नवीन लेखन...

कथा कर्जत स्टेशनची

महाराष्ट्राचं सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक शहर म्हणून पुणे शहराला अनेक शतकांची गौरवशाली परंपरा आहे, तर मुंबई शहराचा इतिहास मात्र जेमतेम ३०० ते ४०० वर्षांचा. ब्रिटिश राजघराण्याला लग्नानिमित्त पोर्तुगीज राजाकडून मुंबई हे बेट आंदण देण्यात आलं होतं. या दोन्ही शहरांची संस्कृती आणि राहणीमान अगदी वेगवेगळं, परस्परांहून कमालीचं भिन्न, पण या दोन शहरांमधलं अंतर मात्र २०० ते २५० कि.मी. इतकंच. अंतर कमी असूनही भोर घाटामुळे या शहरांमधील जाणं-येणं फार जिकिरीचं-खडतर, अशी वस्तुस्थिती होती. या दोन भिन्न संस्कृतीच्या शहरांमधील अंतर मिटवत त्यांना रेल्वेमार्गानं जवळ आणलं ते खंडाळा घाट बांधल्यामुळं! हा घाट म्हणजे भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वोत्तम बांधणीचा, निसर्गावर मात केलेला, शिल्पाचा, एक महान उत्कृष्ट नमुना आहे. या बांधणीची सर्व सूत्रं कर्जत रेल्वे स्टेशनवरून हलली. या दोन शहरांच्या दृष्टीनं कर्जत स्थानकाला तेव्हापासून महत्त्व प्राप्त झालं.

दहिवली या खेड्याचा आधार घेत कर्जत स्टेशनची बांधणी झाली. दहिवली, वेणगाव, तमनाथ, कडाव अशा अनेक खेड्यांना पेशव्यांनी भेटी दिल्याचाही उल्लेख आहे. १८५३ मध्ये मुंबई-ठाणे या मार्गावर सुरू झालेली रेल्वे १८६० सालापर्यंत कल्याण, बदलापूर, नेरळ, कांपोली (खोपोली) असा अडीच तासांचा रेल्वेप्रवास करीत होती. त्यावेळी मुंबई ते खोपोली तिकीट होतं २ रुपये. याच मार्गावर घाटाच्या पायथ्याशी रेल्वेमार्गांच्या बांधकामाचं सामान उतरवण्याकरता म्हणून व घाटात आवश्यक असलेला गाडी चढण्यापूर्वीचा मोठा थांबा, अशा दोन कारणांकरता कर्जतच्या अवाढव्य स्टेशनची बांधणी झाली. सर्व माल उतरवण्याकरता मालगाड्यांचे डबे उभे करावे लागत. त्यासाठी मोठं मार्शलिंग यार्ड बांधण्यात आलं. घाटातून गाडी चढताना गाडीच्या शेवटी इंजिनं (बँकर्स) जोडावी लागतात. ती सर्व इंजिनं तयार ठेवण्यासाठी अनेक रूळ व सांध्यांची योजना करावी लागते. अशा रुळांचं-सांध्यांचं जाळं स्टेशनच्या दोन्ही बाजूस पसरलेलं आहे. लांब पल्ल्याच्या प्रत्येक गाडीला, मालगाड्यांना कर्जत स्टेशनात थांबावंच लागतं आणि मुंबईहून येणाऱ्या अशा प्रत्येक गाडीला हे बँकर्स जोडण्याचं फार जोखमीचं काम ५ मिनिटांत पूर्ण करत गाडी घाट चढण्यास सज्ज होते. एकदा लोणावळा गाठलं, की हे बँकर्स गाडीपासून सोडविले जातात व ते घाट उतरून परत कर्जतमध्ये दुसऱ्या गाडीस जोडण्यासाठी तयार ठेवले जातात. रेल्वेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आणि मोठंच व्यापाचं काम असतं. त्याकरता अतिशय उत्तम सिग्नल यंत्रणा, निष्णात कर्मचारी २४ तास, ३६५ दिवस आपली कामगिरी चोख बजावत असतात. घाटात रेल्वे मार्गावर कोणताही अडथळा आल्यास स्टेशनमधून ताबडतोब उपाययोजना आखल्या जातात. या कामावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांची मोठी कॉलनी स्टेशनजवळच असणं आवश्यक होतं आणि तशी ती आहे देखील.

