नवीन लेखन...

नॅरो गेज ट्रेन्स (टॉय ट्रेन्स) – भाग पहिला

जगभरात डोंगरमाथे गाठण्यासाठी छोट्या म्हणजे २ फूट रुंदीच्या रुळांवरून टॉय ट्रेन्स धावण्यास साधारण १८९० सालापासून सुरुवात झाली. या गाड्यांचे डबे छोटे आणि सुबक बांधणीचे असतात. डब्यांना दोन्ही बाजूंनी प्रशस्त खिडक्या, छोटी दारं असतात आणि आरामात बसण्यासाठी बाकं असतात. वाफेची वा डिझेल इंजिन असलेल्या अशा गाडीचा वेग इतका कमी असतो, की तरबेज प्रवासी, विक्रेते, अशी मंडळी चालती गाडी सहजपणे पकडू शकतात. अतिशय संथ, आरामदायी असलेला हा रेल्वेप्रवास अगदी निसर्गाच्या कुशीत पोहोचतो.

ब्रिटिश राज्यकर्त्यांना भारतातील उन्हाळा सहन करणं फारच कठीण जात असे, त्यामुळे त्यांनी भारतभरातील काही डोंगररांगांमध्ये थंड हवेची ठिकाणं शोधून तिथे टुमदार गावं बनविली. तिथपर्यंत पोहचण्याकरता नॅरो गेज रेल्वे नेली. ह्या रेल्वे बांधणीचं काम महाजिकीरीचं. बांधण्यास लागणारा कालावधी मोठा व अतिशय खर्चीक; पण या सर्व अडचणींवर ब्रिटिशांनी मात केली, कोणतंही काम अर्धवट सोडलं नाही. या सोयीमुळे सामान्य भारतीय नागरिकांनाही थंड हवेच्या जागांची गोडी लागली. यांमधील काही मार्गाना ‘जागतिक वारसा’ (वर्ल्ड हेरिटेज) म्हणून मान्यता मिळालेली आहे आणि आजही ही खर्चीक रेल्वे चालविली जात आहे.

सिलीगुडी – दार्जिलिंग (बंगाल), कलका – सिमला (हिमाचल प्रदेश), मदुराई-कुन्नुर उटकमंड (उदगमंडलम) (तामिळनाडू), नेरळ – माथेरान (महाराष्ट्र), असे चार प्रमुख मार्ग ब्रिटिशांनी प्रारंभी जिद्दीने बांधले. याशिवाय, भारतातील संस्थानिकांनी आपापल्या संस्थानांमध्येही नॅरोगेज व मीटरगेज मार्ग सुरू केले. बडोदा राजवाड्याची रेल्वे, मोरेना भिंड संस्थान (मध्यप्रदेश), जोगिंदरनगर (पठाणकोट), जयपूर आणि हैदराबाद ते औरंगाबाद, असे हे पाच मीटरगेज व नॅरोगेज मार्ग होते.

सन १८७८ मध्ये सिलीगुडी ते दार्जिलिंग हा ५१ मैल लांबीचा सर्पाकृती वळणं असलेला अतिशय खडतर मार्ग बांधला गेला. या बांधणीत बोगदे न बांधता वळणावळणांच्या मार्गाचा अवलंब केला गेला. या वळणांची वेटोळी ही काही ठिकाणी ५९ फूट व्यासाची आहेत आणि इथल्या प्रत्येक वळणावरून दिसणारा निसर्ग हा इतका वेगवेगळा दिसतो, की त्याची नोंद ठेवणंच कठीण आहे. चहाचे मळे, भातशेती, पाम, बांबू, ओक, फर्न, मॉसेस, चेस्टनट्स या सर्वांची विविधता, त्यांमधून डोकावणारी हिमशिखरं, असा हा एकूणच डोळ्यांचं पारणं फेडणारा प्रवास आहे. मंत्रमुग्ध करणाऱ्या त्या प्रवासामध्येच रवींद्रनाथ टागोरांना ‘गीतांजली’तील काव्यरचना स्फुरल्या.

