नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २२)

खरे तर पुणे माझे जन्मस्थान (आजोळ) पण सातारा माझी कर्मभूमी. या दोन्हीही स्थळांची मला प्रचंड ओढ. माझी सारी जडणघडण सातारच्या मातीत झाली. पण पुढे वडिलोपार्जित व्यवसाय सातारला असून देखील पुणे, मुंबई येथे सुरू केला. १९८४ पुण्यात स्थिरावलो. गुरुवर्य, कविवर्य द.वी.केसकर यांच्यामुळे पुण्यात अनेक साहित्यिक भेटले. पुण्यातील ज्येष्ठ कवी व कवयित्री श्री. सुधाकरपंत (अण्णा) देशपांडे आणि त्यांच्या पत्नी निर्मलाताई देशपांडे या दोन्ही कवी पतीपत्नीची गांठ द.वी केसकर सरांच्या मुळे पडली. पुढे आमचे संबंध खुपच दृढावले. त्यांच्यामुळे मी पुण्यातील बुजुर्ग अशा काव्यशिल्प या संस्थेचा सभासद झालो. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. द्वारकानाथ लेले हे ज्येष्ठ पत्रकार होते त्यांचा माझा पत्रकारितेमुळे पूर्वपरिचय होताच. तसेच ज्येष्ठ कविवर्य कै. कल्याण इनामदार देखील माझ्या बहिणीचे सासरच इनामदार असल्यामुळे आमचे नातेच होते. आम्ही सर्व कार्यक्रमानिमित्त सदैव भेटत होतो. ज्येष्ठ मित्रवर्य सुधाकरपंत (अण्णा) म्हणजे सुपरिचित व्यक्तिमत्व. त्यांचे मा. बाबासाहेब पुरंदरे, दाजीकाका गाडगीळ, गंगाधर महांबरे, सुधीर मोघे, गजाननराव वाटवे, अशा अनेक मंडळींशी अगदी जवळचे संबंध होते. त्यांचेमुळे या सर्वांशी माझाही परिचय झाला. मा. बाबासाहेब पुरंदरे यांना मी सातारला असल्यापासूनच ओळखत होतो. कारण ते सातारला वारंवार येत असत. त्याही आठवणी प्रचंड आहेत.
या सर्वच लोकांच्या सहवासात दिवस खूप समाधानात, आनंदात चालले होते. पुण्यात साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते, मी तो आनंद वेळ जसा मिळेल तसा.घेत राहिलो. माझे ऑफिस डेक्कनला मध्यवर्ती असल्यामुळे बरीच मंडळी तिथे संध्याकाळी आवर्जून येत असत.
गप्पा होत असत. असे खूप सुंदर पोषक वातारण मला अधिक समृद्ध करत राहिले. हाही एक योगच म्हणावा लागेल.
त्यात महत्वाची घटना म्हणजे
कै.डॉ.द.भी.कुलकर्णी सरांचा परिचय आणी प्रदीर्घ असा मार्गदर्शक, प्रेमळ सहवास म्हणजे त्यांचे आणी माझे पूर्वजन्मीचेच ऋणानुबंध एवढेच म्हणता येईल!

जीवनात खुप माणसं भेटतात. मला तर अगदी लहानपणापासुन सदैव दीपस्तंभाप्रमाणं मार्गदर्शक अशीच माणसं सतत भेटत राहिली होती की जी आजही ती अंतरात घर करून आहेत. बहुतांशी मी जवळ जवळ त्या सर्वांचाच उल्लेख केला आहे. या माणसांचा सहवास व मार्गदर्शन म्हणजेच माझी प्रचंड अशी गर्भश्रीमंतीच आहे. या सर्वांच्यामुळेच माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला.

माझ्या अगदी मोकळ्या प्रांजळ मुक्त परिचयामुळे गुरुवर्य द.भी. सर व मी मनानं खुपच जवळ आलो. मी एक साधा बूकबाइंडर रूलर होतो आणि आजपर्यंतचा माझा कवी, लेखक म्हणून जो प्रवास झाला तो कसा झाला हे त्यांना कळल्यावर ते म्हणाले, “अरे माझ्या घरात माझा भाऊ देखील बुकबाइंडिंग करीत असे आणि तेंव्हापासून मी पुस्तके वाचीत असे! हा बूकबाइंडिंगचा व्यवसाय हे आपल्यातील अगदी अनपेक्षित साम्य आहे. हा एक योगायोग!”
मी त्यांना म्हणालो, “तुमच्या सारखे गुरुवर्य आज मला लाभले हे माझे भाग्यच!” तेंव्हा ते म्हणाले, “अरे अप्पा (मला सर्वच अप्पा म्हणून ओळखतात हे त्यांना माहित होते) तुझ्यासारखां एवढां प्रांजळ माणुस मला भेटला याचा मलाही आनंद झाला!”

