नवीन लेखन...

आनो ही! (तो दिवस!)

ह्या वर्षी म्हणजेच ११ मार्च २०२१ रोजी जपान देशाने भोगलेल्या त्सुनामीच्या हाहाकाराला दहा वर्ष पुर्ण झाली!
हो. . हे तेच दृश्य, जे आपण सगळ्यांनी आपापल्या घरी बसून टी व्ही वर पाहीलं..
कोणी वाचलं असेल त्याबद्दल, काहींनी ऐकलं असेल..

प्रचंड मोठा पाण्याचा लोढा जमिनीवर येऊन; घरे, गाड्या ,माणसे सारे काही वाहुन घेऊन जातोय! भयानक दृश्य!
काही जणांना कदाचित त्याबद्दल माहिती नसेल तर काही जणांना त्याचा पूर्णपणे विसर पडला असेल…

२०११ साल असा एखादा संहारक दिवस घेऊन येईल ह्याची कुणी कल्पना देखील केली नव्हती. त्यास आज एक दशक आज उलटून गेलं..

जपानच्या सुंदर जागांबद्दल लिहिताना इथल्या उणीवा, संकटे आणि त्यांना धीराने सामोरी जाणारी माणसे ह्यांच्याबद्दल देखील सर्वांना नक्कीच परिचय करून द्यावा हा उद्देश आहे हा लेख लिहिण्यामागे!

‘जगण्याची आशा’ मनात सतत जागृत ठेवणार्‍या जपानी नागरिकांना कायमच महाभयंकर अशा अनेक गोष्टींना सामोरे जात राहावे लागते.
जगात सहजा-सहजी घडल्या नाहीत अशा अनेक गोष्टी. मग अणुबॉम्बचा संहार असो, भूकंप, चक्रीवादळ ते समुद्राचे असुरी रूप दाखवणार्‍या महाभयंकर लाटा त्सुनामी असो.. सारे ह्या देशाने भोगले आहे.

निसर्गाने जेवढी कृपा ह्या देशावर केली आहे तेवढीच अवकृपा देखील ह्या देशाच्या वाटेला आलेली आहे.

११ मार्च २०११.. दुपारी २ वाजून ४६ मिनिटांनी साधारण ९ रिश्टर स्केलच्या भूकंपाने जपानला जबरदस्त धक्का दिला, ह्या भूकंपामुळेच आलेल्या त्सुनामी मुळे आत्ता पर्यंतच्या सगळ्यात उंच ४० मीटर च्या लाटा आसपासचा परिसर नामशेष करीत; जगाच्या मनात कायमचं भयावह चित्र कोरूनच; अवघ्या काही मिनिटांमध्ये मागे फिरल्या!

डोळ्यासमोर आपली जिवलग माणसे, आपल घर सार काही वाहून जाताना पाहणे आणि नुसते पाहत राहणे हे फीलिंगच महाभनयनाक आहे. ह्यातून बाहेर निघणे अवघड अशी परिस्थिती असताना एक संकट समोर उभे ठाकले. ते होते ‘फुकुशिमा दाईची प्लांट’ मध्ये कूलिंग सिस्टीम बंद पडल्याने झालेले रेडिऐशन व त्यामुळे घोषित केलेली आणीबाणी.. लाखो लोकांना आपलं राहतं घर गाव सगळं सगळं सोडून रिलोकेट व्हावे लागले. “कधी परत येता येणार का आपल्या गावी?”  हा प्रश्न त्यांच्या मनात थैमान घालत नसेल तर नवलचं आहे. दशक उलटून गेलं असलं तरी काही जागांवरती अद्याप सुद्धा जाता येत नाही. जपानने तात्पुरती व्यवस्था केलेली घरे (टेम्पररी शेल्टर हाऊस) आणि त्याच घरांना आपलं मानून राहण्याचा प्रयत्न करणारे नागरीक पाहायला मिळतात. बऱ्याच जागांवरची आणीबाणी उठवूनसुद्धा नागरिक परत त्यांच्या मुळ गावी, स्वत:च्या हक्काच्या घरी जायला तयार नाहीत. ‘घोस्ट टाऊन’ बनून गेलेल्या ह्या जागा ओस पडलेल्या आहेत.

