नवीन लेखन...

रेल्वेमधील फेरीवाले

अपरिहार्यपणे रेल्वेचाच भाग असल्यासारखे वावरणारे रेल्वेतील फेरीवाले म्हणजे संपूर्ण समाजातील विविध गटांच्या सामुदायिकत्वाचा आरसाच असतो. त्यांत तरुण, मुलं, मुली, बायका, लहान मुलं, म्हातारे, इतकंच नव्हे, तर तुणतुणं वाजवून गाणी म्हणणारे अंधजन हे सर्व जण सामावलेले आहेत. ते सारे आपापल्या परीने हुशार व रेल्वेच्या वातावरणाशी अगदी मिसळून गेलेले असतात. संपूर्णत: बेकायदेशीर असलेल्या या विक्रेत्यांकडे एम.बी.ए.ची पदवी नाही, परंतु त्यांना ‘विक्री कौशल्या’चं उत्तम ज्ञान असतं. कोणत्या वस्तूंची रेल्वेप्रवाशाला गरज आहे याचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला असतो. ते खरे ‘सपनोंके सौदागर’ असतात. गाडीतील प्रवाशांना आपल्याजवळील माल दाखविताना त्यांचा बोलण्यातील चतुरपणा, उत्तम भाषेत बोलण्याचा सराव, एखादं लक्षवेधी वाक्य, कधीकधी हातातील सामानाचा एकमेकांवर घासून काढलेला आवाज या सर्वांच्या परिणामी अगदी डुलकी घेणारा प्रवासीसुद्धा जागा होऊन उत्सुकतेनं माल पाहण्यास सुरुवात करतो. प्रवाशांमधील सामान नक्की विकत घेणारे कोण व नुसते पाहून, हाताळूनही न घेणारे कोण याचं ज्ञान त्यांना जणू उपजतच असतं. सतत चालत्या गाडीतून फिरावयाचं, परतण्यासाठी उतरून पुन्हा परतीची गाडी पकडावयाची. सकाळपासून सायंकाळी सात-आठ वाजेपर्यंत धंदा करायचा. त्या प्रमाणात पोलिसांना हप्ता द्यायचा व उरलेल्या कमाईत संपूर्ण कुटुंब पोसायचं असा यांचा जीवनक्रम-दिनक्रम असतो. यांच्यापैकी बहुतेकांनी शाळा, कॉलेज सोडून दिलेलं असतं; परंतु वाममार्ग आचरण्याऐवजी हा कष्टाचा धंदा त्यांनी पत्करलेला असतो.

शांत चित्ताने चार-पाच तासांचा प्रवास करीत असताना संपूर्ण बाजारपेठ तुमच्या पायाशी आणणारे फेरीवाले साधारणपणे गोड बोलत, न कंटाळता, माल दाखवितात. यांच्याजवळ कंगवे, शिवणकामाचं साहित्य, स्त्रियांसाठी अनेक प्रकारची सौंदर्यप्रसाधनं, पुस्तकं, मासिकं, लहान मुलांच्या गोष्टींची पुस्तकं, काय काय म्हणून बघण्यास मिळतं! पुष्कळदा डब्यात विकावयास येणाऱ्या अशा काही वस्तू असतात, ज्या बाजारात सहजासहजी दिसतही नाहीत. ‘दाम कम’, ‘वापरा आणि फेकून द्या’ हे तत्त्व धरूनच मालाची विक्री केली जाते.

