नवीन लेखन...

मी पाहिलेला होक्काइदो – दाइसेत्सुझान (जपान वारी)

होक्काइदो मधील पर्वतांची दुनिया!

जपानमधील सर्वात मोठे नॅशनल पार्क म्हणून प्रसिद्ध असणारे हे दाइसेत्सुझान. साधारण २ हजार मीटर (६६०० फूट) पेक्षा जास्त उंच भव्य बर्फाच्छादित पर्वत (Great Snowy Mountains) येथे पाहायला मिळतात.

कमीत कमी मानवी हस्तक्षेप असणारा हा प्रदेश, नैसर्गिक विविधता आणि सौंदर्य मिरवत ताठ मानेने उभा आहे. याचा विस्तार पाहता हे राष्ट्रीय उद्यान जपान देशातील काही छोट्या राज्यांपेक्षा (prefectures) बरेच मोठे आहे. पर्वतारोहक (हायकर्स), मैदानी प्रेमी यांच्यासाठी पर्वणी असलेली ही दुनिया, अनेक दुर्मिळ वन्यजीव प्रजातींचे निवास स्थान, हरणे आणि तपकिरी अस्वले यांचे नंदन वन अशी ह्या दाइसेत्सुझानची ख्याती आहे.

निसर्गाची रंगपंचमी म्हणजेच ऑटम ऋतु आणि हिमवर्षाव या दोन्हीची जपान मधील सुरूवात इथे होते.

दाइसेत्सुझानमध्ये अनेक सुंदर ठिकाणे आहेत त्यामुळे काय आणि किती पाहावे? अश्या प्रश्नात अडकलेले असतानाच आपल्याला वेळेचं भान राखण अवघड होऊन जाते. स्वानुभव! ठिकाणे निवडण्याच्या नादात माझी बस चुकली आणि एका नवीन सुंदर जागी येऊन मी पोहोचले. कुठे आणि कशी ? पाहूया…

बऱ्याच ठिकाणांची माहिती वाचून अखेर मी फायनल केले ‘माउंट कुरोदाके.’

साप्पोरो-आसाहीकावा-कामिकावा असा रेल्वे प्रवास करायचा. ओहत्सक नावाची रेल्वे कामिकावा पर्यंत घेऊन जाते व कामिकावा स्टेशन पासुन बसने दाइसेत्सुझान मधील विविध ठिकाणांपर्यंत जाता येते.

होक्काइदो मध्ये आसाहीकावा या मुख्य शहरापासुन आत मध्ये पसरलेल्या ठिकाणी जाणारी रेल्वे, जपानमधील इतर ठिकाणांसारखी फारशी मॉडर्न रचना आणि सोयीसुविधा असलेली नसली तरी छान सुटसुटीत आहे. या गाड्यांना दोन रूंद डबे आणि प्रत्येकी दोन दरवाजे आहेत.

पुण्यामुंबईत खुप गर्दी असलेल्या लोकल किंवा बस मधून प्रवास करताना, जसे नेहमीच्या वापरातील ओळखीचा स्टॉप असला तरीही त्याच्या अलीकडे येणाऱ्या स्टॉप पासूनच उतरण्याची तयारी सुरु करायला लागते नाही का? तसेच इथे प्रवासी करत होते.

प्रवासात वाटेत लागणारी बरीच स्टेशन्स सुद्धा निर्मनुष्य आणि अगदी साधीशी होती. काही ठिकाणी तर मला वाटुन गेलं इथे लोकं राहत असावेत का? असले तर कोणी रेल्वे ने प्रवास करतात का? इतकी शांतता!

कामिकावा स्टेशन आलं तरी सुद्धा मला असंच वाटत होत. पण उतरल्यावर स्टेशन मास्तर काका दिसले. अक्ख्या स्टेशन वरती तेवढा एकमेव कर्मचारी असणे, हे मी पहिल्यांदाचं बघितलं.

स्टेशन बाहेर आल्यावर दाइसेत्सुझान पर्वतरांगांची माहिती देणारा सुंदर नकाशा समोरच दिसला आणि हुश्श पोहोचलो एकदा अशी खात्री झाली. कामिकावा स्टेशन व आसपास चे आवार सुद्धा आटोपशीर आणि स्वच्छ आहे. बस स्टॉप जवळच आहे आणि तिथुन सुटणाऱ्या बसेस चे वेळापत्रक आणि इतर माहिती अगदी नीट लिहिलेली आहे. दाइसेत्सुझान व्याप्त भाग हा शहरांपासून बराच दूर असल्याने परतीच्या गाड्यांची माहिती आणि वेळा आधीच पाहुन घेणे आणि पुढील प्लॅन आखणे उत्तम!

स्टेशन वरून `माऊंट असाहिदाके’ (दाइसेत्सुझान रांगांमधला सर्वात उंच) पर्वत स्पष्ट दिसतो. ते पाहण्याच्या नादात ५ मिनिटांच्या अंतराने माझी बस चुकली. पुढची बस बऱ्याच अंतराने होती त्यामुळे आता काय? अश्या विचारात, ‘होक्काइदो आईस पॅव्हिलिअन’ या ठिकाणी जाऊन यायचं मी ठरवलं.

(प्लॅन बी आधीच केला होता बरंय!)

