नवीन लेखन...

युरोप ऑन रेल (युरेल) आणि युरो स्टार – भाग २

अॅमस्टरडॅम ते लंडन हा पहिला प्रवास रेल्वे-बोट-रेल्वे’ असा होता व त्यातही साध्या वर्गाचं तिकीट काढलं होतं. अॅमस्टरडॅम रेल्वे स्टेशन अक्षरशः डोळे दिपवून टाकणारं आहे. तेथील स्वच्छता, टापटीप व तुरळक गर्दी या गोष्टीही मनात आणि नजरेत भरतात. १५ ते २० प्लॅटफॉर्म्सवर अनेक गाड्या निघण्याच्या प्रतीक्षेत होत्या. आमच्या डब्यात मात्र प्रवाशांची बरीच गर्दी होती.

जेमतेम बसण्याची सोय झाली होती. बाजूचे प्रवासी आपापसात गप्पागोष्टी करत आपापले डबे उघडून काहीतरी खात होते. गाडी चांगली ताशी १२० मैल वेगानं पळत होती. बाजूनं सर्वत्र हिरवीगार वनश्री. कालवे, टुमदार कौलारू घरं… नजर तृप्त न होती तर नवल! ३ तासांत आमची गाडी एका बंदराला लागून असलेल्या प्लॅटफॉर्मवर रात्रीच्या अंधारात उभी राहिली. परिसरात काळोख, दूरवर एक अजस्त्र बोट. त्यावरती मिणमिणते दिवे, हवेत प्रचंड गारवा. कुडकुडत, बॅगा. खेचून नेत अखेरीस त्या बोटीवर जाऊन आम्ही स्थानापन्न झालो. बोटीचा तळमजल्याचा प्रचंड मोठा दरवाजा ‘आ वासून’ पसरलेल्या जबड्यासारखा. त्यामधून मोटारी, ट्रक्स चढविले जात होते. पूर्वी तर रेल्वेचे काही डबेही बोटीतून नेले जात. मधल्या केबिनच्या तिकिटाची किंमत जास्त असल्याने आम्ही मोकळ्या डेकवर उभं राहणंच पसंत केलं. केबिनमधील प्रवासी ढारादूर झोपलेले. रात्री ११ ची वेळ. डेकवर उभे राहून समोर अथांग सागर पाहताना मन उचंबळून आलं होतं. ब्रिटिश भूमीवर पाय ठेवण्यासाठी उत्सुक झालो होतो. दूर समुद्रात अनेक बोटींचे दिवे लुकलुकत होते. थोड्याच वेळात तळाचा अवाढव्य दरवाजा बंद झाला. बोटीचे साखळदंड सुटले आणि ब्रिटिश खाडीतील प्रवासास सुरुवात झाली. काही प्रवासी आपल्या स्लीपिंग बॅगमध्ये निद्रिस्त झाले होते. रात्री १ वाजेपर्यंत कुडकुडत, झोंबऱ्या वाऱ्याला तोंड देत, झोप घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि जरा डोळा लागतो तर पहाटे ३ वाजता इंग्लंडचं बंदर आलं. खाली उतरलो मात्र आणि चेक पॉईंटवर प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावं लागलं, कारण इंग्लंडमधील व्हिसा मिळवताना भारतीय प्रवाशांना फार अपमानाची व तिरस्काराची वागणूक दिली जात असे. परंतु अखेरीस गंगेत घोडे न्हाले. पासपोर्टवर व्हिसाचा स्टँप लागला. व्हिसा मिळतो का नाही असा अटीतटीचा प्रसंग ओढविण्याची चिन्हे होती.

बाहेर पडल्यावर लंडनला जाणारी ट्रेन उभीच होती. डब्यात बेताची गर्दी, धीरगंभीर चेहेऱ्याचे ब्रिटिश प्रवासी, सगळ्यांची अळीमिळी गुपचिळी. अखेरीस डुलक्या घेत साहेबाच्या लंडन शहरातील व्हिक्टोरिया स्टेशनला पाय लागले. पहिल्या युरोप प्रवासाची सुरुवात सुखाची झाली होती.

