नवीन लेखन...

खिडकीपलीकडे

दोन्ही टेकड्या हिरवीगार शाल पांघरुन बसतात. काळपट वाटणारा पर्वत माथाही हिरवागार होतो. कुठल्याही छान चित्रात शोभावं असं हे दृश्य आणि तेही भरवस्तीच्या बकाल मुंबई शहरात. अशी हिरवळ आणि शांत वृक्षराजी आजही मुंबईच्या कानाकोपऱ्यात शिल्लक आहे. पण ती शोधून सापडावी लागते. 


 माझ्या खिडकीपलीकडनं दाट जंगल सुरु होतं. हे वाक्य वाचून मी चिखलदरा किंवा चंद्रपूरसारख्या ठिकाणी राहत असावा, असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. पण माझं घर मुंबई शहरात आहे आणि तरीही खिडकीपलिकडे दाट जंगलाची सुरुवात होते. इतके दाट की महाबळेश्वर आणि माथेरानची वृक्षराजीसुध्दा त्यापुढे फिकी वाटावी.

खिडकीतून बाहेर पाहिल की दोन टेकडया आणि एक उंच पर्वत नजरेस पडतो. भर उन्हाळयातही हिरवीगार झाडी टवटवीत राहते. पाऊस पडून गेल्यावर तर बहरच येतो. हिरवंगार माळरान फुलत. दोन्ही टेकडया हिरवीगार शाल पांघरुन् बसतात. काळपट वाटाणारा पर्वत माथाही हिरवागार होतो. कुठल्याही छान चित्रात शोभव असं हे दृश्य आणि तेही भरवस्तीच्या बकाल मुंबई शहरात. अशी हिरवळ आणि शांत वृक्षराजी आजही मुंबईच्या कानाकोपऱ्यात शिल्ल्क आहे. पण ती शोधून सापडावी लागते. मग पर्वताच्या पायथ्याशी राहायच म्हणे भरवस्तीपासून दूर. रस्ते व्यवस्थित नाहीत. बरंच चालावं लागतं, त्यानंतर बस किंवा रिक्षा आणि त्यानंतर रेल्वे स्टेशन, त्यानंतर लोकल पकडून व्हीटी किंवा चर्चगेट. कोण सोसणार रहदारीच्या दाटीवाटीच्या प्रदुषणमिश्रित वातावरणात राहणं कुणीही डोक शाबूत असलेला माणूस करणार.

आता प्रश्न असा पडेल की इतकी हिरवळ, मोकळी जागा, टेकडया शाबूत राहिल्यातरी कशा? तिथे लहान मोठी अधिकृत-अनधिकृत वस्ती आली कशी नाही? कारण फार सोप आहे. सांगून न पटणार आहे. उंचाड पर्वत ओलांडला की पलीकडे संजय गांधी नॅशनल पार्कची नैसर्गिक सरहद्द लागते. त्यात पवई, तुळशी असे तलाव आहेत. अगदी मुक्त पणे वावरणारे हिंस्त्र प्राणीही आहेत. म्हणे बिबळे वाघही आहेत.

ही मंडळी उन्हाळयात जंगलातलं पाणी आटल, शिकर मिळाली नाही की सरळ वस्तीत शिरतात. आता दिवसाढवळयाही बिबळया वाघ जर आमच्या तडीपार पूर्ण संरक्षित सोसायटीभोवती चकरा मारत असेल, तर झोपडीबिपडी बांधण्याच्या भानगडीत पडणार कोण? त्यामुळे अजून तरी परिसर शांत आणि निर्सरम्य राहिला आहे. हिरवगार कुरण आयतच मिळाल्यामुळे आजूबाजूची जनावर चरायला मोकळी. सकाळी सकाळी बैलाच्या गळयातील घुंगराच्या आवाजाने आणि वनखात्याच्या गेस्ट हाऊसजवळील दाट झाडीत वास्तव्य करणाऱ्या कोकिळेच्या गायनाने जाग येते. गजर लावावा लागतो आणि मुंबईत आपण राहतोय याचा विसरही पडलेला असतो. तो फोनची घंटा सकाळी वाजू लागल्यावर नाहीसा होतो. पर्वताच्या कुशीत एक मोठी टेकडी आहे. ती सदोदित वृक्षांनी झाकलेली असते. तिच्यापेक्षा आकाराने आणि उंचीने धाकटी असलेली शंकर टेकडी. तिच्यावर बसण्यासाठी लाहनशी बाकं आहेत. गेली चार-पाच वर्ष लायन्स, रोटरी, कॉलेजचे विद्यााथर्भ् सर्व मिळून वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवीत असतात. पण ती झाड अंगार खेळवण्याचे आजून तरी या टेकडीने मनावर घेतलेल नसाव. तिच्या शजारीच तिच्याच उंचीची दुसरी टेकडी आहे आणि तिचा उतार माझ्या खिडकीपाशी येऊन संपतो आणि कच्च्या रस्त्यात रुपांतर पावतो. पावसात होणारी तांबडया मातीची धूप दिसत असते.

