नवीन लेखन...

बेटा-बेटांचं मुंबई बेट (कथा)

पूर्वी कधीतरी मुंबई सात बेटांची असेल. आज ती बेटं एकमेकांना सांधण्यात आली आहेत. मात्र आज मुंबई नावाच्या शहरात अनेक छोटी-मोठी बेटं तयार झाली आहेत. इथं राहणारा प्रत्येक माणूस एक स्वतंत्र बेटच आहे.


रवा एक मित्र भेटला. त्याचे काका मागच्या आठवडयात निवृत्त झाले. डोंबिवलीला राहत होते. व्हीटी स्टेशनजवळ जीपीओत कामाला होते. चाळीस वर्षे नोकरी झाल्यावर निवृत्त झाले. रोज ठराविक लोकलने व्हीटीला येत. संध्याकाळी परत जात. त्यांच्या दृष्टीने  मुंबई म्हणजे जीपीओ बाकी  मुंबईचा कुठलाही भाग त्यांनी पाहिला नाही. वर्तमानपत्रातून वाचून वाचून आपल्याला जेवढी दिल्ली, मद्रास, कलकत्ता शहरांची माहिती होते तेवढीच माहिती त्यांना मुंबई शहराची होती. मुंबई शहरात जनजीवनात होत गेलेले बदल म्हणजे बंद झालेली ट्राम, वाढलेली गर्दी आणि सुंदर डोंबिवली गावाचं सिमेंट काँक्रिटच्या झुडपात झालेलें रुपांतर, जीपीओच्या पलीकडे त्यांनी मुंबई बघितलेली नाही. गावाकडून आलेला पर्यटक जसा गेट-वे, म्युझियम, मत्स्यालय, चौपाटी आणि कमला नेहरु पार्क बघतो तसेच त्यांनी हे भाग बघितले. पण ते सुध्दा स्वत:हून नव्हे, तर नाईलाजास्तव घरी आलेल्या बाहेरगावाच्या पाहुण्यांना दाखवण्याच्या निमित्ताने बाकी दादर वगळता ते कोणत्याही स्टेशनवर उतरलेले नाहीत.

मारिया ही केरळातून तिच्या मोठया बहिणीकडे आलेली. मोठी बहीण केईएममध्ये नर्स. मारियाला मालाडच्या एका खाजगी नर्सिंग होममध्ये नोकरी मिळवून दिलेली. ऍन्टॉप हिलच्या घरापासून ते मालाडच्या भागातील नर्सिंग होम पर्यंतचा प्रवासाचा आराखडा ठरलेला. त्यात तसूभरही फरक न करता मारिया गेली दोन वर्ष मुंबईत काम करीत आहे. रस्त्यातून चालताना ती वरसुध्दा बघत नाही. त्यामुळे रस्ता बदलण्याचा प्रश्नच नाही. हिंदी, इंग्रजी, मराठी काहीच येत नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणीसुध्दा ती कमीच बोलते. तिची बहीण हीच तिची मुंबई. ती जेवढं सांगेल, जेवढी दाखवील तेवढीच मुंबई तिला माहिती.

अल्-कबीर एक्सपोर्ट ऑफिसात लोक आहेत. पण, डिसोझा कामात गर्क असतो. विचारलेले तेवढं बोलतो. सतत हसत असतो. विनोद करतो. सगळयांना हसत ठेवतो. पण त्याच्या विषयी कुणालाच काही माहीत नाही. तोसुध्दा सहका-यांना काही विचारत नाही. काम बरं की आपण बरं आणि कामाचाच एक भाग म्हणून लोकांना हसवणं बरं. बाकी तो, त्याचे नातेवाईक, त्यांचे प्रश्न, ट्रिप्स, येणं-जाणं या पलीकडे तो इतरांत मिसळत नाही. कुठल्या युनियनमध्ये कुठल्या संघटनेत तो भाग घेत नाही. हिंडतो भरपूर. पण स्वत:च्या एका ठराविक वर्तुळात.

