नवीन लेखन...

निरंजन – भाग ४० – पाऊले श्रीमहालक्ष्मीची

श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधूकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरीजा, पद्मा, मालती आणि सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीमाता ओळखल्या जातात. अशा या सर्वांभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मी मातेचे ध्यान लागावे अशी ही कथा आहे.

ही कथा आहे द्वापरयुगातली, आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली.. इथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो शुर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष स्वभावाचा होता. चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे ही विद्या राजाला अवगत होती. राजाच्या पत्नीचे नाव होते सुरतचंद्रिका… राणी रूपवती आणि पतीनिष्ठ होती. त्यांना एकून आठ अपत्ये होती. सात पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या. राजा आणि राणीने आपल्या कन्येचे नाव शामबाला ठेवले होते. एकदा साक्षात श्री महालक्ष्मी मातेच्या मनात आले की, आपण राजाच्या राजमहाली वास्तव्य करावे, त्याने राजा आणखी सुखी होईल आणि प्रजेलाही तो अधिक सुख देईल. एखाद्या गरिबाकडे राहिले, तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून मातेने एका म्हातारीचे रूप धारण केले. जुनी-फाटकी वस्त्रे परिधान केली आणि आधारासाठी एक काठी हाती घेतली. काठी टेकत टेकत राजाच्या महालाजवळ आली. राजमहाली येताना तिला एका दासीने पाहिले. ती लगबगीने म्हातारीचे रूप घेतलेल्या देवीजवळ आली. तिने म्हातारीला विचारले, “कोण ग तू?, कुठून आलीस?, काय काम आहे?, तुझं नाव काय? कुठे राहतेस? यावर म्हातारीचे रूप घेतलेली देवी म्हणाली माझे नाव कमला, द्वारकेला राहते मी, तुझ्या राणीला भेटायला आले आहे. कुठे आहे ती?” दासी म्हणाली, “राणीसाहेब महालात आहेत, तुला त्या कशा भेटतील ग?”, त्यांना जर मी हे सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील, तुला पाहून त्या तुला इथुन निघून जायला सांगतील. तु इथेच थोडावेळ आडोशाला थांब”, म्हातारीला हे बोलणे योग्य वाटले नाही. ती स्पष्टपणे दासीला म्हणाली, “तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती, तो वैश्य फार गरीब होता. त्यामुळे नेहमीच्या उदर निर्वाहासाठी आणि जीवन जगण्यासाठी ही त्यांच्याजवळ पुरेसे धन्-धान्य नव्हते. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत होती. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशीतापाशी भटकू लागली. तिची ही अवस्था पाहून मला तिची फार दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणार्‍या श्रीमहालक्ष्मी-व्रताची माहिती सांगितली. त्या माहितीप्रमाणे तिने ते व्रत अगदी मनापासून ध्यान लावुन केले. तिच्या व्रताने श्री महालक्ष्मी माता प्रसन्न झाल्या, तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती, समृद्धीने भरले. तिचे जीवन आनंदी झाले. पुढे श्री महालक्ष्मी मातेचे व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ते दोघे पती-पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिले. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली आहे. म्हातारीचे हे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले. नमस्कार केला आणि म्हणाली, “मला सांगाल हे व्रत, मी हे व्रत नित्यनियमाने करीन. यात कधीही खंड पाडणार नाही.”

म्हातारीचे रूप धारण केलेल्या श्रीमहालक्ष्मी मातेने दासीला या व्रताची संपूर्ण माहिती दिली. मग तिथून निघून जाणार इतक्यातच राणी महालाबाहेर आली. जुन्या जरजरीत वस्त्रांमध्ये म्हातारीला पाहून राणीला संताप आला. तिने उर्मटपणे म्हातारीला महालापासून दूर जायला सांगितले. म्हातारीचे रूप धारण केलेली ती साक्षात देवी श्री महालक्ष्मी होती हे राणीला कळलेच नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून देवीने तिथे न थांबता आपल्या स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारीचे रूप धारण केलेली देवी निघून जाणार त्याच क्षणी लगबगीने एक लहान मुलगी बाहेर आली. ती मुलगी राजकन्या होती. तिचे नाव होते शामबाला… तिने समोर येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि म्हणाली. “आजी, रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते.” राजकन्येचे हे नम्र बोलणे ऐकून श्री महालक्ष्मी मातेला तिची दया आली. तिने श्यामबालाला श्रीमहालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. साक्षात देवीने सांगितल्याप्रमाणे दासीने हे लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली आणि पुढे दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली. इथे राजकन्येनेही श्रीमहालक्ष्मी व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. काही कालांतराने शामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाचा पुत्र मालाधार याच्याशी झाला. तिला राजवैभव मिळाले. श्रीलक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखाचा, समाधानाचा झाला आणि इकडे राजा भद्रश्रवा व त्याची पत्नी सुरतचंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसू लागले. धन गेले. राजवैभव गेले. ऐश्वर्या संपले. सुरतचंद्रिका राणी होती. पण आता ही स्थिती फार बदलली होती.

