नवीन लेखन...

गांवाची ओढ (कथा)

 

माणूस भाऊच्या धक्क्यावर उतरो, व्हीटी स्टेशनला उतरो, बॉम्बे सेट्रलला उतरो, नाही तर सांताक्रुझ विमानतळावर उतरो, त्याच्या पाठीवर त्याचं बिऱ्हाड असतं, डोळ्यात स्वप्नं असतात आणि मनात एक खूणगाठ बांधलेली असते. नांव आणि पैसा मिळवून गांवी परत जायचं.


माणूस भाऊच्या धक्क्यावर उतरो, व्हीटी स्टेशनला उतरो, बॉम्बे सेट्रलला उतरो, नाही तर सांताक्रुझ विमानतळावर उतरो, त्याच्या पाठीवर त्याचं बिऱ्हाड असतं, डोळ्यात स्वप्नं असतात आणि मनात एक खूणगाठ बांधलेली असते. नांव आणि पैसा मिळवून गांवी परत जायचं. वर्षातून एकदा का होईना गावी जाण्याची धडपड असते. वर्षानुवर्ष जातात. जाणारा माणूस आणि त्याचं गोजिरवाण गांव दोन्हीही बदलत गेलेली असतात. गावी जायचं म्हणत म्हणत तो केव्हाच मुंबईत स्थिरावलेला असतो. काही वर्षानी परत जायची तयारी पूर्ण झालेली असते. सर्व बाडबिस्तारा गुंडाळून गावाला जाऊन शांतपणे जीवन जगणं शक्य असतं.

पण पाय उचलत नाही. पाय उचलायचा प्रयत्न केला तरी तो उचलला जात नाही. नकळत पाळंमुळं घट्टपणे मातीत रोवलेली असतात. ती तटातटा तोडून पाय उचलण शक्य असत असं नाही. पण निर्माण झालेली अनेक नातीगोती, मित्रमंडळ, हिसंबंध, सवयी तोडण जिवावर येत. पाय उचलून मुंबईतून तो बाहेर टाकण्याची इच्छाशक्तीच उरत नाही. ज्यावेळी इच्छाशक्ती प्रबळ असते. त्यावेळी इतर अनेक अडचणी असतात. गावी जाऊन करायचं काय प्रश्न असतो. आर्थिक घडी बसेपर्यंत बराच कालावधी उलटून गेलेला असतो. गांवी परतण्याचं स्वप्न ताजंच असतं. पण पाय उचलत नाही. मुंबईचा मोह सुटत नाही.

मुंबईतील गर्दी, गडबड-गोंधळ, गोंगाट याची इतकी सवय झालेली असते की, एकेकाळी मनाला भावणारी गावाकडील शांतता भयावह वाटायला लागते. गावाकडे आता राहिलंय तरी कोण? उन्हाळयात पाण्याचा खडखडाट असतो. वीज केव्हा जाईल आणि केव्हा येईल याचा भरवसा नसतो. पंख्याशिवाय राहणार तरी कसं? त्यात दवाखानाही बराच लांब आहे. एक ना अनेक अडचणी नजरेसमोर येतात आणि जाण्याचा विचार सध्या तरी कसा बरोबर नाही याची स्वत:चीच समजूत स्वत: काढली जाते. कारण गावी परत जा, असे आमंत्रण द्यायलाही कुणी नसतें तर गावी परत गेल पाहिले ही स्वत:च्याच मनाची आंतरिक ओढ असते. ती रोखायची तिला बांध घालायचा म्हणजे स्वत:च स्वत:ची समजूत काढण्याच काम करावंच लागते.

गावी परत जाण्यात सर्वात मोठी अडचण असते ती मुंबईतच लहानाची मोठी झालेल्या मुलांची. गावाकडे मग ते गाव अगदी लहान खेडं असेल नाही तर पुणे, नाशिक, मद्रास-बंगलोर सारखं शहर असेल जायला, ही मुलं अगदी नाखूश असतात. दरवर्षी मुलांना गावी नेऊन आणलेलं असतं. गावाविषयी त्यांना कुतुहल असतं. प्रेमही असतं. पण गावी जाऊन स्थायिक व्हायचं म्हटल की त्यांच्या अंगावर काटा येतो. आई-वडिलांना गावाकडे जायचं तर उज्वल भवितव्याची स्वप्नं बघणाऱ्या मुलांना मागे मुंबई सोडवत नाही. वादविवाद चालू राहतात. मुलं काही यायला तयार होत नाहीत. बहुतेक वेळा विजय त्यांचाच होतो. आई-वडीलही विचार करतात, मुलं इथे असताना गांवी जाऊन करायचं तरी काय? मुलगीही मुंबईचाच मुलगा पसंत करते आणि पाळंमुळं अधिकच खोलवर घट्ट रुजतात. वर्षातून एकदा जाण्याऐवजी दोन-तीन वेळा गावी जाण्याचे कार्यक्रम होतात. गावातल्या देवळाला किंवा शाळेला थोडीफार मदत केली जाते. तेवढंच समाधान.

नशीब अजमावायला आलेला माणूस इथंच रमतो. मुंबईकर होतो. पण मुंबईत ज्यांच्या अनेक पिढया राहतात- ज्यांचा जन्म इथेच होतो आणि लहानाची मोठी होतात. त्यांना स्वत:चं गावच उरत नाही. मुंबईलाच ते आपलं गाव मानतात. पण मुंबई काही गाव नव्हे. गावातले घरोबे-संबंध गावपण इथं निर्माण होणं शक्यच नसतं. गावपण विसरलं जातं. जमिनीशी नात तुटतं. मुंबईत हे नात रुजणं शक्य असतं का? इथं तर पाय आभाळातच असतात. मुंबईत जमीनच नाही तर इथल्या मातीत माणस रुजणार कशी? इथं चौरस इंचावर जमीन मोजली जाते. तिची किंमत काही लाखांत असते आणि काही कोटी रुपये किंमतीच्या गगनचुंबी इमारती या मातीवर उभ्या राहतात. पाय जमिनीला लागणार कसे- ते रुजणार कसे. पण यात खंत करण्यासारखं काही नसावं. फार भावनाप्रधान होऊन जगणं आजच्या जगात शक्य आहे का?

अनेक गावं नकाशावरुन नाहीशी होतात. स्थलांतरित होतात. नकाशावरच्या सीमारेषा पुसल्या जातात. गावाकडून शहरांकड प्रचंड ओघ सुरु असतो सतत. रोजीरोटीचा, अशा- आकांक्षांच्या शोधात त्यात गावपण नाहीसं होत. शहरीकरणाच्या या प्रक्रियेत हे स्वाभाविकच आहे. गावपण विसलेली किंवा अस्तित्वातच नसलेली, पाळंमुळं नसलेली अधांतरी रुटलेस माणसं मुंबईसारख्या महानगरीत राहतात.

थोडं डोळसपणे पाहिलं, मुंबईतील वाडयावस्त्यांतून, झोपडपट्टयांतून फिरल तर लक्षात येत, देशात दूरवर साजरे केले जाणारे सर्व सणवार, जत्रा, उत्सव मुंबईत वेगवेगळया ठिकाणी लहानमोठया प्रमाणावर साजरे केले जातात. येणारा माणूस, येणारा गांव आपल्याबरोबर आपले संस्कार, सणवार घेऊन येत असतो. या महानगरात राहताना अशी अनेक गावं, वाडया, तांडे मुंबईत सामावलेले आहेत. अनेक गावांचं मिळून बनलेलं गाव मुंबई.

— प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक 25 नोव्हेंबर 1993

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 35 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..