नवीन लेखन...

माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)

माझ्या आईच्या पिढीतले पणजोबांच्या घराला “तेंडोलकर युनिव्हर्सिटी” म्हणत.
कोल्हापुरला राजाराम कॉलेज होते.
पुण्यानंतर कुठे कॉलेज नव्हते, त्यामुळे कोंकण, सातारा, इथले सर्व विद्यार्थी तिथेच येत.
महाविद्यालयीन अभ्यासाबरोबरच कसं रहावं, कसं वागावं, ह्याचे धडे त्यांना तेंडोलकरांच्या घरी मिळत.
त्यामुळे ते आपलं शिक्षण तेंडोलकर युनिव्हर्सिटीत झालं आहे असं अभिमानाने सांगत.
पहिली गोष्ट तिथे शिकवली जाई ती म्हणजे काम करणे महत्त्वाचे.
तिथे राहिलेल्याला पुढे आयुष्यात कधीही कोणतेही काम करायला लाज वाटायची नाही.
आजोबा स्वतः श्रमप्रतिष्ठा आचरणारे होते.
दुसरी गोष्ट म्हणजे वायफळ खर्च न करणे.
छानछोकीवर पैसे वाया न घालवणे.
तिसरी गोष्ट निर्व्यसनीपणा.
कोणतेही व्यसन लावून घ्यायचे नाही.
पणजोबा तपकीर ओढत, अधेमधे कोल्हापूरला त्या काळी होणाऱ्या घोड्यांच्या शर्यतीवरही मर्यादीत पैसे लावत पण आजोबांना कोणतेही व्यसन नव्हते.
कपडे साधे पण स्वच्छ असावेत.
अन्न पानांत टाकून उठू नये. नियमित व्यायाम करावा.
गोष्टी वेळच्या वेळी कराव्यात म्हणजे वेळ पाळावी.
असे अनेक पाठ त्या युनिव्हर्सिटीत शिकवले जात.
पूर्वी युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहाचा प्रमुख कडक शिस्तीचा असल्यावर मुलांना जशी शिस्त लागत असे, तशीच इथे लागे.

वर्षातून एकदा वाडयात शाकारणीच काम असे.
ब-याच भागात नळे म्हणजे गोल कौले बसवलेली होती.
दर एप्रिलमधे त्यांची डागडुजी करावी लागे.
नाहीतर पावसाळ्यात गळती ठरलेली.
अधून मधून येणा-या वानरांच्या टोळ्या कौलांची खूप नासाडी करत.
वाडा आणि समोरचे दुमजली घर यांत मध्ये रस्ता असल्यामुळे अठरा ते वीस फुटांचे अंतर होते.
वानरे सहज उड्या मारून जात.
पोटाशी पिल्लू धरून अशा उड्या मारणा-या माकडीणी मी पाहिल्या आहेत.
एकदा मात्र एका माकडाची उडी चुकल्यामुळे दोन चार फूट खाली असलेल्या तारेवर तो लटकल्याचे व विजेच्या धक्क्याने त्याचा हृदयद्रावक अंत झाल्याचे पहाताना डोळ्यात पाणी आले होते.
शाकारणीचे काम जुन्या अन् नव्या दोन्ही घरांकडे होई.
ते काम करणारे लोक येत पण आम्ही मुले उगाचच माकडांसारखी नळ्यांवर चढून बसत असू.
गडी आम्हाला नळे लावायला शिकवत.
गडी जेवायला गेलेले असतांना मुले तिथेच बसून असत.
उघडलेल्या भागांतून खालच्या घरांतील हालचाली दिसत.
किशोर वयांतील मुलांना वरून एखादी स्त्री वस्त्रे बदलतांना किंवा अंघोळ करतांना दिसे आणि डोळे विस्फारले जात.

