नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३)

या १९६३ सालच्या साहित्य संमेलनात मला सहवास लाभलेले. . . . स्व. लोककवी मनमोहन नातू

स्व. लोककवी मनमोहन नातू म्हणजे ” गोपाळ नरहर नातू ” जन्मगाव तासगांव ( कोल्हापुर). जन्मदिन, ११ नोव्हेम्बर १९११. मनमोहन हे त्यांचे टोपण नाव. माझा भाग्ययोगच की मला जीवनात अनेक साहित्यिकांचा जवळून सहवास लाभला. त्यापैकी कै. लोककवी मनमोहन हे एक होते.

माझी आई ही पुण्याची माहेरवाशीण असल्यामुळे कै. दत्तो वामन पोतदार यांचा दृढ़ परिचय असल्यामुळे ते व कै. गोविन्दस्वामी आफळे हे माहुली (सातारा) येथील असल्यामुळे व माझ्या वडिलांचा त्यांचा स्नेह असल्यामुळे ते व त्याच सुमारास माझे वडील पुण्याहून सातारला येत असताना कै. मनमोहन नातू एस टी ने एकाच सिटवर बसून आल्यामुळे झालेल्या परिचया मुळे आमच्याच घरी उतरले होते. म्हणजे हे तिघेही दिग्गज आमच्या घरीच उतरले होते. आज मी फक्त कै. लोककवी मनमोहन नातू यांचे बद्दल लिहित आहे. . . . . .

साहित्य संमेलन संपल्यानंतर, कै. दत्तोवामन पोतदार, कै. लोककवी मनमोहन नातू व त्यांच्या सोबत कुणीतरी बरोबर असावे म्हणून मी व माझे वडील सज्जनगड, चाफळ, व गोंदावले येथे जावून आलो. नंतर ही मंडळी परतीच्या प्रवासास निघाल्यानंतर मनमोहनांनी माझ्या वडिलांना भारावून कड़कडुन प्रेमाने मिठी मारली होती ! आमच्या कडच्या आदरातिथ्याने ही मंडळी आनंदून गेली होती. . . . .

आमची परिस्थिती तशी अगदी बेताचीच होती, पण घरी आस्था प्रेम, मायेचा ओलावा होता. तसा कुठलाच बड़ेजाव नव्हता. . माझे वडील तर साधे बूकबाईंडर होते. पण दिलदार होते. अनेक लोकांची आमच्याकडे सातत्याने वर्दळ असे. तड़जोड, भागवाभागव करावी लागत असे. पण सारे आबादीआबाद असे. . . . समाधान असे. . .

मला लहानपणापासुनच मोठ्या प्रसिद्ध व्यक्तीन्च्या स्वाक्षरी घेण्याचा छंद होता. अनेक दिगग्ज व्यक्तींच्या सह्या घेत असे त्यासाठी मी स्वतः बूकबाईंडिंगचे काम करीत असल्यामुळे एक अगदी सुंदर बांबूछाप कागदाची, रेक्झिन बाईंडिंगची सुंदर पॉकेट डायरी मुद्दाम अशा सह्या साठीच बनविली होती त्यात अनेक दिग्गजांच्या सह्या मी घेतल्या होत्या. त्याप्रमाणे मी कै. मनमोहन यांना सही मागितल्यावर त्यांनी अगदी प्रेमाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणी मला विचारले की या सह्या तू कशासाठी घेतोस ? त्यावेळी मला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. . . पण लगेचच त्यांनी खिशातून शाईचे फॉउंटन पेन काढून मला त्या डायरीत चार ओळी लिहून स्वाक्षरी करुन दिली व म्हणाले ज्यांच्या ज्यांच्या सह्या घेतल्यास त्यांचा आदर्श जीवनात ठेव. . . . त्या ओळी म्हणजे. . . . .

उसे असावे गरुड़ पिसांचे
पिसे असावे ज्ञानेशाचे
बुड़ु बुड़ु घागर बुडुनी जावी
आणी तिरावर छाटी दिसावी

या चार ओळीचा अर्थ कळण्यास मी वयाची ५० शी गाठली होती. पुढे योगायोगाने त्यांच्या मुलीची व माझी गाठ देखील योगायोगाने बसमद्धये पडली. . ओळखही झाली. काही माणसे आयुष्यात, मनात घर करुन जातात. तसेच हे कै. मनमोहन माझ्या मनात घर करून राहिले त्यांचे बहुतेक सारे साहित्य मी वाचले आहे. पुण्यातील साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमास मी बहुतेक उपस्थित रहातो. त्याप्रमाणे कै. मनमोहन यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या कन्या तसेच डॉ. अमित त्रिभुवन व सहकारी यांनी आयोजित केलेल्या एका कार्यकर्मात मी, गुरुवर्य डॉ. न. म. जोशी सर, मसापचे कै. म. श्री. दीक्षित सर व अन्य काही साहित्यिक मंडळी आवर्जून उपस्थित होतो. . …

