नवीन लेखन...

रेल्वे प्रवासाचे नियोजन – भाग ३

रेल्वे टाईमटेबल

रेल्वे टाईमटेबल’ या पुस्तकाचं रेल्वे प्रवासातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. रेल्वेप्रेमींचं प्रवासाइतकंच ‘टाईमटेबल’ पुस्तकावरही मनापासून प्रेम असतं. प्रवासात ‘टाईमटेबल’ जवळ बाळगणारा हा खरा ‘जातीचा प्रवासी’ असतो. प्रवासाची आखणी करण्यापासून, जाणारी-येणारी गाडी पक्की करणं, गाडीच्या वेळा, प्रवासास लागणारा वेळ, अशा अनेक गोष्टींची इत्यंभूत, खात्रीलायक माहिती देणारं ‘टाईमटेबल’ हे एकमेव पुस्तक असतं.

ज्ञानेश्वरीची ओवी जशी अभ्यासपूर्वक समजून घ्यावी लागते, तसंच टाईम टेबलमधील वेगवेगळ्या टेबल्समधून आपली ठरवलेली गाडी ‘तिचा मार्ग आणि त्यावरचा नकाशा’ ह्यामधून अचूकपणे शोधणं हाही एक अभ्यास असतो. पद्धतशीरपणे त्याचा अभ्यास करता करता नेमकी गाडी कळते व एकदा का हा वेळापत्रकात हरवण्याचा छंद लागला, की मग प्रवासाच्या आधी आणि प्रवासातही त्याच्यासारखा दुसरा मित्र असत नाही. जॉर्ज ब्रेडशॉ यांनी (१८०० ते १८५३) जगातील पहिलं टाईमटेबल छापलं. ते ब्रिटिश होते. पुस्तकांची छपाई करून ती प्रसिद्ध करणं व उत्तम नकाशे बनविणं हा त्यांचा व्यवसाय होता. हे करता करता रेल्वेच्या छापील टाईमटेबलची नेमकी गरज ओळखून धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या व महत्त्वाच्या गावांना जाणाऱ्या बसेस यांचं एकत्रित टाईमटेबल व तेही शिलिंग इतक्या अतिशय माफक किमतीत त्यानं प्रथम १८३९ मध्ये प्रसिद्ध केलं. पुढे दर महिन्याला ते छापले जात असे. हळूहळू पानं वाढत जात पानांची संख्या हजारपर्यंत जाऊन पोहोचली. १९६१ सालापर्यंत त्याच्या १५०० च्या वर आवृत्त्या छापल्या गेल्या होत्या. इंग्लंडमध्ये त्या काळात ‘टाईमटेबल’ हे इतकं गरजेचं पुस्तक झालं होतं, की तिथे ‘घरटी एक बायबल’ आणि दुसरं ‘ब्रेडशॉ टाईम टेबल’ अशी दोन पुस्तकं हमखास दिसू लागली आणि गम्मत अशी होती, की बायबल कधीच उघडलं जात नसे, पण ब्रेडशॉ मात्र प्रवासाच्या निमित्तानं हमखास चाळलं जात असे. हळूहळू अनेक रेल्वेप्रेमी प्रवाशांचं ते इतकं आवडीचं पुस्तक झालं, की लोक त्याला चेष्टेनं ‘बायबल’ म्हणून संबोधू लागले. अनेक प्रवासी त्याचा घरबसल्या सखोल अभ्यास करत आणि टाईमटेबल वाचनाचा जगावेगळा आनंद मनमुराद लुटत असत.

ब्रँडशॉची कीर्ती अमेरिका, युरोपियन देश व भारतात पसरलेली होती. काही काळातच याच नावाने प्रत्येक देशात रेल्वे टाईमटेबल छापली जाऊ लागली.

१८५३ मध्ये नॉर्वेतील ऑस्लो शहरात रेल्वेवेळापत्रकाचे जनक जॉर्ज ब्रेडशॉ यांचं कॉलराचे निमित्त होऊन निधन झालं, पण आजही त्यांचं नाव रेल्वे जगतात प्रसिद्ध आहे. २००६ साली इंग्लडमध्ये ब्रेडशॉ यांच्या २८०० पानांच्या रेल्वे टाईमटेबलवरच्या महाग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं, इतकं त्याचं महत्त्व आहे.

