नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३४)

सातारला प्राचीन तसेच ऐतिहासिक शिवकालीन पार्श्वभूमी आहे हे सर्वश्रुत आहे. राष्ट्रसंत प.पू. रामदास स्वामी, रंगनाथ स्वामी, ब्रह्मेन्द्र स्वामी, गोपाळनाथ महाराज त्रिपुटी, गोंदवलेकर महाराज अशा अनेक संतविभूतींची साहित्य ग्रंथ संपदा लाभली आहे आणि तोच अध्यात्मिक साहित्य, कला, संस्कृतीचा देखील प्राचीन वारसा लाभला आहे हे मागील ३३ व्या भागातून प्रत्ययास येते. सातारा येथील प. पू .रामदास स्वामी यांच्या वास्तव्याने व पदस्पर्शाने पुनीत झालेला समर्थ सज्जनगड हे सर्व आम्हा सातारकरांचेच नव्हे तर प्रत्येकाचे श्रद्धास्थान आहे.

सातारमधील एक समर्थभक्त व समर्थ सेवा मंडळाचे साताऱ्यातील सुसंस्कृत , सुपरिचित आणी अभ्यासू अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे अरुणराव गोडबोले. हे देखील उत्तम साहित्यिक आहेत त्यांचा समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्म्याचा प्रगाढ अभ्यास आहे. त्यांची आजवर अनेक विषयावरील सुमारे ५० पुस्तके प्रकाशित आहेत. ते उत्तम, अभ्यासू वक्ते आहेत. ते प्रसिद्ध टॅक्स कन्सल्टंट आहेत. त्यांची कौशिक प्रकाशन सातारा तसेच कौशिक चित्रपट निर्मिती संस्था असून या संस्थेतर्फे त्यांनी अनेक साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित केली आहेत.
शिवाय चित्रपट क्षेत्रात देखील त्यांनी

१)कशासाठी ? प्रेमासाठी. 
२)नशीबवान
३)धुमाकूळ
४)बंडलबाज
५)रामरहीम

अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन केलेले आहे. या साहित्य, कला क्षेत्रात त्यांना उत्कृष्ट निर्माता म्हणून
तर अखिल भारतीय चित्रपट महामंडळा कडुन चित्रकर्मी असे मानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सर्वच क्षेत्रात त्यांचा लीलया वावर असून आजही ते अत्यन्त उत्साहाने अनेक संस्थाच्या प्रमुख पदावर काम करून असून सर्वाना अत्यन्त प्रेमाने आपुलकीने मार्गदर्शन करीत असतात.
मी सातारकर असल्यामुळे आमचे कौटुंबिक संबंध आहेत त्यामुळे त्यांचा मार्गदर्शक सहवास मला सतत लाभत असतो!

मी सातारला अनेक वर्षे राहिल्यामुळे, माझे शिक्षण सातारला झाल्यामुळे, माझा वडिलोपार्जित व्यवसायही सातारलाच असल्यामुळे तिथेही माझे अनेक क्षेत्रातील मित्र आहेत. त्यात अध्यात्म, साहित्य, नाट्य, कला, क्रीडा क्षेत्रातीलही अनेक मित्रमंडळी जी आहेत त्यातील माझे एक बालमित्र हे सातारच्या प्रसिद्ध मुरलीधर मंदिराचे विश्वस्त श्री.श्रीकांत ( बाळासाहेब) दिवशिकर जे इंजिनिअर असून ते उत्तम साहित्य समीक्षक आहेत. माझ्या बहुअंशी साहित्यावर त्यांची नेहमीच सुंदर अभ्यासात्मक समीक्षक प्रतिक्रिया असते. त्यांनी माझ्या साहित्यावर आजपर्यंत लिहिलेल्या मुक्त आणी समीक्षक प्रतिक्रियेवर एक स्वतंत्र पुस्तक होईल.

सातारचे माझे दुसरे जवळचे मित्र की जे *मराठी साहित्य परिषद पुणे व सातारा मसाप. चे जाणकार पदाधिकारी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. दिपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थचे तसेच लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या लोकमंगल हायस्कुल नागेवाडी, शाहूपुरी व सातारा एमआयडीसी शाळेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. श्री. शिरीष चिटणीस यांनी त्यांच्या या संस्थेतर्फे सातारला त्यांच्या संस्थेच्या दिपलक्ष्मी हॉल मध्ये सातारच्या आठवणी या विषयावर एका व्याख्यानमालेची सुरुवात केली. त्यावेळी प्रथम माझेच व्याख्यान त्यांनी आयोजित केले होते. त्यासोबतच त्यांनी माझ्या संतांच्या ४० तैलचित्रांचेही ३ दिवस प्रदर्शन भरविले होते. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता.

