नवीन लेखन...

देशवासीयांनो कोरोनाला पिटाळून लावू या…!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. वास्तवात या 24 तासांत तिसर्‍या टप्प्यात जाण्याच्या आधी विषाणूंची वाट अडवायची होती आणि त्याचा सर्वात सोपा मार्ग हाच होता की सार्वजनिक संपर्क, आदान-प्रदान बंद करणे.म्हणूनच 130 कोटींचा हा देश घरातच थांबला. या देशाची कळती एक अब्ज जनता दिवसभर स्वत:ला घरात कोंडून घेते, हे जगासाठी नक्कीच आश्चर्य आहे. वाईटाची एक साखळी त्यामुळे तुटण्यास मदत झाली. जगभरात साथ-संसर्गाने पसरणार्‍या रोगांवर मात करण्याची सर्वात प्रभावी उपाययोजना म्हणून प्रबोधनाकडे पाहिले जाते. कोरोनाविषयी जनजागृती झालीच, तसेच काय करावे, काय करु नये, याचीही माहिती एकाचवेळी अनेकांना मिळाली. मात्र एका जनता कर्फ्यूने कोरोनापासून मुक्ती मिळेल असे नाही.

हा जनता कर्फ्यू ३१ मार्च पर्यंत वाढवण्यात आल्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने रविवारीच दिला. तरीही मुंबईतल्या रस्त्यांवर खासगी वाहनांमधून येणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढलेली दिसून आली. लोक काही अत्यावश्यक काम असल्याशिवायही बाहेर पडल्याचे चित्र होते. महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही असे चित्र दिसून आले.“लॉकडाऊनला अजूनही अनेकजण गांभीर्याने घेत नाही आहेत. स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. गरज नसेल तर बाहेर पडू नका, आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव वाचवण्यासाठी हे आपल्याला करायचं आहे. तसेच, देशातल्या सर्व राज्य सरकारांनी नियम आणि कायदे पाळावेत.” जनतेला त्याचे गांभीर्य नाही का? असा सवाल पंतप्रधानांनी केला आहे.

घरातूनच कामकाज

भारत सरकारने कोरोनाचे संकट ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे. केंद्र सरकारने या मोठ्या संकटाला तोंड देण्यासाठी खंबीर उपाय व जनजागृती युध्द पातळीवर हाती घेतली आहे. सध्या एकतीस मार्चपर्यंत निर्बंध जारी केले आहेत. शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी जारी केली आहे. सर्व गर्दीच्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. मुंबई म्हणजे गर्दी हे समीकरण आहे. म्हणून गरज नसेल तेव्हा बाहेर पडायचे नाही, हे पथ्य लोकांनी आपणहून पाळणे महत्वाचे आहे.

अनेक खाजगी व कॉर्पोरेट कंपन्यांनी आपले कर्मचारी व अधिकारी यांना वर्क फ्रॉम होम म्हणजेच कार्यालयीन कामकाज आपल्या घरून करावे अशा सूचना दिल्या आहेत. रोज ऑफिसला जाऊन तेथे आपल्या कंप्युटर किंवा लॅपटॉपवर काम करणारे कर्मचारी आता घरून काम करू लागले आहेत. घरून काम करण्याच्या पध्दतीने या हजारो कर्मचारीवर्गाचे घर ते ऑफीस असा जा -ये करण्याचा रोजचा दोन ते चार तास वेळ वाचणार आहे.

मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, पुणे, अशा मोठ्या शहरात वर्क फ्रॉम होम चा कर्मचारी व उद्योगसमुह या दोघांनाही लाभ होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे साथीचे रोग पसरण्याचा धोका कमी होईल.

गर्दी ओसरली….  सवयींचे काय ?

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सवयींकडे अजूनही सर्रास कानाडोळा केला जातोय. कारण, काही नागरिकांच्या अंगी या वाईट सवयी इतक्या भिनल्या आहेत की, ‘कोरोना’चा प्रादुर्भाव लक्षात आल्यानंतरही त्यांना स्वच्छतेशी देणे घेणे नाही.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचे सध्या सर्व स्तरावर आवाहन केले जात आहे. पण, या विषाणूच्या फैलावाची भीषण परिस्थिती लक्षात आल्यानंतरही काही लोकांच्या सार्वजनिक अनारोग्य पसरविणार्‍या सवयी मात्र बदललेल्या नाहीत. रस्त्यावरची गर्दी ओसरली असली तरी वाईट सवयी ‘जैसे थे’च आहेत. शिंकताना रुमाल वापरा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका यांसारख्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सवयींकडे अजूनही सर्रास कानाडोळा केला जातोय. कारण, काही नागरिकांच्या अंगी या वाईट सवयी इतक्या भिनल्या आहेत की, ‘कोरोना’चा प्रादुर्भाव लक्षात आल्यानंतरही यांच्या तोंडावरच यांचे नियंत्रण नाही. अशा लोकांना स्वतःच्या आरोग्याची धड काळजी तर घेता येत नाहीच, उलट प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या ते इतरांचेही आरोग्य धोक्यात आणतात. पण, ना त्याची खंत ना खेद. ‘आपल्या पचापचा थुंकण्याने, इतरांच्या तोंडासमोर रुमाल न धरता शिंकण्याने काय ‘कोरोना’ पसरणार आहे का,’ अशीच यांची बेजबाबदार, बेशिस्त वागणूक असते.

