नवीन लेखन...

साक्षात् भीम नाटीका क्र. १ (आठवणींची मिसळ २१)

असं म्हणतात की प्रत्येक मराठी माणसाला नाटकाची ओढ असतेच. एकदा तरी नाटकांत काम करावं ही सुप्त इच्छा जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असते. खरं सांगा, तुम्हालाही कधी ना कधी असं वाटलं होतं की नाही? खरं म्हणजे नाटकवेडेपणा हा कांही फक्त गडक-यांवर (राम गणेश) प्रेम करणा-या मराठी माणसाचा किंवा शेक्सपियरवर प्रेम करणा-या इंग्रज माणसाचाच वारसा नाही. तो सर्व मानवजातीचा वारसा आहे. जगांतली कुठलीही भाषा बोलणा-याला आणि कोणतेही तत्त्वज्ञान मानणा-याला कोणत्या ना कोणत्या नाट्यप्रकारांत गोडी असतेच. त्याची कारणमीमांसाही अनेकांनी प्रत्यक्ष /अप्रत्यक्ष केलेली आहे. अगदी “The World is a stage___” . पण जाऊ द्या तुम्हाला ठाऊक असलेल्या गोष्टी तुम्हालाच सांगून बोअर नाही करत. पण नाटकांत काम करायला संधी मिळाली असती तर सोडली नसती, असं वाटतय् ना? अहो, अशी नाटकात काम करायची इच्छा जर नसती किंवा नाटकांतलं छोट्यातलं छोटं काम करायला तयार असणारे नसते तर नाटकं झाली असती कां. पूर्वी मजेंत अशी छोटी काम करणारी माणसं स्वतःला “बोलट” म्हणवत असत. हे बोलट जर नसते तर “अल्लाउद्दीन आणि चाळीस चोर” ह्या नाटकात ३९व्या बुधल्यांतून क्षणभर डोकं वर काढून “झाली कां वेळ?” असं विचारणा-या चोराची भुमिका कोणी केली असती? अथवा ऐतिहासिक नाटका़त सतत समशेर हातात धरून फक्त पहा-याला उभं रहाण्याचं काम करायला कोण मिळालं असतं? तर अशी ही तोंडाला रंग फासून नाटकात काम करण्याची हौस. सामान्य मानवाला त्या वेडाने झपाटलं तर नवल ते काय? पण जेव्हां देवत्व लाभलेल्या पांडवापैकी आडदांड भीमच जेव्हां नाटकांत काम करण्याचा हट्ट धरतो तेव्हां काय होतं ते पहा ह्या नाटीकेत.सुमारे १९६५-१९६६च्या काळांत लिहिलेली हे छोटी एकांकिका.संपूर्ण काल्पनिक.पहा वाचायला आवडते कां ?
*साक्षात भीम.*
(रंगमचाच्या मागे द्रौपदीचा मेक अप करणं चालू आहे.नाटकांत भीमाचे काम करणारा द्रौपदीला “लौकर आटप” म्हणून सांगायला आलेला आहे.त्याच्या हातात गदा आहे.वेष भीमाचा आहे.थोड्याच वेळांत त्याच्याहून महाकाय असा साक्षात भीमच प्रगटतो)
ना. भीम – अहो, सौदामिनीबाई, अहो जरा लौकर आटपा.नाटक सुरू करायची वेळ झालीय.
द्रौपदी – माहित आहे मला.नाटकाची वेळ झाली तरी माझ्यावाचून नाटक होणार नाही हे तुम्हीच लक्षात ठेवा.ना. भीम – अहो बाई, म्हणूनच सांगतोय, आटपा आता.थिएटर मॕनेजरनी पहिली घंटासुध्दा दिली.
द्रौपदी – अहो पण ऐतिहासिक नाटकांसाठी मेकअप करायला जास्त वेळ लागतो, हे ठाऊक नाही कां मॕनेजरना ? ना. भीम – अहो बाई, आपलं नाटक ऐतिहासिक नाही, पौराणिक आहे.आणि ह्यात द्रौपदी विराटाच्या दासीचचं काम करत्येय.तेव्हां उगाच नटू नका.
द्रौपदी – “पुराण म्हणजे इतिहासच” असं कुणीतरी म्हटलं आहे.
ना. भीम – बाईसाहेब, पुराणांतली वांगी पुराणांत.पुराणातल्या गोष्टी खऱ्या मानत असाल तर धन्य आहे तुमची.
साक्षात भीम – (प्रवेश करत) कोण तो ?कोण म्हणतो, “पुराणांतली वांगी पुराणांत ?
“ना. भीम – आं ! आपण कोण ?
सा. भीम – पुराण खरे आहे.पांडवांची कथा खरी आहे.कोण म्हणतो, “हा इतिहास नाही ?”
ना. भीम – आधी ह्या विषयावर इतक्या अधिकारवाणीने बोलणारे इतिहासाचार्य कोण आपण, हे कळेल कां ?सा. भीम – मी कोण ? अरे मूर्खा, एवढंदेखील ओळखता येऊ नये तुला ?
