नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३१)

मागील भागात मी साहित्यिक देवेंद्रजी वधवा यांचा उल्लेख केला आहेच. पुन्हा एकदा नगरला एका कार्यक्रमाला योग आला. पुण्यातील ज्येष्ठ कवयित्री ऍड. संध्याताई गोळे, काव्यशिल्प पुणेच्या अध्यक्षा कवयित्री ऋचा कर्वे, सुनेत्राताई गायकवाड, विद्याताई देव यांच्या पु.ल. एक साठवण या कार्यक्रमासाठी नगरला निमंत्रण आले होते. या सर्वच कवयीत्री माझ्या सुपरिचित होत्या. नेहमी प्रमाणे माझे मित्र सर्वोत्तमजी क्षीरसागर यांचा मला फोन आला की, “आप्पा तुम्ही आला तर आनंद होईल.” तेंव्हा मीही विनाकारण फक्त बरोबर म्हणूनच या कवयीत्रीच्या सोबत गेलो होतो. सकाळीच गाडीने निघाल्यामुळे शक्य झाल्यास पैठण ला जावे असा विचार होता पण संध्याकाळी ५ ते ७ कार्यक्रम करून पुन्हा पुण्यास परत यावयाचे असल्यामुळे ते रद्द केले. कुठेतरी जेवण करावे नंतर कार्यक्रम स्थळी जावे असे ठरले. देवेंद्रजी वधवा हे नगरचे असल्यामुळे त्यांच्या माहितीने एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवावे त्यांनाही बरोबर घेवून जावे म्हणून मी त्यांना फोन केला. ते म्हणाले तुम्ही सर्व माझ्याच घरी या नंतर आपण ठरवू. तिथे गेल्यानंतर जो वधवा कुटुंबाच्या आदरातिथ्याचा अनुभव आला तो काव्यशिल्पच्या अध्यक्षा कवयीत्री ऋचा कर्वे यांच्याच शब्दात मी खाली देत आहे.

एक सहज स्वाभाविक कृतज्ञता व्यक्त करणं हा एक नैतिक संस्कार आहे. काल आम्ही सर्व मंडळी नगर येथे कार्यक्रमासाठी गेलो होतो. वि.ग.सातपुते (आप्पा) बरोबर आहेत हे कळताच आम्हा सर्वानाच आप्पांचे परमस्नेही देवेंद्रजी वधवा यांनी अगदी आग्रहाने जेवणासच बोलावले होते.
त्यावेळी जे आदरातिथ्य झाले त्याबद्दल दोन शब्द. अंगणातील तुळशीवृंदावन बघणं आता दुरापास्त झालं असलं तरीसुद्धा बंगल्यातील व्हरांड्यात, अंगणात, फ्लॅटच्या गॅलरीत आपल्याला ते कधीकधी अजूनही दिसतं बऱ्याच ठिकाणी. पण अख्खा बंगलाच तुळशीवृंदावन असावा असं मात्र क्वचितच दिसतं. अगदी एखाद्या ठिकाणीच.

तुळशीवृंदावनाचं ते मांगल्य आणि सोज्वळता, पवित्रता, प्रसन्नता आणि तुळशीमुळे जसं हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढून वातावरण प्रफुल्लित बनत, उल्हसित होतं, तसंच त्या घरातील जीवन आनंदाने रसरसून जगणारे, जगवणारे नगरमधील साहित्यिक वधवा कुटूंब त्यांच्या बंगल्याच्या सुंदर, सुबक, देखण्या वृंदावनात आनंदानं झुलणारं, डोलणारं, टवटवीत, डेरेदार, हिरव्यागार तुळशी प्रमाणेच भासलं.

आदरणीय कै . पु. ल. देशपांडे ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या अशा व्यक्तिमत्त्वावरील आधारित आमचा कार्यक्रम ‘आठवणीतील पु. ल.‘ नगरमधील सावेडी येथील जेष्ठ नागरिक संघात सादर करण्या करता खरं तर आम्ही चौघी जाणार होतो. पण एक सुखद बातमी संध्याताईं गोळे यांनी दिली की आपल्या बरोबर वि. ग. सातपुते सर सुद्धा येणार आहेत. पुण्यातील आदरणीय व्यक्तीमत्व, श्रेष्ठ साहित्यिक कवीवर्य भावकवी वि.ग.सातपुते(विगसा) उर्फ आप्पा आम्हा साऱ्या कवी कवयित्रींचे गुरू आहेत. असे ऋषितुल्य व्यक्तीमत्व बरोबर आहेत म्हणजे साक्षात कल्पवृक्षाच्या सावलीत आमचा प्रवास, कार्यक्रम सार काही सुखरूप पार पडणार ह्याची खात्री होतीच. पण इतका दैवी अलौकिक अनुभव येईल आणि तोही आताच्या प्रॅक्टिकल धावपळीत असं मात्र वाटलं नाही.

नगर मधील कुठल्याशा हॉटेलमधे जेवायचे असं ठरवत असतानाच आप्पांना त्यांचे नगरचे लेखक मित्र मा.देवेंद्रजी वधवा सरांना फोन केला आणि त्यांनी लगेचच अतिशय आपलेपणाने आग्रहाने जेवणासाठी आम्हा साऱ्यांना आमंत्रण दिले. फक्त अर्ध्या पाऊण तासात त्यांच्या घरातील साक्षात अन्नपूर्णा असलेल्या सुगृहिणींनी आम्ही घरी पोहोचेपर्यंत जेवणाची जय्यत तयारी केली.
हसतमुख देवेंद्रजी वधवासर आणी सौ. मनीषा वधवा भाभीजी ह्यांनी मनापासून आमच असं काही स्वागत केले की, आम्ही पहिल्यांदाच ह्या घरात आलोय हे विसरून परकेपणाचा, संकोचाचा आमच्यातील पडदा पार विरून गेला. खेळीमेळीच्या वातावरणात निवांत बसल्यावर लगेच त्यांच्या सुनबाईं सौ. गगन यांनी शितल सरबताचे मधूर चवीचे ग्लास समोर ठेवले नी त्या बरोबरच काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड ह्या सुकामेव्याचा खाऊं देखील! ह्या दोन्हीने आमचा प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळवला कळलेच नाही.

