नवीन लेखन...

शंभर मैलांवरची माती (कथा)

 

फुलांचा पंचवीस हजारांचा ताटवा काळ्या लाकडी पेटीवजा कुंडीत ठेवलेला होता. खऱ्या फुलांची ही दफनपेटीच म्हणायला हवी. वर्ष वर्ष डांबराच्या गोळ्यांसारखी उग्र वास देणारी तैवानी फुलं हवीत की, क्षणभर फुलून दिवसांचा गजरा सकाळी मावळणारी फुल हवीत, हे प्रत्येकान आपल्याशी ठरवायला हवं.


रगच्च वस्तीत इंचा-इंचावर बांधकामच आढळणार. झाडांसाठी जागा सोडणार कोण? इथे राहायला जागा नाही आणि यांना झाडांची हौस? असल्या महागडया हौसा पुरवणं, भल्याभल्या श्रीमंतांना शक्य नाही. पूर्वी केव्हा तरी लावलेली-लागलेली, वर्षानुवर्ष तग धरुन असलली झाडं टिकवणं इथे मुश्किल. तिथे झाड लावण्याचा षौक पुरवणार कोण आणि कसा? सुंदर मुंबई-हरित मुंबई योजनेखाली किती झाडं लागलीत देव जाणे. टिकलेली तर फारशी दिसत नाहीत.

झाडांची हौस फुलझाडांवर भागवा. ती सुध्दा जवळ जवळ अशक्य कोटीतलीच गोष्ट. त्यासाठी गच्ची हवी. किमान बाहेर ग्रील बसवून चार कुंडया ठेवता आल्या पाहिजेत. त्यावर दिवसातून किमान दोन तीन तास तरी ऊन पडलं पाहिजे. तेसुध्दा सकाळचं ऊन हवं. संध्याकाळचं मलूल ऊन फुलझाडांना काही कामाचं नसतें. बरं, गच्ची रस्त्याच्या बाजूला नको. नाही तर पाणी टाकता येत नाही. टाकलेले पाणी खाली पडतं. खाली दुकानं असतात. येणारे-जाणारे असतात. त्यांच्या अंगावर पाणी पडतं आणि झाडांवर प्रेम करणारे तुमच्याशिवाय दुसरं कुणी तुमच्या विंगमध्ये असत नाही. त्यामुळे पाणी तुम्हीच टाकल पाहिजे हे सांगावं लागत नाही. त्यापेक्षा न लावलेली झाडं परवडली.

गच्ची नसली तर काय कराल? काळजी नको. उन्हाचा कवडसा जरी अंगावर पडला नाही तरी ज्याची वाढ खुंटत नाही, असली काळपट झाडं शक्कलबाज लोकांनी शोधून काढली आहेत. ती झाड ॲ‍मेझॉनच्या खोऱ्यात वाढतात. इतकं घनदाट खोरं आहे की, मोठया मोठया वृक्षांच्या झावळीत सूर्याची  किरणं जमिनीवर वर्षभरात कधीच पोहोचू शकत नाहीत. विविध पातळीवर, विविध प्रकारची झाडं गुण्यागोविंदान वाढत असतात. त्या विशाल वृक्षाच्या तळपायाशी दलदलीत सूर्य स्नानाशिवाय काही तण, पालव वाढत रहातात मजेत. फक्त काळीशार हिरवी शाल पांघरुन त्यातल्या काही वनस्पती मजल-दरमजल करत आपल्यापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत.

आपल्या दाटीवाटीच्या गर्दीतील, श्वास कोंडल्या कुबट वातावरणातही या वनस्पती तग धरुन आहेत. त्यांना कुठेही कोपऱ्यात उभ्या करा. विनातक्रार उभ्या राहतील. प्रेमाने पाणी घातलंत तर फोफावतलील. बिन उजेडाच्या किती खोल्या मुंबईत असतील, त्यात कागदी फुलं नाचवण्यापेक्षा असल्या जिवंत पाळथळ वनस्पती जरा ठेवल्या तर तेवढीच खोलीला जिवंतपणाची जाण तरी येईल. नाही तर भिंतीभर काश्मीरचा देखावा असलेला वॉलपेपर लावायचा. वर टयूबलाईट लावायच्या कोपऱ्यात दोन कुंडया ठेवायच्या. त्यावर हिरवी  बटबटीत दिसणारी प्लॉस्टिकची झाडं ठेवायची. त्याला विचित्र हिडीस-किळसवाण्या रंगातील प्लॅस्टिकची फुलं आलेली दाखवायची.  असल्या खोलीतली फुलंही खोटीच आणि माणसंही खोटीच.

तसेच कागदी फुलांचही. कशी आवडतात कागदी फुलं माणसांना, कळतच नाही मला. अर्थात बऱ्याच गोष्टी कळत नाहीत. त्यातलीच ही तैवानी फुल बघितलीस? मित्र विचारतो. नाही बाबा… मी उत्तरतो. अरे, बघ एकदा. गंमत अशी की, त्यांना सुरेख वासही येतो आणि तो वर्ष वर्ष टिकतो. खऱ्या फुलांच्या थोबाडीत मारणारी फुलं अजुन बघायची आहेत. एका कंपनीच्या ऑफिसात गेलो होतो. तिथे मॅनेजर मोठया रुबाबात सांगत होता, हे बारीक पानाचे नाजूक झाड आहे ना ते 15,000 हजाराचे आणि समोर तो भला मोठया बारा फुटी फुलांचा ताटवा दिसतोय ना तो पंचवीस हजारांचा. मी ऐकत गेलो.

इतक्या हजारात किती एकर मोगऱ्याची बाग झाली असती याचा हिशेब करता गेलो. एका जिवलग मित्राची सासुरवाडी केरळात नदीकाठी आहे. घरामागं पाच एकराची मोगऱ्याची बाग आहे. तो बाकी सकाळ-संध्याकाळ विरार-चर्चगेट करत दिवस काढतो आहे. फुलांचा पंचवीस हजारांचा ताटवा काळया लागडी पेटीवजा कुंडीत ठेवलेला होता. खऱ्या फुलांची ही दफनपेटीच म्हणायला हवी. वर्ष वर्ष डांबराच्या गोळयांसारखी उग्र वास देणारी तैवानी फुलं हवीत की, क्षणभर फुलून दिवसांचा गजरा करुन सकाळी मावळणारी फुलं हवीत, हे प्रत्येकानं आपल्याशी ठरवायला हवं.

मुंबई… जिथे माती विकतही मिळत नाही. गवऱ्या दिसत नाहीत. तिथं कुठली फुलं वाढणार ते सांगायला नकोच. तरी दादरचा फुलबाजार फुलतोच. शंभर मैलांवरुन पिण्याचं पाणी ज्या शहरात येतं त्या शहरात पन्नास मैलांवरुन ताजी फुलं येतात. येत राहतात. देवाच्या निमित्तानं का होईना, येतात, विकली जातात. मित्राच्या सासरचा मोगरा आखातात जातो. त्यातला थोडा त्याच्या वाटयालाही येतो.

प्राग हे युरोपातील सर्वात सुंदर शहर. कधी काळी फेरफटका मारण्याचा योग आला होता. तिथही गगनचुंबी इमारती आहेत. पण प्रत्येक गच्चीत एक तरी फुलझाड आहे. मुंबईतल्या गच्चीत सुध्दा फुलांचे ताटवे दिसू शकतील. काय हरकत आहे? पाण्याबरोबर मातीही शंभर मैलांवरुन आणू या.

— प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक : 13 जानेवारी 1994

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 35 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..