ना. भीम – तुम्हाला पहाताक्षणीच ओळखायला तुमचं कार्टून रोज पेपरांत येतं की काय ?बाकी तुम्ही सुध्दा पौराणिक नाटकवालेच दिसता !
सा. भीम – शतमूर्ख ! इतके वर्ष नाटकांत माझी भूमिका करून सुध्दा तू मला ओळखू नयेस ?
ना. भीम – (गोंधळून) म्हणजे ?
सा. भीम – मी खराखुरा भीम आहे.साक्षात भीम.
द्रौपदी आणि ना. भीम – कोण ? भीम ? खराखुरा भीम ?
सा.भीम – होय मीच तो. खराखुरा भीम.
द्रौपदी – पण आपण पृथ्वीवर कसे आलात ?
सा. भीम – कसा आलो ? माझ्या इच्छेने.ह्या त्रिखंडात मला कोण अडवू शकतो ?
ना. भीम – छे, छे. तसं नाही.पण भीम चिरंजीव आहे, असं कधी ऐकलेलं नाही.
द्रौपदी – हो ना ! चिरंजीव फक्त मारूती आणि तो कोण डोक्यावर जखम घेऊन फिरणारा जरासंध.
ना. भीम – बाईसाहेब, जरासंध नव्हे अश्वत्थामा !
(श्लोक म्हणतो – अश्वत्थामा…..)
भीम – मग ऐका तर.मी खराच भीम आहे आणि आजचं नाटकातलं माझं भीमाचं काम मीच करणार आहे.
ना. भीम आणि द्रौपदी – काSय ! सा. भीम – होय ! माझी भूमिका मीच करणार आज.
ना. भीम – अहो पण ते प्रेक्षकांना चालणार नाही.
सा. भीम – कां नाही चालणार ?
ना. भीम – प्रेक्षक लागलीच ओळखतील की तुम्ही मी म्हणजे नटवर्य साटम नाही हे लागलीच ओळखतील.मग कदाचित दंगलही करतील.
सा. भीम – हूं ! माझ्या एका आरोळीने गप्प होतील सगळे !
ना.भीम – (काकुळतीने) नाही हो, तसं नाही.पण तुम्हाला पूर्वी नाटकात काम करण्याचा अनुभव नाही.हां ! अर्जुनाला होता.तो खरा चालला असता.
सा. भीम – चूप ! मी कांही ऐकून घेणार नाही.
दिग्दर्शक – (प्रवेश करत) अहो साटम !अहो सौदामिनीबाई ! तयार झालांत की नाही ?दुसरी बेलसुध्दा झाली आटपा लौकर.
ना. भीम – अहो डायरेक्टरसाहेब, हे– हे–
दिग्द. – आं ! हे कोण बुवा ?
सा. भीम – मी भीम.ना.
भीम आणि द्रौपदी – साक्षात भीम.
दिग्दर्शक- साक्षात भीम ?काय वेड बीड तर लागलं नाही तुम्हाला ?
सा.भीम – ही दोघं खरं तेच सांगतायत.विश्वास नाही बसत ?पटवून देऊ कां तुम्हांला ?एका बुक्कीत तुमच्या या भीमाच्या गदेचं चूर्ण करून टाकतो.की कोणाचा निकाल लावू गदेच्या प्रहाराने ?
दिग्द. – नको, नको.प्रॉपर्टीवर प्रयोग नको. पटलं आम्हांला.तुम्ही तुमच्यावर लिहिलेलं नाटक बघायला आलात ना ?मी तुमच्या बसण्याची खास सोय करतो.
सा. भीम – मी नाटक पहायला नाही करायला आलो आहे.भीमाची भूमिका करायला.
दिग्दर्शक . – अहो, पण ते कसं शक्य आहे ?
सा. भीम – १०० कौरवांना यमसदनी पाठवणाऱ्या ह्या भीमाला काय अशक्य आहे ?
दिग्द. – अहो डायलॉग, म्हणजे संवाद.त्यांची वाट लागेल ना.तुम्ही बोलाल खरे संवाद आणि बाकीचे गोंधळतील.
सा. भीम – त्याची काळजी नका करू.हां नाटकांतले संवाद मला थोडे मिळमिळीत वाटतात पण माझे तेही पाठ आहेत.
दिग्दर्शक . – पण आमची बाकीची मंडळी तुमच्याबरोबर काम करायला घाबरतील, त्यांच काय ?(नाटकांतला किचक किचकाच्या वेषात प्रवेश करतो.)
ना. किचक – अरे ए भीमा, तयारी झाली की नाही ?अहो, द्रौपदीबाई, चला लौकर.(ना. भीमाला) भीमा, तू म्हणजे अगदीच पुचाट आहेस बाबा.हां, आता नाटकांत मला तुझ्या हातून मरावं लागतं.नाही तर नाटकांतच दाखवला असता माझा हिसका.
ना. भीम – हो, हो. आज जरूर दाखव तुझा हिसका.आज माझ्याऐवजी हे काम करणार आहेत साक्षात भीम.
ना. किचक – कोण ? साक्षात भीम ?