राजा भद्रश्रवाला याबद्दल फार वाईट वाटे. पण तो तरी काय करणार? एकेक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत देखील होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले की, आपण आपल्या मुलीला जाऊन पहावे. तिला भेटावे. तिच्याकडे चार दिवस राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात लेकीला भेटण्यासाठी आला. चालून-चालून तो खूप दमला होता. त्यामुळे नदीच्या काठी थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो बसला. राणी श्यामबालाची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासीने धावत जाऊन राजमहालात ही बातमी दिली. श्यामबालालाही हे कळले. श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. त्यानंतर आपल्या घरी जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. तसे त्याने जावयाला सांगितले देखील…जाताजाता शामबालाने पित्याला धनाने भरलेला हंडा दिला. तो हंडा घेऊन भद्रश्रवा आपल्या घरी आला. भद्रश्रवाने तो हंडा सुरतचंद्रिकाच्या हाती दिला. आपल्या मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे. हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने घाई-घाईने हंडयावरचे झाकण उघडले. हंड्यात पाहतो तर काय, धन नव्हतेच… होते फक्त कोळसे… सुरतचंद्रिकेच्या कर्मामुळे आणि कटुवाणीमुळेच धनाचे कोळसे झाले होते. सुरतचंद्रिकेने हे पाहून कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवाला देखील हे पाहून आश्चर्य वाटले. दुःखाचे दिवस दूर होत नव्हते. दारिद्र्याचे दिवस संपत नव्हते. सुरतचंद्रिकेला एकेक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता.

एक दिवस सुरतचंद्रिकेच्याही मनात लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता. सुरतचंद्रिका लेकीच्या घरी आली. तेव्हा शामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. शामबालाने श्रीमहालक्ष्मीचे व्रत आईकडून ही करून घेतले. चार दिवस लेकीकडे राहिल्यानंतर पुन्हा सुरतचंद्रिका आपल्या गावी परतली. श्रीलक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसांतच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली.

पुढे काही दिवसांनी आई-वडिलांना भेटण्यासाठी म्हणुन शामबाला माहेरी आली. वडील भेटायला गेले असताना वडिलांना कोळसा भरलेला हंडा तरी दिला, पण आपण गेलो असताना मात्र काहीच दिले नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालाचे राजवाड्यात हवे तसे स्वागत झाले नाही. राणीने एकप्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शामबालाने ही गोष्ट मनावर घेतली नाही. ती पुन्हा घरी जाण्यासाठी निघाली, तेव्हा पूर्वी वडिलांना दिलेला हंडा तिने हाती घेतला. त्यात मिठाचे खडे टाकले आणि तो घेऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालाधराने विचारले “माहेरून काय आणलंस?, त्यावर राणी शामबालाने तो हंडा आपल्या पतीला दाखवला. मालाधराने हंड्यावरचे झाकण उघडून पाहिले, तर त्यात होते मिठाचे खडे…मालाधराने चकित होऊन विचारले, हे काय? हे मिठाचे खडे? या मिठाचा काय उपयोग? शामबाला म्हणाली, “थोडं थांबा, म्हणजे कळेलच, त्या दिवशी शामबालाने जेवणातील सर्व पदार्थ अळणी बनवले, जेवताना मालाधराला सर्व पदार्थ अळणी लागले. त्यावेळी शामबालाने थोडे मीठ राजाच्या जेवणात वाढले आणि म्हणाली हा आहे मिठाचा उपयोग. मालाधरालाही तिचे हे सांगणे योग्य वाटले.

थोडक्यात…जे कुणी श्रीमहालक्ष्मी मातेचे व्रत मनोभावे करील, त्यांना श्रीमहालक्ष्मीची प्रसन्नता मिळून त्यांच्यावर देवीची कृपा होईल. श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने कोणताही गर्व न बाळगता श्री महालक्ष्मीव्रत न विसरता करावे. देवीचे ध्यान करावे, मनन-चिंतन करावे. म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील आणि मनोकामना पूर्ण करील.

श्री महालक्ष्मी मातेची कथा-कहाणी गुरूवारची सुफळ संपूर्ण…

— स्वाती पवार 

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..