शिस्तप्रिय आजोबांना खाण्यापिण्याच्या बाबतीत मात्र तडजोड चालत नसे.
ते आम्हां चार पाच मुलांच्या हातात प्रत्येकी दोन तीन पिशव्या देत.
ते भराभर चालत.
मला त्यांच्याबरोबर रहाण्यासाठी पळावे लागे.
त्यावेळी कोल्हापुरांत तीन ठीकाणी मंडई होती.
एक नगरपालिकेजवळ एक कपिलतीर्थ आणि लक्ष्मीपुरी.
तीन मंडयांत फिरणं जिकीरीचं असे पण आजोबा उत्तम वस्तू योग्य किंमतीत मिळवणारे होते.
ते चार ठीकाणी भाव काढत, वस्तू तपासून, घासाघीस करूनच घेत. एखादा चांगला मोठा फणस घेतला की तो आमच्यापैकी एखाद्याकडे देत आणि तो घरी पोहोचवून पुढच्या बाजारांत परत यायला सांगत.
मोठा फणस डोक्यावर घ्यायला लागायचा.
दर रविवारी मटण हे हवेच. कोल्हापूरला मासे तसे कमीच मिळत.
तरी इतर दिवशी मासेही आणत.
आजीला सुके बांगडे व सुके बोंबील आवडत. बांगडा चटणीतही घालत. सुक्या मासळीचा पुरवठा कोंकणातून होत असे.
चहाच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, चिवडा, चकल्या, इ. भरलेले डबे त्यांना समोर लागत.
मुंबईकर पाहुणे माहिम हलव्यासारखी मिठाई घेऊन आले तर त्यांना ती आवडे.
मी उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी जायचो, तो आंब्याचा मोसम असे. आंबे आजोबांना अतिप्रिय.
हापूस, पायरी, माणकूर, रायवळ, इ. प्रत्येक जातीचा आंबा टोपल्या/करंड्या भरून घरांत येई.
आंबे स्वयंपाकघराच्या मागल्या दुस-या खोलीत पसरून ठेवले जात.
मात्र कुठला आंबा कशासाठी वापरायचा ह्या विषयी ते अत्यंत आग्रही असत.
मुलांनी दिवसातून कितीदाही आंबे मागितले तरी त्यांना नकार मिळत नसे.

मी जेव्हा सुट्टीत कोल्हापुरला जात असे, तेव्हां गावभर भटकणा-या गाईला शोधून आणण्याचे काम माझ्या भावाकडे असे.
आम्ही दोनच भाऊ. दोघात सव्वा दोन वर्षांच अंतर.
त्याला शिकायला कोल्हापूरला ठेवले होते. तिथल्या पध्दतीप्रमाणे त्याला बरीच कामे करावी लागत.
तो तिथे असल्यामुळे मी तिथे जायला उत्सुक असे. त्याच्या वाटणीची कामे करायलाही मला आवडे.
त्याचे एक काम होते, गांवभर भटकणा-या गाईला संध्याकाळी शोधून आणणे.
संध्याकाळी पाचनंतर आम्ही तिला हुडकायला ( शोधायला) निघत असू. तिच्या जागा ठरलेल्या होत्या.
प्रथम आम्ही जवळच्या मंडईत डोकावून खात्री करून घेत असू की ती तिथे नाही पण क्वचित ती तिथेच आलेली असे.
नंतर जुना राजवाडा, रंकाळा ते थेट लक्ष्मीपुरी, शाहूपुरीपर्यंत जावं लागत असे.
त्यामुळे त्या काळच्या कोल्हापूरचे गल्ली बोळ मला चांगले माहित झाले. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे भाऊ फोटोग्राफी करी, त्यांत थोडे पैसे मिळत. त्याकाळी कोल्हापूरात उत्तम दूध कोल्ड ड्रींक मिळे. मला ते फार आवडे.
तो सोळंकींच्या दुकानात घेऊन जाई व मला मनसोक्त कोल्ड ड्रींक मिळत असे. गायीला शोधून “ चल घरला” असं म्हटल्यानंतर ती चालू पडे.
मग तिच्याकडे पहावे लागत नसे पण आमंत्रणावाचून परतत नसे.
एकदा खूप शोधून दमलो आणि सांगायला घरी आलो तर ही आधीच गोठयांत उभी.

