नवीन लेखन...

ज्ञानदेवाचे भिंताड (आठवणींची मिसळ – भाग ५)

अंधेरी हे मुंबईच उपनगर. पूर्वीची अंधेरी (पश्चिम) आईस फॕक्टरीपाशीच संपायची. म्हणजे अंधेरी स्टेशनपासून रीक्षाने कमीत कमी भाड्यात तिथपर्यंत पोहोचू शकता.अर्थात् रस्ते रिकामे असले तरच. अंधेरीची मुख्य वस्ती तिथे संपायची.पुढे वेसाव्याला जाणाऱ्या त्या रस्त्याला तिथे दोन फाटे फुटायचे. एका फाट्यावर कांही टुमदार एक मजली बंगले होते तर दुसरा रस्ता स्मशानाकडे जायचा. त्याच्या वाटेतल्या दोन गल्ल्या अंधेरी जवळच्या छोट्या आंबोली गांवाकडे जायच्या. तिथेही थोडे बैठे बंगले होते. दोन्ही फाटे परत एक झाले आणि अर्धा किलोमीटर चाललो की डाव्या बाजूला एक जुनं पडकं बांधकाम दिसायचं. बांधकाम कसलं तो एक भग्नावस्थेतला चौथरा होता फक्त. आजूबाजूला खूप दूरवर कुठेही कसलंही बांधकाम नव्हतं.चोहोबाजूला खाचरं. ती सुध्दा खार जमिनीची. त्यामुळे शेती वगैरेही कांही नव्हती. त्यामुळे ते ओॲसीस सारखचं होत. तिथून पुढे एक किलोमीटरपेक्षां जास्त चालल्यावर चार बंगला आणि त्याच्या बऱ्याच पुढे सात बंगला, हे श्रीमंतांचे सुट्टीतले बंगले. त्या पडक्या भग्नावस्थेतील चौथऱ्यालाच आम्ही ‘ज्ञानदेवाचं भिंताड’ म्हणत असू.

ज्ञानदेवांना मराठी मनामधे एक वेगळचं स्थान आहे. ते त्यांच्या चमत्कारांनी मिळवून दिलं कां? संताना चमत्कार चिकटवले जातात. ज्ञानदेवांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, हा चमत्कार पुरेसा न वाटणाऱ्यांनी चिकटवले. भिंतीची गोष्ट तर तुम्हा सर्वाना माहितच असेल पण इथे थोडक्यात सांगतो. ज्ञानदेवांचे नाव सर्वत्र झाल्यावर, चांगदेव नांवाच्या साधुना वाटलं आपण ह्या भावंडांची भेट घ्यावी, परीक्षाही पहावी. त्यांनी तसा निरोप धाडला. (तो ही कोरा कागदच. कारण त्यांना कळेना मायना काय लिहावा? मुक्ता म्हणाली, “हा ह्या कागदासारखाच कोरा राहिला.”) चांगदेवांनी तप करून सिध्दी प्राप्त केल्याचे म्हटले जात असे. त्यांचे हजारो शिष्य होते. मग ते ह्या मुलांच्या भेटीला वाघावर बसून निघाले. हातात नाग धरला.मागे १४,००० शिष्य.अशा मिरवणुकीने ते निघाले. त्यांना वाटले की ह्या मुलांना आपल्या वैभवाने दिपवून टाकू या.ही मुलें त्यावेळी एका पडक्या भिंतीवर बसलेली होती. ती त्यांचे स्वागत करायला निघाली, ती त्या भिंतीसकटच.भिंतीसह भेटायला येताना त्यांना पाहून चांगदेव आश्चर्यचकित झाले. खजिल झाले आणि आपलं वय, तप विसरून त्यांना शरण गेले.अशी ती गोष्ट. आता यांतला त्यांचे गर्वहरण झाले हा भाग खराच.कारण पुढे मुक्ताई त्यांची गुरू झाली. त्यांना उपदेश करण्यासाठी तिने लिहिलेले पासष्ट अभंग आजही “चांगदेव पासष्टी” म्हणून प्रसिध्द आहेत.पण भिंत चालवण्याची गोष्ट आज मान्य करणं अगदी भोळ्या माणसालाही कठीण जाईल.मग भिंतीचा उल्लेख आला कसा ?चांगदेवांची अपेक्षा असेल की हे प्रासादात किमान वाड्यात रहात असतील.चांगल्या आसनावर बसलेले असतील आणि अचानक ते वेशीवरच पडक्या भिंतीवर भेटले असतील.विपन्नावस्थेतही प्रसन्न असलेल्या त्या मुद्रा पाहून चांगदेवांना त्यांचे वेगळेपण जाणवले असेल.कांही असो पण पडकी भिंत त्यामुळे मराठी जनांत प्रसिध्द झाली.सिनेमाच्या तांत्रिक शक्तिने ती भिंत सिनेमाच्या पडद्यावर चालली आणि आणखीच प्रसिध्द झाली.त्या भिंतीवरूनच आमच्या या चौथऱ्याला ‘ज्ञानदेवांचे भिंताड’ असे नाव आमच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या तरूणांच्या गृपमधील कुणा कल्पक तरूणाने दिले आणि ते रूढ झाले.