अशांना सार्वजनिक स्वच्छता करण्याची शिक्षा द्यायला हवी. दुसरीकडे शालेय स्तरावर आणि कौटुंबिक पातळीवरही स्वच्छतेचे केवळ पुस्तकी संस्कार न गिरवता, त्याची अंमलबजावणी विद्यार्थी त्यांच्या दैनंदिन जीवनात करत आहेत की नाही, याची खातरजमा करावी. जपानचच्या शाळांमध्ये स्वच्छता कर्मचारीच नाहीत. संपूर्ण शाळा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आणि प्रामुख्याने विद्यार्थ्यांची. त्यामुळे स्वच्छतेचे संस्कार नुसते सांगून, ऐकून अमलात येत नसतात, तर त्याला प्रत्यक्ष कृतीची जोडच द्यावी लागते.ती दिली जावी.

सामाजिक गुन्हेगारांना शिक्षा द्या

परिस्थिती आल्यावरच माणसाची सज्जनता आणि दुर्जनता समोर येते, हे नक्की. आपण किंवा आपल्यामुळे दुसरे कोणीही कोरोनाचे शिकार होऊ नये यासाठी सज्जनशक्ती प्रयत्नशील आहे. मात्र, याच परिस्थितीमध्ये काही लोकांच्या सज्जनतेचे मुखवटे फाटले आहेत.कनिका कपूरवर गुन्हा दाखल झाला आहे. कारण, ही स्वतः कोरोनाग्रस्त आहे, तिला माहिती असून तिने लखनौमध्ये उच्चपदस्थांच्या पार्टीमध्ये सहभाग घेतला. इतकेच नाही तर नातेवाईकांच्या कौटुंबिक कार्यक्रमालाही तिने हजेरी लावली. परदेशातून भारतात आल्यावर एअरपोर्टवर परदेशातून आली आहे म्हणून कोरोनाची प्राथमिक तपासणी होऊ नये म्हणून ती एअरपोर्टवर लपूनही राहिली आणि संधी मिळताच पळून गेली. दुसरीकडे इगतपुरी आणि इतरत्रही काही ठिकाणचे क्वारंटाईन केलेले रुग्ण पळून गेले. श्रीनगरच्या विमानतळावर बांगलादेशाहून आलेल्या विद्यार्थ्यांनी क्वारंटाईन होण्यास नकार देत धिंगाणा घातला. बांगलादेशातून भारतात परतलेले विद्यार्थी म्हणे बांगलादेशात शिकायला गेले होते. काय फायदा त्यांच्या उच्च शिक्षणाचा? ‘अल्लाहची मर्जी कोरोना झाला,’ असे म्हणत उपचार नाकारू पाहणार्‍या केरळच्या चार मुस्लीम विद्यार्थ्यांनी कोरोनाची लागूण होऊनही उपचाराला नकार दिला.

या सगळ्यांना असे का वाटले नाही की, आपल्यामुळे दुसर्‍यांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव होईल. कशाला समाजाचे नुकसान करायचे? ते समाजाचे आणि देशाचेही गुन्हेगारच आहेत.त्यांना रस्ते साफ़ सफ़ाई करण्याची शिक्षा दिली जावी.

प्रत्येकाने सहकार्य करण्याची गरज

कोरोना संशयितांनी कुठली पथ्ये पाळावी यासह स्वच्छतेबाबत कोणती काळजी घेतली जावी, याच्या सूचना सरकारतर्फे आणि आरोग्य मंत्रालयातर्फे जारी होत आहेत. आता जबाबदारी सर्व भारतीयांचीही आहे. भारतात लोकशाही आहे आणि त्यामुळेच आपली जबाबदारी जास्त आहे. आज प्रत्येक भारतीयाने कोरोनाविरुद्धच्या सरकारने पुकारलेल्या युद्धाचे सैनिक म्हणून त्यात सशस्त्र सहभागी झाले पाहिजे. हा विषाणू ज्येष्ठ नागरिक आणि 10 वर्षांच्या आतील मुलांना लक्ष्य करतो. त्यामुळे अशा वयोगटातील लोकांची विशेष काळजी देशवासीयांनीच घ्यायला हवी. आरोग्ययंत्रणेला सहकार्य करण्याची जबाबदारी सर्व सामान्य जनतेची आहे. कारण जोवर प्रजा सहकार्य करणार नाही, तोवर या देशातील कोणताही राजा, कुठल्याही प्रकारच्या युद्धावर जय मिळवू शकणार नाही.

अशा वेळी आपल्या घरचे धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम रद्द करणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, आपापले व्यवसाय काही दिवस बंद करणे, शिक्षकांनी गरज असेल तरच शाळेत जाणे अशी कृती अपेक्षित आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मिळालेल्या सुट्या या मजा मारण्यासाठी नसून, त्याचा सदुपयोग करायला हवा. प्रवास टाळावा, गरज असेल तरच घराबाहेर पडावे, कामबंदीमुळे आमदनीही बंद पडणार आहे. यामुळे मजूर किंवा छोटे विक्रेते यांच्या पोटापाण्याचा प्रश्न उभा राहील. अशांच्या उदरभरणाची काही दिवसांची सोय करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. राष्ट्रीय कर्तव्य काय असते, हे दाखवून देण्याची हीच खरी वेळ आहे. आपण आपल्या अधिकारांसाठी नेहमी जागरूक असतो. मग अशा संकटकाळी आपण सरकारची, नागरिकांची मदत करून आपली जबाबदारी ओळखायला नको?

तुमच्या भागात जे कुणी सर्दी, तापानं आजारी असतील त्यांना धीर देऊन तपासणी करून घ्यायला सांगायला हवे. आपल्या भागात असे कुणी रुग्ण आढळल्यास प्रशासनाच्या किंवा आरोग्य खात्याला त्याची कल्पना द्यायला हवी.ही नागरिकांच्या परीक्षेची घडी आहे. ही बाब ओळखून, माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध पुकारून, कोरोनाला पिटाळून लावू या…!

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..