आजोबांनी ब-याचं ठिकाणी इन्व्हेस्टमेंटही केली होती.
स्वस्तिक रबर प्रॉडक्टस आणि कोल्हापूर शुगरमिल ह्याच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग होता.
ते ह्या दोन कंपन्यांचे डायरेक्टरही होते. डायरेक्टर म्हणून ते सर्व मिटींगजना नियमित उपस्थित रहात.
स्वस्तिकच्या मिटींगस पुण्यास असत. लक्ष्मी बॅंकेतही त्यांचे शेअर्स व ठेवी होत्या. ती बॅंक बुडाली तेव्हा त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले परंतु त्यामुळे ते खचले नाहीत.
ते गेल्यानंतर स्वस्तिक रबर आणि कोल्हापुर शुगरही लीक्विडेशनमधे गेल्या. तारदाळची जमीनही कांही कुळकायद्यात दिली तर कांही विकली. तरीही त्यांना किंवा नंतर आजीलाही भरपूर होते.
जो मामेभाऊ तिथे राहिला, त्याचाही चरितार्थ त्या मालमत्तेवरच चालला. आताच्या पिढीने पुढेच एक स्वत:चं दुकान काढलं आहे.

पत्रव्यवहारासाठी आजोबा बहुदा पोस्टकार्ड वापरायचे.
पोस्टकार्डाचा कोपरा न कोपरा मजकूराने भरलेला असायचा.
टांकाने लिहिलेले त्यांचे किंचित तिरप्या आणि ठळक अक्षरातले पत्र वैशिष्ट्यपूर्ण असे.
एकदा आईला पाठवलेल्या पत्रावर “सिंधूताईस देणे, अंधेरी, मुंबई ” एवढाच पत्ता त्यांनी लिहिला.
सिंधू हे तिचे माहेरचे नांव होते तरीही त्यांचे अक्षर ओळखून अंधेरीच्या आमच्या पोस्टमनने बिनचूक ते पत्र आमच्या घरी आणून दिले.
माझा कोल्हापूरच्या बहुप्रसवा बाळंतीणीच्या खोलीत जन्म झाला, तेव्हां वडील मुंबईत होते.
त्यावेळी मात्र आजोबांनी पाकीटांतून पत्र पाठवले. ते आजही माझ्याकडे आहे. त्यांत वडिलांचे पत्र पोहोचल्याचा उल्लेख असून, माझे बारसे झाल्याचा व त्यांत माझे नांव “अरविंद” हे ठेवावे हे सूचवणारे वडिलांचे पत्र उशीरा मिळूनही बायकांनी तेच ठेवल्याचे व तशी “मानससूचना” आधीच पोहोचल्याचे म्हटले आहे.
वकील मित्राकडून तयार करून घेतलेली जन्मपत्रिकाही त्यात दिली आहे व वकीलमित्राने ती “बरी” आहे असे सांगितले, असे म्हटले आहे.

माझे आजोबा ८५ व्या वर्षी म्हणजे मी २७ वर्षांचा असतांना गेले.
त्याच्या आधी दोन वर्षे माझ्या लग्नाला ते आवर्जून आले.
आमचे लग्न गोरेगांवला टोपीवाल्यांच्या वाड्यात झाले.
स्वागत समारंभाच्यावेळी आम्हा दोघांबरोबर बाजूला फेटा, डगला ह्या कोल्हापूरू जाम्यानीम्यासकट उभे होते.
खरोखरीच लग्नाची शोभा आपल्या भारदस्त अस्तित्वाने वाढवत होते. सर्वांना आवर्जून भेटत होते. त्यानंतर आम्ही दोघे कोल्हापूरला गेलो तेव्हां मला त्यांचे वेगळे दर्शन झाले.
“अरविंद, तिला पन्हाळ्याला घेऊन जा.” “तिला जोतिबाला नेलेस कां?” असे कौतुकाने सांगत होते, सारखी विचारपूस करत होते.
आजोबा बारा वर्षाचे असतांना आणि आजी आठ वर्षांची असतांना त्यांच लग्न झालं.
आजी ९७व्या वर्षी ती गेली. शेवटपर्यंत स्मरणशक्ती शाबूत.
कधीही गेलो की, “अरविंदला काजूचे लाडू आवडतात, खिमा आवडतो”, अशी आठवण ठेवून करायला धडपडायची.
आजोबांनी पणजोबांप्रमाणे शेवटपर्यंत वकीली केली नाही.
साठीनंतर कांही ठराविक लोकांसाठीच ते काम करत.