आम्ही मित्र संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो की या बाजूला येत असू.बरेच वेळा चार बंगल्यापर्यंत फिरून परत येताना ह्या ज्ञानदेवाच्या भिंताडावर बसत असू.हळूहळू आमचे तेच बसण्याचं ठिकाण झालं.या बाजूला फिरायला येण्यांत कितीतरी उद्देश होते.पंधरा ते अठरा वयाचे दहा बारा मित्र.कधी त्यापैकी पाच सहाच असत.कधी जास्त पण नियमाने आम्ही रोज तिकडे जात असू.फिरणे हा उद्देश असेच पण वाटेत जाताना लागणाऱ्या चाळींच्या आणि कांही बंगल्यांच्याही गॕलरीत उभ्या असणाऱ्या किंवा त्याच बाजूला फिरायला येणाऱ्या तरूण मुलीही सहज दिसत, हा त्याचा उपफायदा होता.रस्त्यावर पुढे रहदारी अगदीच विरळ व्हायची.वाटेत भवन्स कॉलेज लागे.त्यानंतर रस्त्यावर फक्त वेसाव्याला जाणारी येणारी बस दहा पंधरा मिनिटांनी दिसायची तेवढीच.त्यामुळे चालतांनाही आम्ही मोठ्या आवाजांत बोलू शकायचो.गांवापासून रमतगमत चालत जायला अर्धा तास लागायचा.भरभर चालल्यास तेंच अंतर पंधरा मिनिटांतही पार करतां यायचे.

ज्ञानदेवांचे भिंताड हे मुळांत काय असावे ह्याचा अंदाज बांधणे कठीण होते. एखादी समाधी असावी की खचलेले मंदिर असावे कुणास ठाऊक. रस्त्यापासून आठ फूट अंतरावर असावे. दगड-मातीचे बांधकाम होते. तरी अनेक वर्षे टिकण्याएवढे भक्कम होते.दगडांचा रंग सांगणे कठीण होते. काळा नव्हता की लाल नव्हता. करड्या रंगाच्या दगडावर पावसाच्या दिवसांत आलेल्या शेवाळ्याने थोडा हिरवा रंग चढवल्यासारखा रंग होता. आकार साधारण चौरस होता पण लांबी एखाद फूट जास्त वाटायची. खाचर जमिनीपासून चौथऱ्याची उंची चार पाच फूट असावी पण रस्त्यापासून पुढचा भाग भरावामुळेदोन फूटाचा राहिला होता. वर चारी बाजूला एक-सव्वा फूट ऊंच कट्टा होता. पुढच्या बाजूचा कट्टा ढासळला होता. तीन बाजूंचा कट्टा बसायला फारच सोयीचा होता. पाय पुढे मोकळे सोडून छोट्या बांधावर बसल्यासारखं वाटायचं. एका वेळी बाराही जण सहज बसू शकतील एवढी जागा भिंताडावर होती. ते बांधकाम तिथे कां आणि कसं आलं असेल आणि मग एवढं भग्नावस्थेप्रत कां गेलं असेल याचा विचार त्या तरूण वयांत आमच्या कधी मनातच आला नाही. ती बेवारशी जागा होती. इथे कां बसलात असं विचारायला कुणी तिथे नव्हतं. आम्ही कितीही तास तिथे बसलो तरी विचारणारं कोणी नव्हतं. तिथे आम्ही मोकळेपणी मोठ्या आवाजात बोललो तरी ते ऐकायला कुणी येणार नव्हतं. एवढ्या गोष्टी आम्हाला आमची नित्याची बसण्याची जागा म्हणून ज्ञानदेवांच भिंताड निवडायला पुरेशा होत्या.