भारतात कलकत्त्याच्या न्यूमन कंपनीनं ‘भारतीय रेल्वे टाईमटेबल’ हा ग्रंथ १८९६ मध्ये प्रथम प्रसिद्ध केला. पुढे काही वर्षे तो मासिक स्वरूपातही निघत असे आणि त्या नंतरच्या काळात दरवर्षी नवीन पुस्तकाच्या स्वरूपातही प्रकाशित होऊ लागला. अनेक वर्षे भारत, पूर्व-पश्चिम पाकिस्तान व सिलोन या देशांतील सर्व रेल्वे मार्गांचा एकत्रित ‘ब्रेडशॉ’ निघत असे, सोबत विमानांचं टाईमटेबलसुद्धा असे. ब्रेडशॉ टाईमटेबलमध्ये भारतातील रेल्वेवरील प्रत्येक स्टेशनचे नाव (म्हणजे अगदी छोट्यात छोटे उदाहरणार्थ, वांगणी, आसनगाव इत्यादी) दोन स्टेशनांमधील अंतर, गाडी जेथे थांबणार तेथील वेळ (तास, मिनिटं), गाडीचा क्रमांक, तिचं नाव, प्रत्येक स्टेशनच्या नावाची सूची (प्रथम अक्षराप्रमाणे केलेली) इत्यादी सर्व बाबी असत. हे सारं पाहून नवखा माणूस अवाक झाल्याशिवाय राहत नाही. पुस्तकाला ३०० ते ३५० पानं, त्यामध्ये प्रत्येक पानावर उभी-आडवी अनेक टेबल्स, यांमधून आपल्याला हवी असलेली गाडी शोधणं हे काम मात्र तसं सोपं नव्हे. या ‘शोधा’ची सवय करून घ्यावी लागते. प्रत्येक गाडीचा क्रमांक व गाडीचं नाव हे दोन घटक टाईमटेबल बघण्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे असतात.

पूर्वी गाड्यांना एक व दोन आकडी क्रमांक असत, त्यावेळी काही गाड्या त्यांच्या नावापेक्षा क्रमांकामुळेच ओळखल्या जात. जसजशा गाड्या वाढत गेल्या, तसे विभागाप्रमाणेच गाडीला चार अंकी क्रमांक आले, आता तर पाच आकडी क्रमांकांनी जागा घेतलेली आहे. भारतातील अनेक गाड्यांना अतिशय उत्तम नावं दिलेली आहेत. गाड्यांची नावं हा तर एक स्वतंत्र विषयच आहे. ‘टाईमटेबल-ब्रेडशॉ’ या पुस्तकाची किंमत अतिशय माफक म्हणजे २० एक वर्षांपूर्वी साधारणतः ५० रु. पर्यंत होती, पण त्याचा कागद मात्र अतिशय हलक्या दर्जाचा, मळकट, पिवळसर, असायचा. त्यामुळे मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात (पूर्वी डब्यातील दिवे मिणमिणते असत) टाईम टेबल वाचणं एक दिव्यच असे.

‘न्यूमन-ब्रेडशॉ’ १९७७ पर्यंत अगदी नियमितपणे छापला जात असे, तेव्हा छापलेलं पुस्तक माझ्या स्वतःच्या संग्रहात आजदेखील मानाच्या स्थानावर आहे.

आता ब्रँडशॉ इतिहासजमा झालेलं आहे, कारण हळूहळू भारतीय रेल्वेचे ५ ते ६ विभाग झाले. गरज बदलली आणि प्रत्येक विभागाचं वेगळं टाईमटेबल छापण्यास सुरुवात झाली. ब्रँडशॉची जागा रेल ॲट ग्लान्स’ यानं घेतली. यामध्ये संपूर्ण भारतातील महत्त्वाच्या गाड्या व मोठाली स्टेशनं दाखविलेली असतात. आजच्या संगणक युगात तर कोणत्याही गाडीचं संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवरच मिळतं. तरीही माझ्यासारख्या रेल्वेप्रेमींसाठी वेळापत्रक चाळण्याचा आनंद वेगळाच असतो.

गाडीतील ज्याच्या सामानातून रेल्वे टाईमटेबल डोकावत असतं व एकदा डब्यात स्थानापन्न झाल्यावर जो प्रवासी टाईमटेबल चाळत असतो, त्याच्या नसानसांत रेल्वे प्रवास व टाईमटेबल भिनलेलं आहे असं समजावं. गाडी बरोबर वेळेवर जात आहे? का ‘लेट’ आहे? (हा अस्सल रेल्वेचा शब्द), बरीच लेट असेल तर रात्रीच्या प्रवासात ‘मेकअप’ (दुसरा रेल्वे शब्द) करणार की नाही? याची गणितं टाईमटेबल बघून सोडविली जात असतात. गाडी किती वेगानं जाते आहे हे दोन स्टेशनांमधील अंतरावरून कळू शकतं. काही वेळा गाडी इतकी जोरात हाणतात की ती पुढील स्टेशनात वेळेच्या आधीच पोहोचते. ‘मेकअप’ करता करता वेळेआधी गाडी पोचण्याच्या या प्रकारानं आम्हा चौघा मित्रांची एकदा गम्मतच झाली. आझाद हिंद एक्सप्रेसने कलकत्त्याहून पुण्यात येत होतो. गाडीचे ते शेवटचं स्टेशन. टाईम टेबलप्रमाणे पहाटेचे ४ ही गाडीची नेहमीची पोहोचण्याची वेळ आहे. त्या दिवशी गाडी पोहोचली तरी आम्ही चौघे गाढ झोपी गेलेलो होते. गाडी प्लॅटफॉर्मवर येऊन पंधरा मिनिटं होऊन गेली, सर्व प्रवासी उतरले, गाडी उलटी यार्डात जाण्याची वेळ आली तेव्हा एका हमालाने आम्हाला उठवलं म्हणून नशीब, नाहीतर यार्डातच जाण्याची वेळ आली होती. घड्याळात बघितलं तर फक्त पावणेचार झालेले, म्हणजे गाडी चक्क अर्धा तास लवकर आलेली होती. टाईमटेबल आणि अनुभव अशा दोहोंची सांगड घालण्याच्या अशा काही विशेष वेळा येतच असतात!