द.भी.कुलकर्णी म्हणजे साहित्य क्षेत्रातील एक असामान्य ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे, हे सर्वश्रुत आहे. प्रख्यात ज्येष्ठ निर्भिड समीक्षक, उत्तम ललित लेखक, शब्दांची अचूक, अभ्यासु जाण असलेलं म्हणजे अगदी साक्षात शब्दप्रभु असलेलं! वाचस्पती आणि उत्तम भविष्य जाणणारं! वाचासिद्धी असलेलं असं व्यक्तिमत्व होतं!

तसेच संत ज्ञानेश्वर आणी ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास असलेलं आणी महाकवी कालीदासावर पीएचडी केलेलं समृद्ध व्यक्तिमत्व!
त्यांच्या व गुरुवर्य डॉ. न.म.जोशी सरांच्याच मार्गदर्शनाने १० वर्षापूर्वी धायरी वडगाव पुणे ४१. या पुण्यातील वेगाने विकसित होत असलेल्या प्रभागात सप्तर्षी मित्र मंडळ धायरी या संस्थेतील साहित्याची अभिरूची असणाऱ्या ज्येष्ठ मित्रांच्या सहकार्याने मी महाकवी कालीदास प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली.

त्या संस्थेचे सातत्याने उत्साहात नियोजनपूर्वक साहित्य, कला, संस्कृती या सुंदर विषयाला अनुषंगुन कार्यक्रम सुरु होवू लागले. त्या सर्वच कार्यक्रमांना मा.द.भी. सर आणि मा. न.म. सर, आनंद यादव सर यांची मोलाची साथ लाभली. त्या निमित्ताने या सर्वांचाच सतत सहवास लाभला. गुरुवर्य कै.डॉ. द.भी.कुलकर्णी सर तर डीएसके विश्वसंकुलामध्ये माझ्या अगदी जवळच रहात होते त्यामुळे त्यांचा माझा अगदी नित्य सहवास होता. माझे त्यांचेकडे नित्य जाणे येणे होते .

कै. डॉ. द.भी.कुलकर्णी सरांच्या घरात सातत्याने महाराष्ट्रातील सर्वच साहित्यिक सारस्वतांची वर्दळ असे. अनेक साहित्यिक कवी मंडळी त्यांच्या मार्गदर्शनासाठी तर त्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी नेहमी येत असत. अशा जवळ जवळ सर्वच व्यक्तीन्ची, साहित्यिकांची माझी ओळख योगायोगाने सरांच्यामुळे होत असे. त्यामुळे द.भी .सरांच्या बरोबर मला त्यांच्या कार्यक्रमात बरेच वेळा सहभागी होण्याची संधी मिळत असे. त्यानिमित्ताने द.भी.सरांच्या तसेच न.म. जोशी सरांच्या सोबत अनेक ठिकाणी माझाही प्रवासाचाही योग येत असे. त्यामुळे अशा विद्वानांच्या सहवासात खुप काही शिकण्यास मिळत असे.

द.भी.सरांचा बंगला म्हणजे एक सुंदर पुस्तकांचेच उद्यान होते त्यांच्या समीक्षेसाठी, प्रस्तावनेसाठी आणि अभिप्रायासाठी पुस्तकांच्या रांगा असत. पण तेही नित्य लिहित असत, पुस्तके वाचत असत. त्यांचे पाठांतर प्रचंड होते. हे चर्चेतुन,गप्पांमधुन निदर्शनास येत असे. त्यांच्या घरात सर्वानाच मुक्त प्रवेश असे. त्यांच्याशी बोलताना वेळ कसा गेला हे कळतही नसे. त्यांना येणाऱ्या प्रत्येकाचे आदरातिथ्य करण्याची आवड होती. हे सारे मी अनुभवले आहे . ते स्पष्ट वक्ते तर होतेच पण मर्म विनोदीही होते. बहुअंशी त्यांची बैठक ही घरातील छोट्याशा बागेत असायची.त्या बागेत एक झोपाळा आणि त्याच्या सभोवती खुर्च्या मांडलेल्या असत त्या खुर्च्या नेहमीच माणसांनी आसनस्थ असत.असे सुंदर वातारण होते.

सरांच्या बोलण्यात नेहमी मृदुता असे. शब्दात आत्मविश्वास असे. माझ्या पुस्तकांना त्यांनी ज्या अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिल्या त्या त्यांनी अगदी लीलया फक्त तोंडी डिक्टेक्ट केल्या आणि मी स्वतः लिहून घेतल्या आहेत. यावरून त्यांचे साहित्याभ्यासातील श्रेष्ठत्व प्रत्ययास येते. यातून मलाही बरेच काही शिकता आले.

(बाकी अजुन पुढील क्रमशः २३ व्या भागात)

©विगसा

दिनांक:- ५ – १२ – २०१८.

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..