नवीन लेखन...

मी पाहिलेला होक्काइदो – बीएई (जपान वारी)

“नावात काय आहे?”… असं शेक्सपियरने म्हटले आहे!

याचेच जणु उत्तर देऊ पाहणारे डोंगराळ भागातील हे गाव आहे बीएई. बीएई नावाची फोड केली तर सौंदर्य+स्पार्कल असा अर्थ होतो. स्पार्कल म्हणजे काय असावं ? तर चकाकी, चमक, तेज, उमेद,  इ.नावातच सौंदर्य असलेले हे बीएई. यांच्या संकेतस्थळाला (वेबसाइट) भेट दिल्यावर एक उत्तम टॅगलाईन दिसते.

–Welcome to Biei where your heart is reflected–
बीएई हे साप्पोरो शहरापासून साधारण अडीच तासाच्या अंतरावर आहे. त्याबरोबरच होक्काइदो मधील दुसरे मोठे शहर असलेल्या ‘आसाहीकावा’ पासुन अर्ध्याएक तासाच्या अंतरावर आहे. त्यामुळे बीएई ला येण्याकरीता रेल्वे आणि बस बरोबरच हवाईमार्ग हा सुद्धा एक पर्याय उपलब्ध आहे.

साप्पोरो स्टेशन पासुन ‘कामुई’ आणि ‘लाईलॅक’ या लिमिटेड एक्सप्रेस धावतात ज्या आसाहीकावा शहरापर्यंत पोहोचवतात. लाईलॅक हे होक्काइदोला स्प्रिंग मध्ये दिसुन येणाऱ्या फुलाचं नाव आहे.  लिमिटेड एक्स्प्रेसने प्रवास करून आसाहीकावा पर्यंत येऊन, पुढे ‘फुरानो लाईन’ ने बीएई असा प्रवास करायचा. बीएई रेल्वे स्टेशन पासुन बऱ्याच स्पेशल प्रवासी बसेस पुढे प्रसिद्ध ठिकाणांपर्यंत घेऊन जातात. (गुगल मॅप वरती या स्पेशल बस दिसत नाहीत) यांच्याबद्दल स्टेशन जवळच्या चौकशी खिडकी मध्ये उत्तम रीतीने माहिती पुरवली जाते. अजुन एक पर्याय म्हणजे सायकल सवारी ! रेंट वरती उपलब्ध असलेल्या या सायकल चालवत बीएई  फिरणे म्हणजे अतिशय सुंदर अनुभव.

