नवीन लेखन...

शिवधनुष्य बोरघाटाचं

१८६३ साली पुणे-मुंबई दरम्यान बांधलेला सर्वात कठीण मार्ग - बोरघाट (खंडाळा घाट)

भारतातली पहिली रेल्वे सुरू झाल्याला एक दशक होतं न होतं तोपर्यंत ब्रिटिश राज्यकर्त्यांनी पंधरा ते वीस हजार कामगारांच्या मदतीने मुंबई पुणे मार्गावरील बोरघाट बांधण्याचं शिवधनुष्य हाती घेतलं. १८६३ सालापर्यंत ही दोन महत्त्वाची शहरे केवळ काही तासांच्या अंतराच्या प्रवासानं जोडली गेली. बोरघाट हा सर्वात कठीण असा रेल्वेमार्ग होता. याकामी कल्पकता वापरणं; तसंच, नियोजनपूर्वक हजारो कामगारांची मोठ बांधणं म्हणजे परीक्षाच होती. हा मार्ग थोडाथोडका नाही तर पंधरा ते अठरा मैलांचा होता. एक छोटी टेकडीच तयार होईल इतका या कामातील मातीचा उपसा प्रचंड होता. ६,२९६,०६१ क्युबिक्स यार्डस् एवढी ही माती होती आणि मजूर ती माती टोपल्यात भरुन पंधरा ते वीस मैल  इतक्या दूरवर डोक्यावरून नेत होते. ब्रिटनसारख्या प्रगत देशात मात्र वॅगनमध्ये भरून माती दूर जागी नेली जात असे व वॅगन रिकामी केली जात असते. त्याच वेळी भारतात मात्र ही माती हजारो स्त्रिया-मुले टोपल्या भरभरून डोक्यावर वाहून नेत होती.

बोरघाट बांधणीचे हे अवघड बांधकाम ब्रिटिशांनी कर्जत, पळसदरी ते खंडाळा आणि लोणवली (लोणावळा) ते खंडाळा असे दोन्ही बाजूंनी सुरू केले होते. हा घाट बांधण्याचा खर्च दर मैला मागे ६,६४,३७५ रुपये इतका, तर एकूण खर्च १,०५,००,२६७ रुपये इतका झाला. एका रुपया मध्ये ३५ ते ४० किलो तांदूळ मिळण्याचा आणि कारकुनाचा पगार आठ ते दहा रुपये आणि अधिकाऱ्यांचा पगार वीस ते पंचवीस रुपये महिना असण्याच्या त्या काळात हे खर्चाचे आकडे छाती दडपून टाकणारे होते. पण ब्रिटिशांची पैशांची तरतूद मात्र इतकी व्यवस्थित होती, एकदा बांधकामाला सुरुवात केल्यानंतर सर्व काम सलगपणे पूर्ण झालं. पैशाअभावी किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव ब्रिटिशांनी याकामी कधी खंड पडू दिला नाही.

या घाट बांधणी दरम्यान कामगार व तंत्रज्ञांचे बळी मात्र अनेक वेळा गेले. इथल्या कामगारांची वस्ती घाटातल्या जंगलात असे, त्यामुळे होणारे जगली श्वापदांचे हल्ले, सर्पदंश, सोबतच मलेरिया, प्लेग, कॉलरा, हगवण, देवी, अशी रोगराई आणि कामाच्या ठिकाणी घडणारे अपघात, यामुळे जवळजवळ आठ ते दहा हजार कामगार व तंत्रज्ञ बळी पडले. घाट बांधताना येणाऱ्या आपत्तीबाबत लॉर्ड एलफिस्टन यांनी म्हटलं होतं, की `या जीवघेण्या घाट बांधणीत कितीही सावधगिरी बाळगली, तरी अशा बांधकामाच्या वेळी मनुष्य हानी होणे अटळ आहे. आपण प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. हे तर एक प्रकारचे युद्धच आहे.’

हे युद्ध अंतिमतः विजयापर्यंत नेत ब्रिटिशांनी खंडाळा घाटात काम पूर्णत्वाला नेलं. खंडाळा घाटातील नव्याने बांधलेली, अनेक बोगदे पार करीत जाणारी लोखंडी सडक सह्याद्रीच्या पर्वतराजांना एखादा दागिना घातलेला असावा अशी दिसत होती. या घाटांमधला ७ क्रमांकाचा बोगदा बांधत असताना चमकणारे लोलकासारखे हजारो दगड मिळण्यास सुरुवात झाली, त्यामुळे कामगारांमध्ये अतिशय अस्वस्थता निर्माण झाली, मनात खळबळ दाटली आणि ते हर्षभराने नाचू लागले. चकाकणारे ते दगड म्हणजे झिओलाईट क्रिस्टल होते. हा बोगदा दैवी देणगी आहे असा समज १८६० मध्ये सर्वत्र पसरला होता. १९५० साली बोगद्याच्या पुनर्बांधणीच्या वेळीही हे असेच दगड परत दिसले होते. किमयागार निसर्गाच्या कुशीत हा बोरघाट रस्ता रचतानाचा प्रवासही अस्वस्थता, खळबळ आणि अखेर हर्षोल्हासाचाच घडलेला होता.

