नवीन लेखन...

गोशीकिनुमा (जपान वारी)

Goshikinuma Ponds-Walking trail (Image source Google)
जपानमधील एका राज्यात, अनेक तलावांनी वेढलेली ही जागा.
आजूबाजूला फक्त झाडे-झुडपे, फुले,पाने पक्षी, वाळलेली पाने आणि पानांवरून चालताना होणारा किरकिर आवाज..
सकाळच्या वेळी रात किड्यांची किरकिर ऐकू येते आहे, असा भास व्हावा एवढी शांतता  आणि चौफेर नजर जाईल तिथवर फक्त सुंदर दृश्य! चित्रकार, कवी, लेखक, फोटोग्राफर आणि सगळेच आर्टिस्ट, हौशी पर्यटक ह्यांच्या साठी भरपूर स्कोप!Goshikinuma Ponds-Walking trail (Image source Google)जागेचे नाव “गोशीकिनुमा” असे नाव ठेवले गेले कारण तिथे विविध रंगांचे ५ तलाव आहेत. अक्षरश: ५ रंग वेगळे उठून दिसावेत असे हे पंचरंगी तलाव आहेत.ह्या जागेबद्दल जेव्हा माहिती गोळा करायला सुरुवात केली तेव्हा तिथले फोटो पाहून क्षणभर विश्वास बसेना, खरंच अशी जागा आहे? फोटो एडिट वगैरे केले नसतील ना? अनेक प्रश्न…

शेवटी नुसता अंदाज बांधण्यात काय अर्थ? चला जाऊनच येऊ असे ठरवून निघाले आणि पोहोचले येऊन फुकुशिमा राज्यातल्या गोशीकिनुमा जवळ.

तोक्यो स्टेशन वरून शिनकानसेन(Bullet train) ने ‘कोरियामा स्टेशन’ पर्यंत येऊन पुढे  ‘बानेत्सु’ नावाच्या रेल्वे लाईन ने ‘इनावाशिरो स्टेशन’ असा प्रवास करायचा. नंतर स्टेशन पासुन पुढे बांदाइ तोतो बसने ह्या जागी जाता येते. बाकी इतर सगळी सविस्तर माहिती लेखाच्या शेवटी लिंक आहे त्यावर आहे.

थोडक्यात काय कलर पॅलेट आहे ही जागा. निळ्या रंगाच्या तर सगळ्या छटा आहेत. रंगांच्या पेटीत असतात तश्याच. मराठीत माहिती नाहीत अशी काही नावे (cobalt blue, turquoise blue, emerald blue, pastel blue). थोड्याफार फरकाने उठून दिसणारे ते रंग!
असा हा रहस्यमय तलाव काय आहे त्या मागचे रहस्य चला शोधूया…

साधारण ४-५ किमी चा Walking Trail अनुभवताना हे रहस्य हळुहळु उलगडेल आपल्याला.
Trail पुर्ण करण्यासाठी ७० ते ९० मिनिटे नक्कीच लागतात.

बांदाई  पर्वताच्या उद्रेकामुळे हे विविध तलाव तयार झाले. ह्या ठिकाणी नेत्र दीपक रंगांचे फक्त पाच नाही अनेक तलाव आहेत.
वेगवेगळे रंग दिसण्याची कारणे हवामान, ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेले घटक पदार्थ वगैरे अशी बरीच आहेत. हे सगळे फॅक्टर्स तसेच  सिझन व एखादा तलाव पहाण्याचा अँगल, आपण पहात असलेल्या रंगांवर परिणाम करू शकतात बरं का! या कारणास्तव ‘वर्षाच्या वेगवेगळ्या वेळी पुन्हा भेट द्याच’ असा उल्लेख तिथे लावलेल्या माहिती फलकांवर दिसून येतो.