संध्याकाळी पावणेसहा झाले की आम्ही एकत्र जमायला सुरूवात होत असे. सहा वाजेपर्यंत आम्ही ज्ञानदेवांच्या भिंताडाकडे जायला निघत असू. भवन्स कॉलेजच्या गल्लीनंतर सात बंगल्यापर्यंत म्हणजे साधारण अडीच तीन किलोमीटर दोन्ही बाजूला खुली खार जमीन होती. पहिलं बांधकाम दिसायचं ते ज्ञानदेवांचे भिंताड. त्यापुढे पाऊण किलोमीटर अंतरावर होती शीतळादेवी.त्या काळी अतिशय छोटं मंदिर होतं ते. पुजारी सुध्दा जागेवर असे नसे. आम्ही एखाद्या दिवशी त्या देवळांत जात असू. सणासुदीला वेसाव्याच्या कोळ्यांची तिथे ये जा असे. माहीमची शीतळादेवी सर्वांना ठाऊक आहे पण अंधेरीची थोड्याच लोकांना ठाऊक असेल. माहीमचे देवीचे मंदिर प्राचीन बांधकामाचा नमुना आहे. तसं कांही या शीतळादेवीचं नव्हत. शीतळादेवी मंदीरापासून अर्धा किलोमीटर पुढे चार बंगला बस स्टॉप लागायचा आणि त्याच्या पुढे एक किलोमीटरवर सात बंगला. पूर्वीचे शेठ सावकार त्यांचा दुसरा बंगला अंधेरीला बांधत. एखाद्याची वाडीही असे. तसेच चार बंगले तिथे फार पूर्वीहोते, म्हणून तो चार बंगला. तर असेच सात मोठ्या लोकांचे बंगले सात बंगल्याला किनाऱ्याजवळ होते, म्हणून त्याचं नांव सात बंगला. आम्ही कधी कधी सात बंगल्यापर्यंतही चालत जात असू पण बहुदा नित्याची बैठक ज्ञानदेवांच्या भिंताडावरच भरत असे.

गप्पा हा करमणुकीचा पहिला भाग असला तरी फक्त गप्पांवर भागत नसे. आमच्यात चार गायक होते. एक मित्र फारच सुंदर गात असे. त्याचा आवाज भरदार होता. मन्ना डे, महंमद रफी यांची गाणी तर तो इतकी छान म्हणायचा की हा गाणं शिकलेला नसेल असे कोणाला वाटले नसते. (ह्यांच्याबद्दल स्वतंत्र लेखच लिहायचा विचार मनांत आहे)एकाचा आवडता गायक तलत आणि तलतची गाणी तो आवडीने म्हणायचा. तर एका मित्राने कांहीं मराठी नाट्यगीतं पाठ केली होती आणि तो ती म्हणत असे. मग चौथा गायक मित्र मराठी सिनेगीतं, भावगीतं म्हणत असे. आम्हांला अशी सर्व व्हरायटी ऐकायला मिळायची. शिवाय कुणातरी ओळखीच्या गृहस्थांच्या नकला, शिक्षकांच्या नकला आणि मिमीक्रीही चाले. ज्ञानदेवांच्या भिंताडावर आम्ही दीड दोन तास बसत असू. तेवढ्यांत किती तरी करमणूक होत असे.

