सोशल मीडिया वरील दुष्प्रचार आणि सामान्य नागरिकांचे कर्तव्य

समाज माध्यमे (Social Media) ही एक महत्त्वाचे साधन झाले आहे. सुमारे 60-70 टक्के भारतीयांपर्यंत ही माध्यमे पोहोचली असावीत असा अंदाज आहे. समाज माध्यमांमधून सकारात्मक बातम्या आपण पोहोचवू शकतो. तर शत्रु राष्ट्रे मात्र एकमेकांविषयी वाईट बातम्या सांगण्यासाठीही व अपप्रचार करण्यासाठी त्यांचा वापर करतात. यामध्ये नवनवे संशोधन रोज होत आहे. समाज माध्यमांवरील पोस्टसाठी आर्थिक भार पडत नसल्याने प्रत्येक सामान्य व्यक्तीला स्वतःच टीव्ही, वर्तमानपत्र चालवणे किंवा एखादी विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे. मात्र याचा वापर जेव्हा समाजात तेढ पसरवण्यासाठी किंवा चुकीचा विचार प्रसार करण्यासाठी केला जातो तेव्हा नागरिकांची व त्याचवेळी सरकारची जबाबदारी वाढते. गेल्या काही महिन्यांपासून आरोप प्रत्यारोप समाजमाध्यमे, टीव्ही आणि वर्तमानपत्रे यामधून केले जात आहेत. यापैकी 99 टक्के आरोप कधीच सिद्ध होणार नाहीत. मग हे आरोप जे करतात त्यांच्या विरूद्ध कायदेशिर कारवाई होणार का?. जसे तंत्रज्ञान सोपे होत सामान्य माणसाच्या हाती जात आहे तसे देश द्रोही विचारांना विरोध करण्याची त्यांची ताकद वाढत आहे.

काही राष्ट्रांनी निवडणुका आधी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने प्रचार केला व या प्रचारामुळे डोनाल्ड ट्रम्प जिंकले असावे अशी समजूत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने रशिया आणि चीन ने प्रचार करून सोशल मिडीयावर त्यांचे विरोधक डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिटंन यांच्याविरोधात प्रचंड चुकीच्या बातम्या पसरवल्या अश्या बातम्या आहेत. त्यातील 99 टक्के बातम्या खोट्या होत्या.त्याचा परिणाम असा झाला की डोनाल्ड ट्रम्प जे स्वतःहून निवडणूक जिंकू शकले नसते त्यांचा विजय झाला. अमेरिके सारख्या प्रगत राष्ट्रामध्ये सुशिक्षितांचे प्रमाण सर्वाधिक असतांना सुध्दा हिलरी क्लिटंन यांचा पराभव झाला. याचा अर्थ चुकीच्या बातम्यांचा वापर समाज माध्यमांद्वारे करून एक उमेदवार विजयी झाला. त्यावरून सोशल मिडीयाची डाव पलटण्याची ताकद आपण ओळखू शकतो.

ज्या बाजूने निर्णय हवा त्या बाजूचे तज्ज्ञ बोलवायचे

दुष्प्रचारामध्ये एक महत्त्वाचे तत्व हेच की कुठलाही एक आरोप करायचा, त्यानंतर तो आरोप समाज माध्यमांचा वापर करून तो सगळीकडे पसरवायचा. त्याकरिता अनेक पक्षांनी, असे तंत्रज्ञ किंवा कन्सलटंट यांना नोकरीवर ठेवले आहे,ज्यांना सोशल मिडीयाचा वापर कसा करायचा याची माहिती आहे. त्यांचे काम हेच की दुसरे पक्ष जे काही विधान करेल त्यातील चुका शोधायच्या आणि त्यांच्या विरूद्ध दुष्प्रचार सुरू करायचा. एवढेच नव्हे तर अशा प्रकारच्या बातम्या समाज माध्यमांमध्ये पसरावयाच्या, नंतर काही टीव्ही वाहिन्यांवर त्याविष़यी चर्चा घडवून आणायची. चर्चा घडवताना ज्या बाजूने निर्णय हवा त्या बाजूचे पत्रकार किंवा तज्ज्ञ बोलवायचे.