पाच वर्षापूर्वी ताजीतवानी असलेली ही उतारावची टेकडी आज विद्रुप दिसते. चार ठिकाणांहून तिला कुरडलेले आहे. सुरुवातीला उंचावर कोपऱ्यात एक लहान खड्डा होता. पावसाळयापूर्वी लोक लहान भांडी, बादल्या घेऊन जाचचे, त्यातून माती भरुन आणायचे. कुंडयात झाड लावायचे. हलके हलके लोकांची संख्या वाढली. ते रिक्षातून जायला लागले. काही गाढव घेऊन आले. त्यांच्या पाठीवरुन रोजी पोती दोन पोती माती जायला लागली. रिक्षा पाठोपाठ टेम्पो आले. ट्रक्स आले. माती खणण चालूच होते.

बघता बघता त्या लहान खड्डयाचा मोठा खड्डा झाला. एक कडा तुटून पडला. त्या वरच्य बाजूला, खालाच्या बाजूला, पलीकडच्या बाजूला, खोदकाम सुरु राहिल. वर्षामागून वर्ष जात टेकडी विद्रूप झाली. मातीकाम चालूच आहे. बरं हे काही व्यावसायिक माती खोदण्याचे काम नाही. त्यामागे कुणी बिल्डर किंवा डेव्हलपर्स नाही. माती नेणारे उच्चभ्रू आहेत. सगळयांच झाडांवर प्रेम आहे. झाड लावण्यासाठी ही माती उचलून नेली जात आहे. टेकडीचे हाल न बघवणा-यांनी म्युनिसिपालटीच्या ऑफिसात तक्रार केली. उत्तर मिळाल, अहो, ही माणस काही घर बांधण्यासाठी माती नेत नाहीत. झाड लावण्यासाठी नेतात. मुंबई जर थोडीशी सुंदर दिसली तर तुमच काही बिघडणार आहे काय? प्रश्नाला उत्तर नव्हत. डोळयांदेखत कुरतडलेली टेकडी मृतवत पडली आहे. आज ती पडली आहे. उद्या उरलेल्या दोघीहीजणी अशाच पडतील आणि विचार केला तर माझी इमारत जिथे उभी आहे तो देखील टेकडीचाच भाग होता ना? तो कापून इमारत उभी राहिली. बघता बघता समोरची टेकडी सपाट झाली आहे, लोकानी घमेली दोन घमेली माती कुंडीत घालण्यासाठी नेली. जागा सपाट केली. आता नुकतच ऐकलय कुणीतरी तिथे आता इमारती बांधणार आहे. जमीन आयतीच तयार करुन मिळाली आहे. त्यानंतर उरल्यदोन टेकडयाच कुरतडण सुरु होर्ठल. मग तिथेही इमारती उभ्या राहतील. मग कशाला येतील बिबळे आणि कोकिळा?

माझ्या खिडकीपलीकडच दाट जंगल चार पावल मागे सरकल आहे. अस सरकत सरकत ते पर्वतपल्याड निघूनही जाईल. का जाऊ नये त्यांने? जर कुणालाच त्याच काही वाटत नाही तर.

— प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक : १६ जून १९९४

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..