नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३५)

उत्तम मैत्र हे भाग्याने लाभते ! खरी श्रीमंती तीच असते ! त्या बाबतीत मी भाग्यवंतच.

मागील एका भागात मी ज्येष्ठ साहित्यिक गुरुवर्य प्राचार्य डॉ. द. ता.भोसले या अत्यन्त विद्यार्थीप्रिय अशा आमच्या कॉलेजच्या मराठीच्या प्राध्यापकांचा उल्लेख केला आहे. ते सध्या पंढरपूरला स्थायिक आहेत. अचानक एकदिवस आम्हा मित्रातील पूर्वाश्रमीची भगिनी (सातारच्या डॉ. महाजनी यांची मुलगी) सौ.मृदुला उदयराव पराडकर आमच्या एका मित्रांच्या गेटटूगेदरला भेटली होती. तेंव्हा गुरुवर्य द.ता भोसले सरांची आठवण निघाली. अगदी लगेचच सरांना भेटावयास जायचे ठरले देखील. तिने सरांना फोन केला दिवस ठरला. आणी आम्ही मित्र म्हणजे मी श्रीपाद फाटक , जयंत उमराणी , हेर्लेकर , बसवराज हिरेमठ आणी सौ.मृदुला व तिचे पती श्री.उदयराव पराडकर आम्ही पंढरपूरला सरांच्या बंगल्यावर पोहचलो देखील.

आपल्या आवडत्या गुरूंना भेटणे हा आनंद अवर्णनीय आहे. ८५ वर्षांचे सर आमची आतुरतेने वाट पहात पंढपुरमध्ये मेन रस्त्यावर येवून उभे होते. सरांनी व त्यांच्या पत्नीने आमचे अत्यन्त आनंदाने स्वागत केले. साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ.द.ता.भोसले म्हणजे अगदी उत्तुंग असे व्यक्तिमत्त्व! ते माझे गुरू याचा मला अभिमान आहे. अनेक आठवणींची उजळणी झाली. त्यांच्या घरात चहापाणी , उपहार यथेच्छ गप्पा झाल्या. आम्ही सर्व येणार म्हणून त्यांचे काही मित्र देखील आले होते. सरच आम्हाला म्हणाले आता तुम्ही आला आहात तर आपण पांडुरंगाचे दर्शन घेवून येवू.

आम्ही निघालो. गाडी पार्किंगमध्ये पार्क केली. मंदिरात सरांच्या सोबत चालत निघालो. सरांची रहाणी अगदी साधी , फक्त नुसता नेहरू शर्ट आणी पायजमा. पण या गुरुवर्य द.ता. भोसले सरांच्या परिचयाचं पंढरपुरातील वलय एवढं मोठं होतं की रस्त्यावरील दुतर्फा माणसं त्यांना अदबीने नमस्कार करीत होती. आम्ही पहातोय तेंव्हा पासून सर अत्यन्त नम्र आणी लाघवी व्यक्तिमत्व. समाजात अशा व्यक्ती खुपच दुर्मिळ असतात. आमच्या बरोबर सर असल्यामुळे आम्हा सर्वांना मंदिरात पांडुरंगाचे अगदी मुक्त मनसोक्त व्हीआयपी दर्शन झाले. हा ही आमचा भाग्ययोग होता. असेच म्हणावे लागेल. तेथून त्यांनी सुरू केलेल्या लायब्ररी मध्ये देखील सर आम्हाला घेवून गेले विशेष म्हणजे सरांनी माझा व मृदुलाचा अगदी हार घालून जो सत्कार केला त्या प्रसंगांनी आम्ही भारावून गेलो.

माझ्या वयाच्या ७० व्या वर्षी आमचे शिक्षक प्राध्यापक , दिगग्ज साहित्यिक गुरुवर्य प्राचार्य डॉ.द.ता.भोसले यांच्या हस्ते सन्मान होणं ही घटना सर्वोच्य पुरस्कार आहे हे मी मानतो.

त्यानंतर आम्ही सर्वच जेवणासाठी एका छान हॉटेलमध्ये गेलो. तेंव्हा उत्तम सुग्रास जेवणा नंतर सर्वांचे बिल सरांनी दिले.आम्हाला निकराने देवू दिले नाही. आम्हाला निरोप देताना सर देखील गहिवरले होते. अशा गुरुवर्य आणी विद्यार्थी अशा नात्याचे वर्णन कुठल्या शब्दात करावे . ही भेट अविस्मरणीय ठरली आणी या भेटीचा वृत्तांत पंढपूरच्या वर्तमान पत्रात देखील छापूनही आला. त्या नंतर सरांनी मला एक पत्र पाठविले आहे.
ते पत्र हे संग्राह्य असा आशीर्वाद आहे. मला आलेली पत्रे या माझ्या पुढील प्रकाशित होणाऱ्या पुस्तकात त्याचा समावेश आहे.