अनेक साहित्यिक चर्चेमद्धये मनमोहनांचा नेहमी योगायोगाने विषय निघत असे. . आनंद होत असे. एक दिवस मी स्वतः मुद्रक प्रकाशक असून देखील मीच लिहलेल्या संस्कार शिदोरी या पस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तिच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ज्येष्ठ प्रकाशक श्री, सु. वा. जोशी यांचे कड़े गेलो होतो. . आमच्या गप्पा झाल्यावर निघताना त्यांच्या दुकानात मला लेखिका संध्या देवरुखकर या विदुषिचे “आठवणीतील मनमोहन हे पुस्तक नजरेस पडले. . . मी सु. वा. जोशींना म्हणालो, मला ते पुस्तक हवे आहे. त्यांनी एका क्षणात ते पुस्तक मला स्व:ताची सही करून सप्रेम भेट दिले. हा ही माझ्या दृष्टीने एक योगच होता. (कदाचित कै. मनमोहनांचे व माझे पूर्वजन्मिचे ऋणानुबन्ध असावेत. ). . . . आणी त्याक्षणी पुन्हा. . . . ” आणी तीरावर छाटी दिसावी ” या त्यांच्या ओळीची आठवण झाली. . . . . . . . . संध्या देवरुखकर यांचे पुस्तक मी लगेचच वाचले. . खरे तर हे पुस्तक तसे सर्वांच्याच संग्रही असावे असेच आहे. . . त्यात समग्र लोककवी मनमोहन नातू आपल्यास अनुभवता येतात. . . .

कुणी रक्ताने लिहिली गाथा ।
कुणी अश्रुन्नी लिही कथा ।
लवचिक घेवूनी करी लव्हाळे ।
मी पाण्यावर लिहिली कवीता ।

अनेक प्रतिभावंत साहित्यिकांनी लोककवी मनमोहन यांचे बद्दल लिहिले आहे. त्यांच्या प्रतिभेला दाद दिली आहे. मनमोहनांच्या वैयक्तिक जीवनात प्रारब्धयोगाने अत्यंत गरीबीचे चटके बसले आहेत हे विदारक वास्तव आहे. पण त्यांच्या प्रत्येक रुधिर स्पंदनातून साहित्य शारदीयप्रतिभा बरसली आहे. पण त्या प्रतिभेतून त्यांची बिकट दैंन्यावस्था प्रतिबिंबीत होते. दुर्दैवाने चरितार्थासाठी देखील त्यांना कवीतांचा बाजारही मांडावा लागला, अगदी किरकोळ बिदागीसाठी देखील त्यांना वधुवरांची मंगलाष्टकेही लिहावी लागली. आघाती जीवनाने त्यांच्या जीवनात सर्वाथाने विरक्ती आली होती. या लोककवीमद्धये अनेक कलांची अभिव्यक्ति जन्मजात होती. रोज आपल्या चित्रकारीतून नित्य गणपतिचेही चित्र ते काढीत होते, विकतही होते असे ऐकिवात आहे !

अक्षयी हा त्यांचा काव्यसंग्रह म्हणजे काव्य प्रतिभेचा अलौकिक आविष्कार आहे. .

लोककवी मनमोहन नातू यांची साहित्यिसंपदा खुप मोठी आहे.

लघुकथा – देवाचे देणे.
काव्यसंग्रह – १). ताई तेलिण. २). सुनीत गंगा. ३). कॉलेजियन. ४)शंखध्वनि. ५)उद्धार. ६). अफुच्या गोळ्या. ७). बॉम्ब. ८) जीवनाधार. ९) दर्यातिल खसखस. १०)फील्डमार्शलची सलामी. ११) युगायुगांचे सहप्रवासी. १२). कुहुकुहू. १३). शिवशिल्पांजली. १४). आदित्य.

संध्या देवरुखकर यांच्या पुस्तकात अनेक दिग्गज साहित्यिकांचे लोककवी मनमोहन नातू यांच्या बद्दल अत्यंत वाचनीय असे सर्वांगसुन्दर लेखांक आहेत. ते वाचल्यावर मनमोहनांचे सारे जीवन चरित्रचित्रण वाचकांच्या समोर येते. नवोदितांनी ते निश्चित वाचले पाहिजे. . . . . . !!!