लंडन शहर पाहण्याचा ५ दिवसांचा एकूण कार्यक्रम ठरला होता. लंडन ट्यूबरेल्वे-कम-बस असा एकत्रित पास काढून हा कार्यक्रम पार पाडला. जमिनीखाली तीन तीन थरांवर स्टेशनं; सरकते जिने; पिवळ्या, लाल, हिरव्या, निळ्या आणि पांढऱ्या लाईनचे विविध मार्गांचे डबे, आपोआप उघडझाप करणारे गाड्यांचे दरवाजे, त्यांचा वेग, वेळेचा नियमितपणा… प्रथम भांबावूनच गेलो, पण लक्षात आलं, की चुकायचं ठरवलं तरी चुकणं अशक्य. दुसऱ्या महायुद्धात रात्री बाँब हल्ल्यापासून बचावाकरता याच भुयारी रेल्वे फ्लॅटफॉर्मवर हजारो लंडनवासी आश्रयास येत. त्यावरील अनेक सिनेमे पाहिले होते. आज प्रत्यक्ष त्या जागी गाड्या बदलत होतो. ४ दिवसांत संपूर्ण लंडन पाहून घेतलं. लंडनच्या ट्यूबरेल्वे प्रवासात मनसोक्त भटकल्याने तृप्ती झाली होती.

लंडन-डोव्हर-कॅले-पॅरिस हा प्रवास परत रेल्वे-बोट-रेल्वे हाही तितकाच अविस्मरणीय! प्रसिद्ध इंग्लिश खाडी ओलांडून पुन्हा युरोपमध्ये प्रवेश केला. राहून राहून ‘द लाँगेस्ट डे’ या प्रसिद्ध युद्धपटाची आठवण येत होती, कारण याच कॅले बंदराजवळ दोस्तराष्ट्रांचे लक्षावधी सैनिक छोट्या बोटींतून उतरले होते.

पॅरिस नॉर्ड स्टेशनपासून आमच्या मौल्यवान युरेल पासची सुरुवात करण्याकरता एका खिडकीपाशी गेलो. पासपोर्ट तपासणी पूर्ण केल्यावर आमच्या तिघांच्या पासवर तो चालू झाल्याची तारीख व २१ दिवस ज्या तारखेला पुरे होणार ती तारीख नोंदविली गेली. नेमका माझ्या पासवर ऑफिसने गडबडीत चुकीचा महिना छापला. माझं नशीब बलवत्तर म्हणून चूक तिथल्या तिथे लक्षात आली. खाडाखोड न होता पुन्हा महिन्याचा क्रमांक व्यवस्थित लिहिला गेला. तरीही मनाला प्रवासभर मधूनच धाकधूक वाटे. कोणी त्यावरून अडविणार तर नाही ना? तसं झालंच, तर तिघांचा एकच गोंधळ व पास मुंबईत मिळाल्याने तो पुन्हा पॅरिसमध्ये मिळणारच नाही. असो. तशी वेळ मात्र आली नाही. आता पुढचे २१ दिवस लाल रंगाचा पास व पासपोर्ट यांचं आमच्या जीवनात अविभाज्य स्थान झालं होतं. त्यांची तपासणी पुढील प्रवासात असंख्य वेळा झाली.

पॅरिस नॉर्ड ते व्हर्सायिल्स असा पहिला प्रवास फर्स्टक्लासमधून सुरू केला. डबा उत्तम सुखसोयींनी परिपूर्ण होता. पुढेही प्रत्येक नवं स्टेशन येण्यापूर्वी डब्यात घोषणा ऐकून व इतरही अनेक सोयी-सुविधा पाहून आम्ही थक्क झालो होतो. पुढचे २१ दिवस अशाच आलिशान डब्यांमधून आमचा प्रवास सुखद होणार होता. पॅरिसमधील वास्तव्यात पॅरिस नॉर्ड स्टेशन तर आम्हाला सरावानं अगदी घरासारखं वाटलं. राहण्याची जागा स्टेशनजवळ व आमच्या मोठ्या बॅगा स्टेशनवरील लॉकर्समध्ये सुरक्षित, अशी सर्व चोख व्यवस्था झाल्याने शहर फिरताना एक छोटी बॅग गळ्यात अडकवून संपूर्ण शहर पॅरिस ट्यूब-रेलने आरामात फिरून पाहता आलं. लंडन ट्यूबपेक्षा पॅरिस-ट्यूबरेल्वे निश्चित वरच्या दर्जाची होती. डब्यातील व प्लॅटफॉर्मवरील दिव्यांचा झगमगाट डोळ्यांत भरणारा आणि प्रवासीही रंगेल, मजा करत फिरणारे दिसत होते. पॅरिस शहराचा विस्तार बराच मोठा आहे, परंतु ट्यूब-रेल शहराच्या कानाकोपऱ्यांतून पोहोचलेली असल्यामुळे शहर सहजपणे पालथं घालता येतं.

— डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..