नवीन लेखन...

मी पाहिलेला होक्काइदो – साप्पोरो (जपान वारी)

हाकोदाते पाहिल्यानंतर पुढे ओढ लागली ती म्हणजे होक्काइदोची कॅपिटल सिटी पाहण्याची.

“साप्पोरो” हे होक्काइदो मधील सर्वात मोठे शहर असुन इकडे येण्याचा सगळ्यात सोयीस्कर मार्ग म्हणालं, तर हवाई मार्ग.

साप्पोरो पर्यन्त शिनकानसेन (बुलेट ट्रेन) अजून पोहोचलेली नाही, त्यामुळे थेट साप्पोरो यायचे असल्यास विमानप्रवास हाच एक पर्याय आहे. इथले शीन-चीतोसे विमानतळ सर्वांचे स्वागत करण्यास सदैव सज्ज असते.

हाकोदातेहुन (होक्काइदो मधे हाकोदाते पर्यन्तच शिनकानसेन धावतात) प्रवास करणार असु तर, साप्पोरोला जाण्याचा सगळ्यात जलद मार्ग (माझ्या रिसर्चनुसार) रेल्वे हा आहे. ‘होकूतो / सुपर होकूतो लिमिटेड एक्सप्रेस.’

JR(जपान रेल्वे) च्या हाकोदाते स्टेशन वरून सुटणाऱ्या ह्या गाड्या साधारण चार तासात साप्पोरो स्टेशनला पोहोचतात. JRचे हे स्टेशन प्रशस्त आणि सुंदर आहे.

जपानच्या बऱ्याच शहरांमधील रेल्वे स्टेशन्सही अशीच सुंदर आणि टापटीप आहेत, तिथूनच फर्स्ट इम्प्रेशन घेऊन आपण पुढच्या प्रवासासाठी सज्ज होतो.साप्पोरो स्टेशन तर बरेच मोठे असुन, अंडरग्राऊंड शॉपिंग प्लाझा, होक्काइदो विशेष – सीफुड जॉइंट्स असं बरंच काही आहे फिरायला.

बाहेरच लगेच मोठे बसस्थानक आहे. रेल्वे बरोबरच JR च्या बसेस सुद्धा प्रवासीसेवेत आहेत. त्या इकडे बऱ्याच पाहायला मिळाल्या.

साप्पोरो Planned City असल्यामुळे, शहराची रचना पद्धतशीर आहे. पण रोड ग्रीड्स आणि त्यांचे नंबर्स च्या घोळात एखादा पत्ता शोधणे नवख्या माणसाला अवघड वाटु शकते.पण माझ्या सोबत तेथील रहिवासी असलेले जपानी मित्र मैत्रिणी होते .त्यामुळे काहीच गैरसोय झाली नाही. या होक्काइदो ट्रिपमध्ये त्यांचे आदरातिथ्य छोट्याछोट्या गोष्टीनं मधून दिसुन येत होते. जस की बुकिंग्स करिता मदत करणे, स्टेशन वर घ्यायला येणे, शाकाहारी पदार्थ मिळतील अशी रेस्टोरंट्स शोधून, अगदी तिकडचा खास शाकाहारी मेनू आधीच पाहून ठेवण्या पर्यंत सगळं केलं त्यांनी! परक्या देशात अनपेक्षित आपलंमाणूस पाहिलं की जितका आनंद होतो तसंच काहीस वाटलं मला त्यांचं हे आदरातिथ्य पाहून.

खूप परदेशी प्रवासी (तोक्योला न जाता) थेट साप्पोरोला सुद्धा येत असतात. याचं प्रमुख कारण म्हणजे सगळ्या जगभर नावारूपास आलेलं  “साप्पोरो युकीमात्सुरी” (स्नो फेस्टिवल) हे असावं. तसेच हे शहर अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजक (होस्ट) असण्याची ओळख मिरवते.

