नवीन लेखन...

निरंजन – भाग ४७ – आपल्या प्रत्येक देण्यामध्ये येणं हे आहेच

जयदीप नावाचा एक तरुण एका व्यापार्‍याकडे काम करित होता. तो स्वभावाने मात्र अतिशय कंजुष होता. आपल्याकडचं एखाद्याला कसं द्यावं यावर तो अतिशय विचार करी. मुळात तो देतच नसे.

एकदा असेच व्यापाराच्या निमित्ताने त्याच्या शेटजींनी त्याला गावी पाठवण्याचे ठरवले. तोही खुप आनंदीत झाला. शहरापासुन खुप दुर एका वाळवंटी परिसाराच्या बाजुलाच एक गाव होतं, तिथे त्या शेटजींच काम होतं. म्हणून थोडे पैसे शेटजींनी त्याला दिले. जयदीपने देखील सोबत स्वतःजवळची काही रक्कम स्व-खर्चाला घेतली. आणि किमान एक जोडी कपडे घेतले आणि ठरलेल्या दिवशी तो प्रवसाला निघाला. तिथे पोहोचल्यावर लगेचच त्याने शेटजींनी सांगितलेले काम उरकुन घेतले आणि दुसऱ्या दिवशीच शेटजींच काम करुन त्याने परतीचा मार्ग धरला. परिसर नवीन होता. त्यामुळे जयदीप घरी परतताना अतिशय काळजी घेत होता. पण नेमक्या वाळवंटी मार्गातुन येता-येता त्याची वाट चुकली आणि तो त्या वाळवंटात हरवला. आजुबाजुला दुर-दुरवर त्याला लोकवस्ती दिसत नव्हती. संध्याकाळ झाल्यामुळे काहीसा अंधार झाला होता. आणि त्यामुळे त्याने जिथे आहे तिथेच विश्रांती घेण्याचे ठरवले. त्याच्या जवळचे पाणी आणि जेवण तसे संपलेलेच होते. रात्र कशीतरी संपुन सकाळ होते. पण दुसऱ्या दिवशीसुद्धा हिच परिस्थिती….जयदीप अतिशय घाबरलेला असतो. जेवण नाही, पाणी नाही फक्त इकडे-तिकडे वाट शोधत फिरणे इतकेच सुरु असते. शेवटी त्याच्या जवळचे पाणी देखील संपते. जयदीप पाण्याशिवाय अतिशय व्याकुळ होतो. नजरेने जेवढा परिसर दिसत होता तिथपर्यंत कुठेही लोकवस्ती दिसत नव्हती. आता जयदीपची परिस्तिथी अशी झाली होती, कि जर का त्याला पाणी मिळाले नाही तर्….फार कठिण परिस्थिती होती, याची जाणीव त्यालाही होती. आता तो हताश होऊन सभोवताली दूर दूर पर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत पाणी शोधण्याचा प्रयत्नात असतो.

खुप शोधल्यानंतर थोड्याच वेळात त्याची नजर काही अंतरावर असलेल्या एका झोपडीवर गेली. जयदीपच्या जिवात जीव येतो. आता आपल्याला पाणी देखील मिळेल आणि आपाल्याकडचे काही पैसे देऊन आपण आपल्या जेवणा-आरामाची सोय देखील करु. या विचाराने जयदीप कसेतरी तिथपर्यंत पोहोचतो. पण ती झोपडी रिकामी असते. त्या झोपडीत कोणीच नसते, झोपडीला बघितल्यावर असे वाटत होते कि बऱ्याच दिवसांपासून, कदाचीत काही महिन्यांपासुन तिथे कोणी फिरकले नसावे. पण तिथे एक जमिनीमधून पाणी काढण्यासाठी हातपंप मात्र होता. आणि त्याचा पाईप जमिनीत शिरलेला होता. जयदीपच्या लक्षात आले की जमिनीखाली पाणी आहे. या विचाराने त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला. पुढे सरकत त्याने हातपंप उरलेल्या शक्तीने वर-खाली करायला सुरवात केली. पण पाणी काही येईना, पाण्याचा एक थेंबही आला नाही, फक्त पंपाचा आवाज येत राहिला. अखेर उदास होऊन जयदीप खाली बसला. परमेश्वराची आठवण करत राहीला. तोच त्याचे लक्ष वर एका फळीवर कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडे गेले. बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून व्यवस्थित घट्ट अशी बंद केलेली होती. ती पाहुन जणु तिथे कुणी काही दिवसांपुर्वीच येऊन गेले असावे असे वाटत होते. जयदीप पाणी पिण्यासाठी बाटली उघडणार तोच तेवढ्यात त्याचे लक्ष बाटलीवर चिटकवलेल्या कागदाकडे गेले. त्यावर लिहिले होते की…

“यातील पाणी पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचे काम झाल्यावर ही बाटली परत पाण्याने भरून ठेवायला विसरू नका.”

हे वाचून त्याच्या मनात विचार सुरू झाले. काय करावे..? त्याचा विश्वास बसेना.

या सुचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळे व्हावे…? की या सुचनेप्रमाणे करावे…? त्याला काहीच समजेनासे झाले. तो विचारात पडला की, समजा… सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतले आणि…. पंपच खराब असेल तर…? पाणी वाया जाईल… आणि त्यानंतर मात्र आपल्याकडे दुसरा काहीच पर्याय उरणार नाही. .. सुचना बरोबर असेल तर…? तर मग… भरपूर पाणीच पाणी… 

खुप वेळ या विचारात घालवल्यानंतर शेवटी मनाचा पक्का निर्धार करीत त्याने ते पाणी पंपात ओतले. डोळे मिटून देवाचे नामस्मरण केले. आणि पंप वरखाली करायला सुरवात केली. हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरवात झाली. पंपामधुन भरपूर पाणी यायला लागले. जयदीप मनसोक्त पाणी प्यायला. आणि स्वतः जवळच्या सगळ्या बाटल्या देखील त्याने काठोकाठ भरल्या. तो खुप खुश झाला होता. आणि त्याचे मनही आता शांत झाले होते. पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष आणखी एका कागदाकडे गेले. तो त्या परिसराचा नकाशा होता. त्यावरून सहज लक्षात येत होते की तो मानवी वस्तीपासून फारसा दुर नव्हता. पण आता त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाचा मार्ग तरी समजला होता. त्याने निघायची तयारी केली. सुचनेप्रमाणे ती बाटली आणि स्वत:जवळची अधिक एक बाटली त्याने तिथे भरून घट्ट बंद करून ठेवली.  

आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहीली. 

“विश्वास ठेवून हे पाणी पंपात ओता… पाणी येणारच… “

आणि तो पुढे आनंदाने परतीच्या प्रवासाला निघाला. 

कथेतील बोध हा असा कि आपल्या प्रत्येक देण्यामध्ये, येणं हे आहेच …..!

काय परिणाम होईल हे माहिती नसताना देखील, जेव्हा जयदीपने विश्वासाने स्वतःजवळ जे पण आले ते देण्याची तयारी ठेवली तेव्हाच त्याने त्या मोबद्ल्यात कितीतरी जास्त पटीने सुख मिळवले.

जेव्हा आपण आपली मनस्थिती बदलतो तेव्हाच आपण आपल्या परिस्थितीत बदल घडवु शकतो.

— स्वाती पवार 

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..