नवीन लेखन...

कलकत्ता मेल व्हाया नागपूर – भाग ३

नागपूरला लग्नाला जाण्याचे ठरले की आमच्या मोठ्या काकांचा अंगात जणू रेल्वे संचारत असे. बोरीबंदर स्टेशन वरून वन डाऊन निघण्याच्या वेळी आधी ३ ते ४ तास ते स्टेशन जवळील यार्डात पोहोचत.ज्या ठिकाणी गाड्या धुण्याचे काम चाले त्या जागी ते पांढरा कोट व हॅट चढवून एखाद्या गार्ड सारखे उभे राहात. डब्यातील बरोबर शेवटचा कोपरा आम्हा दहा-बारा जणांसाठी ते हेरून ठेवीत. सर्व सामान ठीकठाक मावेल याची खात्री करून घेत.यार्डातून गाडी उलटी प्लॅटफॉर्मला लागत असताना ते दारात उभे राहून हात हलवून आम्ही कोणत्या डब्याशी उभे राहावे याचा इशारा देत.रेल्वे ऑफिसरचे कुटुंब असावे अशा संभ्रमात बाकीचे प्रवासी दूर उभे रहात. आम्ही सर्व रुबाबात गाडीमध्ये स्थानापन्न झालेले पाहून आमचे काका विजयी मुद्रेने सगळ्यांकडे पाहात. काका,तुम्ही ग्रेट आहात असे म्हंटल्यावर त्यांना मनापासून आनंद होत असे. दिवसा सामानातील दोन भल्या मोठ्या जाड पत्र्याच्या ट्रंका दोन बाकांचा मध्ये ठेवून जेवणाची व्यवस्था व रात्री आम्हा मुलांची त्यावरच झोपण्याची सोय करण्यात येई. जेवणाचे पितळी डबे, पिण्याच्या पाण्याची कळशी अशा सरंजामासहित वन डाऊन चा प्रवास सुरू होत असे. एकदा गाडी सुरू झाली की काका सबंध वेळ दाराशी उभे, प्रत्येक स्टेशनवर उतरत.गाडीला चक्कर मारत व कोणत्याही प्रवाशांना आमच्या बाजूला जराही फिरकू देत नसत. इगतपुरी भुसावळ या स्टेशनांवर इंजिन बदलण्याचा सोहळा होत असे. तो पाहण्यासाठी काका आम्हाला आवर्जून त्या ठिकाणी नेत .मग ते उगाचच इंजिन ड्रायव्हर बरोबर संवाद साधीत आपल्या जुन्या रेल्वेतील आठवणींचा पाढा वाचीत. खरे तर त्यानंतरच्या ३० वर्षात त्यांचा रेल्वे नोकरीशी सुतराम संबंध नव्हता.परंतु काका अशा काही गप्पागोष्टी करीत की जणू तेच गाडी पुढे नागपूर पर्यंत नेणार आहेत. मध्यरात्री येणाऱ्या स्टेशनवरील प्रवाशांच्या आपापसातील भांडणाचा कलकलाट चालू असला तरी आम्ही सर्वजण मात्र गाढ झोपी जात होतो. अर्थातच केवळ काकांची कृपा!

एकदा मनमाडला उतरून औरंगाबाद गाठायचे होते. झाले-!आमचे काका सरसावले. कोणालाही पत्ता लागू न देता त्यांनी सामानात स्टोव्ह, भांडी व शिधा असलेले पोते घेतलेले होते. मनमाडला उतरता उतरता प्लॅटफॉर्मच्या एका कोपऱ्याचा ताबा त्यांनी घेतला व तासाभरात आम्हा दहा जणांना पिठले भाताचे जेवणचक्क प्लॅटफॉर्मवरच पंगत म्हणून स्वतः वाढले. तो काळही तसा होता . आमच्याकडे कुणाचे लक्षही गेले नाही. काकांनी आपली जिद्द मात्र पुरी करून घेतली.आजही जेव्हा कधी मनमाड स्टेशनवर गाडी थांबते तेव्हा मला प्लॅटफॉर्मवर मांडलेली भेटले व भाताची पंगत आठवते.

एका प्रवासात वडनेरा स्टेशन वरपटकन उतरून काकांनी सर्वांसाठी आणलेली गरम भज्यांची फर्माईशीची रास आठवल्यावर कधी कधी मनात येऊन जाते की खऱ्या अर्थाने काका रेल्वे प्रवासातील आनंद लुटत होते.

माझ्या बहिणीची कलकत्त्याला बदली झाली. तिच्याबरोबर सोबत म्हणून आम्ही घरातील ५ जण पुन्हा वन डाऊन ने कलकत्त्यास जाण्याच्या तयारीला लागलो.उन्हाळ्याचे दिवस तेव्हा एअरकंडिशन्ड अबे नव्हते.फर्स्टक्लास ची तिकीटे मिळवली.वाटेतील अकोला, नागपूर या स्टेशनवर नातेवाईकांना भेटण्यासाठी व जेवण घेऊन येण्यास सांगितलेले.

आमच्याबरोबर ब्रेक व्हॅनमधून तिच्या घरातील सर्व फर्निचर न्यावयाचे होते.पुढे आम्ही दार्जिलींगला जाणार म्हणून पुढच्या गाड्यांची ही तिकिटे मिळवली. दोन रात्रीचा प्रवास त्यामुळे सर्वांच्या मनात खूप उत्सुकता व उत्साह.आता जय्यत तयारीनिशी स्टेशनवर जाणार तर अचानक बदली रद्द झालीअसल्याने येऊ नये अशा निरोपाचा कलकत्त्याहून टेलीफोन.सगळ्यांचे चेहरे पडले.त्या खेपेस आम्ही वन डाऊन पर्यंत पोहोचू शकलो नाही.

तरीसुद्धा नियतीने हा वन डाऊन चा मार्ग माझ्यासाठी पुढे अनेकदा निवडून ठेवला होता आणि थेट सिक्कीम, भूतान , आसाम पर्यंत या गाडीच्या मदतीने माझे पाय लागले. आता वन डाऊन च्या तोडीची गीतांजली व दुरांतो एक्सप्रेस या गाड्या दिमतीला आहेत. परंतु आजही वन डाऊन नागपुर मेल तशीच रुबाबात आपला प्रवास करीत आहे.

— डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..