नवीन लेखन...

रेल्वेस्टेशन्स – भारतीय संस्कृतीचं दर्शन

रेल्वेची भराभराट होत गेली, तसतशी रेल्वेमार्गावर स्टेशनच्या रूपात आलेली, पण एके काळची नगण्य असलेली अनेक खेडी उजेडात आली. खेड्यांची गावं झाली, गावांची शहरं, तर शहरांची महानगरं बनली. प्रत्येक स्टेशन हे त्या त्या प्रदेशाचं सांस्कृतिक केंद्र बनलं आणि ही स्टेशनं विविध व्यवसायांची केंद्रस्थानंही बनली.

अनेक छोट्या खेड्यांमध्ये ‘स्टेशन’ हे तेथील गावकऱ्यांच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेलं आहे. अशा स्टेशनांवर सबंध दिवसभरात जाणाऱ्या व येणाऱ्या अशा फार तर दोन ते चार गाड्या थांबतात, परंतु त्यांच्या येण्याच्या वेळात प्लॅटफॉर्म प्रवाशांनी भरून जातो. गाडी येण्याच्या आधी अर्धा तास गावगप्पा रंगतात. रेल्वेचे तेथील दोन-चार कर्मचारी प्रवाशांना अगदी त्यांच्या घरच्यांसारखे वाटतात. अशा ठिकाणी चहाची एखादीच टपरी असते. थोडा वेळ गजबजलेलं स्टेशन गाडी गेली की शांत-निद्रिस्त होऊन जातं.

मोठ्या स्टेशनांबाबतीत मात्र, जग जेव्हा झोपलेलं असतं तेव्हाही स्टेशन जागं असतं आणि जग जेव्हा जागं होतं तेव्हाही स्टेशनावर जागच असते. अशी स्टेशनं ह्या थरारणाऱ्या व धडधडणाऱ्या जागा आहेत. खरं जग या ठिकाणी पाहावयास मिळतं. अशा मोठ्या स्टेशनच्या केवळ असण्यानं लाखो लोकांची पोटं भरतात. येणारा प्रत्येक प्रवासी हा संभवनीय गि-हाईक असतो हे लक्षात घेऊन इथला विक्रेता अनेक गोष्टी विकण्यासाठी ठेवत असतो. अगदी चहा म्हटला तरी भारतात सत्तर ते ऐंशी प्रकारच्या विविध चवींचा चहा स्टेशनांवर मिळतो. दक्षिणेत ‘कापे-कापे’चा आवाज सुरेख सुगंधासह दरवळत असतो. पूर्वी माठातील गार पाणी विकणारे व पियाऊंच्या अनेक जागा असत. ‘बिसलरी’चं युग अवतरलं आणि करोडो रुपयांचा धंदा सुरू झाला.

बटाटेवडा, भजी, सामोसे अशा खाण्याच्या चटपटीत पदार्थांपासून विविध फळं, बिस्किटं, थंड पेय, आईस्क्रीम, कुल्फी, अशा नानाविध गोष्टी स्टेशनवर उपलब्ध असतात. कदाचित इतक्या सर्व गोष्टी एकत्र मिळण्याचं ठिकाण गावात अन्यत्र आढळणारही नाही.

पुढील काही वर्षांत रेल्वेस्टेशन्स ही विविध व्यवसायांची महत्त्वाची ठिकाणं (Hub) बनतील. तिथे मॉल्स, वाचनालयं, छोटी सिनेमागृहं तयार होतील. एकूणच, स्टेशनांचा ढाचाच बदलून जाईल. त्यामुळे नुसते रेल्वेने जाणारे प्रवासीच नव्हे, तर जनसामान्य फिरण्याकरता वा खरेदीकरता तिथे वळतील. ‘स्टेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ अशा प्रकारची संस्था स्थापन केली जाईल, जिथे ५० हजारांच्यावर लोकांना रोजगार मिळेल. यामधून मिळणारं उत्पन्न हा पैशांचा एक फार मोठा स्रोत रेल्वेला मिळेल. संपूर्ण देशात रेल्वेमार्गांच्या बाजूला रेल्वेच्या मालकीच्या ३०० जागा आहेत. या जागांचा उपयोग अशा जोडधंद्यांच्या निर्मितीसाठी रेल्वे बोर्ड करू शकेल. आजघडीला स्टेशनावर आकर्षक पद्धतीच्या जाहिराती लावण्याच्या जागा भाडेतत्त्वावर दिल्या जातात. त्यात आधुनिकता आणून भरपूर महसूल गोळा करता येईल; ज्यामधून स्टेशनं स्वच्छ व आकर्षक ठेवता येतील. परदेशांतील रेल्वेस्टेशनं तेथील विमानतळांइतकीच स्वच्छ व सुखसोयींनी युक्त असतात. भारतातही काही अपवादात्मक रेल्वेस्टेशनं सुधारित अवस्थेत आहेत. उदाहरणार्थ, पन्नास वर्षांपूर्वीचं जगन्नाथपुरी स्टेशन आणि आता ८ वर्षांपूर्वी नवीन झालेलं तेच स्टेशन यांतील आमूलाग्र बदल जाणवतो. तरीही, अजून बराच मोठा पल्ला गाठण्याची गरज आहे.

-डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 178 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..