आम्हा मित्रांमधे आपापसांत कांही खाजगी नव्हते. प्रत्येकाची सगळी माहिती सगळ्यांना असे. ज्ञानदेवांच भिंताड हे आमचं आपापसांत हितगुज करण्याचं ठिकाण होतं. मनातल्या सर्व भावभावना इथे शेअर केल्या जात. आईवडील रागावून कांही बोलले, घरी कांही प्रॉब्लेम झाला, नवीन कुणीतरी आवडायला लागली, प्रेमांतली प्रगती, कोणाबरोबर झालेली बाचाबाची या सगळ्या गोष्टी सर्वांपाशी बोलल्या जात. मी तुला सांगितले, ते तू बाकीच्याना कां बोललास, असा सवाल नव्हता. ज्यांची ज्यांची नाजूक प्रकरणे (त्यांच्या दृष्टीकोनातून) होती, ते एखाद्या मित्राशी प्रथम शेअर करत. मग ते सर्वाना माहित होई. बरीच प्रकरणे ५०% वाली असत. पावसाळी छत्रीप्रमाणे उगवत आणि यथावकाश मिटून जात. एखाद्याच्या बाबतीत ह्या प्रकरणांनी गंभीर वळणे घेतली की तो आपली व्यथा, प्रश्न सर्वांना सांगे. मग सर्व जण आपापल्या मगदूराप्रमाणे सल्ला देत. कधीकधी तो परस्परविरोधीही असे. मदतीला तर सर्वच तयार असत. आपापल्या आयुष्याविषयीची स्वप्नेही इथे शेअर केली जात. कुणी इंजिनीयर बनू पहात होता तर कुणी वकील किंवा प्रोफेसर. हे सर्व मित्रांमधलं हितगुज त्या ज्ञानेश्वराच्या पडक्या भिंताडाने ऐकलेलं आहे. त्याच्या आठवणींत साठवलंही गेलं असेल. त्या ज्ञानदेवांच्या भिंताडाकडे जर कांही खास शक्ति असती तर त्याने “तथास्तु” म्हणून आम्हा सर्वांची स्वप्ने पूर्ण व्हावी म्हणून आशीर्वाद देऊन ती पूर्णही केली असती.

ज्ञानदेवांच्या भिंताडाला बोलता आलं असतं तर त्याने आम्हाला काय सांगितले असते? स्वतःपाशी दडलेली कांही रहस्य? स्वतःचीच गोष्ट की आमच्या आणि आमच्याशिवाय इतरही तिथे कधीतरी बसणाऱ्यांच्या गोष्टी? आमच्या मित्रांनी कोण कोणती गाणी म्हटली ते भिंताडाला आठवत असेल? ऐकवून दाखवेल? की विचारेल तेव्हा एवढ्या गमजा मारत होता आता प्रत्यक्षात काय चाललयं? ते भिंताड आमच्या तारूण्यातल्या कांही वर्षांच साक्षीदार होतं. त्या वेळेपुरतं ते आमचं आसन होतं. पुढे खुर्च्या मिळाल्या. गोल फिरणाऱ्या खुर्च्या मिळाल्या. मऊ मऊ गादीचे सोफे मिळाले पण इतकं सुखद आसन पुन्हा कधीच मिळालं नाही. आमच्यापैकी एक दोन जण सोडले तर कोणीच नियमित अभ्यास करणारे नव्हते. परीक्षा आल्यावर गाईडस शोधायची आणि अभ्यास करायचा. घरच्या, पैशाच्या अडचणी होत्या पण त्याची कोणी काळजी करत नव्हतं. त्या निभावून नेतां येतील असा एक विश्वास होता. तरूण वयांत भविष्याबद्दल आशा हीच संजीवनी असते. त्यामुळे थोडी बेफिकीर वृत्ती होती. आमच्या मनाचे विविध रंग आमच्या त्या त्या वेळच्या चेहरेपट्टीसकट भिंताडाने टिपले असतील?

