नवीन लेखन...

निरंजन – भाग ४४ – दंगले देऊळ संतध्यानात

“जय जय राम कृष्ण हरी” जपत-जपत श्री संत नामदेवांची संत मंडळी खूप मोठ्या उत्साहाने एकदा जंगल पार करीत होती. हा प्रवास सुरू असतानाच वाटेमध्ये त्यांना महादेवांचे एक भव्य मंदिर दिसते. सर्वांची उत्कट इच्छा होते की, आपण सर्वांनी मंदिरामध्ये जाऊन परमेश्वराचे दर्शन घ्यावे.

संत नामदेवांच्यासोबत सर्व संतमंडळी “विठ्ठल-विठ्ठल” नामाचा जप करत मंदिरासमोर येतात आणि मंदिरामध्ये प्रवेश करणार, तोच दुरून एका पुजाऱ्याच्या त्यांना अडवण्याचा आवाज येतो. “अरे, अरे, काय करताय? कोण आहात तुम्ही सर्वजण? कुठून आलात? आणि परवानगीशिवाय मंदिरात प्रवेश कसा काय करताय?…. यावर सर्वजण दचकून तिथेच थांबतात. एकमेकांकडे आश्चर्याने पाहत बसतात. संत नामदेव त्या पुजार्‍याला विचारतात. मंदिरात प्रवेश करण्यासाठी परवानगी? हा कोणता नियम? यावर तो पुजारी उद्गारतो, “होय, हा इथला नियम आहे”. तुम्ही सर्वजण कोण आहात. संत नामदेव म्हणतात, “मी नामदेव आणि हे माझे सहकारी आणि माझ्या विठ्ठलाचे भक्त, माझ्या विठ्ठलाचे अखंड चिंतन करतात, नामस्मरण करतात. आम्हाला वाटेमध्ये येता-येता या पवित्र स्थळाचे दर्शन झाले म्हणून इच्छा झाली की परमेश्वराला पाहून पुढचा प्रवास करावा. यावर पुजारी म्हणतो “हे सर्व ठीक आहे, पण तुझी जात कोणती, नामदेव म्हणतात, “माहित नाही”, “मग गोत्र कोणते?” नामदेव म्हणतात, “हे ही मला माहीत नाही, यावर पुजारी म्हणतो, “अरे, मग माहिती तरी काय आहे तुला? तुझ्या वडिलांचे नाव काय? ते काय करतात? हे तरी माहित आहे का तुला?” अशा विचित्र बोलण्याने पुजाऱ्याने नामदेवांचा अपमान केला. पण नामदेव मात्र शांत होते. ते शांतपणे म्हणाले. “होय, माझ्या वडिलांचे नाव ठाऊक आहे मला….विठ्ठल….. विठ्ठल नाव आहे त्यांचे” यावर पुजारी म्हणाला, “ते काहीही असो पण जर तुम्हाला जात माहित नाही, गोत्र माहित नाही, तर मग नक्कीच तुम्ही कमी जातीतले आहात. तुम्हाला या मंदिरात प्रवेश मिळणार नाही. जर दर्शन घ्यायचं असेल तर मंदिराबाहेरूनच दर्शन घ्यावे. अजिबात मंदिराची पायरी ओलांडू नये. यावर नामदेव शांतच राहतात आणि म्हणतात “ठीक आहे, जशी माझ्या विठ्ठलाची इच्छा” आणि मंदिरासमोर मोठ्या आनंदाने नामदेव भजन गाऊ लागतात. काही कालांतराने पुन्हा त्या पुजार्‍याला हे पाहवत नाही. पुन्हा तो पुजारी नामदेवांजवळ येऊन पुटपुटतो आणि म्हणतो, “ पुरे झाले आता, इथे नको, तुम्ही मंदिराच्या मागे जाऊन भजन करा. ही वाट येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी मोकळी ठेवा. विनाकारण अडचण बनु नका. पण तरीही नामदेव शांतच राहतात. हे बोलून पुजारी तिथून निघून जातो. वेळ दुपारची असते. नामदेव मात्र मंदस्मित भाव देऊन आपल्या सहकाऱ्यांना घेऊन ते मंदिराच्या मागच्या बाजूला जातात. तिथे आनंदाने भजन कीर्तन करतात. सर्वांचे संतध्यान लागते.

संगीत ध्यानात तल्लीन होतात. मंदिराच्या आवारातील अखंड वातावरण प्रसन्न होते. नामदेव आणि सोबत असलेली इतर भक्त मंडळी विठ्ठलाच्या नामस्मरणात मंत्रमुग्ध होतात. त्यांच्या या सहनशक्तीमुळे आणि निस्वार्थ भक्ती-भावामुळे मंदिरात असलेली महादेवाची पिंडी जागृत होते. सकाळची संध्याकाळ कधी होते. हे त्यांना कळतही नाही आणि मंदिरासारखी पवित्र वास्तू आपले द्वार वळविते. जिथे नामदेव आणि त्यांची भक्तमंडळी संत ध्यानात तल्लीन असतात. तिथेच मंदिराचे द्वार येऊन थांबते. नामदेवांचे संगीत अखंड सुरूच असते. संध्याकाळची आरती करण्यासाठी पुजारी नेहमीप्रमाणे आपल्या वेळेवर मंदिरात येत असतो. पण पाहतो तर काय?……… मंदिराचे द्वार हे समोर नसते. ते मागे वळलेले असते. जिथे संतांचे भजन सुरू असते. हे पाहून त्याला त्याची चूक कळते. त्याला अतिशय दुःख होते. तो धावत जाऊन नामदेवांच्या चरणांशी नमस्कार घालतो. त्यांच्या चरणांना आलिंगन देतो आणि म्हणतो, “मला माफ करा महाराज, मी फार वाईट वागलो तुमच्याशी, म्हणूनच परमेश्वराने आज माझ्याकडे पाठ फिरवली. मी तुम्हाला परमेश्वराचे दर्शन घेऊ दिले नाही. पण साक्षात परमेश्वराने तुम्हाला दर्शन दिले. माझी फार मोठी चूक झाली. मी विसरलो होतो की, भक्तीला कोणतीही जात नसते. गोत्र नसते. भक्तीचे खरे स्वरूप तुम्ही आहात. तुम्ही मला ओळख करून दिलात. मला माफ करा महाराज”. यावर संत नामदेव त्या पुजार्‍याला माफ करतात. त्यांना जवळ घेतात. आशीर्वाद देतात. आणि आपल्या सहकाऱ्यांना घेऊन पुढच्या प्रवासाला जायची तयारी करतात.

नागपूर मध्ये असलेल्या श्री नागनाथ-नागेश्वर ज्योतिर्लिंगाची ही कथा, संत नामदेवांच्या भक्तीचे साक्षात उदाहरण आहे.

— स्वाती पवार 

Avatar
About स्वाती पवार 57 Articles
मी स्वाती... स्वतःला आनंद मिळतो म्हणुन लिहिणारी....... माझे "निरंजन" या लेखसंग्रहातुन दैनंदिन जीवनातल्या वेगवेगळ्या विषयांवर लेखन... या लेखनामधील निवडक लेखरचना या "|| ॐश्री ||" या ध्यानकेंद्रातील व्याख्यानमालेमधल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..