अशा घटनांमुळे मी साहित्य क्षेत्रात रमलो होतो.या क्षेत्रातील अनेक मंडळी मला ऑफिसमध्ये भेटावयास येत असतात. तो एक वेगळाच आनंद असतो. एक दिवस दोन विद्यमान तरुण सुनील खंडेलवाल आणी विवेक पोटे (दोघेही चार्टर्ड अकौंटट) मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असून देखील साहित्यप्रेमी आहेत हे पाहून मला आश्चर्य वाटले पण खरंच कौतुक वाटले. ते दोघेही सतत लिहीत आहेत. सुनीलच्या उत्तम काव्यरचना तर विवेक हा तर समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचा अभ्यासक आहे तोही लिहीत असतो. ही दोन्ही तरुण मुले आजही माझ्या सातत्याने संपर्कात आहेत. त्यांची काव्यानंद प्रतिष्ठान पुणे नावाची साहित्य संस्था आज ५वर्षे उत्तम रीतीने कार्य करते आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर परप्रांतातील आणी पाश्चात्य देशातील साहित्यप्रेमी देखील आज काव्यानंद प्रतिष्ठान या संस्थेच्या सभासद झाल्या आहेत. साहित्याभिरुची तसेच साहित्याचा ध्यास असला की अशा संस्था निर्माण होतात. नोकरी सांभाळून या अशा उत्साही सुनील खंडेलवाल, विवेक पोटे , अमोल शेळके या सारख्या तरुण व्यक्ती साहित्यक्षेत्रात कार्यरत रहातात मग त्यांच्याकडून अजून अपेक्षा वाढतात. या तरुण मंडळींचे सातत्याने कार्यक्रम सुरू असतात. आता करोनाचे वातावरण असले तरी ऑफलाईन शक्य नसले तरी ऑनलाईन कार्यक्रम सुरू असतात आणी त्या सर्व कार्यक्रमांना मला निमंत्रित करतात.

संस्थेतर्फे त्यांनी अनेक ई-बुक्स प्रकाशीत केली आहेत. हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अशा या सर्वच कार्यक्रमातून नेहमीच मला अनेक साहित्यिक, कवी, कलावंत, विचारवंत भेटत असतात.

अनेक साहित्यिक , सांस्कृतिक , संस्थामधून झालेल्या अनेक साहित्यिक मला कार्यक्रमातून अनेक दिगग्ज व्यक्ती भेटल्या त्यामध्ये सर्वश्री विश्वनाथजी कराड , डॉ. सतीश देसाई , श्रीपाल सबनीस , फ. मु. शिंदे , मिलिंद जोशी (मसाप ), राजन लाखे, बंडोपंत जोशी , अरुण रोडे , डॉ. कमलेश सोमण , रंगत संगतचे प्रमोद आडकर , मनोहर सोनवणे , डॉ. मधुसूदन घाणेकर , डॉ. सोनाग्रा. प्रभाताई सोनवणे , ज्योत्स्ना चांदूगडे , गायिका चारुशीला बेलसरे, बबन पोतदार. वसंत गोखले ,धनंजय तडवलकर ,मारुती यादव , तर काव्यशिल्पचे सर्वच कवी मित्र , बाबूजी डिसुझा , डॉ. श्रीकांत नाडगौडा , विजयकुमार कोटस्थाने , डॉ. पद्माकर पुंडे , अशा अनेक महाराष्ट्र प्रदेशातील तसेच परप्रांतातील साहित्यिक ,विचारवंतांचा सहवास लाभला. सर्वांची नावे उदघृत करणं अवघड आहे.

गतवर्षी मध्यप्रदेश मधील भोपाळ येथील मराठी साहित्य अकादमीने पुण्यातील निवडक साहित्यिकांना मराठी भाषा दिनानिमित्त निमंत्रित केले होते. तेंव्हा तेथील मध्यप्रदेश मधील साहित्यिकांचा देखील परिचय झाला आणी सहवास लाभला. त्याबाबत पुढील ३६ व्या भागात मी उल्लेख करत आहे.

वि.ग.सातपुते.

9766544908

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..