म्हणजे राफेल प्रकरणी घोटाळा झाला असे सिध्द करायचे आहे. त्याकरता काही तज्ज्ञ ज्यांचे मत राफेल घोटाळा झाला असेच असेल अशांनाच बोलावायचे. जेणेकरून टीव्हीचा कार्यक्रम पाहाणार्‍यांना असे वाटेल की चार तज्ज्ञ म्हणतात की घोटाळा झाला तर नक्कीच घोटाळा झाला असणार. वर्तमान पत्रातही आपल्या बाजूच्या तज्ज्ञांकडून लेख लिहून घ्यायचे. त्यातून घोटाळा कसा झाला हीच गोष्ट पुढे सरकवायची. त्यासाठी काही टीव्ही वाहिन्या,वर्तमानपत्रे तज्ज्ञांना पैसा देऊन खरेदी केले जाते असे आरोप केले जात आहेत.

येत्या पाच महिन्यांच्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमात खोट्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न होईल.रोजच्या रोज ही लढाई आपल्या विरोधातील लोकांच्या विरूद्ध एक नवा अपप्रचार करण्याची मोहिम सुरू करेल. पत्रकार परिषदा घेऊन त्याला हवा दिली जाइल. समाज माध्यमांची मुख्यालये ही अमेरिका किंवा युरोप या देशात आहे. ट्विटर, फेसबुक, व्हॉटस अ‍ॅप यांची मदत घेउन आपल्या विरूद्ध आलेल्या बातम्यांना थांबवण्याचे किंवा ब्लॉक करायचे आणि ज्या बातम्या आपल्या सोयिस्कर बातम्या येऊ द्यायच्या असे प्रकार सुरु असावेत. सोशल मिडीयावर त्या त्या पक्षाच्या नेत्यांचे अनेक समर्थक फेक आयडेन्टिटी तयार केले जात असावेत. एखाद्या नेत्याचे 10 लाख फॉलोअर्स आहेत असे दाखवले जाते मात्र त्यातील खर्‍या फॉलोअर्सची संख्या फ़ारच कमी असेल. अशा प्रकारे अपप्रचार मोहिम ही एका मोठ्या पातळीवर पोहोचली आहे.

गोबेल्स प्रोपागंडा

दुसर्‍या महायुद्धामध्ये सायकॉलॉजिकल वॉर फेअर ही लढाई झाली. जर्मनीचा हुकुमशहा हिटलर याच्या खोट्या बातम्या पसरवणारा प्रमुख होता गोबेल्स. त्यानेच हिटलरच्या बाजूच्या बातम्या सर्वदूर पसरवल्या. काश्मिर मध्ये या सर्वांचे रूपांतर एका वेगळ्या लढाईत करण्यात आले. त्याला पर्सेप्शन मॅनेजमेंट म्हटले जाते. माध्यमांमध्ये सातत्याने अशा बातम्या दाखवायच्या की या राज्यातील निष्पाप तरूणांवर सातत्याने अत्याचार होतो आहे, त्यामुळेच ते दहशतवादी कृत्यात सामील होत आहेत. त्यावर लेख लिहिण्यासाठी वर्तमानपत्रासाठी अनेक तज्ज्ञ(??) काम करत आहे.

नेपोलियन ने 100 वर्षापुर्वी म्हटले होते की दुष्कृत्य पसरवणारी वर्तमानपत्रे ही १०,००० शत्रुसैन्यापेक्षा सुद्धा जास्त ताकदवान आहेत. नेपोलियने हे विधान केले होते तेव्हा टीव्ही, वर्तमानपत्रे नव्हती, तसेच समाज माध्यमे नावाचा भस्मासूर नव्हता. आता अपप्रचाराच्या मोहिमेला या सर्वांमुळे मोठा आयाम दिला जातो. या सर्वांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा ओतला जात आहे. त्यामुळे हे सर्व कसे थांबवायचे हे एक मोठे आव्हान आहे.