भूकंप त्या पाठोपाठ आलेली त्सुनामी आणि सिसॅमिक रेडिएशन असा तिहेरी प्रहार करणारे संकट ज्यातून बाहेर येण्यासाठी जपान सारख्या देशाला १० वर्ष लागतात, तरीसुद्धा पूर्णपणे बाहेर येताच येणार नाही अशा अनेक जखमा घेऊन उभे असलेले ह्या देशातील नागरिक पाहून नि:शब्द व्हायला होते. हजारो लोकांनी आपला जीव गमावला लाखो लोकांनी घरदार व आयुष्यातील सगळंच!

ह्या ‘हिगाशी निहोंन दाईशिनसाई (Tohoku earthquake)’ बद्दल समजलेल्या काही गोष्टींबद्दल बोलायचे झाले तर गुगल वरती उपलब्ध असलेल्या अनेक आर्टिकल्स मधून काही धक्कादायक गोष्टी समजल्या.  असे म्हटले जाते कि जगातला चौथ्या क्रमांकावरचा हा भूकंप आणि त्याचे परिणाम जपान बरोबरच जगातल्या बाकी काही गोष्टींवर सुद्धा झाले आहेत. जसे अंटार्टिका खंडामधील हिमनग वितळले, भूकंप झाला तेथील समुद्रा खालील भागाच्या गुरुत्वाकर्षण शक्ती मध्ये बदल आढळले. तसेच काही मायक्रो सेकण्डस ने पृथ्वी वरील दिवस कमी झाला असे काही तर्क शास्त्रज्ञ व गणितज्ञ यांनी मांडलेले आहेत.

मनुष्याला प्रयत्न केल्यास अशक्य काही नाही असे सिद्ध करतच अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी वास्तवात उतरवणारा हा देश. परंतु म्हणतात ना शेवटी निसर्गापुढे कुणाचे काहीही चालत नाही. नैसर्गिक आपत्ती ह्या टाळता न येणार्‍या, हाताबाहेरच्या गोष्टी असल्याने, घाबरून रडत राहण्यापेक्षा सामना करत  त्यांच्या बरोबरीने आयुष्यात पुढे चालत राहणे जपानी लोकांना चांगलेच ठाऊक आहे.

मनुष्याला शक्य असतील असे सगळे प्रयत्न करत अशक्य वाटणाऱ्या गोष्टींवरती सुद्धा कशी मात करता येईल ह्याचा झपाटल्यासारखा विचार करत असतात का काय हे जपानी? असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही. प्रयत्नांना यश मिळेपर्यंत ध्येयाचा पाठपुरावा करत राहण्याचं बळ ह्या लोकांना सतत पाठलाग करणाऱ्या नैसर्गिक आपत्तिमुळेच मिळाल असावं अस नेहमी वाटत.

जगातल्या शंभराहून अधिक देशांनी जपानला मदतीचा हात पुढे करत ह्या आपत्तितून बाहेर पडण्यासाठी आपला हातभार लावला. प्रचंड दु:ख सहन करत असणार्‍या आपत्तीग्रस्तांना जगण्याची नवी उमेद आणि बळ मिळावं म्हणून शक्य ते सर्व प्रयत्न केले गेले आणि आजही चालूच आहेत. ह्यातील शेकडो उदाहरणे ह्या सरलेल्या दशकात रोज समोर येत गेली. आर्थिक, मानसिक, शारीरिक शक्य असेल ती मदत करत माणूस माणसासाठी उभा होता.. अजूनही उभा आहे.

