नवीन लेखन...

पुलाखालची माणसं (कथा)

ही पुलाखालची माणसं मुंबईच भयावह चित्रण आहेत. कुठेतरी वाळवी लागली आहे. बाकी सर्व प्रश्न सुटू शकतात पण एकदा लागलेली ही वाळवी शहर आतून-बाहेरून पोखरून काढणार. वर्षा-दोन वर्षापूर्वी पुलाखाली माणसं नव्हती. आता कुठल्याही पुलाखाली जाऊन पाहा. नशेत बुडालेल्या केविलवाण्या चेहऱ्यांची ही कळकट-मळकट मंडळी जनावराच्या नजरेन तुमच्याकडे पाहतील.


तो पूल तसा नवीन नाही. नेहमी दिसतो. पण जाता येताना, लोकल तशी कुठेही आणि केव्हाही थांबत असते. स्टेशन आल्यावरच थांबायला पाहिजे, असा काही तिचा नियम नाही. लहरी आहे. वेळ झाला म्हणून चिडण्यात काही अर्थ नसतो. लोकलवर चिडून काही आपण वेळेवर पोचणार नसतो. अशा वेळी अनोळखी सहप्रवाशांशी हास्य विनोद करुन वेळ घालवण एवढाच मार्ग हाती असतो किंवा हातात पुस्तक असेल, पेपर असेल, पुरेसा उजेड असेल तर वाचण्यात वेळ घालवण हा त्यातल्या त्यात सोयीस्कर मार्ग. कारण गाडीचा खोळंबा झाल्यावर सहप्रवासीसुध्दा इतके वैतागलेले असतात, की त्यांच्याशी काही बोलाव तर अंगावर धावून येतात किंवा तुम्ही जे बोलाल त्याच्या नेमकं उलट  बोलून वाद घालायला तयार होतात. त्यांचाही राग त्यांना कुणावर तरी काढायचा असतो. अशा वेळी पत्ते खेळणाऱ्या मंडळींचा हेवा वाटतो. त्यांना गाडी थांबली काय, चालू राहिली काय काहीच फरक पडत नाही. त्यांची ब्रम्हानंदी टाळी लागलेली असते. जिंकणारा आणखी किती डाव होतात याची वाट पाहत असतो. तर हरणारा आणखी डाव खेळून तोटा भरुन काढयाच्या मन:स्थितीत असतो. प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर गाडी गेल्यावरसुध्दा उभ्या उभ्या हातात पत्ते घेऊन खेळणाऱ्या मंडळीना तस वेळेच फारसं बंधन नसावंच. त्यामुळे गाडी कुठे उभी राहिली तरी त्यांच्या खेळात काही व्यत्यय येत नाही. फक्त  वारा कमी झाल्यामुळे थोडीफार किटकिट होते इतकंच.

मसजिद बंद गेल्यावर गाडी तशी नेहमीच उभी राहते. पण त्या दिवशी ती नेमकी त्या पुलाखाली उभी राहिली. त्यामुळे अंधार पडला नाही. पण जाता-येता जे दिसायच ते गाडी एका ठिकाणीच थांबल्यामुळे फारच जवळून दिसले. श्वास घेता येत नव्हता इतका कोंदट-कुबटपणा सर्व वातावरणात भरलेला.

किंचित उंचावर असलेल्या इमारतींचं काळपट सांडपाणी ओघळून पुलाखालच्या रेल्वे लाईनच्या बाजूच्या गटारात मिसळून वाहून जात होतं. उंचावरुन पडणारं पाणी थोडया-थोडया वेळानं खाली पडत होतं. पाणी पडत होतं त्याच्या बाजूला साठलेल्या डबक्यात दोन-तीन बायका, लहान मुली कपडे धुत होत्या. त्या काळपट पाण्यात बुचकाळून पिळून काढून रेल्वे रुळांमध्ये वाळत टाकत होत्या. काळपट पाण्यात आणि कपडयांत काही रंगाचा फरक नव्हता. वरुन          पडणाऱ्या पाण्याखाली दोघं- तिघं आंघोळ करत होते. पाच-दहा मिनिटं गाडी थांबलेली होती. तेवढयात तरी त्यांची आंघाळ संपलेली नव्हती.

पुलाला लागून एक भिंतीचा कठडा होता. त्यावर पाच-सहा विशी-पंचविशीतली पोर होती. भिंतीजवळच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर तशीच दोन –तीन पोर बसलेली, खांद्यावरुन रुमाल टाकून एकमेकांच्या डोक्याला डोक लावून काहीतरी चालल होते. त्यांच्या बाजूला शुध्द हरपून बेहोष झालेली पाच-सहा पोर आडवी झालेली. मुडदे पडावेत तसे.