चालायला सुरुवात केल्यावर, आपल्याला पहिल्यांदा दिसते ‘बिशामोन-नुमा’ या तलावामध्ये बोटीने फिरता येते. अनेक छोट्या छोट्या नावा वल्हवत फिरणारे पर्यटक पाहून एका निवांत आणि सुंदर दिवसाची सुरुवात झाली आहे असे वाटून जाते. पुढे पुढे चालत जाऊ तसे बाकीचे तलाव आका-नुमा, मीदोरी-नुमा इत्यादी  व त्यांचे विविध रंग लक्ष वेधून घेतात.
तात्सु-नुमा हा तलाव हिवाळ्यात गर्द हिरवा तर स्प्रिंग मध्ये निळाशार दिसतो. कधी ही पाहता आणि अनुभवता येणारा हा निसर्गाचा एक रहस्यमय अवतार आहे. हे मात्र अगदी खरे.

या Trail मध्ये विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे, वयस्कर माणसांना सुद्धा येथे भेट देण्यास काही हरकत नाही. अवघड आणि अशक्य वाटा इथे अजिबात नाहीत. आणि असल्या तरी तिथे लाकडाचे प्लॅटफॉर्म्स घातलेले असल्याने आरामात त्यावरून ये-जा करता येते.
परिसर बराच मोठा असल्याने बरेच चालावे लागते. मध्ये कुठेही खाण्याचे स्टॉल किंवा बाकी तत्सम काही सोय नसल्याने, लागणार्‍या गोष्टी सोबत घेऊन गेलेले उत्तम.

फूड कोर्ट पहिल्या तलावाजवळ आणि एकदम शेवटी ‘लेक हिबारा’ जवळ आहेत. लेक बरेच मोठे असून बोटीची सफर इथे अनुभवता येते. लेक हिबाराला थेट जाता येणार्‍या बस सुद्धा इनावाशिरो स्टेशन वरून आहेत. Trail संपल्यानंतर लेक हिबारा जवळच परतीची बस मिळते.

महत्वाचं शॉपिंग बद्दल, विविध खाद्यपदार्था बरोबर फुकुशिमा मध्ये प्रसिद्ध असणार्‍या ‘ओकीआगारी कोबोशी’ आणि ‘आकाबेको’ बाहुल्या इथे शॉपिंग सेंटर्स मध्ये ठेवलेल्या दिसून येतात. ह्या बाहुल्या ‘ओमियागे’ म्हणजे गिफ्ट देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी किंवा ऑफिस मधल्या सहकारी वर्गासाठी ओमियागे देण्या-घेण्याची पद्धत जपान मध्ये आहे. आपला आनंद दुसर्‍यांबरोबर वाटून घेण्याची उत्तम पद्धत. अगदी न चुकता कुठे फिरायला गेल्यानंतर तेथील प्रसिद्ध वस्तू किंवा खाद्यपदार्थ हे ओमियागे म्हणून दिले जातात. त्या निमित्ताने तेथील जागांबद्दल अधिक माहिती जाणून घेतली जाते. रोजगार वाढतो आणि इकॉनॉमिकली सुद्धा चांगलेच.

अशा काही पद्धतींचा अवलंब केल्याने अनेक चांगल्या गोष्टी घडतात याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हे गिफ्ट देवघेव प्रकार!

सलग तीन-चार तास चालल्यानंतर सुद्धा थकवा न जाणवता उगाचच फार एनर्जेटिक का वाटतेय? असा प्रश्न पडतो. निसर्गा सोबत थोडा काळ घालवल्यानंतर एक वेगळेच तेज आणि ताजेतवानेपण चेहेर्‍यावर उठून दिसते.

नक्कीच अनुभवता आला तर अनुभवावे असे हे ‘गोशीकिनुमा’

— प्रणाली भालचंद्र मराठे 

Avatar
About प्रणाली भालचंद्र मराठे 17 Articles
मी सध्या जपान मध्ये वास्त्यव्यास असून ,येथे जपानी भाषेची भाषांतरकार म्हणून काम करत आहे. जपानी भाषेमध्ये जितके नावीन्य आहे तितकेच या देशामध्ये आणि यादेशातील रहिवाश्यांमध्ये. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या जपान देशाचे सौंदर्य अलौकिक आहे. जे मी आपणापर्यंत माझ्या लेखनाद्वारे पोहोचवू इच्छिते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..