मध्य रेल्वेच्या लोकलसेवेचं हे शेवटचं रेल्वेस्टेशन असल्यानं गाड्यांची ये-जा इथून सततच चालू असते. कर्जतमध्ये धान्याची मोठी बाजारपेठ असून, पुणे व कोकण विभाग या गावामुळे जोडला गेला आहे. लोकलमुळे तर जवळजवळ २४ तास हे स्टेशन जागंच असतं. त्यात कर्जत-खोपली व कर्जत-पनवेल असे रेल्वेमार्ग झाल्याने तर कर्जतचं महत्त्व दिवसेंदिवस आणखीनच वाढलं आहे.

पहाटे अडीच वाजता कर्जत स्टेशनमधून मुंबईकडे पहिली लोकल रवाना होते. ही पहिली लोकल ‘मिल्कमन लोकल’ या नावानंच प्रसिद्ध आहे. कर्जत परिसरातील अनेक खेड्यांतून दुधाचे हंडे घेऊन जाणारे शेकडोनी दूध विक्रेते या गाडीनं थेट मुंबईपर्यंतचा अडीच तासाचा प्रवास डुलक्या घेत पुरा करतात. अगदी वर्षाचे ३६५ दिवस, रोजच्या रोज.

रात्री १ ते पहाटे ४ या वेळेत काही वेळा कर्जत प्लॅटफॉर्मवर ट्रेकर्सची टोळकी गप्पा गोष्टी करत बसलेली असतात. त्यांना पहाटे भीमाशंकर, राजमाची येथे जाणाऱ्या बसची प्रतीक्षा असते. अशा लोकांना भल्या पहाटे गरमा गरम पोहे व चहा देणारी कुटुंबं कर्जत स्टेशनच्या जवळच आहेत. प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्या दूर पल्ल्यांच्या गाड्यांतील खवय्ये प्रवासी एका खास गोष्टीकरता कर्जत येण्याची आतुरतेने वाट पाहत असतात, ती विशेष गोष्ट म्हणजे ‘दिवाडकर’ यांचा गरमागरम बटाटेवडा, लसणीची चटणी आणि मसाला चहा. गेली सत्तर एक वर्षे दिवाडकर व कर्जत स्टेशन यांचं अतूट नातं प्रस्थापित झालेलं आहे.

दख्खनची राणी (Deccan Queen) ही मुंबई-पुणे-मुंबई मार्गावरील मानाची गाडी तब्बल ८६ वर्षे कर्जत स्टेशनला मानाचा मुजरा देत धावत आहे. तिचं रंग, रूप सतत पालटत आहे. पांढरी, काळी, निळी हे तिचे काळाबरोबर बदललेले रंग. ही गाडी प्रथम श्रीमंतांची गाडी म्हणून फक्त ‘फर्स्ट क्लास’ होती, पण गेल्या पन्नास वर्षांत ती सामान्य प्रवाशांकरता परिवर्तित होत गेली. आज सर्व प्रवाशांची ती आवडती गाडी आहे. या गाडीने कधीही प्रवास न केलेला मुंबई-पुण्यातील रेल्वेप्रेमी मिळणं दुरापास्तच आहे.

