नवीन लेखन...

निरंजन – भाग ४३ – मिटला वाद हरिहराचा…..

ही कथा एका अशा भक्ताची आहे ज्याच्या हृदयामध्ये सदैव शिवभक्ती आणि श्वासांमध्ये ॐ नमः शिवाय गुंजत होते. त्यांचे नाव आहे, “संत नरहरी सोनार…..” ते पंढरपुरामध्ये राहत होते. जिथे सदैव श्रीविठ्ठलाचे नामस्मरण, विठ्ठलाचे भजन, विठ्ठलाचे कीर्तन, अश्या या विठठलरंगी रंगुन विठ्ठलमय झालेल्या वातावरणामध्येसुद्धा त्यांचे मन हे सदैव श्रीमहादेवांच्या भक्तीमध्ये रमलेले होते. नरहरी सोनार हे सोन्या-चांदीचे रत्नजडित दागिने बनवण्यामध्ये अतिशय कुशल होते. याकरिता त्यांची प्रसिद्धी ही संपुर्ण पंढरपुरामध्ये सर्व दिशेला पसरलेली होती. 

एके दिवशी एक दाम्पत्य खूप दूरचा प्रवास करून पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. त्यांना मूलबाळ नव्हते. म्हणून पंढरपुरामध्ये साक्षात विठ्ठलाचे दर्शन घेऊन तिथे नवस करावा या विचाराने ते मोठ्या भक्तिभावाने आले होते. श्री विठ्ठल देऊळ समोर दिसत होते. प्रवास संपत आला होता. दाम्पत्य मोठ्या आशेने मंदिरात आले. समोर एकटक श्री विठ्ठल मूर्तीकडे पाहून ध्यानस्थ झाले. विठ्ठलाच्या ध्यानचिंतनाने त्यांचे मन जागृत झाले. श्री विठ्ठलासमोर त्यांनी आपली प्रार्थना मांडली. ते मनोमन म्हणाले की, “आम्हाला एखादे मूल व्हावे. माझ्या पत्नीला कुणी वांझ म्हणू नये. माझी कमतरता ही तीला कलंकित करू नये. तिच्या पदरी एक सुंदर बाळ दे. मी नवस करतो की माझी ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी पुन्हा इथे तुमच्या दर्शनासाठी येईन आणि तुम्हाला सोन्याच्या कंबरपट्ट्याने सजवेन. आपली इच्छा परमेश्वरासमोर मांडून ते दांपत्य आपल्या घरी निघून गेले.

