नवीन लेखन...

हरवलेल्यांची पंढरी (कथा)

सिनेमात काम करायचं-मुंबई. नोकरी मिळत नाही – मुंबई. घरी त्रास आहे- मुंबई. परिक्षेत नापास झाला- मुंबई : अशा अनेकविध कारणांमुळे घरी न सांगता मुंबईकडे धाव घेनारे अनेक आहेत. स्वत:हून दडून बसलेल्या अशा माणसंना शोधून काढणं पोलीसच काय कुणालाच शक्य नाही.


यवतमाळला राहणाऱ्या मित्राचं पत्र आलं. महिना झाला. त्याचा मुलगा बेपत्ता झाला होता. खूप शोधलं, पण सापडला नाही. त्यांच पत्र आलय, तो मुंबईलाच कुठतरी राहतो. पत्ता कळवला नाही पण सर्व खुशाल आहेत, काळजी करु नका, असे वाक्य त्यांन पाच वेळा लिहिलेलं होत.

त्या पत्राची एक झेरॉक्सही त्यानं पाठवून दिली. काही शोध करता आला तर पाहा. चार दिवसांनी रजा काढून मी स्वत: येतो, असे त्यांन कळवलं.

पत्ता नसलेल्या त्या मुलाचा शोध घेणार तरी कसा व कुठे? मला तर काही सुचलं नाही. शेवटी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांना मित्राचं पत्र आणि त्या मुलाच्या पत्राची झेरॉक्स प्रत दाखवली. ती त्यांन वर-खाली करुन पाहिली, पण काहीच बोध झाला नाही. नावापुरती तक्रार नाेंंदवून घेतली.

पत्रामागोमाग मित्रही येऊन थडकला. तक्रार करण्यापलिकडे मी काही करु शकलेलो नव्हतो. ती आल्यानंतर शोध-मोहीम परत एकदा हाती घेतली.  तरी कुठे आणि कसा शोधायचा प्रश्न होताच.

परत पोलीस स्टेशनवर गेलो. यावेळी मुलाचा फोटो होता तो त्यांनी ठेवून घेतला. मुलाची माहिती विचारली. का पळून गेला? काही माहती नाही. पण वर्ष झालं पदवीधर होऊन. वर्षभरात काहीच काम मिळाल नाही. त्यामुळे तो अतिशय अस्वस्थ होता. त्यामुळे कादाचित घरातून पळून नोकरीच्या शोधात मुंबईला आला असावा. त्याचा मुंबईत कुणी मित्र किंवा नातेवाईक? नातेवाईक कुणी नाहीत. त्याचा एक मित्र त्याच्या आधीच मुंबईत आलेला आहे आणि कुलाब्यातल्या एका हॉटेलात नोकरीला लागला आहे. हॉटेलच नाव माहिती आहे? नाही.

आम्ही शोध करतोच. पण तुम्हीसुध्दा कुलाब्यातली हॉटेल्स शोधून काढा.  तिथेच कुठंतरी तो असण्याची शक्यता वाटते. दुसरं असं करा, क्रॉफर्ड मार्केट समोर क्राईम ब्रँच आहे. तिथे सोशल सेक्युरिटी सेल आहे. तिथेही खबर करा. त्यांना जास्त माहिती असते. जवळपासचे मित्र जमले होतेच. सगळयांनी मिळून कुलाब्यात शोध घ्यायच ठरवल. ते अवघड आहे हे तपास सुरु केल्यावर समजलं. कुलाब्यात इतकी हॉटेल आहेत हे सांगूनही खरं वाटल नसते. त्यात कुणाला विचारायच,  काय विचारायच माहिती नव्हतं. त्यामुळे पहिल्याच दिवशी सगळे हताश झाले होते.

दुसऱ्या दिवशी पोलीस हेडक्वॉर्टरमध्ये गेलो. तिथे संबंधित अधिका-यांना भेटलो. पण त्यांनी काही फारशी दखल घेतल्यासारख वाटल नाही. त्यांना कदाचित हे नेहमीचंच असतं.