गणिततज्ज्ञ कोसंबी, दत्तो वामन पोतदार, जस्टिस बाळ, पु. ल. देशपांडे, विठ्ठलराव गाडगीळ, वसंत बापट, अशा अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या गाडीनं कायम प्रवास करीत असत. ‘दख्खनची राणी’ ही बापटांची कविता तर अजरामर झालेली आहे. या गाडीतून रोज प्रवास करण्यासाठी पासधारकांना वेगळे डबे आहेत. हे डबे म्हणजे त्यांचं दुसरं घरच असतं. प्रत्येक दिवशी ८-९ तास त्यांचं या गाडीशी अतूट नातं असतं. ही गाडी साडेतीन तासांत मुंबई-पुणे प्रवास पूर्ण करेल यासाठी आटोकाट प्रयत्न केला जातो. कमी वेळात प्रवास पूर्ण करण्यामुळे या गाडीने उत्कृष्ट कुरियर सेवादेखील चालते. या मार्गावर अनेक गाड्या प्रवाशांनी भरभरून धावत असतात, पण दख्खनच्या राणीची शान काही औरच आहे.

घाटात कोणतीही अडचण आल्यास या स्टेशनवरील यंत्रणा तो अडथळा तत्काळ दूर करण्यासाठी तत्पर आहे. १५० वर्षे हा रेल्वेमार्ग प्रवासासाठी सुरक्षित ठेवण्यात स्टेशनवरील कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे.

एकदा पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या इंद्रायणी एक्सप्रेसवर घाटात फार मोठा बाका प्रसंग उद्भवला होता. ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ अशी ती वेळ होती. घाटातील एका उतरणीच्या रेल्वेमार्गावर इंजिनमध्ये काहीतरी बिघाड झाल्यासारखा वाटल्यामुळे ड्रायव्हरनं गाडी थांबविली. इंजिनमधून उतरून तो त्या इंजिनची खालून तपासणी करत असतानाच, त्याला काही कळण्याच्या आत अक्षरशः क्षणार्धात ती गाडी सुरू झाली; नुसती सुरू नाही झाली, तर तिनं असा काही वेग घेतला, की तो ड्रायव्हर इंजिनमध्ये शिरूच शकला नाही. पुढे उतार असल्यानं गाडीचा वेग वाढतच होता. बोगद्यामागोमाग बोगद्यातून विलक्षण वेगात उतरणारी गाडी आतील प्रवासी अनुभवत होते. काहीतरी बिघाड झाला आहे हे प्रवाशांच्या लक्षात येत होतं, पण करायचं काय हे मात्र कोणालाच कळत नव्हतं. जवळजवळ १५ मिनिटं गाडीचा हा जीवघेणा प्रवास चालू होता. एकाएकी डायनिंगकारच्या चाकाखालून ठिणग्या उडू लागल्या, खालून धूर येऊ लागला आणि डब्याच्या काही भागांनी पेट घेतला. त्याचवेळी उतार संपत आला आणि गाडी सपाटीवर आली, वेग एकदम कमी झाला. बऱ्याच डब्यांची चाकं घर्षणाने तापली होती, त्यातून ठिणग्या उडू लागल्या होत्या; त्यामुळे काही लोकांनी चालत्या गाडीतून काळोखात उड्या मारल्या. शेवटी एकदाची गाडी कर्जत स्टेशनच्या बाहेरील मालगाड्यांच्या यार्डात येऊन थांबली. तोपर्यंत आगही आटोक्यात आली. हतबल प्रवाशांनी अखेर सुटकेचा श्वास सोडला. इंजिनजवळ येऊन बघतात तो आत ड्रायव्हर नव्हता. ‘हे काय गौडबंगाल आहे’ हे कळतच नव्हतं व पुढेही याबाबत योग्य तो खुलासा झालाच नाही. सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही. केवढा तरी अनर्थ टळला होता. काळोखात सर्व प्रवाशी प्लॅटफॉर्मपर्यंत चालत आले आणि सर्व प्रवाशांना मुंबईपर्यंत दुसऱ्या गाडीनं नेण्याची सोय करण्यात आली.

महत्त्वाचे लक्षणीय क्षण साठवून ठेवणारं, रेल्वे आणि प्रवासी या दोघांसाठीही महत्त्वाचं असणारं असं हे कर्जत स्टेशन गेली १५० वर्षे अखंड सेवा देत दिमाखात उभं आहे.

-डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..