नवीन लेखन...

चेहरे (कथा)

 

या चेहऱ्यांच्या सतत हेलकावणाऱ्या लाटेत गुदमरुन आपला चेहराही आपल्या लक्षात राहत नाही. गर्दीत भान हरवलेला चेहरा आपलं साम्य इतर चेहऱ्यात कुणी जिवाभावाचा माणूस भेटतो का पाहत असतो कारण इथं कुणाला कुणासाठी वेळ असतो ?


 

रोज हजारो चेहरे डोळयांसमोरुन जात असतात. बोलके, त्रासलेले, हसरे, मख्ख्य, सुंदर, कुरुप, पापभीरु, बेरके, दर एक स्टेशनवर, दर एक बस स्टॉपवर अनेक खाली उतरतात. नवे चेहरे आत येतात. आपण बघतोच असे नाही. पण असे असंख्य चेहरे आपल्या अवतीभवती तरंगत असतात.

केवळ चेहरेच समोर असतात असें नाही. भर गर्दीत, लोकलमधून उतरल्यावर न चालताच तुम्ही पुलापर्यंत अलगद पोहोचता आणि एक एक पायरी खाली पाहत चढता. जरा मान वर करुन पाहा. मुंग्यांची रांग असते. इथ असतो रांग मोडलेल्या काळया ठिपक्यांचा खालीवर होणारा पुढं पुढे सरकणारा पुंजका. काळयाशार ठिपक्यानं एखाद डोकं चकाकतंही. चेह-यांनी पाठ फिरवलेली असते पण पाठ फिरवलेले चेहरे अवतीभवती सदोदित असतातच.

तुमच्या कामाची, शहरात फिरण्याची जर एक ठराविक चाकोरी, ठराविक लोकल, ठराविक बस स्टॉप, ठराविक बस असेल तर ही चेह-यंची ओळ थोडी अधिक जवळ येते. नाव माहिती नसते. पण चेहरा ओळखीचा असतो. तो जसा समोर येतो तसा नाहीसा सुध्दा होतो. आपल्या लक्षातही येत नाही. असेच असंख्य चेहरे ओळखीचे होतात. स्टेशनवर उभा असलेला टीसी, पोस्टमन, दुकानदार, कंडक्टर, पानवाला, फुलवाली, रोज ठराविक वेळेला घरासमोरुन फिरायला जाणारी माणसं, ऑफिसमध्ये, शेजारच्याकडे नियमित येणारी माणसं, असे असंख्य चेहरे ओळखीचे होतात. पण नाव नसलेले.

बरं, हे चेहरे असे असतात की, ते जिथ नेहमी असतात तिथच समोर आले तर चटकन लक्षात येतात. तेच जर वेगळया ठिकाणी वेगळया संदर्भात दिसले तर नेमकं लक्षात येत नाही. हा चेहरा कुठं तरी पाहिलेला आहे. पण कुठे हे काही लक्षात येत नाही. ऑफिसमध्ये कामानिमित्त कधी तरी दिसणारा चेहरा जर मित्राच्या रिसेप्शनमध्ये दिसला तर त्याला नेमका कुठ ठेवावा हे कळत नाही.

मुंबईत चेहऱ्यांची काहीच कमतरता नाही, रोज किती नवीन चेहऱ्यांची भर पडते सांगणं कठिणच आहे. केवळ मुंबई बघायला येणारेच किमान लाखभर लोक अस्ताव्यस्त पसरलेले असतात. जिवंत माणसांची कमतरता पडू नये म्हणून जिथे जाल तिथे मोठमोठया जाहिरातीतून गोरेगोमटे चेहरे तुम्हाला खुणावत असतातच. कितीही लक्ष द्यायचं नाही म्हटल तरी लक्ष जातंच. नुसतं लक्ष जातंच असं नाही. तर हे खास चेहरे लक्षात राहतात. खास लक्षात राहाणारे चेहरे असल्यामुळे या खास लोकांना जाहिरात संस्था भरपुर पैसे देऊन खास आपल्या तैनातीत ठेवत असतात. हे चेहरे नुसते पाहून आपण विसरुन जात नाही. तर ते चेहरे आपण लक्षात ठेवतो. त्यांच्या प्रेमात पडतो आणि त्यांच्या सारख्याच माकडचेष्टाही करु लागतो. तसेच कपडे घालतो, बोलतो, वागतो, हसतो आणि सही सही नक्कल करु लागतो. या चेह-यांच्या प्रेमात पडून त्याच्यामागे लागल्यावर आपला स्वत:चा चेहराही हरवून जातो.