कठडयावर बसलेली ती पोरं, डोकयावर टाकलेले रुमाल, कागदाचा धूर, तो छातीत भरुन घेण्यासाठी चाललेली धडपड आणि बेहोश होऊन मृतवत पडलेली कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरील पाच-सहा पोर. गाडी थांबली नसती तर कदाचित पुलाखाली ही माणंस दिसलीसुध्दा नसती. पाणी मिळत नाही म्हणून गटाराच्या पाण्यात कपडे धुणारी आणि आंघोळ करणारी माणस किमान धडपडत तरी राहतील. पण ड्रगच्या आहारी गेलेल्या त्या पोरांच काय?

कामधंदा नाही, दोन वेळा जेवायला नाही, वेळेच काय कराव कळत नाही. अशा वेळी व्यसनाच्या आहारी गेलेलीही पुलाखालील माणसं. त्यांना माणस म्हणायच का? त्यांना तर कसलच भान राहिलेले नाही. त्यांचा तरी काय दोष म्हणा. पण त्याच कुणालाच काही सोयरसुतक दिसत नाही. कुणालाच काही वाटत नाही. आसपास राहणाऱ्या लोकांना, रेल्वेच्या व्यवस्थापनाला, त्या भागात गस्त घालणाऱ्या पोलिसांना किंवा सामाजिक काम करणाऱ्या संस्थाना या पुलाखालच्या लोकांच काही वाटेनास झालं असाव. लोकलमध्ये बसलेल्या माणसानाही पुलाखालच्या माणसांचा काहीच संबंध नाही. तो संपर्क जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लोकलमध्ये बसलेल्या माणसान त्याची दखल तरी का घ्यावी. त्याला काळजी आहे लोकल लवकर सुरु होण्याची. ऑफिसला वेळेवर पोचण्याची. लोकलच्या खिडकीतून बाहेर बघण्याची. त्याची नोंद घेण्याची काही गरज त्याला वाटत नाही.

मुंबई शहरात ड्रग्जच प्रमाण वाढलय. हे सांगायला कुणाची गरज नाही. शाळा-कॉलेजांच्या बाहेर कोवळया मुलांना त्या ओढणारे टोळधाड घिरटया घालत असतात. श्रीमंतांची चैन खपून जाते. ते काळजी घेऊ शकतात. पण गरिबांच काय. एकदा तो त्यात फसला की तो सुधारण्याची शक्यता राहत नाही. तो बाहेरच फेकला जातो. अधिकच खोलात बुडत जातो. मित्र-मंडळी, नातेवाईक- घरचे लोकही त्याला परके होतात. तो अधिकच निडर बनतो. हळूहळू कशाचंच काही वाटत नाही. नजर मरुन जाते आणि तो दिवसाढवळया पुलाखाली येऊन बसतो. दुसरी जागा त्याच्याकडे राहत नाही. कशाचंच काही वाटेनास झालेल असतं. मग कुणी बघेल, काय म्हणेल याचा प्रश्न उरत नाही. पोलीस जरी आले तरी काय करणार, पकडून तुरुंगात ठेवू शकत नाहीत. बाहेर सुटून आल्यावर पुलाशिवाय दुसरी जागा उरत नाही. खाण्यापिण्याच भान उरत नाही. कुणाचा धाक उरत नाही. कुणाची माया उरत नाही. ती आडवी झालेली पोर. त्यांना कोण उठवणार. ती अशी पडून बेवारशी मरुन जाणार. महापालिकेची कचरा गाडी येऊन कचऱ्याबरोबर ही बेवारशी माणसंही कुठल्या तरी दलदलीत भराव घालणार.

ही पुलाखालची माणसं मुंबईच भयावह चित्रण आहेत. कुठेतरी वाळवी लागली आहे. बाकी सर्व प्रश्न सुटू शकतात. पण एकदा लागलेलीही वाळवी शहर आतून-बाहेरुन पोखरुन काढणार. वर्षा-दोन वर्षापूर्वी पुलाखाली माणसं नव्हती. आता कुठल्याही पुलाखाली जाऊन पाहा. नशेत बुडालेल्या केविलवाण्या चेह-यांची ही कळकट-मळकट मंडळी जनावराच्या नजरेन तुमच्याकडे पाहतील. तुम्हाला जस त्यांच्याबद्दल काही वाटणार नाही. तसच तुमच्याबद्दलही त्यांना काही वाटणार नाही. आणि त्यामुळेच ही मंडळी पुलाखाली आसरा शोधून बसली आहेत. गाडी सुरु झाली. पण पुलाखालची माणसं डोळयापुढून गेली नाहीत. काय होणार या माणसांचं?

————————————————————————-

-प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक : 24  मार्च 1994

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..