आईस पॅव्हिलिअन म्हणजे होक्काइदो मध्ये सहा-एक महीने सतत पडणाऱ्या बर्फाचा आणि हवामान बदलाचा अनुभव देणारी जागा आहे. पॅव्हिलिअन मध्ये जाण्याआधी सगळ्या पर्यटकांना एक युनिफॉर्म (थंडीचा कोट) व हातमोजे देतात. आतमध्ये फिरताना काही आखलेल्या ऍक्टिव्हिटी आणि खराखुरा वाटावा असा बर्फ आणि तत्सम देखावे, सगळं काही मजेशीर आहे. कन्सेप्ट छान वाटली मला एकंदर.

वजा ४२ डिग्री सेल्सिअस (होक्काइदो ने नोंदवलेलं आत्तापर्यन्त चे किमान तापमान) फक्त ३० सेकंद अनुभवणे सुद्धा महाकठीण होते. कसे काय हे लोकं इथे राहत असावेत?

हे सर्व सहन होत नाही असे वाटत असल्यास आतमध्ये छोट्या हीटर रूम ची सोय आहे. संपूर्ण पॅव्हिलिअन फिरून झाल्या नंतर, बाहेर आल्यावर त्या तापमानाचा त्रास होऊ नये म्हणुन गरमागरम ओचा आणि ओकाशी (ग्रीन टी आणि स्वीट्स) असं आपल्या करता तयार असतं. ह्या पॅव्हिलिअन च्या बाहेर ऐनु संस्कृती बद्दल ची माहिती देणारी घरे आहेत आणि कुमा (अस्वल) पार्क सुद्धा आहे.

फक्त होक्काइदो मध्ये येणारे पांढरे वासाबी (बाकी ठिकाणचे हिरवे असतात) इथल्या वस्तू विक्री करणाऱ्या केंद्रातल्या एका कर्मचारी व्यक्ती ने मला खास टेस्ट करायला दिले. वासाबी म्हणजे जपान मध्ये मिळणार खाद्यपदार्थ (स्पाईस म्हणु) आहे. जो सुशी सारख्या प्रसिद्ध जपानी खाद्यपदार्थां बरोबर तोंडी लावण्यासाठी सर्रास वापरला जातो. याची चव अतिशय उग्र असते. जपानला स्वतःची अशी एक वेगळी खाद्यसंस्कृती आहे.जागोजागी याचा सतत प्रत्यय येत राहतो.

दाइसेत्सुझान नॅशनल पार्कमधील सर्वात सहजपणे सर होणाऱ्या प्रमुख शिखरांपैकी एक म्हणजे माउंट कुरोदाके, उंची १९८४ मीटर. तो सहज पाहता आला ते इथे असणाऱ्या रोप वे आणि चेअर लिफ्टमुळे. एवढ्या उंचीवर मी आयुष्यात पहिल्यांदाच गेले होते.

वरती पोहोचल्यानंतर पर्वताच्या सभोवताली दिसणारे विलोभनीय दृश्य पाहुन होणारा आनंद, वरून खाली पाहताना वाटणारी अनामिक भीती, सुखरूप ने-आण करत इतक्या उंची वर सहज पोहोचवणारा रोप-वे व चेअर लिफ्ट अनुभवताना वाटणारे  आश्चर्य आणि एक दृढ विश्वास.

हे सारंच अशा प्रकारच्या कित्तीतरी भाव भावना एकत्र बांधुन ठेवणारं आणि विचारशक्तीला चालना देणारं वाटलं मला!

प्रत्येक व्यक्ती खास आहे. Unique! आयुष्यात उंची गाठायची असेल तर मार्गात येणाऱ्या अडचणींवर मात करून, पुढे प्रयत्न चालु ठेवल्यानेच ते शक्य होते, पण हे सगळं करताना स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. म्हणतात ना बऱ्याच वेळा सगळी उत्तरे समोरच असतात, बस देखने की देर है!

ह्या कुरोदाके पर्वतावर ऑटोम ऋतु (कोयो) आणि बर्फ असं एकत्र अनुभवता आलं जे जपानमध्ये इतरत्र फारसं दिसुन येत नाही.

या लेखमालेच्या मागील भागांमध्ये पाहिल्या प्रमाणेच मी पाहिलेला होक्काइदो हा अतिशय सुंदर अनुभूती देणारा होता.

प्रत्येक जागेच सौंदर्य वेगळं उठुन दिसणारं वरती सांगितल्याप्रमाणेच अगदी Unique! ह्या सुंदर जागा कायमच होक्काइदोला भेट देणाऱ्या  पर्यटकांच्या  मनावर  त्यांचा ठसा उमटवत असणार यात शंका नाही.

जपान मध्ये आल्यावर, एकदा ह्या होक्काइदो ला नक्की भेट द्यायला हवी!

हा मी पाहिलेला होक्काइदो आपल्याला आवडला असेल अशी आशा करते.

© प्रणाली मराठे

 

Avatar
About प्रणाली भालचंद्र मराठे 17 Articles
मी सध्या जपान मध्ये वास्त्यव्यास असून ,येथे जपानी भाषेची भाषांतरकार म्हणून काम करत आहे. जपानी भाषेमध्ये जितके नावीन्य आहे तितकेच या देशामध्ये आणि यादेशातील रहिवाश्यांमध्ये. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या जपान देशाचे सौंदर्य अलौकिक आहे. जे मी आपणापर्यंत माझ्या लेखनाद्वारे पोहोचवू इच्छिते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..