असं म्हणतात की इथल्या  लॅंडस्केप चा जन्म ‘तोकाची’ पर्वताच्या उद्रेकातून (Eruption) झाला. बीएई मधील पूर्वजांनी येथे शेती करण्यास सुरुवात केली. इथे खासकरुन गव्हाचे उत्पादन होते आणि इथे पिकणाऱ्या गव्हाचे पीठ हे इतर ठिकाणांपेक्षा चवीला गोड लागते असे म्हणतात. संपुर्ण होक्काइदो मध्ये सर्रास पिकवले जाणारे पिक म्हणजे बटाटा. ते पण इथे घेतले जातेच. वेगवेगळ्या तीन प्रकारचे आणि निराळ्या रंगसंगतीचे बटाटे होक्काइदो मध्ये पिकवले जातात. तर हा होक्काइदो जपानचा कृषी प्रदेश आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.
एखाद्या प्रदर्शनात जश्या व्यवस्थित वस्तु मांडुन ठेवाव्यात अगदी तश्याच प्रकारे कुणीतरी मांडुन ठेवली असावीत अशी युरोपियन शैलीची बांधणी असणारी घरे बीएई मध्ये आहेत. एक विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे इथल्या साधारणपणे प्रत्येक इमारतीं आणि घरांवरती, बांधणी झाल्याचे वर्ष नमुद केलेले दिसले.
मी आखलेल्या प्लॅन नुसार, इथे दोन जागा पाहायच्या अस पक्क केलेलं होतं, ‘शिरागाने ब्लु पॉन्ड’ आणि ‘शिकिसाई नो ओका’. नेमकं त्या दिवशी दोन्ही पैकी एकाच जागेला जाता येणारी बस उपलब्ध होती.
‘शिरागाने ब्लु पॉन्ड’ बीएई स्टेशनच्या बसस्थानका पासुन २५-३० मिनिटांच्या अंतरावर आहे. दोहोकू बस आपल्याला तिथे घेऊन जाते. बस मधुन दिसणारं बीएई शहर अनुभवत बीएई गावातुन फिरताना, तुरळक वस्ती आणि लांबच्या लांब पसरलेली शेते हेच दिसुन येते. रस्त्याच्या कडेला असणारी दाट झाडी दिसायला लागली आणि आपण तलावाच्या जवळ पोहोचतोय असं वाटायला लागलं होतं.
आपल्या कोकणात नाहीका कधी कधी दिसतो एखादा बस स्टॉप, आडवाटेवर, निर्मनुष्य जागेवर. तसाच हा इथे असलेला तळ्याच्याच नावचा बस स्टॉप दिसला, परतीच्या बसची वेळ पाहुन ठेऊन मी पॉन्ड च्या दिशेने निघाले.
“अजूनही रस्त्यातुन झाडी आणि पुढे जाणारी पक्की पायवाट हेच दिसतंय की, हाच आहे ना तो शिरागाने ब्लु पॉन्ड नक्की ?” असा भीतीसदृश्य प्रश्न मनात रेंगाळुन गेला. आणि त्यात भर म्हणुन की काय पाऊसाची रिपरीप सुरु झाली.
अजुन ५ मिनिटे चालत राहिल्यावर समोर निळ्याशार रंगाच पाणी आणि त्यात उभी असलेली झाडांची उंच सडपातळ खोडं दिसायला लागली. आकाशाचे प्रतिबिंब पडुन पाणी निळं दिसतंय असं वाटतं पण तसं नाहीये. पाण्यामध्ये असलेल्या काही रसायनांमुळे त्याचा रंग निळा दिसतो. हा मनुष्यनिर्मित पॉन्ड आहे. ‘तोकाची’ पर्वतातुन होणाऱ्या उद्रेकापासुन बीएईचे रक्षण करण्याकरीता घेण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपायांमधुन हा तयार झाला.
थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि ह्या पाण्यात आकाशाचे आणि कापसा सारख्या दिसणाऱ्या शुभ्र पांढऱ्या ढगांचे प्रतिबिंब दिसायला लागले. आणि वाटलं, ह्या पॉन्डच्या शांत रुपाकडे पाहूनच माउंट तोकाची आज उद्रेकाविना उभा असावा का ?
पॉन्ड पाहुन पुन्हा बीएई स्टेशनला पोहोचले. मग पुढचं ठिकाण पाहिलं ते म्हणजे ‘शिकीसाई नो ओका’ इथे जाण्यासाठी मी बीएई स्टेशन वरुन फुरानो लाईन ने ‘बिबाऊशी’ नावाच्या स्टेशन वर उतरले आणि तिथुन रेंटवर मिळणारी सायकल घेऊन फिरत फिरत थेट शिकीसाई नो ओका येऊन पोहोचले. ह्या सायकल सवारीची आयडिया मला बीएई स्टेशन वरच्या चौकशी खिडकीतल्या कर्मचारी काकूंनी दिली.
“शिकीसाई नो ओका” ह्या जागेबद्दल सांगायचं तर अशी कल्पना करा की, एक मध्यम उंचीची टेकडी थंडी वाजूनये म्हणुन रंगीबेरंगी फुलांची नक्षीदार शाल पांघरुन बसलीये. आजुबाजुला सुंदर डोंगर आणि लांबच लांब पसरलेले फुलांचे शेत. काय सुंदर होती ती फुले आणि त्यांचे ते विविध रंग!
हे सभोवतालचे रंग पाहत असतानाच, समोर दिसायला लागली सुरेख अशी इंद्रधनुष्याची कमान! आजचा दिवस माझा! असं वाटुन गेलं ते पाहुन! एक कमान पाहुन मनाचं समाधान झालं नसावं कदाचित,म्हणुनच की काय परत निघाल्यावर सुद्धा सलग तीन ते चार वेळा इंद्रधनुष्य पडलेलं पाहिलं. पुन्हा नक्की येण्याकरता पर्यटकांकडुन घेतलं जाणार प्रॉमिस असावं का हे? विशेष आहे नाही का?

इंद्रधनुष्याशी लपाछपी चालुच असताना पुढे परत ढगांचा पडदा उघडला आणि…

“पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!” असं म्हणतच दुहेरी इंद्रधनुष्य (डबल रेनबो) ने दिमाखदार एन्ट्री केली. डबल रेनबो पहिले मी. काय सांगु ,वाह! एका वर एक फ्री चा आनंद!
शब्द नाहीयेत त्याचे सौंदर्य वर्णन करण्यासाठी.
सायकल परत करुन पुढे निघाले, बिबाऊशी स्टेशन जवळच गावातल्या दोन शाळकरी मुलींनी सुद्धा अगदी आपुलकीने मला ओरडून हात दाखवुन इंद्रधनुष्य पडल्याचं जेंव्हा सांगितलं ना, तेंव्हा मला इथली माणसं पण मनानी कित्ती सुंदर आहेत ते जाणवलं.
आम्ही तिघी तेंव्हा एकसारख्या दिसत होतो बहुतेक, कारण तिघींच्या चेहऱ्यांवरती एक गोष्ट सारखीच होती, आनंद!
बीएई (सौंदर्य+स्पार्कल) या शब्दांत लपलेल्या अनेक शब्दांचा अर्थ अत्ता कुठे समजलाय अशी नव्याने खात्री पटली. कधीच न विसरता येणारा अनुभव गाठीशी बांधुन मी परतले, पुन्हा नक्की जाण्याचं मनाशी पक्क करुन…
— प्रणाली मराठे
(पुढील भागात जाऊयात दाइसेत्सुझान पर्वतांच्या दुनियेत …)

Avatar
About प्रणाली भालचंद्र मराठे 17 Articles
मी सध्या जपान मध्ये वास्त्यव्यास असून ,येथे जपानी भाषेची भाषांतरकार म्हणून काम करत आहे. जपानी भाषेमध्ये जितके नावीन्य आहे तितकेच या देशामध्ये आणि यादेशातील रहिवाश्यांमध्ये. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या जपान देशाचे सौंदर्य अलौकिक आहे. जे मी आपणापर्यंत माझ्या लेखनाद्वारे पोहोचवू इच्छिते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..