नवीन लेखन...

गँगमन (कथा)

मैलोगणिक पसरलेल्या रेल्वे रुळांच रक्षण करुन ते व्यवस्थित ठेवायचे. म्हणजे ऊन-पावसात मैलोगणिक चालण्याची शारिरिक क्षमता हवी. इतकं चालणार कोण ? दिवसाकाठी दहा मैल डोंगरकपारी तुडवणारा आदिवासी या कामाला योग्यच होता. पण शहरापासून बिचकून राहणारा हा लाजाळू माणूस गँगमन म्हणूनकाम करायलाकसा तयार झाला कुणास ठाऊक.


गँगमन. गँगमन म्हटल, की हातात चाकू- सुरी, एक-47 सारखी खतरनाक हत्यारं घेतलेले गुंड, त्यांच्या आपापसातील हाणामाऱ्या डोळयांसमोर उभ्या राहतात. मुंबईत गुन्हेगारांच्या टोळयांची कमी नाही. एक दादा संपला की दुसरा तयार होत असतो. आपसात टोळीयुध्द चालू असतं. त्या टोळीवाल्यांचा जेव्हा सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होता. त्यावेळी खरा प्रश्न निर्माण होतो.

पण माझे गँगवाले हातात कोणतंच शस्त्र न घेता लढतात. त्याची लढाई एकाच गोष्टीसाठी चालू असते, ती म्हणजे लोकल विनासायास वेळेवर धावली पाहिजे. रेल्वे रुळाची देखभाल करणाऱ्या या सर्वात खालच्चा वर्गातील सेवकालाही गँगमन म्हणतात. पण अतिशय साधा सरळ असा हा गँगमन कुठल्याही टोळीयुध्दात सामील नसतो. मुंबईतल त्याच वास्तव्य फक्त रेल्वे रुळांशी जोडलेले असतं. या रुळांची देखभाल झाली, की हा गरीब गँगमन काहीही आवाज न करता आपल्या गावी रवाना होतो. परत चार-पाच दिवसांनी उगवतो. सात-आठ दिवस काम करतो आणि परत चार-पाच दिवस गायब होतो.

रेल्वेचा हा गँगमन चेहरा नसलेला माणूस रेल्वे रुळांची त्यांच्या सांध्यांची डोळयात तेल घालून पाहणी करणार, देखभाल करणार, अनेक भयानक अपघात या अशिक्षित पण प्रामाणिक गँगमनमुळे टळले. कॉम्प्युटराईज्ड सिग्नल सिस्टीम एक वेळ अपयशी ठरेल. पण बारीक नजरेने रेल्वे रुळांच्या फिश-प्लेटस्ची पाहणी करणाऱ्या या गरीब माणसाच्या बारीक नजरेतून लहानसा फरक सुध्दा सुटणार नाही. लाखो प्रवाशांच्या जिवाची काळजी वाहणाऱ्या गँगमनच आयुष्य मात्र काबाडकष्टातच जातं. त्यांने केलेल्या कामाची नोंद होत नाही. कधी शाबासकीचा हात पाठीवर पडत नाही.

गेली अनेक पिढया गँगमन म्हणून काम करणारी ही मंडळी इगतपुरी-कसारा-डहाणू भागांतून आलेली आदिवासी मंडळी आहेत. देशात रेल्वे सुरु झाली ती मुंबई-ठाणे. मग ठाण्याच्या पुढे गेली आणि या रुळांची देखभाल करण्याच काम पिढीजात पध्दतीने या आदिवासी माणसांच्या हाती आलं. त्याच कारण एकच. मैलोगणिक पसरलेल्या रेल्वे रुळांच रक्षण करुन ते व्यवस्थित ठेवायचे. म्हणजे ऊन-पावसात मैलोगणिक चालण्याची शारिरिक क्षमता हवी. इतकं चालणार कोंण? दिवसाकाठी दहा मैल डोंगरकपारी तुडवणारा आदिवासी या कामाला योग्यच होता. पण शहरापासून बिचकून राहणारा हा लाजाळू माणूस गँगमन म्हणून काम करायला कसा तयार झाला कुणास ठाऊक. रेल्वे रुळांची पाहणी करायला येणारा साहेब चारजणांच्या ट्रालीवरुन येणार. ती ढकलत आणायला गँगमनच हवा. बाकी इतर वेळी पायी चालयचं आणि काम संपल्यावर चालत जवळच्या स्टेशनवर जायंच. मिळेल ती गाडी पकडायची आणि गावाकडे पळायच, असा त्यांचा कार्यक्रम.