प्रसिद्ध नावे म्हणालं तर विंटर-ऑलिंपिक, फिफा वर्ल्डकप -२००२, रग्बी वर्ल्डकप- २०१९ इत्यादी. जपान मध्ये सगळ्यात जास्त बर्फ होक्काइदो मध्ये पडत असल्यामुळे साप्पोरो व इतर शहरांत विंटर स्पोर्ट्स बरेच खेळले जातात.

साप्पोरोला  मी पाहिलेली प्रेक्षणीय स्थळे ४; शिरोई कोइबितो पार्क,ओदोरी पार्क, साप्पोरो TV टॉवर आणि साप्पोरो क्लॉक टॉवर.

मी साप्पोरो पाहिले तेंव्हा सिझन नसल्याने स्नो फेस्टिवल पाहता आला नाही. पण खूप अवर्णनीय असतो हे मात्र खात्रीने सांगता येईल. साधारण फेब्रुवारी महिन्यात हा फेस्टिवल साजरा केला जातो. सात दिवस चालणाऱ्या ह्या फेस्टिवल मध्ये हिम आणि बर्फा पासून बनवलेले शेकडो भव्य देखावे व शिल्पे पाहायला मिळतात. ‘ओदोरी पार्क’ च्या बरोबरीने ‘सुसुकिनो’ आणि ‘त्सुदोमे’ या ठिकाणी हा फेस्टिवल असतो.  ओदोरी पार्कला संध्याकाळच्या वेळी केली जाणारी रंगीबेरंगी रोषणाई पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या शिल्पावर फार सुंदर दिसते असं म्हणतात.

हे सगळे पाहत असतानाच गोठवणाऱ्या थंडीत गरमागरम पेय मिळालं तर काय मज्जा येईल नाही ? (खास करून चहा; तोही आल्याचा…अगदीच नाही तर कॉफी असेलच) अशी सुप्त इच्छा पुरवायला फूड कॉर्नर असतातच आजूबाजूला.

पेयावरून आठवलं ‘साप्पोरो ब्रेवरीज’ हा जपान मधील बिअरचा सर्वात जुना ब्रँड आहे.

नंतर पहिला “साप्पोरो TV टॉवर”

साप्पोरो TV टॉवर

डिजीटल घड्याळाद्वारे वेळ दाखवत उभा असलेला टॉवर, आपण शहरात फिरत असताना अधून मधून डोकावून बोलावत राहतो. साप्पोरो स्टेशन पासून दहाएक मिनिटांवरती असेल.तिथे पोचल्यावर एक लीफ्ट ६०सेकंदात टॉवर च्या ऑब्सर्व्हेशन डेकवर नेते. त्या डेक वरून खालती पाहिल्यावर, संपूर्ण साप्पोरो शहरचं आपल्या डोळ्यांसमोर उलगडत आहे असं वाटत होतं. समोर पसरलेल ओदोरी पार्क आणि लुकलुकणारे दिवे पाहिले आणि ठिपके-ठिपके जुळवून काढली जाणारी ठिपक्यांची रांगोळी आठवली. आखीवरेखीव मोजूनमापून काढल्यावर, सुंदर रंगात रंगवली जाणारी ती रांगोळी. दिवाळीच्या दिवसांत त्या रांगोळीवर पणत्या ठेवल्यानंतर, तिचं सौंदर्य अजूनच खुलुन येतं नाही? अगदी तसंच, आजूबाजूला दिसत असणारं हे शहर भासत होतं.

साप्पोरो प्रमाणेच जपान मधल्या इतरही बऱयाच प्रमुख शहरांमध्ये ही टॉवर कन्सेप्ट दिसून येते जी अफाट भारी आहे! त्यात सगळ्यात प्रिय आणि प्रथम स्थानी बाजी मारणारा आहे तो, तोक्यो टॉवर! पण हा साप्पोरो टॉवर सुद्धा पाहण्यासारखा आहे.