जगप्रसिद्ध लेखक मार्क ट्रेन याने १८९६ मध्ये दार्जिलिंगपर्यंतचा प्रवास टॉय ट्रेननं केला होता.८ तासांच्या प्रवासात हिमाच्छादित कांचनझोंगा पर्वत शिखरांचं दर्शन, ७४०७ फूट उंचीवरील ‘धूम’ हे नॅरो गेज मार्गावरील जगातील सर्वांत उंचीवरील स्टेशन, दोरीच्या वेटोळ्यासारखे पर्वतमाथ्यावरून दिसणारे रुळांचे वेटोळे (बटालिया लूप) हे सर्व पाहून तो अतिशय भारावून गेला. तो लिहितो, ‘हा आठ तासांचा प्रवास आठ दिवसांचा असावयास हवा.’ स्टीव्ह मॉकरी नावाच्या फोटोग्राफरचा रेल अॅक्रॉस द सबकॉन्टिनेंट’ नावाचा भारतीय रेल्वेवरील लेख फोटोसहित नॅशनल जिओग्राफिक १९८४ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्यामधील रेल्वेसंबंधी सर्वच फोटो अप्रतिम आहेत. त्यांतील ‘बटालिया लूप’ हा फोटो जगप्रसिद्ध फोटोंपैकी एक आहे.

१९०३ मध्ये कलका-सिमला हा ६० मैल लांबीचा मार्ग बांधला गेला. हा मार्ग २८०० फूट उंचीवरून ७००० फुटांपर्यंत वर जातो. मार्गावर छोटे-मोठे १०३ बोगदे असून त्यांची एकत्रित लांबी जवळपास ५ मैल भरेल.

१९०८ सालात मेटुपलम (मदुराई) ते उदकमंडलम (उटकमंड) हा २८ मैलांचा मार्ग बांधण्यात आला. १५०० फुटांवरून ७५०० फूट उंचीपर्यंत वर जाणारा हा मार्ग वर चढण्यासाठी एक कठीण मार्ग मानला जातो. या मार्गावर गाडी वर चढण्याची ‘कॉगव्हिल’ त-हेची पद्धत वापरली जाते. या मार्गावरील कुनुरपासून उदकमंडलम हा ब्ल्यू माउंट एक्सप्रेस प्रवास हा एक सुरेख अनुभव असतो. हा प्रवास आम्ही आवर्जून केला होता आणि आमच्यासाठी हा एक अतिशय अविस्मरणीय असा अनुभव होता.

या प्रवासात क्षितिजापर्यंत पसरलेल्या निळसर-हिरवट डोंगररांगा, रुळांच्या दोन्ही बाजूंची गर्द झाडी, मधूनच डोकावणारी लाल कौलांची घरं, असं लोभस दर्शन होत राहतं. गाडीचा वेग बेताचा असेल, तर तो दुग्धशर्करा योगच असतो इथे. निसर्गाचे विविध आविष्कार मनापासून अनुभवता येतात. वाटेतील वेलिंग्टन स्टेशन हे भारतीय सैनिकी शिक्षणाचे दक्षिणेतील महत्त्वाचे ठिकाण, त्यामुळे चढणारे व उतरणारे थोडेफार सैनिक प्लॅटफॉर्मवर दिसतात. रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूस कोवळ्या उन्हात सैनिकांसाठी हिरव्या छताच्या बराकी, त्यामधील आखीव पांढऱ्या पट्ट्यांनी रंगविलेले रस्ते, जिप्स, ट्रक्स आणि रुबाबात फिरणारे तरणेबांड सैनिक. वातावरणात नि:स्सीम शांतता असते. आमची गाडी तर प्लॅटफॉर्मवर बराच वेळ शांतपणे उभी होती आणि क्वचितच मिळणारा एक अनुभव आमच्या गाठीशी जमा होत होता. वेलिंग्टन ते उटी हा प्रवास म्हणजे अखंड बदलत राहणारा निसर्गाचा चलतपट आहे. हा पट प्रत्येक भारतीयानं अनुभवायला हवा.

-डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..