बराच काळ ओसरला आणि त्यानंतर त्या दाम्पत्याच्या घरी सुखाचा दिवस उजाडला. त्यांना बाळ होणार होते. त्याने मनोमनी श्रीविठ्ठलांचे आभार मानले. साक्षात श्री विठ्ठल मूर्तीला समोर उभे केले. आणि आपण केलेला नवस लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
ठरल्याप्रमाणे काही दिवसानंतर ते महोदय पंढरपुरामध्ये पुन्हा एकदा श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले. श्रीविठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये त्यांनी पूजा-आरती करणाऱ्या त्या पुजाऱ्याला आपल्याजवळ बोलावले. आणि विचारले की “इथे अतिशय उत्कृष्ट दागिने घडवणारा सोनार मला हवा आहे. कारण मी या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये साक्षात् नवस केला होता की मला जर मूल झाले तर मी या मूर्तीला सोन्याच्या कंबरपट्ट्याने सजवेन”. पुजाऱ्याने त्यांना नरहरी सोनाराचा पत्ता सांगितला. त्याप्रमाणे ते महोदय नरहरी सोनाराच्या घरी आले. नरहरी सोनार आपल्या शिवभक्तीमध्ये तल्लीन होते. महोदय, नरहरी सोनाराची भक्ती मधून जागृत होण्याची वाट पाहत होते. थोड्याच वेळात नरहरी सोनार आपली पूजा-अर्चना पुर्ण करुन आपल्या कामाला लागले. ते महोदय जवळ आले. त्यांनी नरहरी सोनारांना नमस्कार केला आणि म्हणाले “मला एक उत्कृष्ट असा सोन्याचा कंबरपट्टा बनवायचा आहे.” नरहरीसोनाराने विचारले “यासाठी तुमच्याजवळ त्याचं माप आहे का? यावर महोदय म्हणाले, नाही. मग कंबरपट्टा कसा बनवू? मला त्याकरीता अगदी अचूक माप हवे. यावर श्रीमान म्हणाले, मला हा कंबर पट्टा श्रीविठ्ठल मूर्तीला अर्पण करायचा आहे. म्हणून त्याच मापाचा कंबरपट्टा बनवायचा आहे. यावर नरहरी सोनार थोडे शांत झाले आणि म्हणाले की ठीक आहे. तुम्ही त्या मूर्तीचे माप आणा. मी तुम्हाला त्याच मापाचा सोन्याचा कंबर पट्टा बनवून देतो. कारण नरहरी सोनार हे शिवभक्त होते आणि ते कोणत्याही इतर देवाचे दर्शन घेण्याचे टाळत असे. त्यावर श्रीमान म्हणाले, “ठीक आहे, मी तुम्हाला अगदी अचूक माप आणून देतो. त्याचप्रमाणे तुम्ही सोन्याचा कंबरपट्टा मला घडवून द्यावा. नरहरी सोनार तयार झाले. त्याच दिवशी त्या महोदयांनी श्री विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन पुजाऱ्याच्या मदतीने श्रीविठ्ठल मूर्तीचे कंबरेचे माप घेतले. अगदी अचूक माप घेऊन श्रीमान नरहरी सोनारांकडे आले. ते माप हाती घेऊन नरहरी सोनाराने आपल्या कार्याला सुरुवात केली. काही दिवसांमध्येच त्यांनी अतिशय सुंदर असा सोन्याचा कंबरपट्टा बनवला. आणि त्यानंतर एक दोन दिवसांमध्येच महोदय आपला सोन्याचा कंबरपट्टा घेऊन जाण्यासाठी नरहरीसोनारांकडे आले. नरहरी सोनाराने आपण घडविलेला कंबरपट्टा त्यांच्या हाती दिला. सोन्याचा कंबर पट्टा पाहून श्रीमान अतिशय आनंदित झाले. अशी उत्कृष्ट कला त्यांनी याआधी कुठेही पाहिलेली नव्हती. खूप आकर्षक अशी ही रचना मन मोहून घेणारी होती.