औपचारिक ओळख इतर गप्पागोष्टी झाल्यावर भाभीजींनी चहा कॉफीची विचारणा केली. पण नुकतेच सरबत घेतल्यामुळे आम्हीच दोनतीनदा नको नको म्हणालो आणि मग भाभीजी आणि त्यांच्या गोड गोजिऱ्या सुनबाई गगन ह्या दोघीजणीआमच्या जेवणाची तयारी करु लागल्या. खरचं पटकन जाणवून गेलं इतक्या अमूल्य संस्कारांनी सजवलेले घर तसच सावरून पुढच्या पिढीपर्यंत सुपूर्द करण्यासाठी ‘गगन’च हवी. ही प्रेमळ गगन नावा, रुपा, गुणांनी आम्हा सगळ्यांनाच आवडली भावली. आमच्या मनात कायमची रुतून बसली. अतिशय हसतमुख चेहऱ्यांनी दोघी प्रेमळ सासूसुनांनी आमची जेवणाची बडदास्त इतकी छान, सुंदर ठेवली की त्याच वर्णन करायला शब्दच अपूरे पडावेत. तत्परतेने, आवडीने, रसिकतेने, निगुतीने प्लेटस, ग्लासेस, स्वयंपाकाचे पदार्थ किचनपासून हॉलपर्यंत आणणे त्यांचे चालू होते. खास आमच्यासाठी महाराष्ट्रीयन मेनू त्यांनी केला होता. भेंडीची भाजी, भरल्या वांग्याची भाजी, आमटी, भात, सॅलड, पापड कुरडई, चटणी, लोणचं, गरमागरम फुलके, भाकरी, आमरस आणि साऱ्या पदार्थांना आतिथ्याचा, आपुलकीचा, प्रेमळ आग्रहाचा अंगीभूत लाभलेला खास ‘वधवा’ टच! त्यामुळे त्या जेवणाने आनंदाने तहान भुके बरोबरच आमची. मने सुद्धा तृप्त होऊन गेली. हल्लीच्या ह्या प्रॅक्टिकल धकाधकीत आपल्या जवळच्या नातलगांकडून सुद्धा आपलेपणा जिथे राहिला नाही तिथे अगदी पहील्यादांच आलेल्या पाहुण्यांचा इतक्या आदराने केलेल्या ह्या आतिथ्याने मी इतकी मी इतकी भारावले की डोळ्यातून पाणी आले. आप्पांनी सांगितल्याप्रमाणे “हे सारे जग खूप थोडक्याच पण चांगल्या लोकांमुळे चाललेय त्यातील एक हे देवेंद्रजी वधवा सर आहेत.” अर्थातच ह्याची प्रचितीही आम्हाला आली.

जेवणे वगैरे उरकल्यावर त्यांची गोडगोजीरी नातवंडे शाळेतून आली. त्या देखण्या तुळसरोपावरच्या तितक्याच साजिऱ्या ह्या मंजिऱ्याही आम्हाला आवडल्या. संस्कांरांच रुजू पाहणारं बीज तिथेही मुरु लागलय ह्याची जाणीव झाली.
आमच्या कवितांना मनसोक्त दाद देत वधवा कुटूंब आमच्या कवितेतही रंगून गेलं. गगननी त्या कवितांच रेकॉर्डिंगही केले. गच्च भरून गेलेले पोट, मन जराही जिरलं नसतानाच चहा आला, चहा बरोबर बिस्किटे, शेव, चकली हा खाउ. त्यालाही तोच वधवा टच. बापरे! चहा घेतला आणि आम्ही जड अंतःकरणाने भाभीजींचा, सरांचा निरोप घेऊन निघालो. अतिथी देवो भव: ही म्हण सार्थ करून दाखवणारे ते कुटूंब ते घर!नाही साक्षात वृदांवन माझ्या मनात कायमचं घर करून राहिल. तो सुंदरसा परिमल माझ्यातही मुरून सतत दरवळत राहीला.

(कवयीत्री ऋचा कर्वे पुणे)

पुढे पु.ल. एक साठवण हा कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडला त्या कार्यक्रमात नगर मधील आदर्श ज्येष्ठ उत्साही साहित्यिक बोपर्डीकर वय वर्षे ८५ हे भेटले .त्यांनी आम्हा सर्वांना त्यांनीच अनुवादित केलेले गीतगोविंद हे राधाकृष्णाच्या निर्मोही प्रीतीचे सर्वांग सुंदर वर्णन असलेले अत्यन्त सुंदर संग्राह्य असावे असे पुस्तक भेट दिले.

त्यातून प्राचीन कवी जयदेव यांच्या अमोघ प्रतिभेचा परिचय तर झालाच पण या पुस्तकाला लाभलेली ज्येष्ठ साहित्यिक कै. आनंद साधले यांची प्रस्तावना वाचण्यास मिळाली.

वि.ग.सातपुते.

9766544908

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..