माझ्या चित्रांचे प्रदर्शन हे अनेक ठिकाणी झाले. इटीव्ही, झी टीव्ही, सह्याद्री वाहिनीनी त्याची दखल घेतली, माझी मुलाखत घेतली. जिथे मी घडलो त्या साताऱ्यात या माझ्या सातारकर मित्रांनी आयोजित केलेला कार्यक्रम हा माझा सर्वात मोठा आनंद होता. याची जाणीव आजही मला आहे .

यावेळी “सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या ” सायन्स कॉलेज मध्ये देखील माझ्या चित्रांचे तसेच माझ्या पुस्तकांचेही प्रदर्शन झाले होते. त्यावेळी सर्वश्री शिरीष चिटणीस व त्यांच्या संस्थेचे सर्व सहकारी, डॉ. राजेंद्र माने तसेच माझे बालमित्र सर्वश्री श्रीकांत दिवशिकर, प्रा. भगवंत आफळे, वासुदेव किरवे, सोमनाथ भाटिया, अशोक शहा, प्रा.राम कदम, प्रा. रमणलाल शहा (ज्योतिषाचार्य), आर्टिस्ट अभिजीत वाईकर (नाट्यलेखक), चित्रपट समीक्षक पद्माकर पाठकजी, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर अशोक गोडबोले, सामाजिक कार्यकर्ते ऍड, जयंत केंजळे, प्रा. डॉ. विजय खांडेकर, भगवान डांगे या सर्वांनी माझ्या ४० तैलचित्रांची तसेच माझ्या प्रकाशित पुस्तकांच्या प्रदर्शनाची जी जातीने उपस्थित राहून ३ दिवस आत्मीयतेने सहकार्य करून जी व्यवस्था केली ती अविस्मरणीय आहे.

याप्रसंगी साताऱ्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यात सर्वश्री अरुण गोडबोले, मा. नगराध्यक्ष प्रकाश गवळी, संपादक ग्रामोद्धार बापुसो जाधव, संपादक, लेखक, व्याख्याते संजय कोल्हटकर, ऍड. उतेकर, माधव पटवर्धन, अरुण रायरीकर, विलास देवधर, अशोक काळे, कविवर्य मुकुंद लाहोटी अशी अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. त्यावेळी माझे परम स्नेही समीक्षक श्री श्रीकांत दिवशिकर यांनी सर्वांच्या वतीने आपले प्रतिधिनिक मनोगत व्यक्त केले ते मुद्दाम त्यांच्याच शब्दात मी येथे मुद्दाम देत आहे. (जीवनात सावरणारे मित्र असले की जीवन सर्वार्थाने समृद्ध कृतार्थ होते.)

मित्रांनो! आजच्या आनंदाच्या क्षणी आपणा सर्व सातारकरांच्या वतीने आज आपले मूळ सातारकर माधव उर्फ विलास गजानन सातपुते म्हणजे विगसा या नावाने आज सर्वत्र ओळखले जाणारे आजचे मुद्रक, प्रकाशक, संपादक, साहित्यिक, कवी, चित्रकार, व्याख्याते म्हणून सर्वांना परिचित असलेल्या या माझ्या बालमित्रा बद्दल मी एक अगदी जुनी आठवण आज सांगणार आहे.

परवा माझ्या नातीने “आजोबा ” तुमचे लहानपणीचे शाळेतले जुने फोटो मला दाखवा ना! असा हट्टच धरला होता.” मी पूजा करत होतो, पूजा झाली की बाळा दाखवतो असे सांगूनसुद्धा ती ऐकायला तयारच नव्हती. पूजा करून बघतो तो काय तिने माझे सारे कपाट खोलीत पसरून फोटो शोधत होती , बरेचसे फोटो घेऊन ती पळाली सुद्धा पसारा आवरायला घेतला आणि अचानक एक जुनी वही माझ्या हाती लागली. जुन्या तारुण्यातल्या कविता, काही माझ्या, काही मित्रांचे सुविचार, लेखक कवींचे संदेश, सह्या, आणि बऱ्याच काही नोंदी. हळू हळू एक एक करत सारी पाने चाळता चाळता एका पानावर नजर खिळून राहिली. त्या पानावर एक नोंद होती “चमचमणाऱ्या ताऱ्याचा नभांगणात प्रवेश” मन क्षणात कित्येक वर्षे मागे गेले, त्याचीच ही एक सुंदर आठवण शब्दात पकडून आज तुम्हा सर्वांसमोर मांडतोय.

खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, प्राथमिक शाळेतील वर्गामधले पार्टीशन काढून दोन्ही वर्गाचा मिळून केलेला हॉल. त्यात ठरलेला तीनचा कार्यक्रम पाच वाजता सुरु झाला. एका काव्यस्पर्धेचा समारंभ सारेच नवोदित कवी, काही नावाजलेले, काही संग्रह प्रकाशित झालेले, काही नवोदित तर प्रतिष्ठित मान्यवर असा साऱ्यांचा समावेश त्या कार्यक्रमात होता. एकेक नाव पुकारले जाऊ लागले कविता वाचन झाले, प्रतिष्ठितांचे पण काव्यवाचन झाले, बक्षीस वाटप झाले, श्रोत्यांची भरपूर दाद, कार्यक्रम संपला असे वाटले.