हा घाट बांधताना, महुकमली डोंगरांमधील दरीवर पूल बांधण्यात आला. घाटातून रेल्वे सुरू झाल्यावर या पुलावरून गाडी जाऊ लागली, कि कानठळ्या बसवणारा, घुमत येणारा आवाज येत असे. आसपासच्या खेड्यातील गावकऱ्यांना तर हा भुताटकीचा प्रकार वाटू लागला. `अघटित काही घडणार’ अशी भीती गावकऱ्यांच्या मनात ठाण मांडून बसली. त्यांनी सातत्याने अनेक तक्रारी केल्यावर `ही भुताटकी नाही व अघटित काहीही घडणार नाही’ असा निर्वाळा तंत्रज्ञांना द्यावा लागला. पण काही दिवस गेले गेले, तोच एका रात्री रेल्वे रूळावरील रक्षकाच्या डोळ्यांदेखत संपूर्ण पूल दरीत कोसळला. `देव कोपला’ हे खेडुतांचा म्हणणं खरं ठरावं अशी वेळ आली आणि हा पूल अतिशय भक्कमपणे पुन्हा बांधण्याची वेळ ब्रिटिश राज्यकर्त्यांवर येऊन ठेपली. यावेळी मात्र, अधिक काळजी घेत साठ-सत्तर डब्यांची मालगाडी आणि चार इंजिनांच्या वजनाचा विचार करून हा पूल बांधण्यात आला. पुलाचं आयुष्य शंभर वर्ष असेल असं काम करण्यात आलं.

बोरघाटाचा हटकेपण आणखी एका बाबतीतही होतं. हा बोरघाट बांधला गेला तेव्हा या मार्गावर एक एवढी चढण होती, की गाडी उलट्या दिशेने वरपर्यंत चढवली जात असे आणि नंतर ती पुढच्या मार्गाला जोडण्यात येई. `रिव्हर्सिंग स्टेशन’ ची ही जागा आता इतिहासजमा झालेली असली, तरी सुरुवातीच्या त्या काळात घाट चढणाऱ्या प्रत्येक गाडीला या दिव्यातून जावंच लागे. बोरघाटाच्या या अवघड कामावर देखरेख करण्यासाठी ब्रिटिश तंत्रज्ञ वेळोवेळी घोड्यावरून जात असत. कामाकरिता लागणारे सामान कर्जत येथे उतरवले जात असे. त्यामुळे याच काळात कर्जत हे महत्त्वाचे स्थानक व रेल्वे वसाहतीचं ठिकाण म्हणून उभारलं गेलं. सर्व दिव्यातून पार पडत १८६३ सालापर्यंत खंडाळा घाट, तर १८६६ सालापर्यंत थळघाट (कसारा-इगतपुरी) बांधून पूर्ण झाले होते.

मुंबई सुरू झालेली भारतीय रेल्वे भारतभर नेण्याचा, रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण भारत जोडण्याचा भव्य प्रकल्पही ब्रिटिश सरकारने हाती घेतला होता. या अवाढव्य कामासाठी आणि रेल्वेच्या एकत्रीकरणासाठी  बी. बी. सी. आय. (BBCI), जी. आय. पी. (GIP) व मद्रास कोची लाईन, अशा तीन कंपन्या उभारण्यात आल्या होत्या. अनेक अडचणींवर स्वार होत रेल्वेच्या प्रारंभ काळाची वाटचाल सुरू होती. त्या काळी रेल्वे बांधणीची सामग्री घेऊन सुमारे ५,७०३ बोटी इंग्लंडहून भारतात येण्यासाठी निघाल्या होत्या. या बोटींपैकी १८६८ बोटींना अपघात होऊन त्यांचा विध्वंस झाला, तर दुसऱ्या बाजूने इ.स. १८५५-६५ चं  संथालांचं बंड आणि इ.स.१८५७-५८ चा ब्रिटिश सत्तेविरुद्धचा स्वातंत्र्यलढा, यातून अनेक अडचणी समोर आल्या. या अडचणींना तोंड देत रेल्वे बांधणीचा वेग ब्रिटिशांनी प्रतिवर्षी पाचशे ते चौदाशे मैल असा राखला हे तर विशेषच होतं.

— डॉ. अविनाश केशव वैद्य 

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..