आपला व्यवहार पूर्ण करून श्रीमान श्री विठ्ठलाच्या मंदिरात निघाले. आज नवस पूर्ण होणार होता. मंदिरात आल्यावर त्यांनी आपला हा घडविलेला दागिना पुजाऱ्याच्या हाती दिला आणि विठ्ठल मूर्तीला सजवण्यास सांगितले. पुजार्‍याने अतिशय आनंदाने तो कंबर पट्टा विठ्ठलाच्या मूर्तीला चढविला. पण एक कडी त्यात कमी पडली. “असे कसे शक्य आहे.” पुजारी म्हणाला, त्यावर श्रीमान देखील उद्गारले की “माप तर अगदी अचूक होते.” नक्कीच सोनाराची काहीतरी चूक झाली असावी.” म्हणून पुन्हा श्रीमान त्या सोनाराकडे निघाले. सोनाराजवळ आल्यावर त्यांनी तो कंबर पट्टा सोनाराच्या हाती दिला आणि म्हणाले की यात एक कडी कमी झाली आहे. कदाचित तुम्ही ती बसवण्यासाठी विसरला असाल.. पण सोनाराला त्यावर विश्वास नव्हता. म्हणून श्रीमंत गेल्यानंतर, त्यांनी आणलेल्या मापाला तो कंबर पट्टा मिळवून पाहिला तर माप अगदीच योग्य होते. पण तरीही एक कडी मी अधिक लावून देतो. कदाचित आणलेले माप चुकीचे असावे. अशा विचाराने सोनार आपल्या कार्याला लागतो. दोन दिवसानंतर महोदय आपला सोन्याचा कंबरपट्टा घेण्यासाठी पुन्हा आले. यावेळी अजिबात कोणती चूक होणार नाही. अशा आशेने ते आनंदाने पुन्हा कंबर पट्टा घेऊन मंदिरात गेले. पुन्हा एकदा हा कंबरपट्टा विठ्ठल मूर्तीला सजवण्यास सांगितला. पुजाऱ्याने हा कंबरपट्टा जेव्हा विठ्ठल मूर्तीला चढविला तेव्हा तो  लगेचच थोडा खाली घसरला. म्हणजे एक कडी अधिक होती. “असे का झाले”? या विचाराने पुन्हा ते श्रीमान सोनाराजवळ गेले आणि म्हणाले यावेळी तुम्हीच मंदिरात या आणि ते विठ्ठल मूर्तीचे माप घेऊन अगदी अचूक असा कंबर पट्टा बनवा. यावर नरहरी सोनार अतिशय उदास होतात. कार्य संपूर्ण न झाल्यामुळे त्यांना दुःख होते. पण ते विठ्ठल मंदिरामध्ये येण्यासाठी नकार देतात. आणि म्हणतात, “मी शिवभक्त आहे, मी इतर कोणत्याही देवाचे दर्शन घेऊ शकत नाही. मी आजन्म शिव भक्तीमध्ये तल्लीन राहण्यासाठीच आहे.” यावर श्रीमान अतिशय विनवणी करतात आणि म्हणतात की, “तुम्हाला तुमच्या शिवभक्तीची शपथ, तुम्हाला मंदिरात यावच लागेल, माप हे घ्यावाच लागेल.”  त्यावर नरहरी सोनारांकडे कोणताही उपाय नसतो. म्हणून ते मंदिरात येण्यासाठी तयार होतात. पण एका अटीवर… ते म्हणतात की, “माझ्या डोळ्याला पट्टी बांधा आणि मग मला त्या मंदिरात घेऊन चला.” डोळ्यावर पट्टी बांधून नरहरी सोनार श्री विठ्ठल मूर्ती समोर येतात. आणि आपल्या हातांनी स्वतःहून ते माप घेतात. पण एक वेगळीच क्रिया तिथे घडते. नरहरी सोनार जेव्हा त्या विठ्ठल मूर्तीला स्पर्श करतात तेव्हा त्यांना अगदी शिवलिंगाला स्पर्श केल्याप्रमाणे भासते. विठ्ठल मूर्तीच्या गळ्यात असलेल्या माळा या मोत्याच्या नसून त्या रुद्राक्षाच्या आहेत असे त्यांना भासते. आपण शिवलिंगाला स्पर्श करत आहोत की आपली कोणी थट्टा करत आहे. या विचाराने ते अतिशय भांबावून जातात. ते पुन्हा एकदा स्पर्श करतात. पुन्हा-पुन्हा त्यांना तिच जाणिव होते. आपली कोणीतरी नक्कीच थट्टा करत आहे या विचाराने ते आपल्या डोळ्यांवरची पट्टी काढतात आणि पाहतात तर काय एक भव्य दिव्य तेज…. त्या मूर्तीमध्ये साक्षात शिवलिंगाची प्रतिमा उभी असते. कधी श्रीविठ्ठल तर कधी शिवलींग, पुन्हा कधी श्रीविठ्ठल तर कधी शिवलींग, असा खेळ त्यांच्या डोळ्यांना अचंबित करत राहतो. त्यांना लगेचच आपली चूक समजून येते. श्री विठ्ठल आणि श्री महादेव हे एकच आहेत. आपल्याकडुन फार मोठी चुक झाली आहे. हरिहराच्या वादामध्ये मी का म्हणून अडकलो. अखंड भक्तीमध्ये तल्लीन राहून देखील मी श्री महादेवांचे रूप ओळखले नाही. आणि श्रीविठ्ठलाचे स्वरूप ओळखले नाही. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. साक्षात एकरूप असलेल्या शक्तीला मी माझ्या विचारांनी भिन्न करायचा प्रयत्न केला. अजाणतेने माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. असे म्हणून नरहरी सोनार श्रीविठ्ठलांच्या चरणी लीन होतात. यांच्या कमरेमध्ये तो सोन्याचा पट्टा सजवितात. आणि अगदी अचूक माप असलेला तो सोन्याचा कंबरपट्टा मूर्तीला अगदी योग्य मापात होतो. आणि फार शोभून दिसतो.

यानंतर नरहरी सोनार “संत नरहरी सोनार” म्हणून ओळखले जाऊ लागले. मोठ्या भक्तिभावाने श्री विठ्ठलाचे अभंग गाऊ लागले, किर्तन करु लागले, विठ्ठलाच्या दर्शनाने महादेवांचे चिंतन करू लागले. तर कधी महादेवांच्या ध्यानाने विठ्ठलाचे दर्शन…असा हा मिटला मनातुन वाद हरिहराचा….

—  स्वाती पवार 

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..