सा. भीम – (मोठ्या आवाजात) होय मीच तो भीम !साक्षात इथे माझे काम करायला आलो आहे.ना.
किचक – अहो, हे खरेच भीम आहेत काय ?
दिग्द. – आमची तरी खात्री पटलीय.
ना. किचक — (भ्यालेल्या आवाजात) अहो, ते मला खरंच मारतील, हो.
ना. भीम – कां ? आता कां ?मला हिसका दाखवणार होतास ना ? आता दाखव.
सा. भीम – मूर्खांनो, ह्या भीमाला काय नाटक आणि खरं ह्यातला फरक कळत नाही काय ?अरे, खरा कसा मारेन ?ना. किचक – तुमचा साधा मुष्टीप्रहार पण माझा जीव घेईल हो !डायरेक्टर, मी नाही ह्यांच्याबरोबर काम करणार.
द्रौपदी- मी सुध्दा मघापासून थरथर कांपतेय.साक्षात भीमाबरोबर काम मलाही नाही जमणार.
दिग्दर्शक . – भीममहाराज, आमच्यावर कृपा करा. दया करा.तुम्हाला कसं काम देऊ ?
सा. भीम–एकदम चूप.कांही बोलू नका.मी माझी भूमिका करणार म्हणजे करणार.पहातो कोण अडवतो मला ?आणि माझ्याबरोबर काम करायच नाकारलं तर..
थिएटर मॕनेजर – (प्रवेश करत) अरे, काय चाललय इथे ?मी तिसरी घंटा दिली सुध्दा.तयार आहांत ना सगळे ?चला पडदा वर करायला सांगतो.
दिग्दर्शक . – अहो, पण इथे जरा गोची झालीय ? गडबड झालीय.
मॅनेजर – गोची ? गडबड ?
दिग्द. – अहो, म्हणजे पहा ना !हे खरेखुरे साक्षात भीम.
(सा. भीमाने मान खाली घातली आहे.)
मॕनेजर – कोण ? कोण ?
द्रौपदी, दिग्द., ना.भीम, किचक – (कोरसमधे)अहो भीम, खरेखुरे भीम, साक्षात भीम.हे पहा.
मॅनेजर – कोण साक्षात भीम ?हे साक्षात् भीम ? (हंसतात)अहो, हा तर…
सा. भीम – मॕनेजर—!
मॕनेजर – (हंसत हंसत) अहो, हे तर आमच्या थिएटरच्या समोरच्या हॉटेलचे बल्लवाचार्य आहेत.
ना. भीम – हॉटेलचे आचारी ?
सा. भीम – (मान खाली घालून)हो. मी हॉटेलचा आचारीच आहे. एकेकाळी ज्या कंपनीचं “किचकवध” नाटक गाजलं होतं, त्या कंपनीत मी आचारी होतो.मला नाटकांत भीमाचं काम करायची फार इच्छा होती.म्हणून भीमासकट सगळ्यांचे संवाद तोंडपाठ केले.अनेकदा एकट्यानेच तालमी पण केल्या.वाटायचं, एखादा दिवस भीमाचं काम करणारा आजारी पडला तर मालकांना आपण विचारू.पण भीमाचीच काय, कुणाचीच भूमिका कधी करायला मिळाली नाही.मालकांकडे बोलायचीही हिंमत झाली नाही.आज ह्या थिएटरमधे “किचकवध” नाटक होणार म्हणून कळल्यावर मला एक युक्ती सुचली.ऐन वेळी खराखुरा भीम म्हणून जायचं आणि सर्वाना घाबरवून ही भूमिका हिसकावून घ्यायची.एकदा तरी भीमाची भूमिका करायला मिळेल.पण… पण.. आजही माझं नशीब आडवं आलं.माफ करा, मला सर्वानी माफ करा.मी तुम्हांला त्रास दिला.(जायला निघतो)ना. भीम – थांबा, बल्लवाचार्य, थांबा.तुमचं नाटकावरचं आणि भीमाच्या भूमिकेवरचं प्रेम पाहून, मी स्वतः तुम्हाला विनंती करतो की आज माझ्याऐवजी तुम्हीच भीमाची भूमिका करा.डायरेक्टर साहेब, सौदामिनीबाई चालेल ना तुम्हांला ?
द्रौपदी – अहो, तुम्ही, नटवर्य साटम यांनी एव्हढं केल्यावर मी कशी मागे राहीन ?
दिग्द. – माझी तर खात्रीच पटलीय की हे भूमिकेला न्याय देतील याची.
ना. भीम – मग होऊन जाऊ द्या घोषणा की नटवर्य सुधाकर साटम अचानक आजारी पडल्याने त्यांच्याच तोडीचे.. किंवा सरस.. नट भीमाच्या भूमिकेत सादर करत आहोत..थिएटरमधे घोषणा होते… …….मंडळी सादर करत आहे “किचकवध” … … द्रौपदी– सौदामिनी ..,… आणि भीमाच्या भूमिकेत …….. ……. साक्षात् …… …… . . .
समाप्त…..

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..