नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २९)

अशा अनेक मार्गदर्शक आणि सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सहवास मला लाभला. खरे तर प्रत्येकालाच तो लाभत असतो. मी फक्त सारे आठवणीत ठेवले आणि आज जे आठवते आहे ते शब्दबद्ध करण्याचा छोटासा प्रयत्न करतो आहे. हे एक प्रकारचे डॉक्युमेंटेशनच आहे असे मी समजतो.

मला अगदी १९६५ पासून दैनंदिन डायरी लिहिण्याची सवय होती, मी अनेक वर्षे लिहिली म्हणजे १९८४ पर्यंत लिहिली देखील. त्यात अनेक घटनांची नोंद आहे. दुसरे म्हणजे माझ्या व्यवसायामुळे हा असा साहित्यिक सहवास मला लाभला. आज पर्यंत १९३२ सालापासून सुरू झालेल्या या वडिलोपार्जित व्यवसायात आजपर्यंत १०६० पुस्तके छापली गेली, त्यात माझी स्वतःची १४ पुस्तके प्रकाशित झाली.

पुढे अनेक कार्यक्रमात सहभागी हौस म्हणून सहभागी झाल्यामुळे देखील खूप मान्यवर भेटले. त्यामध्ये प्राचार्य शं. ना. नवलगुंदकर देखील भेटले. ते सुपरिचित उत्तम व्याख्याते होते. आमच्या महाकवी कालिदास किंवा सप्तर्षी मित्र मंडळ या संस्थेत तसेच माझ्या अन्य परिचीत संस्थेत त्यांचा व माझा चांगला परिचय आहे हे सर्वांना माहिती असल्यामुळे व्याख्यानासाठी निमंत्रण करण्यासाठी त्यांच्या घरी देखील माझे अनेक वेळ जाणे झाले. सहाजिकच त्यांचे व माझे संबंध अधिक दृढ झाले. अत्यन्त अगत्यशील, अत्यन्त विनम्र पण अगदी तत्वनिष्ठ आणि वाचस्पती असलेले प्रा. नवलगुंदकर बोलू लागले की फक्त ऐकत रहावे. त्यांचीही व्याख्याने मी खूप ऐकली. त्यामुळे माझ्याही ज्ञानात भर पडली. अशा मोठ्या व्यक्ती माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला ओळखू लागल्या होत्या याचे मला अप्रूप होते. तो माझा एक आत्मिक आनंद होता.

आमच्या संस्थेत देखील धायरी वडगाव पुणे येथे (सिंहगड रोड परिसरात) वासंतिक व्याख्यानमाला सातत्याने होत असत तीही एक आनंदपर्वणी होती आणि अशा कार्यक्रमास स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री काकासो चव्हाण, नानासो. दांगट पाटील, राजाभाऊ लायगुडे, बाळासो. नवले, सौ. रुपाली चाकणकर, प्रशांत मनोरे, भरतआबा कुंभारकर, अशा अनेक व्यक्तींचे सहकार्य असे.

मा.डॉ. रामचंद्र देखणे देखील यांना देखील या वासंतिक व्याख्यान मालेत अनेक वेळ निमंत्रित केले होते. त्यांचे वडील हे माझ्या मामांच्या (कै. राजाभाऊ पाठक) सोबत नेहमी सातारला सज्जनगडावर किंवा कार्यक्रमानिमित्त येत असत. त्यामुळे त्यांचाही कौटुंबिक पूर्वपरिचय होताच. त्यांना माझी आई ही वारकरी आहे आणि तिने १८ वर्षे सातत्याने पंढरीची वारी केली ही गोष्ट माहिती होती. आमची अनेक कार्यक्रमात नेहमी भेट होत होती. एकदिवस नगरला त्यांचा सत्कार सावेडी ज्येष्ठ नागरिक संघाने सत्कार आयोजित केला होता. त्या संस्थचे पदाधीकारी तसेच अध्यक्ष मा. सर्वोत्तमजी क्षीरसागर यांचे माझे मित्रत्वाचे ऋणानुबंध असल्यामुळे व त्या संस्थेत माझीही व्याख्याने झाली असल्यामुळे जर कुणी पुणेकर साहित्यिक मंडळी नगरला कार्यक्रमासाठी जाणार असतील तर मला त्या संघाचे आग्रहाचे निमंत्रण असे. त्यामुळे या सत्कार समारंभ कार्यक्रमातही डॉ. रामचंद्र देखणे यांची गांठ पडली होती. त्यावेळी पुण्यातील प्रसिद्ध गायक मा. रावेतकर, प्रा. डॉ.महेंद्रजी ठाकुरदास सर देखील सोबत होते. कार्यक्रम संपल्यावर अगदी आठवणीने डॉ. देखणे यांनी “आप्पा यावेळी सिंहगड रोड पुणे येथे अभिरुची मॉल मध्ये माझा संत वाङ्मयावर कार्यक्रम आहे . त्या कार्यक्रमाला तुम्ही तुमची मित्र मंडळी यालच, पण मी तुमच्या आईचा त्या कार्यक्रमात सत्कार करणार आहे तिला अवश्य घेवून या असे निमंत्रण दिले होते.

त्या कार्यक्रमाला मी माझ्या आईला घेवून गेलो होतो. माझ्या ९० वर्षे वयाच्या वारकरी संप्रदायी आईचा ज्येष्ठ साहित्यिक ह.भ.प. डॉ. रामचंद्र देखणे यांनी यथोचित हृद्य सत्कार केला ही गोष्ट माझ्या दृष्टीने अत्यन्त अविस्मरणीय आहे.

माझी आई पुण्यातील ख्यातनाम ‘सेवासदन’ या मुलींच्या शाळेतून १९४२ साली एसएससी झालेली विद्यार्थिनी होती. तीने १९४२ सालचा स्वातंत्र्य लढा शाळेच्या गच्चीवरून पाहिला होता असे ती नेहमी सांगत असे. अशा व्यक्तीची दखल घेऊन पुण्यातील प्रसिद्ध अशा ‘आपुलकी संस्था’ या सामाजिक, साहित्यिक कार्य करणाऱ्या नि:स्पृह संस्थेने आवर्जून माझ्या आईचा म्हणजे विद्यमान ह.भ.प. कमलाबाई (पाठक) सातपुते हिचा, सर्वश्री प्राचार्य, नवलगुंदकर सर, डॉ. लाहोटी, संजीवनीताई शिंदे, कवयित्री मंदाताई नाईक, डॉ. राजकुमार शहा या मान्यवरांच्या उपस्थितीत प्रख्यात सिने अभिनेते जॉकी श्रॉफ यांच्या हस्ते, टिळक रोडवरील डॉ. नितु मांडके सभागृहात आदर्श माता म्हणून सत्कार केला होता. हा अत्यन्त हृद्य सोहळा देखील अविस्मरणीय आहे.

अशा अनेक घटना केवळ मला लाभलेल्या या सहृदांच्या सहवासामुळे घडल्या हे सांगताना मला आनंद होत आहे.
“राखावी बहुतांची अंतरंगे, भाग्य येते तदनंतरे” या उक्तीची अनुभूती मला आली. हाही एक दैवयोग!

वि.ग.सातपुते.

9766544908

पुणे.

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..