आमच्यापैकी एकेकजण हळूहळू पोटापाण्याच्या सोयीसाठी बघू लागला. तसा तसा आमचा भिंताडाकडचा फेरा कमी होऊ लागला. पहिल्यांदा फक्त रविवारी तरी जात असू पण पुढे आमचं संध्याकाळी गप्पा मारायचं ठिकाणचं बदललं. ईर्ल्याच्या दिशेला असलेलं एक “जंटलमन” नांवाच इराणी हॉटेल आमचं नवं ठिकाण झालं. हातात चार पैसे आल्यामुळे असेल किंवा नोकरीवरून आल्यावर परस्पर जायला सोयीचं म्हणून असेलं, पण ठिकाण बदललं. ज्ञानदेवांच्या भिंताडाचा तेवढाच सहवास आमच्या आयुष्यात असावा. त्याच्या थोडी आधी अंधेरीच्या विकासाची सुरूवात झाली.ती सुरूवात प्रथम त्या ज्ञानदेवांच्या भिंताडानेच पाहिली, हे तुम्हाला खरं वाटेल कां? पण खरोखरीच “धाके कॉलनी” या नावाने प्रसिध्द असणारा बिल्डिंगसचा समूह हा प्रथम भिंताडाच्या समोरच्या बाजूला रस्त्याच्या पलिकडे उभा राहिला. ते अंधेरीतील पहिले फ्लॕटस म्हणता येतील. त्यानंतर कांही काळ संथ गतीने अंधेरी वाढत होती. चार बंगल्याजवळ इंडियन ऑईलची कॉलनी आली. भवन्स कॉलेजच्या पुढे चार दोन बंगले आणि एखादी फ्लॕटवाली इमारत आली आणि कांही वर्षांनी अंधेरीच्या वाढीने प्रचंड वेग घेतला. स्टेशन ते धाके कॉलनी आणि धाके कॉलनी ते सात बंगला यांत आता नवीन इमारत बांधायला जागा राहिली नाही. उत्तरेला वस्ती अंधेरी जोगेश्वरीमधल्या डोंगराला भिडली तर इकडे दक्षिणेला जूहू आणि पार्ल्याला जाऊन मिळाली. पूर्वेला कुर्ल्यालाच जाऊन भिडली. आता तर काय जुनी अंधेरी मेट्रो रेल्वेनेच व्यापून टाकलीय.

ह्या प्रचंड वाढीमधे खाचरं नाहीशी झाली. वेसावे, सात बंगला इथून समुद्रावरून येणारा वारा अंधेरीला पोहोचेना. मग ह्या वाढीत पडक्या भिंताडाचं काय झालं असेल? ते जवळपास कुणा बिल्डरची इमारत होताना सपाट करण्यात आलं असेल किंवा रस्ता रूंद करण्यातही गेलं असेल. आता जुन्या अंधेरीकरांना त्याची पुसटशी आठवणही नसेल. जर एखाद्या बुवाने किंवा फकीराने ती जागा आपल्या गुरूची जागा म्हणून तिथे बाजूलाच बस्तान बांधलं असतं तर कदाचित आजही ज्ञानदेवांचं भिंताड तिथेच टिकून राहिल असतं. कदाचित त्यावर डोकं टेकायला रांगाही लागल्या असत्या. ज्यांनी “मंडी” नांवाचा सिनेमा पाहिला असेल त्यांना मी काय म्हणतोय ते पटकन लक्षात येईल. पण भिंताडाचं ते भाग्य नव्हतं. आमच्यानंतरही कांही तरूणांनी त्याचा बसायला उपयोग केला पण आमची जशी रोजची वारी असायची तशी त्यांची नव्हती. वर वर्णन केलेले ज्ञानदेवांच्या भिंताडाबद्दलचे विचार तेव्हां इतक्या स्पष्टपणे केलेही नव्हते. तुमच्यासाठी काय नवीन लिहावं म्हणून मी भूतकाळांत पहात होतो तर अचानक हे भिंताड हळूच मनांत डोकावलं आणि म्हणालं,”माझ्यावर लिही ना.की तूही मला विसरलास?” आमच्या सळसळत्या तारूण्याच्या उंबरठ्यावरच्या गप्पांच्या, गाण्याच्या मैफिलींच्या साक्षीदारा, तुला कसा विसरेन? तुलाच आठवतय कां की एकदा पूर्णिमेच्या रात्री तिथे बसून मैफल रंगवली होती. ज्ञानदेवांच्या भिंताडाची आठवण मला तर चांगलीच आहे. आता माझे ते सर्व मित्र, एकजण आम्हाला सोडून गेला, ७६ ते ८० वयाचे आहेत.आता सर्वाना विचारून पहातो, ज्ञानदेवांचे भिंताड त्यांनाही आठवतय कां? एखादा ‘नाही’ म्हणाला तर समजेन की त्याचं आता “वय” झालंय.

— अरविंद खानोलकर .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..