पुढे मी पाहिलं , ‘शिरोई कोइबितो पार्क’. नावाप्रमाणेच टेस्टी! इकडे जाताना रेल्वे पेक्षा बसने गेलो तर जास्त सोईस्कर आहे. साप्पोरो स्टेशन जवळील बसस्थानकावरून बस मिळते जी थेट पार्कला नेऊन सोडते. वरती पार्कला टेस्टी म्हटलं कारण, शिरोई कोइबितो ह्या नावाचं चॉकलेट (कुकीज म्हणूयात) खुप लोकप्रिय आहे. जपानमध्येच नाही तर जगभरात गाजतंय. केवळ होक्काइदो मध्येच तयार केलं जातं.

शिरोई कोइबितो पार्क

ह्या पार्कच मोटो म्हणजे ‘पहा, जाणून घ्या, चव चाखा आणि आनंद अनुभवा’. ही एक फॅक्टरी आहे आणि बाजूनी यावर आधारित थिम पार्क केलेलं आहे. फॅक्टरी मध्ये चॉकलेट तयार होताना आपण बघू शकतो.

(काचेतून हं, आतमध्ये जाता येत नाही ) इतक्या मोठ्या आणि लोकप्रिय ब्रँडच काम नुसतं बघतानाच एवढं छान वाटतं की खरोखरच तेच चॉकलेट बनवता आलं तर किती आनंद होईल ?

तर, अशी पण सोय आहे ज्यात आपण स्वतः हा अनुभव घेऊ शकतो. तिकीट काउंटर जवळच, एक माहितीपत्रक देतात आणि त्यातील वेगवेगळ्या प्लॅन्स मधून आपल्याला प्लॅन निवडता येतो. माझा प्लॅन १ तासाचा होता. अगदी शेफ वापरतात तशी पांढरी टोपी, अँप्रेन व हातमोजे सुद्धा देतात.

साप्पोरो क्लॉक टॉवर

व्यवस्थित सगळं समजावून सांगतात आणि चॉकलेट बनवून झालं कि त्यावर आपल्या आवडीनुसार सजावट करायला देतात. स्वतःच बनवलेलं चॉकलेट (अगदी बॉक्सपॅकिंग पर्यंत सगळं) घेऊन घरी येण्याची मज्जा काही निराळीच. ते पूर्ण झाल्यावर मग बाकी पार्क फिरून, पेटपूजा करून झाली कि विविध फोटो घेवून मग गाडी शॉपिंग कडे वळतेच. आणि खूप सारी खरेदी करून (कॅलरीज ची आकडेवाढ इ. तत्सम विचार बाजूला सारत) आपण परत येतो.

साप्पोरो क्लॉक टॉवर (तोकेइदाई ) म्हणजे एक सुंदर इमारत, जी बांधली गेली १८व्या शतकात. पांढऱ्या रंगाची अमेरिकन शैलीची बांधणी असलेली ही इमारत आणि त्यावरचं गोलाकार घड्याळ. साप्पोरोचे प्रतीक म्हणूनही ओळखली जाणारी ही जागा, बरेच लोकं कॅमेराबद्ध करण्यात मग्न असलेले दिसून येतात.

तर असं हे साप्पोरो, होक्काइदो च तोक्यो आहे. मॉडर्न, चकचकीत शहर जे सतत धावत असतं  नं थांबता! ज्याला कशाचीच पर्वा करायला सवड नाही. काहीही होऊ द्या…(लाईफ गोज ऑन!)

पुढील भागात ओतारू पाहूया …

— प्रणाली मराठे

Avatar
About प्रणाली भालचंद्र मराठे 17 Articles
मी सध्या जपान मध्ये वास्त्यव्यास असून ,येथे जपानी भाषेची भाषांतरकार म्हणून काम करत आहे. जपानी भाषेमध्ये जितके नावीन्य आहे तितकेच या देशामध्ये आणि यादेशातील रहिवाश्यांमध्ये. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या जपान देशाचे सौंदर्य अलौकिक आहे. जे मी आपणापर्यंत माझ्या लेखनाद्वारे पोहोचवू इच्छिते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..