शव हे कवीचे जाळू नका हो ।
जन्मभरी तो जळतच होता ।
फुले तयावरी उधळू नका हो ।
जन्मभरी तो फुलतच होता ।

अत्यंत विप्पन्न अवस्थेतही स्वतःचे स्वत्व जपणारा स्वाभिमानी कवी म्हणून लोककवींची ख्याती होती. या स्वाभिमानी प्रवृत्तिचे अनेक किस्से आहेत. . स्वकाव्यप्रतिभा हीच त्यांची अस्मिता होती आणी दैवत होते.

मी माझ्या जन्माला हसतो ।
मरणावर तर थूंकणार मी ।
तृषा तृप्ती करी मृगजळ माझे ।
कां मेघावर भुंकणार मी ।

साहित्यिक रमेश मंत्री म्हणतात !. . . काय हो ! लोककवी मनमोहन नातू हे नाव तुम्ही ऐकले असेल किंवा नसेलही परंतु जर ऐकले नसेल तर तुम्ही नुकसानीतच आहात, दुर्दैवी आहात असे समजा ! असे लोककवी मनमोहन होते. कुणीतरी त्यांना एकदा कुत्सितपणे विचारले ” अहो कवीता करून काय मिळते हो ?” तेंव्हा कवीराजांनी ” ते तुमच्या सारख्याना समजण्यासारखे नसते हे उत्तर दिले. . . . हेच नवोदितानी लक्षात घेण्यासारखे आहे.
गुरुवर्य डॉ. न. म. जोशी सरांचा आणी मनमोहन यांचे खुप घनिष्ट संबंध होते, त्यांचाही लेख या पुस्तकात आहे. कै. मनमोहन यांना ” तबकडीचा कवी असे संबोधले जात होते. त्यांची कवीता म्हणजे मराठी कवितेला एक आगळी वेगळी देणगी आहे. ज्या काळात भावगीतांचा जमाना होता त्या काळी मनमोहन नातुंनी अनेक लोकप्रिय भावगीते लिहिली. ती फार गाजली. . . . .

” कसा गं गड़े झाला. . . . !कुणी गं बाई केला. . . . ! राधे तुझा सैल अंबाडा. . . . !. . . .

” मैत्रीणिनो सांगू नका नाव घ्यायला. . . . !”

तर. . . . ” ती पहा, ती पहा । बापूजींची प्राणज्योती ।. . . तारकांच्या सुमनमाला । देव त्यांना वाहताती ।. . . …. . .

अशी गाणी त्यावेळी तरुण तरुणीच्या ओठावर असत ! आणी अशा गीतांना, भावगीत गायक कै. गजाननराव वाटवे यांना अनेक वेळ वन्समोअर मिळत असे. . ही गाणी मी स्वतः कै. गजाननराव वाटवे, कै. बबनराव नावडीकर यांच्या कार्यक्रमात ऐकली आहेत. त्या सर्व गाण्यांच्या मी मुद्दाम सिडीही करून घेतल्या अशी ती अजरामर गीते आहेत. त्यावेळी ग्रामोफोन हीच लोकांची करमणुक होती. अशा ग्रामोफोन म्हणजे काळ्या तबकड्यावर रेषा कोरुन त्यात शब्द सुर गुंफले जात असत, अशा तबकड्यावर जे जे कवी लोकप्रिय झाले त्यात कै. . लोककवी लोककवी मनमोहन नातू हे नाव सर्वाथाने आधी घ्यावे लागेल.

कै. लोककवी मनमोहन नातू हे लोकविलक्षण कवी होते. अत्यंत प्रभावशाली प्रतिभा परंतु अत्यंत विक्षिप्त मनमानी, स्वाभिमान या त्यांच्या स्वभावामुळे सरस्वतीच्या साहित्य दरबारात, ते अत्यंत उच्चतम प्रतिभावंत असून देखील दुर्दैवाने त्यांची उपेक्षा झाली ! हा त्यांचा प्रारबधी दुर्दैविदुर्विलास असेच म्हणावे लागेल. . . . !!

तरीही नवोदितांना निश्चितच आत्ममुख करणारे असेच लोककवी मनमोहनांचे असामान्य व्यक्तिमत्व आहे हे निर्विवाद. !!! उत्तुंग प्रतिभेच्या मयूरपंखावर स्वार होणारी मुक्त कल्पनाशक्ति आणी “जे न देखे रवी, ते देखे कवी या उक्तीची साक्षात प्रचिती त्यांच्या मनभाव शब्दाच्या कलाकृतीतुन जाणवते. . . . . . . !

मी गेल्यावर कळयाफुलांनो ।
विसरु नका हं उमलायाचे ।
तुमच्या गंधाच्या गिरकीवर ।
कवित्व माझे चलित व्हायचे ।

— वि. ग. सातपुते (विगसा)
दिनांक :- १३-११-२०१८ 
(बेंगलोर मुक्कामी )

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..