डॉ. देवदत्त दाभोळकर, प्रयोग परिवारचे प्रणेते त्यांचे सख्खे बंधु प्रा. श्रीपाद दाभोलकर, वारकरी संप्रदायाचे बेळगांवचे श्री दिगंबर परूळेकर, ज्यांच्याविषयी आपल्या पुस्तकांत पोलीस अधिकारी रिबेल्लोंनी गौरवोद्गार काढले आहेत ते इन्स्पेक्टर कै. दाभोलकर (नंतर डीसीपी होऊन रिटायर झाले), माझे सख्खे मामा जे तामीलनाडू फर्टीलायझर कॉ. चे एम.डी. व निवृत्तीनंतर दहा वर्षे श्रीलंकेत फर्टीलायझर कंपनीचे सल्लागार होते ते नित्त्यानंद तेंडोलकर, रबर टेक्नॉलॉजिस्ट वामन देसाई, चित्रपट निर्माते- दिग्दर्शक सदानंद देसाई, ध्वनि संयोजक मंगेश देसाई, लेखिका डॉक्टर रोहिणी गवाणकर, श्रीरामपूर येथील कॉलेजच्या प्रिन्सिपाल डॉक्टर पळशीकर ह्या सर्वावर आणि आपापल्या क्षेत्रांत यशस्वी होणाऱ्या इतर अनेकांवर ह्या घराने संस्कार केले.
ते त्यांनी पुढील पिढीपर्यंत पोहोंचवले. “नातेवाईकांचा मोठेपणा सांगणे” हे ही एक मूर्खाचे लक्षण आहे.
तो दोष पत्करूनही मी कांही नातेवाईकांचा उल्लेख केला आहे.
मला एवढचं सागायचं होतं की आमचे पणजोबा मोठा वारसा मागे ठेवून गेले. त्यांचे नाव रघुनाथ होते.
त्यांची पत्नी हीचं घराणं मुन्सफ नाईक ह्यांच.
नाईक कुटुंबातही कर्तबगार वंशज झाले पणजोबांपासून सुरू होणा-या कुलाला आमच्या मामांनी मजेत “रघुकुल” नांव दिले.
या रघुकुलाची नोंद जिनी (Geni) ह्या वंशावळ दाखवणा-या साईटवर केली आहे.
तिथे माझ्याशी आईकडून नाते असलेल्या शेकडोजणांची नोंद आहे. त्यांत ‘ब्लड रिलेटीव्हज’ आहेत.
आज ही सर्व मंडळी जगभर पसरलेली आहे. तेंडोलकर कुटुंब हा अजूनही सर्वांना जोडणारा घटक आहे.

वाड्याने या सर्वांना मोठे केलं. तेंडोलकर परिवाराच्या चार पिढ्यांना निवारा दिला. आनंद दिला. तो धन्य झाला. त्याच काम पूर्ण झालं.
घर अजूनही आहे परंतु आजी गेल्यानंतर घराची वाटणी झाली.
खरं तर वाटणी आजोबा गेले तेव्हाच झाली होती परंतु आजी असेपर्यंत तीनही मामांनी त्या घरावर हक्क सांगितला नाही.
तिचा घरावर पहिला हक्क नव्हता कां? १६ वर्षांनी आजी गेली.
मग जुने बाग असलेले टाउन हॉलच्या समोरच्या बोळातले घर ज्याच्या वाटणीला आले होते, त्या मामाने ते विकून टाकले.
साहाजिक होते कारण जुन्या भाड्यात त्या घराची आता शाकारणीही झाली नसती.
कोर्टाजवळचा वाडा दोघा मामांना मिळाला होता, त्यापैकी मोठ्या मामांचा एक मुलगा व त्याचे कुटुंबही तिथे होते.
त्या मामांच्या वाट्याला वाड्याचा पुढचा मोठा भाग आला होता.
मागचा संपूर्ण भाग आणि पुढच्या वाड्याचा खानावळ असलेला भाग दुस-या मामांकडे होता.
तो पुण्यांत स्थायिक झाल्यामुळे त्याने तो भाग डॉक्टर गुणेंच्या विनंतीवरून त्यांना विकला. तिथे मोठं हॉस्पिटलं उभं राहिलं आहे.
मोठ्या मामाच्या वाट्याचं मुख्य घर रस्तारूंदीत पुढून अर्ध गेलं.
उरलेलं घर हे मूळच्या घराच्या एक चतुर्थांशही नाही. अर्थात् तिथे आता साठ सत्तरच्या एवजी फक्त मामेभावाच चार जणांचच (आजमितीला दोघंच) कुटुंब रहात.
तेंडोलकर परिवार मात्र जगभर पसरला आहे.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..