या चेह-यांच्या सतत हेलकावणाऱ्या लाटेत गुदमरुन आपला चेहराही आपल्या लक्षात राहत नाही. गर्दीत भान हरवलेला चेहरा आपल्या साम्य इतर चेहऱ्यात कुणी जिवाभावाचा माणूस भेटतो का पाहत असतो. कारण इथं कुणाला कुणासाठी वेळ असतो?

जिथं स्वत:चा चेहरा ओळखता येत नाही, तिथं अमक्या अमक्या नावाचा माणूस कोण? असे विचारल तर सांगणार कोण. त्यामुळे स्वत:चा चेहरा स्वत:च विसरु नये किंवा या नावाचा  बिनपत्यांचा माणूस म्हणजे मीच, अस सांगता याव म्हणून फोटो- पासची सोय होते. एक वेळ रेशनकार्ड नसले तरी चालेल. पण फोटोपास हवा. त्या चेहऱ्याकडे बघत बघत तरी दिवस भरभर निघून जातात. जीवघेण्या जीवनस्पर्धेंत त्या फोटोचा आणि चेहऱ्याचा रंगही हळूहळू विरु लागतो. पण या चेह-यांच्या गर्दीत श्वास घेऊन दोन क्षणांची उंसत घ्यायलाही मिळत नाही. एक लाट येऊन गेली की, दुसरी लाट असते. भरतीची लाट ओसरुन ओहोटीची लाट सुरु झालेली असते. पण लाट असते. लाटेची ओढ असते. समुद्राचा तळ गाठण्याची आसक्ती असते.

चेहरे बदलत असतात. पण आपला चेहरा लक्षात राहावा. चेहरा आणि नाव यांचे नात कळाव म्हणून ढिगांनं फोटो काढावे लागतात. फक्त पासपोर्ट साईज. पासपोर्ट काढा किंवा काढू नका. पासपोर्ट साईज फोटो एकदा तरी लागणारच. हा कामगार माझ्या कंपनीत काम करतो, काढा फोटो, सरकारी नोकरीत अर्ज करायचाय काढा फोटो,  नवरा पाहिजे काढा  फोटो, विमानतळावर कामासाठी जायचंय काढा फोटो, पंतप्रधनांना भेटायचंय काढा फोटो, महापालिकेच्या तरण तलावाचा सदस्य व्हायचंय काढा फोटो, हरवल्याची जाहिरात द्यायचीय काढा फोटो, रेल्वेचा सिझन पास काढायचाय काढा फोटो, एकंदर काय तर आपला चेहरा कसाही असला तरी तो व्यवस्थित फोटोत उतरवून त्याला बंदिस्त करायला हवा. त्यासाठी दोन-तीन दिवस थांबायची गरज नाही. पोलोराईडपुढे उभे राहा, चहा प्या आणि फोटो घेऊन जा. आपला चेहरा कसा दिसेल अशी तगमग लागण्याची आवश्यकता नाही.

चेहरे बदलत असतात. रेल्वेला विचारा. दर पाच वर्षांनी नवीन फोटो. नाही तर पास नाही. एका मित्राचा पासावर पत्ताच नव्हता. रेल्वेच्या क्लार्कच्याही लक्षात आला नाही. एकदा टी.सी.नं त्याला दुसऱ्या व्यक्तीच्या पासवर प्रवास करतोस काय, असा दम दिला तेव्हा त्याच्या लक्षात आलं. अरे, दहा वर्षांपूर्वी काढलेला आपला फोटो आणि धावपळ, ताण-तणाव, काळजी, उल्हास, हर्ष याचा मार खाऊन तग धरुन राहिलेला आपला चेहरा यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. दोष टी.सी.चा नाही. दोष फोटोचा नाही. दोष चेहऱ्याचा नाही. नियम-लाटेचा आहे.

चेहऱ्यांच्या या महासागरात आपला चेहरा सांभाळा जसा असेल तसा.

— प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक 11 नोव्हेंबर 1993

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 35 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..