टाईमटेबल चाळताना काही स्टेशनची नावं कायमची मनात भरतात. उदाहरणार्थ, सालेकसा, दारेकसा, झारसीगुडा (नागपूर-कलकत्ता मार्ग), नागदा, भवानी मंडी (पश्चिम रेल्वे, बडोदा ते मथुरा) भवानी मंडी प्लॅटफॉर्मची एक बाजू राजस्थान, दुसरी बाजू मध्यप्रदेश, दौलत-ए-शोनी (बिहार), तांबरम, मंडपम् पम्बन (तामिळनाडू) अशी ही उत्सुकता वाढवणारी यादी असते. जोडीला या पुस्तकात सर्व नियमावली, प्रत्येक वर्गाचं किलोमीटर अंतरासाठी भाडं, प्रेक्षणीय स्थळं, रिटायरिंग रूम्स अशा विविध बाबींची माहिती असते. रेल्वेप्रवासाविषयीचा हा परिपूर्ण ग्रंथच असतो आणि प्रत्यक्ष प्रवासाला न जाताही घरबसल्या प्रवासाचा आनंद लुटण्याचा विरंगुळा म्हणूनही ‘टाईमटेबल’च्या पानापानांत हरवून जाता येतं. टाईमटेबल हा रेल्वेप्रेमींचा किती आवडीचा छंद आहे हे सांगणारं एक उदाहरण, म्हणून माझ्या मित्राचाच दाखला देता येईल. या माझ्या मित्राच्या घरातील शौचालयाच्या कठड्यावर कायम रेल्वे टाईमटेबल ठेवलेलं असे.

सोनिया राजेश नावाच्या इंग्लंडमधील एका रेल्वेप्रेमीनं भारतीय रेल्वे टाईम-टेबलचा सखोल अभ्यास करून ‘अराउंड इंडिया इन ८० ट्रेन्स’ असा तब्बल ४ महिन्यात २०,००० मैल प्रवास केला; या प्रवासानुभवावर, याच नावानं पुस्तक प्रसिद्ध केलं. त्यात तो लिहितो ‘भारतीय रेल्वेस्टेशन्सवरील विविध चवींचा चहा ढोसण्याची मजा काही औरच आहे. या रेल्वेप्रवासाचा अनुभव माझं रक्त नसानसांत सळसळून टाकणारा, अतिशय मनोरंजक आहे. खरोखर भारतीय रेल्वे ही भारताची जीवनरेखा आहे. भारतीय रेल्वे भारतीय जीवनाचा आरसा आहे.’ –

चौकट (Box)
कल्याणचे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ श्री. हेमंत मोने हे खरे रेल्वेप्रेमी व रेल्वेचे अभ्यासक आहेत. त्यांनी आपल्या घरातील एक संपूर्ण भिंत भारताच्या रेल्वे मार्गांच्या नकाशाने व्यापलेली आहे. प्रत्येक रेल्वेमार्ग छोट्या विजेच्या बल्बने दाखविण्याची सोय होती. जो मार्ग बघायचा असेल त्यावरचं पहिल्या व शेवटच्या स्टेशनांची बटणं दाबली, की संपूर्ण मार्ग दिसू शकत असे. खरं तर असा नकाशा व्ही.टी. स्टेशनवर लावण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती, पण रेल्वेच्या अधिकारी मंडळींनी त्याची दखल घेतली नाही. त्यांचा दुसरा छंद होता भारतातील कोणत्याही गाडीचे ४ अंकी क्रमांक ते क्षणार्धात सांगू शकत. एकदा टाईमटेबल हातात घेऊन आम्ही त्यांची चाचणीही घेतली होती. मालगाड्यांना ‘हनुमान’, ‘महादेव’, अशी नावं असतात हे त्यांनी सांगितल्याचं आठवतं.

-– डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 178 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..