नवीन लेखन...

पॅलेस ऑन व्हील्स : रेल्वेचा फिरता महाल

भारतीय रेल्वेमधील स्वप्ननगरीचं सुख अनुभवावयाचं असेल, तर ‘पॅलेस ऑन व्हील्स’ या एकमेव अतिश्रीमंत गाडीचं नाव समोर येतं. देशाचा अभिमान, असलेली ही राजेशाही गाडी नवी दिल्लीहून निघून पुढे जैसलमेर, जयपूर, जोधपूर, रणथंबोर (व्याघ्र प्रकल्प), आग्रा असा आठ दिवसांचा आरामदायी व आनंददायी प्रवास घडविते. या गाडीचा प्रत्येक डबा म्हणजे पारंपरिक भारतीय पद्धतीनं सजविलेला महालच आहे. स्वागतासाठी खास राजस्थानी पेहेराव केलेला, फेटे बांधलेला, तत्पर, विनयशील नोकरवर्ग प्रवाशांच्या दिमतीला चोवीस तास असतो. ही संपूर्ण गाडी वातानुकूलित आहे. दोन उत्तम सजविलेले खानपानाचे डबे गाडीला जोडलेले आहेत. त्यांपैकी एकाचं नाव ‘महाराजा’ व दुसऱ्याचं ‘महाराणी’. त्या हॉलना लागून मदिरापानाची सोय असलेला अद्ययावत बार आहे. अनेक प्रकारची दारू मुबलकपणे पुरविण्याची व्यवस्था तिथे आहे.

गेल्या तीस वर्षांत पॅलेस ऑन व्हील्समध्ये अनेक बदल होत गेले. प्रत्येक वेळी जुनी कात टाकून, भारतीय साज तसाच राखीत, पण अत्याधुनिकतेकडे नेणारे बदल केले गेले. ते सर्व बदल पर्यटकांच्या पसंतीस पडतील याची खातरी काटेकोरपणे केली जाते. अगदी सुरुवातीला ही गाडी सुरू झाली, तेव्हाचे डबे ब्रिटिश व्हाइसरॉय जशा पद्धतीच्या डब्यातून प्रवास करीत त्या पद्धतीच्या बांधणीचे होते. या गाडीला प्रथम मीटर गेज मार्ग होता. ज्याला थट्टेने ‘लोखंडी घोडा’ म्हणत ते कोळशाचा धूर ओकणारं इंजिन या गाडीला लावलं जाई. या गाडीच्या इंजिनामध्ये फावड्याने कोळसा टाकणाऱ्या फायरमनचा मोठाच रुबाब असे. प्रवासामध्ये मधूनच कर्कश वाजणाऱ्या इंजिनच्या शिटीची साथ व चाकांचा ताल हा सर्व माहौल पर्यटकांच्या खास आवडीचा होता. त्या काळातील डबे वातानुकूलित नसल्याने कोळशाचे काळे कण अंगावर झेलूनही आनंदाने प्रवास करणारे अनेक परदेशी पर्यटक असत. काही उत्साही पर्यटक तर इंजिनसोबत प्रवास करत. इतकंच नव्हे, तर फावड्यानं कोळसा फेकण्यात व शिटी वाजविण्यातही भाग घेत असत.

१९९० सालानंतर काळाप्रमाणे सर्वच बदलत गेलं. मीटरगेज जाऊन तिथे ब्रॉड गेज आलं. धुराच्या इंजिनाऐवजी डिझेल इंजिन आलं, डबे वातानुकूलित झाले आणि अर्थातच, ह्या सगळ्या प्रगतीबरोबर पर्यटकांना पैशाचं पाकीटही सैल करावं लागलं. एका वेळी अंदाजे १०० प्रवासी ह्या हिशोबाने साधारण ८ महिन्यांत १८०० प्रवासी या प्रवासाचा आनंद लुटतात. त्यांतील बरेचसे पर्यटक हे परदेशातील असतात. ह्या गाडीचं आरक्षण ६ ते ९ महिने आधीपासून करावं लागतं, आणि तिकीट मिळविणं हे महाकठीण काम असतं. कुंकुम तिलक कपाळाला लावून व गळ्यात फुलांच्या माळा घालून दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनवर प्रवाशांचं कौतुकानं स्वागत केलं जातं, आणि मग आठ दिवस हा स्वर्गनगरीचा प्रवास घडतो.

या गाडीसोबत काम करणारा सर्वांत जुना कर्मचारी गेली २० वर्षे या ९४ । रेल्वेची रंजक सफर गाडीतील प्रवाशांच्या सेवेत आहे. लक्ष्मण नावाचा हा रेल्वेकर्मचारी अनेक परदेशी प्रवाशांचा मित्र बनतो. त्याचं वागणं, बोलणं व नम्रपणा त्यांना इतका भावतो, की ते परदेशी पाहुणे म्हणतात ‘आमची मुलं किंवा मुलीसुद्धा इतकी चांगली, प्रेमानं व आपुलकीनं सेवा देणार नाहीत.’ लक्ष्मणला अनेक पर्यटकांकडून त्याच्या प्रेमळ वागणुकीबद्दल नेहमीच अशी भरपूर प्रशस्तिपत्रकं मिळाली आहेत.

ह्या गाडीच्या धर्तीवरच भारतातील इतर काही राज्यांतून आलिशान गाड्या सुरू झाल्या आहेत, परंतु राजस्थानच्या ‘पॅलेस ऑन व्हील्स’ इतकी मोहिनी दुसऱ्या कोणत्याच गाडीच्या वाट्याला आलेली नाही. भारतीय रेल्वेने जगातील श्रीमंत, हौशी रेल्वेपर्यटकांना दिलेली ही एक अनमोल भेट आहे.

या गाडीचं नामांतर ‘महाराजा एक्सप्रेस’ असं केलेलं आहे. २०१२ सालातील ‘वर्ल्ड ट्रॅव्हल अॅवॉर्ड’ या गाडीला मिळालेलं असून ‘महाराजा एक्सप्रेस लीडिंग एक्सप्रेस ट्रेन’ या नावानं ती जगप्रसिद्ध झालेली आहे. यात तीन वेगवेगळ्या सजावटीचे अतिअलिशान डबे असून, ८ दिवस ७ रात्रींचं तिकीट प्रत्येक दिवसाला ३६,००० रुपयांपासून १,१२,५०० रुपये एवढं आहे. हौसेला मोल नाही हेच खरं!

-डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 178 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..