काय करावे

भारत सरकारने सोशल मिडियातील फेसबुक, ट्वीटर, व्हॉटस अ‍ॅप यांची तपासणी केली पाहिजे.जे मेसेज हिंसाचार वाढवु शकतात ते ब्लॉक केले पाहिजे. फॉलोअर्सची संख्या खोट्या पद्धतीने वाढवण्यात आली आहे का. सोशल मिडीया सारख्या प्लॅटफॉर्मवर जाताना स्वतःची ओळख करून देणे फार महत्त्वाचे आहे, ज्यामुळे फेक न्यूज म्हणजेच खोट्या बातम्या पसरवणे सोपे राहाणार नाही. व्हॉटअ‍ॅपने नियमन करायला सुरूवात केली आहे. पण याची अंमलबजावणी जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही.

चीन सारख्या देशात सोशल मिडीयामधली साधने जी हिंसाचार पसरवतात, द्वेष पसरवतात किंवा एकमेकांच्या विचारसरणी विरूद्ध लिहितात, त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. आता वेळ आली आहे की सोशल मिडीयात बदनामीकारक मजकूर प्रसृत करणार्‍यांना हे सांगावे लागेल की भारतात अशा प्रकारचा दुष्प्रचार करून भारतीयांची मने जिंकता येणार नाही. भारतीय मतदार हुशार आहे आणि त्याला कोणाला मत देऊन निवडून आणायचे आहे याची जाण आहे. मात्र चुकीच्या बातम्यांचा भडिमार थांबवण्याची गरज जरूर आहे.

दुष्प्रचार युद्ध काश्मिरमध्ये चालते

हाच भडिमार जसा काही राजकीय पक्ष मतदारांवर करतात तशाच प्रकारचा भडिमार लष्कर, भारतीय सुरक्षा एजन्सीवरही होतो. सुरक्षा एजन्सीच्या कामाच्या पद्धतीवर घाला घालावा त्यामुळे त्यांची कामाची क्षमता कमी होईल, अशा प्रकारचे दुष्प्रचार युद्ध काश्मिरमध्ये चालते, नक्षलवादी भागातही हा भडिमार केला जातो. ईशान्य भारतातही अशा प्रकारचे दुष्प्रचार केला जातो. म्हणून या सर्व प्रकारात सामान्य सुज्ञ नागरिकांची जबाबदारी काय तर शक्यतो समाज माध्यमांवरील अशा समूहात सामील होऊ नये. कुठलीही बातमी पुढे पाठवण्यापुर्वी विचार करावा. अशी कुठलीही बातमी हिंसाचार घडवू शकते किंवा एकमेकांविषयी वाईट बातमी असेल तर दुर्लक्ष करावे. जस संशयास्पद वाटत असेल तर असा बातमीची लिंक पोलिसांपर्यंत पोहोचवावी. जेणेकरून पोलिस त्यांच्यावर लक्ष ठेवतिल. येत्या काही महिन्यात सुरक्षा एजन्सी या सगळ्यावर लक्ष ठेवतील. जे कोणी हिंसाचार वाढवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करतील. अशा प्रकारच्या दुष्प्रचाराचा बळी आम्ही होऊ शकत नाही.

भारतामध्ये अराजक माजवायचे असेल तर त्यासाठी नक्षलवाद, माओवाद, दहशतवाद, याची काहीही गरज नाही. साधा एसएमएससुद्धा त्यासाठी पुरेसा आहे, जेव्हा इंटरनेटचा प्रसार जगभर झाला, त्यावेळी त्याच्या शिल्पकारांनी भाकित वर्तवले होते की, या तंत्राची व्यापकता आणि गती ही भविष्यकाळात सायबर क्राईम आणि सायबर वॉरला जन्म देणारी ठरू शकते. म्हणून त्याबाबत सगळ्याच देशांनी आणि समाजाने जागरुक राहिले पाहिजे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 226 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…