुस्त करून घ्यायला लावली …माझ्या हातावर हात ठेवून तो आश्वासक हसला..

पुढे पत्नीशी शारीरिक संबंध सुरळीत आहेत का ? शारीरिक संबंध ठेवण्यात काही अडचण येते का ? असे प्रश्न आल्यावर मी पुन्हा अंतर्मुख झालो ..या प्रश्नांची उत्तरे देवू नयेत असे वाटले ..लग्न झाल्यावर अगदी सुरवातीच्या काळात आमचे सहजीवन म्हणजे आनंदसोहळा होता ..अधून मधून दारू पीत होतोच ..तरीही फारशी अडचण येत नसे ..फक्त माझ्या तोंडाला येणाऱ्या दारूच्या वासाने मळमळल्या सारखे वाटते ..अजिबात तुमच्या जवळ येवू नये असे वाटते असे अलकाने बोलून दाखवले होते ..मी मात्र त्याच्या कडे दुर्लक्ष करत असे ..माझे पिण्याचे प्रमाण वाढल्यावर अलका माझ्या जवळ येण्यास अजिबात उत्सुक नसे ..एकतर दिवसभर घरातील कामे ..मुलांचे सगळे करताना तिची खूप दमछाक होई ..शिवाय मी पिवून आलो की तिच्या चेहऱ्यावर सतत फक्त मलाच जाणवणारी एक अढी असे ..मग कसला प्रणय न कसले काय ? ..पुढे पुढे मी याबाबतीत बेफिकीर होत गेलो ..

तिच्या कपाळावरील अढीकडे दुर्लक्ष करायला शिकलो ..मला हवे ते हक्काने वसूल करत गेलो ..तिचा प्रतिसाद माझ्या दृष्टीने नगण्य होता ..किवा कधी जाणवलेच तर मी त्याची पर्वा केली नाही ..अनेकदा महिनोंमहिने आमची जवळीक होत नसे ..हे सगळे आठवले तसा मी अंतर्यामी हादरलो ..गेल्या अनेक दिवसात पत्नी पत्नी म्हणून आमचे नाते लोकांसाठी आणि मुलांसाठी होते ..बाकी सगळा आनंदी आनंद ..अनेकदा इच्छा असूनही योग्य प्रकारे शारीरक संबंध प्रस्थापित करू शकलो नव्हतो ..याला कारण दारू असे अलका म्हणे ..मात्र मी इतर करणे पुढे काढून तिची समजून घालत असे ..तर वाटले काही वेळा तर अलकाच्या इच्छेविरुद्ध केवळ दारूच्या उत्तेजनेत आणि आक्रमक अविर्भावात मी बलात्कार तर केला नव्हता !

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

( ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे ..ही लेखमला मागील वर्षी फेसबुकवर लिहिली होती ..मात्र ज्यांनी वाचली नसेल त्यांच्यासाठी पुन्हा ही लेखमाला येथे आज पासून टाकायला सुरवात करत आहे ..यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..