रेल्वेमध्ये एकाचवेळी मिळणारी खाण्याच्या पदार्थांची विविधतासुद्धा दुसरीकडे कुठेही मिळण्याची शक्यता कमीच असते. रेल्वेच्या पॅन्ट्रीकारपेक्षा वेगळे खाद्यपदार्थ निवडून पुरवले जात असतात. त्यांत प्रत्येक प्रांतातील स्टेशनची खासियत निरनिराळी असते. लोणावळा म्हणजे चिक्की, कर्जतचा बटाटेवडा, शेगावची कचोरी, दिल्लीची आलूरस्सा-पुरी किंवा आगऱ्याचा पेठा… प्रवासीदेखील या सर्व गोष्टींची आतुरतेनं वाट पाहत असतात. चटपट भेळ ते कुल्फी, नाना त-हेची शीतपेयं, भारतभर मिळणारा चहा आणि दक्षिणेतली कॉफी… हजारो, लाखो प्रवाशांच्या चवींचे चोचले पुरविले जातात ते केवळ रेल्वेफेरीवाल्यांच्या सुविधेमुळे! त्यावरच फेरीवाल्यांची हजारो कुटुंबं सुखाने जगतात. या विक्रीव्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल चालते. त्यांचे ना बुक ऑफ अकांऊट, ना त्यांना जागेचे भाडं आणि सर्वच व्यवहार रोख, उधारीचा सवालच नाही. रात्री डेक्कनक्वीनमधून पुण्याला नियमित जाणारे प्रवासी घरच्यांकरता रेल्वेत विकत मिळणारी कुल्फी हमखास घरी नेतात.

अतिपूर्वेकडील राज्यांत व दक्षिणेत चक्क चादरी, शाली व साड्यासुद्धा विक्रीस येतात. गुजरात व कर्नाटकच्या प्रवासात लहान मुलांसाठी उत्तम खेळणी मिळतात.

बेकारी वाढत आहे, तसं फेरीवाल्यांचं प्रमाण जास्त होत आहे. त्यांच्या बेसुमार वाढीनं प्रवास करणं नकोसं वाटतं. मध्येच कधीकधी रेल्वे अधिकारी धाडी घालतात व एखाद्या भागातील विक्रेते तात्पुरते नाहीसे होतात; परंतु अखेर सगळेच एकमेकांवर अवलंबून असतात. कायद्याचा बडगा दाखविणारे रेल्वेअधिकारी, पोलीस व फेरीवाले यांच्यातील परस्परसंबंध हे एक अजब रसायन असतं.

डब्याडब्यातून फिरत सिनेमांतील गाणी-भजनं गाऊन पैसे मिळविणारे, नुसते भीक मागणारे हा आणखी एक निराळाच वर्ग असतो. निव्वळ सहानुभूती मिळवून हे लोक पोट भरतात.

बरेच अंध-फेरीवाले विविध त-हेच्या वस्तू विकण्याचं कामही करतात. दयेपोटी प्रवासी त्यांना जास्त पैसे देतात, परंतु त्यांच्या अंधपणाचा फायदा घेऊन वस्तू चोरणारे वा कमी पैसे देणारे ग्राहकही बरेच असतात. अंध मुली, तरुण स्त्रिया यांची छेड काढली जाते; पण पोलिसांना त्यांच्याकडून हप्ते मिळत नाहीत या निरुपयोगी लोकांच्या तक्रारींकडे पोलीसही लक्ष देत नाहीत. त्यांचं सामान फेकून दिल्यावर ते उचलणंही त्यांना शक्य नसतं.

एकदा अतिपूर्वेकडील गाडीच्या दुसऱ्या वर्गाच्या वातानुकूलित डब्यात एकावेळी ६० फेरीवाले घुसले. त्यांतील काही गुंडच होते. टी.सी. व प्रवासी सर्व जण स्वस्थपणे बसून, हवालदिल झालेले! गाडीत एकमेव पोलीस, आणि त्याला बोलाविल्यास परिस्थिती अधिकच गंभीर होईल ही भीती; त्यामुळे टी.सी. काहीच करू शकला नाही. नंतर याविरुद्ध बऱ्याच तक्रारी नोंदविल्या गेल्या. तृतीयपंथीयांचा त्रासही असतोच. हे सगळे सहानुभूतीपूर्वक अनुभवतानाही मधूनमधून फेरीवाल्यांवर मर्यादा आणणं गरजेचं आहे हे जाणवत राहतं. त्याची अंमलबजावणी करणं कठीण आहे हे खरं असलं, तरी गाडीमध्ये प्रवाशांच्या गरजेपेक्षा फारच अधिक गोष्टी विकावयास येतात ही वस्तुस्थिती नजरेआड करता येत नाही.

डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..