दत्तूकाका व माझे वडिल अनेक वर्षे खडकपूरला सुट्टीमध्ये जातच राहिले. मोठी रेल्वे कॉलनी. रोज निरनिराळ्या गाड्यांच्या गप्पा त्यातही वन डाऊन विशेष चर्चेत असे.
गाड्यांचे टाईमटेबल व त्या लेट का होतात यावर तासन्तास काथ्याकूट. या सर्व मार्याचा दत्तूकाकांच्या मनावर असा काही जबरदस्त पगडा बसला की त्यांनी चक्क इंजिनमधील फायरमनची नोकरी पकडली. त्यांचे दणकट शरीर व काबाडकष्ट करण्याची मनापासून आवड व तयारी. इंजिनमधील एका कोपर्यातील कोळशाच्या राशीतून १५० फावडी दगडी कोळसा एक एक करुन उचलून जोराने इंजिनच्या बॉयलर खालील पेटत्या भट्टीत फेकायचा. समोर भडकत्या ज्वाळा, दगडी कोळशाचा धूर व उडणारे जाड काळे जळते कण.
त्यातच मे महिन्यातील उत्तरेकडील उन्हाळा तेव्हा काकांसाठी हे काही सोपे काम नव्हते.तरीही त्यांनी मनापासून ३ ते ४वर्षे ही नोकरी निभावली. एकदा घरी कोणाला पत्ता लागू न देता काकांनी १८ तासाचा इंजिनप्रवास थेट जगन्नाथपूरीपर्यंत केल्याचे मागाहून समजल्यानंतर घरात हलकल्लोळ माजला होता.
काही वेळा त्यांचे खडकपूरचे काका सुट्टीत आपल्या दोन्ही पुतण्यांना सहाय्यक सेवक म्हणून दूरच्या रेल्वे प्रवासाला नेत. ते व त्यांची बायको फर्स्ट क्लासमध्ये आणि हे दोघे थर्ड क्लासच्या डब्यासमोर हजर व्हायचे. सर्व सामान दोघांनी डोक्यावर घेत रेल्वेची वेटिंग रुम गाठायची. सोबत स्वयंपाकाचे सामान असे. सर्व स्वयंपाक त्यांनी शिजवायचा. खडकपूरवाले काका त्यांना एखाद्या नोकरासारखे वागवायचे. वरती घरच्या मंडळींचे म्हणणे असे. अरे, फुकट प्रवास आणि स्थलदर्शन झाले. मग आणखीन काय हवे?
यामुळे एक मात्र झाले. रेल्वे प्रवासाच्या अनुभवांचा फार मोठा साठा त्यांच्याजवळील पोतडीत जमा झाला. पुढे खडकपूरचे काका रेल्वेतून निवृत्त झाले आणि नागपूरच्या घरात रेल्वे स्टेशनवरच आढळणारी दोन भली मोठी लाकडाची बाके स्थानापन्न झाली. त्या बाकांना लोखंडी हात होते. पूढे घरातील अनेकांनी त्यांचा उपयोग वामकुक्षी घेण्यासाठी केला होता.
माझे वडिल वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबईत व त्यांचे मोठे भाऊ रेल्वे सोडून नंतर मुंबईतच फॅक्टरीत कामाला लागल्याने दोघांच्या मुंबई – नागपूर वार्या वन डाऊनने अनेकवेळा होत असत. आधीच हा प्रवास १८ तासांचा व त्यात गाडीला उशीर झाल्यास वाढीव प्रवास करावा लागे. तो सुध्दा अखंड वेळ बसूनच. गर्दी तर इतकी जीवघेणी असे की साधे बाथरुमपर्यंत जाणेही अशक्य होई.मधल्या स्टेशन वरील प्रवाशांना सरळपणे दारातून आत शिरणे कठीणच असे त्यामुळे डब्याच्या खिडकीचा वापरात शिरण्यासाठी करण्यात येई.
एकदा एक प्रवासी खिडकीमधून अर्धा आज शिकलेला असताना गाडी सुरू झाली. आतील प्रवासी त्याला आत शिरूच देत नव्हते. अर्धा तास गाडी चालू, हा अर्धा आत, अर्धा बाहेर, धन्य तो प्रवासी!
१८ तासाच्या प्रवासात उडालेल्या कोळशाच्या कणांनी काळसर झालेले कपडे आणि पार विस्कटून गेलेले केस यामुळे रेल्वेने आलेले प्रवासी हमखास ओळखता येत असत.
— डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply