नवीन लेखन...

वन्स अपाॅन अ ‘Time’

लहानपणी मी सर्वात आधी मराठी चित्रपट पाहिला, तो होता ‘देवबाप्पा’, हिंदी होता ‘आशीर्वाद’ आणि इंग्रजी होता ‘जाड्या रड्या’! ‘जाड्या रड्या’ म्हणजेच ‘लॉरेल अॅण्ड हार्डी’ अशा चित्रपटात संवाद नसायचे. मजकूराच्या इंग्रजी पाट्या मधे मधे येत असत. अलका व विजय टॉकीजला सकाळी दहा वाजता हे शो असायचे.

दहावीला असताना मोठा भाऊ व वडील ‘हाऊस ऑफ वॅक्स’, ‘ड्रॅक्युला’, ‘सायको’, ‘द ब्रिज ऑन द रिव्हर व्कॉय’ अशा इंग्रजी चित्रपटांविषयी चर्चा करताना त्यांची कथानकं कानावर पडायची व त्या विषयी उत्सुकता वाढायची. अकरावीला गेल्यावर मित्रांबरोबर मी इंग्रजी चित्रपटाचे मॅटिनी शो पाहू लागलो. विजयानंद टॉकीजला दुपारी एक वाजता इंग्रजी चित्रपट असायचे. या दीड तासाच्या चित्रपटांमध्ये मी लॉस्ट इन डेझर्ट’, हिचकॉकचा ‘फ्रेंझी’, डेव्हिड लीनचा ‘रेयॉन्स डॉटर’ असे अनेक क्लासिक व अविस्मरणीय चित्रपट पाहिले.

राहुल टॉकीजला ग्रेगरी पेकचा ‘मेकॅनाज गोल्ड’ चित्रपट एकदा पाहून समाधान झालं नाही, म्हणून पुन्हा पाहिला. मग तसेच काऊबॉईजच्या पठडीतले, ‘वन्स अपॉन टाईम इन द वेस्ट’, ‘रेडसन’, ‘मॅग्निफिशियंट सेव्हन’ ‘रिव्हेंज’ असे चित्रपट पाहिले. क्लींट इस्टवुड, बड स्पेनर, स्पेन्सर ट्रेसी या त्रिकूटाचे अनेक चित्रपट पाहिले. संपूर्ण जगाला कुंग फू कराटेचे वेड लावलेल्या ब्रुस ली चा ‘एन्टर द ड्रॅगन’ राहुलमध्येच ब्लॅकने तिकीट घेऊन पाहिला.

एलिझाबेथ टेलरचा ‘क्लिओपात्रा’ अलंकार टाॅकीजमध्ये ७०एमएम च्या भव्य पडद्यावर पहाताना डोळ्याचे पारणे फिटले. तसेच ‘टेन कमांडमेंट्स’, ‘बेनहर’ व ‘हेलनऑफ टॉय’ हे नटराज टॉकीजला पाहिले. इंग्रजी चित्रपटातील सर्व संवाद कळायचे नाहीत, मात्र प्रसंग पाहून तर्काने कथानक समजायचं.

साहसी चित्रपट पहायला मला फार आवडायचे. ‘इंडियाना जोन्स’, ‘टारझन’, बॉर्न फ्री’, ‘जुरासिक पार्क”, ‘किंग कॉन्ग’ पाहिले. काही हॉरर चित्रपट पहाताना भितीने माझी गाळणही उडाली आहे. ‘एक्झॉरसिस्ट’ चित्रपटाच्या वेळी थिएटर बाहेर अॅम्ब्युलन्स ठेवलेली असायची. तसाच ‘ओमेन’ चित्रपट होता. वेस्टएंडला “फ्रायडे १३ जून’ हा हॉरर चित्रपट पाहिला होता. तिथंच पिरॅमिडच्या इतिहासावरचा ‘द स्फिंक्स’ चित्रपट पाहिला आणि दुसरेच दिवशी ते थिएटर पाडण्यात आले.

राहुल टॉकीजला ‘द गिफ्ट’ नावाचा एक उत्तम चित्रपट मी पाहिला, तो कदापिही विसरु शकत नाही. तिथेच ‘द पॅसेज’ व ‘ऑपरेशन डेब्रेक’ हे दुसऱ्या महायुद्धावरील चित्रपट पाहिले. जनरल द गोल यांना मारण्याचा कट असलेला ‘द डे ऑफ द जॅकॉल’ हा चित्रपट थरारक आहे.

‘सायलेन्ट मूव्ही’ नावाच्या विनोदी चित्रपटात एकही संवाद नव्हता. ‘इट्स अ मॅड मॅड मॅड वर्ल्ड’ हा धमाल विनोदी चित्रपट होता. चार्ली चॅप्लीनचा ‘मॉडर्न टाईम्स’ पाहिला. ‘गॉड मस्ट बी क्रेझी’ या विनोदी चित्रपटांचे पुढील भाग देखील पहिल्या चित्रपटासारखेच धमाल होते.

अलका टॉकीजलाच पाहिलेला अॅन्ड्री हेपबर्नचा ‘रोमन हॉलिडे’, राजकन्येने एका दिवसासाठी सामान्य जीवन अनुभवल्याचा हा चित्रपट अविस्मरणीय असाच आहे. तिथेच तिचा क्लासिक ‘माय फेअर लेडी’ पाहिला. तिचाच अंध तरुणीच्या भूमिकेचा ‘वेट अंटील डार्क’ हा गूढ चित्रपट अप्रतिम आहे.

जेम्स बॉण्डचा पहिला चित्रपट पाहिला तो ‘द मॅन विथ द गोल्डन गन’. त्यानंतरचे आलेले बाॅण्डपट पाहिले, मात्र खरा बॉण्ड शोभला तो सीन कॉनरीच! सीन कॉनरीचाच ‘ग्रेट ट्रेन रॉबरी’ हा चित्रपट अफलातून आहे. हेरगिरीवरचा ‘आय ऑफ द निडल’ हा चित्रपट शेवटपर्यंत उत्कंठा वाढवणारा होता.

सायन्स फिक्शनचे चित्रपट मला कधीही आवडले नाहीत. ‘हनी, आय श्रंक द किड’ हा चित्रपट वेस्टऐंडला पाहिला होता. त्यामध्ये तंत्रज्ञानाची कमाल होती.

लग्नानंतर मुलाला घेऊन ‘जंगलबुक’, ‘लायन किंग’, ‘फ्रि विली’, ‘निमो’ असे चित्रपट पाहिले. ‘स्पायडर मॅन’ पाहिला. नंतर व्यवसायामुळे इंग्रजी चित्रपट पहाणे कमी होत गेलं.‌ मराठी आणि हिंदी क्वचितच पहात होतो.

शेवटी ‘टायटॅनिक’ पाहिल्याचे आठवतंय… तब्बल एक वर्ष हा चित्रपट अलका टॉकीजला चालू होता. या चित्रपटाने खरंच लोकप्रियतेचा विक्रम केला. तिन्ही शो हाऊसफुल्ल असायचे. चित्रपट अविस्मरणीय असाच होता. त्यानंतर मी टॉकीजमध्ये जाऊन एकही चित्रपट पाहिला नाही आणि आता पाहण्याची इच्छा देखील होत नाही.

अलीकडच्या चित्रपटांचे विषय पटत नाहीत. तंत्रज्ञान सुधारलंय पण विषय तरुण पिढीचे आहेत. त्या चित्रपटांचेही पुढचे पार्ट येत असतात. ‘अॅव्हेंजर्स’, ‘फिस्ट अॅण्ड फ्युरी’, ‘स्टार ट्रेक’ हे चॅनेलवर अनेकदा दाखवले जातात.

मला मात्र माझ्या पिढीतीलच इंग्रजी चित्रपट आवडतात…खरंच ‘वन्स अपॉन अ ‘Time.’

© सुरेश नावडकर.

मोबाईल ९७३००३४२८४

२४-५-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..