तेवढयात निवेदकाने आवाहन केले की आणखी कोणाला कविता जर सादर करायच्या असतील तर त्यांनी मंचावर यावे. मी व माझा मित्र शेवटच्या बाकावर बसलो होतो. माझा मित्र चुळबूळ करू लागला पण त्याचे धाडसच होत नव्हते . *शेवटी मी त्याला उभारी दिली आणि म्हणालो* “उठ कविता वाचायची असेल तर बिनधास्त जा आज काय व्हायचे ते होऊ देत” बिनधास्त जा त्याचा आत्मविश्वास जागृत झाला. माझा तरुण मित्र जागेवरून उठला दिसायला अगदी साधा, भोळा गरीब, पण प्रामाणिक होता, त्या मित्राकडे बघून मला एक जबरदस्त एक वेगळा आत्मविश्वास जाणवला. तो अत्यंत सावकाशपणे चालत चालत स्टेजवर गेला. मंचावरील मान्यवरांना त्याने नमस्कार केला, हा त्याचा विनम्र भाव सर्वांनाच स्पर्शून गेला असावा. मंचावरील पाहुण्यांना त्याचा हा अदब आवडला, बहुदा त्याचा सादरीकरण करण्याचा पहिलाच प्रयत्न होता.
त्याने कविता सादर केली, ती इतकी उत्कृष्ट होती की श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला, क्षणभर संपूर्ण हॉल टाळ्यांनी दणाणून गेला. सर्वांनीच आणखी काही कविता त्याला सादर करण्याचा आग्रह धरला, त्याला मान देऊन माझ्या मित्राने अत्यंत नम्रपणे ३-४ कविता सादरही केल्या.
समारंभ संपल्यावर त्याच्या भोवती श्रोत्यांनी एकच गर्दी केली. पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मिळवणार्‍यांना त्याच वैषम्यही वाटले पण तो माझा मित्र त्यांच्याकडे गेला आणि त्याने सर्वांचे मनमोकळे कौतुकही केले. मंचावरील एक मान्यवर उठले आणि त्याला म्हणाले, “तुझ्या कविता खूपच छान होत्या. खरे तर तूच आजचा विजेता आहेस. तुलाच द्यायला हवा पहिला क्रमांक!”
तो म्हणाला “मी यात भागच घेतला नव्हता” पहिलं येणे म्हणजे सर्वोत्कृष्ट असं काही नसते. ज्यांनी भाग घेतला त्यात पहिला इतकंच! त्याहीपेक्षा आपण मला आज संधी दिलीत हेच महत्वाचे आहे. चांगल्या कविता करणारे हे अनेक कवी – कवियत्री आहेतच ना!
त्याच हे दिलखुलास मनमोकळे उत्तर त्याच्या कवितेपेक्षा सर्वानाच जास्त भावले. *इतकी निरागसता आणि नम्रता फारच दुर्मिळ गोष्ट असते. साहित्याशी, आपल्या काव्याशी प्रामाणिक राहणारा, साऱ्या प्रसिद्धी पासून अलिप्त राहणारा या माझ्या बालमित्राचा मला अभिमान वाटला.
सूर्यास्त होऊन अंधार पडू लागला त्यात लाईट गेले, बाहेर मैदानावर आम्ही आलो त्या तिन्हीसांजेला पश्चिमेकडे सहज वर पाहिले, एक छोटासा चमचम करणारा तारा नभांगणात लुकलुकत होता.

आज जवळ जवळ ५५ वर्षे होऊन गेली या गोष्टीला. तो दिवस होता १२ मे १९६३ आणि ती आठवण आजही ताजी आहे.
मित्रांनो आज आवर्जून सांगावेसे वाटते “तो माझा सातारकर मित्र म्हणजे, माधव उर्फ ” विलास गजानन सातपुते” म्हणजेच आजचे भावकवी आणि ज्येष्ठ साहित्यिक, व्याख्याते संत चित्रकार (विगसा).

मित्रानो आज मुद्दाम सर्वाना ही जुनी ओळख देतोय, नुसत्या प्रकाशित साहित्यावरून माणसाची प्रतिभा सिद्ध होत नसते. एका रात्रीत माणूस कधीच मोठा होत नसतो. आपली प्रामाणिक साहित्यिक बांधिलकी, कवितेचे इमान, आत्मविश्वास, जिद्द आणि आदरभाव, अनेक वर्षाची तपश्चर्या, साधना आणि सहवास माणसाला यशाचे शिखर एक दिवस नक्की दाखवते. याची ही प्रचिती.
इती श्री .श्रीकांत दिवशिकर.

वि.ग.सातपुते.

9766544908

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..