हा आणि अशी सारी माणसं आपापल्या वर्तुळात फिरत राहतात. सुरक्षित असतात. माणसांच्या समुहातील ही छोटी बेटंच. एकमेकांपासून पूर्णपणे स्वतंत्र असलेली. आजचं मुंबई शहर हे सात छोटी छोटी बेटं होती. ती बेटं जोडून आजची महाकाय मुंबई उभी आहे हे सांगावं लागतं. तसा मुंबई शहराचा इतिहास काही आपल्याला नवीन नाही. ती सात बेटं कुणाच्या मालकीची होती. ती त्यांनी परस्पर एका लग्नात  ब्रिटिशांना कशी आंदण म्हणून देऊन टाकली. प्रत्येक बेटावर एक एक किल्ला कसा होता. किल्ला जाऊन गगनचुंबी इमारती कशा उभ्या राहिल्या, हे सगळं सगळं आपल्याला माहिती असतं.

पूर्वी कधीतरी मुंबई सात बेटांची असेल. आज ती बेटं एकमेकांना सांधण्यात आली आहेत. पण आज मात्र मुंबई नावाच्या शहरात अनेक छोटी-मोठी बेटं तयार झाली आहेत. इथं राहणारा प्रत्येक माणूस हा एक स्वतंत्र बेटच आहे. अशा असंख्य बेटांची मुंबई नगरी बनली आहे. एक एक उपनगर म्हणजे एक एक महाकाय नगर आहे, स्वयंपूर्ण स्वत:ची अशा खास प्रतिमा बाळगून. वेगवेगळया जाती-जमाती, संस्कृती, भाषा, धर्म यांना कवेत घेऊन.

माणसांची ही बेटं स्थिर नाहीत. ती एकमेकाला खेटून दाटीवाटीने उभी आहेत. स्वत:भोवती आणि इतरांभोवती हळुवारपणे, वेगाने, थांबून, धडपडत फिरत आहेत. स्वत:ही फिरत आहेत. इतरांनाही फिरवत आहेत. पुराणकालीन ग्रामदेवता मुंबादेवी सोडून मुंबईतील सर्वकाही गरगर फिरत आहे.

इथल्या गर्दीत माणूस पटकन सामावून जातो. पण कितीही गर्दी अवतीभेवती असली तरी बेटांच्या या नगरात तो स्वत: एक बेट बनूनच राहतो.

मुंबईत येऊन मला तीन वर्षे झालीत. माझी मुलं लहानाची मोठी झाली. अनेक नवीन मित्रमंडळी मला भेटली. ऑफिसात, घरशेजारी. काय असेल ते असो पण अजूनही खूप एकटं एकटं वाटतं. गावाकडे गेल्यावर जो एक प्रकारचा आपलेपणा वाटतो तसा आपलेपणा वाटत नाही. संध्याकाळी ऑफिसातून सुटल्यावर रस्त्यावरची तुफान गर्दी बघताना हरवल्यासारखं वाटतं. एकट वाटत. घरी मुलाबाळात गेल्यावरही एकटेपणाची भवना जात नाही. राष्ट्रीयीकृत  बँकेतील एक अधिकारी गप्पा मारताना म्हणाले. त्यांची वाक्यं मनात लक्षात राहिली. असं एकटेपणाची भावना का निर्माण होत असेल.

सांगता येत नाही. पण त्यांचही नकळत त्यांच स्वत:च एक बेट तयार झालेले असतं. ते इतकं एकाकी बनत की बाहेरची माणस तर सोडाच पण स्वत:च्या घरातील मुलाबाळांशीही त्यांचा फारसा संवाद राहिला नसतो. मग अशा माणसाला माणसांच्या गर्दीतही एखाद्या बेटासारखं एकाकी वाटल तर त्यात आपल्याला नवल ते काय?

— प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक 18 नोव्हेंबर 1993

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

1 Comment on बेटा-बेटांचं मुंबई बेट (कथा)

  1. नमस्कार.. खरच खुप छान लेख अगदी वस्तूस्थितीची जाणीव करून देणारा.आज खरोखरच प्रत्येक माणूस एक स्वतंत्र बेट झाला आहे. तुझे आहे तुज पाशी परी.. अशी गत झाली आहे माणसाची.. आपले मनःपूर्वक अभिनंदन…

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..