आता इतक्या पिढया या रुळांवर काम करणारा पण शहरी जीवनाशी काहीच संपर्क नाही. या गँगमनने रेल्वे रुळ कधी सोडला नाही. प्लॅटफॉर्म कधी ओलांडला नाही आणि इमाने इतबारे काम संपल्यावर क्षणाचीही वाट न पाहता गावाची वाट धरत राहिला. गँगचा फोरमन सोडला तर बाकी सगळे गँगमन रोजगार हमीवर, पगार वेळेवर नाही. कामासाठी पूर्णपणे फोरमनवर अवलंबून. आताशी थोडी परिस्थिती सुधारलीय. पण आता नोकरीच्या अभावामुळे इतर लोकही या नोकरीत घुसू लागले आहेत.

पंधरा –पंधरा दिवस वा महिनाभर मुंबईत राहायच झाल तरी हा माणूस कधी घर शोधत बसला नाही. प्लॅटफॉर्मवर, केबिनजवळ, कारशेडच्या बाहेर टिनाच्या टपरीत गँगबरोबरच राहणार. तिथल्याच पाण्याचा पाईप वापरून आंघोळ करणार आणि तीन-चार दगड एकत्र करुन वाळक्या काटक्या गोळा करुन भात शिजवून खाणार. दहा दिवसांनी परत घरी.

हातात एक लांब दांडीचा हातोडा आणि दुसऱ्या हातात रुळाभोवती दगड सारखे करण्यासाठी तारेची फणी घेऊन निघालेल्या या गँगमनच्या पायात चप्पलसुध्दा नसते. युनियमन स्थापन करावी, मागण्या कराव्यात, घेराव घालावेत या मनोवृत्तीचा हा माणूस नाही. त्यांच्याकडे अधिक सहानुभूतीने बघण्याची गरज आहे. केवळ दगड सारखे करणं आणि फिश-प्लेटस् जागेवर आहेत की नाही. एवढे बघितल की काम संपल अस नाही. नवीन सांधे टाकण, जुने रुळ बदलण, लाकडी पाटया ठोकण, अशी अवघड कामही या गँगमनलाच करावी लागतात. सिमेंटच्या पट्टया टाकल्यापासून काम जरा सोप झालय. पण त्यामुळे गाडयांचे डब्बे जरा जास्त उडायला लागले आहेत. अस या अडाणी माणसाच अनुभवाच मत आहे. पण ते लक्षात कोण घेतो?

कुणाच्या सुपीक डोक्यातून कल्पना निघाली कुणास ठाऊक. पण रेल्वे रुळाच्या आजूबाजूची उघडी जागा या गँगमनच्या ताब्यात देण्याचा निर्णय झाला आणि मातीवर प्रेम करणाऱ्या या माणसाने फावल्या वेळात तिथे भाजीचे मळे उभारले. त्यासाठी जवळपासचं सांडपाणी वापरल. ज्या ठिकाणी या गँगमनची पत्र्याची शेड असते तिथे सहज वाढणारं, फारस पाणी न मागणारं चाफ्याच झाड उभ असलेले आपल्याला दिसतं. जास्वंदीच झाड दिसते. त्याबरोबर पालक, आंबटचुका सारख्या सहज कमी वेळात तयार होणाऱ्या पालेभाज्यांचं उत्पन्न हा माणूस सहजरीत्या घेत आहे. याच पध्दतीने जर याला कल्याण – विरारच्या पुढे रेल्वे लाईनजवळची नाही तरी वाया गेलेली वरकड जमीन जर दिली तर तिथे तो भातशेती केल्याशिवाय राहणार नाही. गँगमनला हाताशी धरुन रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूला वनशेती कार्यक्रम राबवायला हरकत नाही. पण तेवढा वेळ कुणाकडे आहे. मुंबईत राहून मुंबईचा स्पर्श न झालेला एकमेव माणूस म्हणून गँगमनकडे बघितल पाहिजे.

———————————————————-

-प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक : 7 एप्रिल 1994

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..