इतक्या मोठया शहरात मूल हरवणारच? त्या अधिकाऱ्याने आश्चर्य व्यक्त केलं. कदाचित हरवलेली मुलं शोधायच काम करणं म्हणजे काहीतरी कमीपणा त्यांना वाटत असावा. चार्लस् शोभराज सारख्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराचा पाठलाग करावा, पकडावं, बक्षीस-मानसन्मान मिळावेत, या हेतूनं बिचारा पोलीस खात्यात आला असावा आणि हरवलेल्यांचा शोध घेण्याचं बिकट पण फारशी दखल घेतली न जाणारं काम करणे त्याच्या नशिबी आलं असावं, त्यामुळे चीडचीड करीत असावा. हीरो- हिरॉईन बनण्याचं स्वप्न घेऊन मायापुरीत प्रवेश करणाऱ्या असंख्य तरुणतरुणी पुढे आरसा धरण्याचं किंवा नायिकेच्या डोक्यावर ऊन लागू नये म्हणून छत्री धरण्याचं काम करत आयुष्य काढतातच नां?

अहो, इथे मुलं हरवत नाहीत. मोठी माणसं, तरुण-तरुणी, म्हातारे-कोतारे सगळे हरवतात.

काय?

होय. सगळे हरवतात. हरवतात, नाही तर पळून जातात न सांगता. बरं, मुंबईतलेच लोक हरवतात असं नाही. तर सगळया दुनियेतले लोक हरवतात आणि मुंबईत येऊन कडमडतात. आम्हाला, आई-बापाला, मित्रमंडळींना ताप.

वैतागून तो अधिकारी सांगत होता. हे बघा आज आलेलं टपाल. हे देशातल्या विविध राज्यांतून आल आहे. त्यात सगळया हवलेल्यांच्या केसेस आहेत. त्या सगळयांची खात्री आहे. दर्शविलेली माणसं जागाच्या पाठीवर कुठेही सापडली नाहीत, तरी मुंबई शहरात मात्र हमखास सापडणार. मुंबई शहर म्हणजे हरवलेल्या, पळून गेलेल्या लोकांची पंढरीच आहे.

मुलाचा शोध चालूच होता. एक लक्षात आलं, या प्रचंड मोठया गुंतागुंतीच्या शहरात ज्याला स्वत:चा पत्ता सांगता येत नाही अशी लहान मुलं, विस्मृतीच्या गर्ततेत सापडलेली वयस्क माण्सं किंवा किंचित वेडसर लोक फक्त हरवू शकतात. पण स्वत:हून पळून जाणारी आणि आपल्या कुटुंबापासून मित्र- मंडळीपासून लपून बसणारी माणसं फार मोठया संख्येत असावीत.

मुंबई शहराविषयी इतक आकर्षण असतं की झुरीतलय्यापासून कांचीकामकोटीपर्यंत  घरातून पळालेल्या प्रत्येकजण मुंबईकडे धाव घेतो. सिनेमात काम करायचं.- मुंबई, नोकरी मिळत नाही– मुंबर्ठ, घरी त्रास आहे–मुंबई, परीक्षेत नापास झाला– मुंबई, अशा अनेकविध कारणांमुळे घरी न सांगता मुंबईकडे धाव घेणारे अनेक असावेत स्वत:हून दडून असलेल्या अशा आणसांना शोधून काढणं पोलीस काय, कुणालाच शक्य नाही. दाणापाणी बंद झाल्यावर अशी माणंस बाहेर येतात.

झालंही तसंच. आम्ही इकडे शोध घेत होतो. तिकडे मुलाचं घरी पत्र गेलं, सगळं ठीक आहे. नोकरी मिळण्याची शक्यता आहे. फरक इतकाच होता, की पत्र हॉटेलच्या लेटरहेडवर लिहिलेलं होत. त्याला शोधणं अवघड गेलं नाही.  शोधणं सोप व्हाव म्हणूनच त्यांने अप्रत्यक्षरीत्या पत्ता कळवला होता.

हरवलेला एक माणूस सापडला होता.

— प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक  2 डिसेंबर 1993

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..