जपानच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे १ मिनिट आधी भूकंपाबद्दल सूचना मिळाल्याने बऱ्याच फैक्ट्री आणि एक्सप्रेस ट्रेन थांबवल्याने बरीच मनुष्यहानि टाळण्यात जपानला यश आले. त्सुनामी बद्दलची वॉर्निंग सुद्धा १५ मिनिटे आधी जाहीर केली गेली परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात उंच लाटा वेगाने आत शिरतील आणि कोलाहल माजवतील ह्याचा कुणालाच पत्ता लागला नाही. फक्त ६८% लोकांनी नैसर्गिक आपत्तिच्या वेळी पाळण्यात येणार्‍या प्रोटोकॉल च पालन करत  शक्य तेवढ्या उंच जागी जाण्याचा प्रयत्न केला बाकी लोकांनी बेफिकिर राहून भयानक आपत्ती ओढवून घेतली असे सांगण्यात येते.

जपानमधे अतिशय जागरूकतेने आपत्ती व्यवस्थापन (डिझॅस्टर मॅनेजमेंट) केले जाते. आपत्कालीन व्यवस्था उत्तम आहे.  नैसर्गिक आपत्ती उध्दभवल्यास त्या परिस्थिती मध्ये घ्यावयाची काळजी व प्रोटोकॉल विषयी नागरिकांना नेहमी जागरूक केले जाते. वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते. वादळ अथवा भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्ती विषयी वारंवार माहिती जाहीर केली जाते. प्रत्येक नागरिकांच्या मोबाइल वरती तसेच टीव्ही व रेडिओ वरती शक्य तेवढे आगाऊ (साधारण १ मिनिट आधी ) अलर्ट दिले जातात. प्रत्येक घरामध्ये व कामाच्या ठिकाणी ऑफिसेस मध्ये इमर्जन्सी किट ठेवणे बंधन कारक आहे. संकटांच्या वेळी पॅनिक न होता स्वत:चा जीव वाचवणे गरजेचे आहे त्याकरिता प्रत्येक नागरिकाने  नैसर्गिक आपत्तिच्या वेळी घ्यायची काळजी व नियम यांचा अभ्यास जरूर करावा!

ह्या भूकंपाने जात पात, धर्म, देशा-देशातील वैर, सीमा रेषा वाद, महासत्ता स्पर्धा, हक्क, अधिकार इ. साऱ्या पलीकडे जाऊन माणूस माणसासाठी उभा राहणे हे महत्त्वाचे; असे सिद्ध केले. त्याबरोबरच इतरही अनेक महत्त्वाचे धडे दिले असं मला वाटते.

निसर्गा पेक्षा माणूस मोठा नाही, निसर्गाने रौद्र रूप घेतले तर माणसाचा मागमूस नाहीसा केल्या वाचून राहत नाही त्यामुळे शक्य तेवढा त्याचा अपव्यय टाळावा. आपल्या येणार्‍या पुढील पिढ्यांसाठी निसर्ग जपणे गरजेचे आहे. आयुष्याच्या चक्रव्यूहात गुंतलेल्या माणसाने आभाळाला हात लावण्याच्या प्रयत्नात असताना ..पाय कायम जमिनीवर टिकवतच पुढे जावे हे महत्त्वाचं आहे.

क्षणात होत्याचे नव्हते करणारा ‘आनो ही’ (तो दिवस) विसरून चालणार नाही.

२०१३ साली जपानच्या फुकुशिमा-मिनामी आईझू  भागाला भेट देण्याची संधी मिळाली.
तेंव्हा तेथील लोकांशी साधलेला संवाद व एक आयुष्यभर जपलेली आठवण ‘सासुकेने’ (म्हणजे लोकल भाषेत -सगळं ठीक होईल !)..

Avatar
About प्रणाली भालचंद्र मराठे 17 Articles
मी सध्या जपान मध्ये वास्त्यव्यास असून ,येथे जपानी भाषेची भाषांतरकार म्हणून काम करत आहे. जपानी भाषेमध्ये जितके नावीन्य आहे तितकेच या देशामध्ये आणि यादेशातील रहिवाश्यांमध्ये. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या जपान देशाचे सौंदर्य अलौकिक आहे. जे मी आपणापर्यंत माझ्या लेखनाद्वारे पोहोचवू इच्छिते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..